लॉकडाऊनच्या दिवसांमधलं गीतरामायण

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
11 Apr 2020 - 9:50 am

गदिमांनी रचलेलं आणि बाबूजींनी गायलेलं गीतरामायण हे काव्य अवीटातलं अवीटच. दुर्दैवाने बाबूजी प्रत्यक्ष स्वतः गात असताना गीतरामायण ऐकण्याचं भाग्य कधी लाभलं नाही मला. पण नंतर एकदा श्रीधरजींच्या मुखातून ऐकण्याचा योग आला आणि त्यांच्याही सुमधुर आवाजाने त्यावेळी मी तृप्त झालो होतो .

तुम्हाला सांगतो त्या कार्यक्रमामध्ये मी अक्षरशः रडत होतो. वास्तविक आपण मोठी माणसं अशावेळी स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो. पण एका क्षणानंतर माझ्या असं लक्षात आलं की आता स्वतःला सावरणं निव्वळ अशक्य आहे. तसंच आजूबाजूला नजर टाकली आणि लक्षात आलं की इतरही बरेच जण रडतातच आहेत. मग म्हटलं कशाला उगाच स्वतःला सावरा? आणि दिली अश्रूंना मुक्त वाट करून. स्वतः प्रभू रामचंद्र म्हणजे निव्वळ त्याग आणि त्यावर रचलेलं भावनांनी ओतप्रोत असं गीतरामायण. मग ते ऐकताना रडू न येणारा मनुष्य असूच शकत नाही खरंतर.

असो, आज त्या गोष्टीवर लिहीणं झालं त्याचं कारण म्हणजे नुकतीच २ एप्रिलला रामनवमी होऊन गेली आणि लॉकडाऊनमुळे थोडा निवांतपणा असल्यामुळे युट्यूब वर गीतरामायण ऐकत बसलो होतो रात्री. टीव्हीवर एकीकडे अमेरिका, इटली, स्पेन सारख्या प्रगत देशांमध्ये दररोज हजारो माणसं मरत आहेत, भारतातही धोका वाढतो आहे आणि कमी प्रमाणात का होईना पण माणसं मरत आहेत या ब्रेकिंग न्यूज येत होत्या आणि त्याच वेळी युट्यूब वर 'पराधीन आहे जगती... ' हे गाणं लागलं. कोरोनामुळे बळी पडत असलेल्यांच्या बातम्या ऐकून आधीच खिन्न झालेलं मन हे गाणं ऐकताक्षणी पुन्हा एकदा अश्रूंना मुक्त वाट करतं झालं.

बाबूजी म्हणत होते, दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा... प्रभू रामचंद्र भरताला हे उद्देशून म्हणत होते. साक्षात परमेश्वर तब्बल १४ वर्षांचा वनवास लाभलेला असूनही कसलाही विकार मनात न आणता यात कुणाचाही दोष नाही असं आपल्या भावाला सांगत होता आणि त्याचवेळी २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे मी मात्र पुरता हवालदिल झालो होतो. भरत रामाला विनवणी करून सांगत होता की वनवास वगैरे काही नाही तू अयोध्येत परत ये आणि राम मात्र वडिलांचा शब्द मोडू नये म्हणून वनवासात जाणंच कसं योग्य आहे ते भरताला सांगत होता आणि त्याच वेळी २१ दिवसांचा लॉकडाऊन असह्य होऊन पोलिसांची नजर चुकवून काही ठिकाणी लोकं कशी बिनदिक्कत गर्दी करत आहेत ते टीव्हीवर दाखवलं जात होतं.

खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा... हे वाक्य ऐकलं आणि चर्रर्र झालं. परिणामांची पर्वा न करता आपणच वाढविलेली बेसुमार लोकसंख्या, बेदरकारपणे निसर्गावर घातलेला घाला, आपल्याला जगता यावं म्हणून इतर प्राणिमात्रांच्या जंगलात केलेलं अतिक्रमण आणि चंगळवादी मानसिकतेत आलेला आत्मकेंद्रीपणा या सगळ्या कर्मांचं पूर्वसंचित बनून तर निसर्गानेच किंवा त्या विधात्यानेच हा कोरोनाचा हाहाकार सुरु केला नाही ना अशी भीती मनात आली. सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत...
जणूकाही माझ्या मनातल्या भितीलाच बाबूजी उत्तर देत होते. मी, माझं, माझ्यासाठी असं करता करता केवढा संग्रह करून बसलो आपण! या लॉकडाऊन मध्ये जाणवलं की खरंतर साधं जगण्यासाठी एवढ्या गोष्टींची आहे कुठे गरज? या लॉकडाऊन मध्ये घरी असूनही जमविलेल्या कित्येक गोष्टींकडे माझं लक्षही गेलं नव्हतं. मग कशाकरता करत होतो हा संग्रह?

काय शोक करिसी वेड्या, स्वप्निच्या फळांचा?... बाबूजी काही युट्यूब वर मागे हटायला तयार नव्हते. निव्वळ ऐहिक व सुखलोलुप अशा माणसाच्या वृत्तीला केवळ समजावून चाप बसवणं आता शक्य होत नाही म्हणून तर निसर्गाने हा रुद्रावतार धारण नाही ना केला? कधी नव्हे ते आज गीतरामायण ऐकताना मन चलबिचल झालं. जगण्यासाठी आणि गरज नसलेल्या गोष्टींच्या संग्रहासाठी आटापिटा करत असताना, मरणानंतर आपल्या कर्मांच्या पूर्वसंचिताने आपल्याला काय गती मिळेल याचा विचार करायची सवड काही सापडलेली नव्हती. त्याचंही कारण लगेच सापडलं जेव्हा बाबूजी म्हणाले, मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा... त्याचा विचार करण्यासाठीच तर हा जबरदस्तीचा २१ दिवसांचा कालावधी मिळाला नाही ना? कितीही उड्या मारल्या तरी आपली धाव जिवंत असेपर्यंतच. कोरोनावरती कालांतराने लस शोधली जाईल. पण मरणानंतर आपल्या पूर्वकर्मांमुळे काय फळं मिळणार याचा शोध याच प्रयोगशाळांमध्ये घेतला जात असेल का?

बळी पडलेल्यांमध्ये मरणाआधी कदाचित कुणीतरी नुकताच कित्येक दिवसांनी आपल्या कुटुंबाला त्यावेळी भेटला असेल, एखादा निवृत्त होऊन पुढच्या आयुष्याची जोडीदारासोबत स्वप्न रंगवत असेल, कुणीतरी आपल्या मुलांच्या लग्नाची धावपळ करत असेल असे विचार येऊ लागले आणि तेवढ्यात बाबूजी म्हणाले, दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाहिं गांठ, क्षणिक तेंवि आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा. वनवासाच्या या दाहक दुःखाची कसलीही तीव्रता आपल्या मनाला लागू न देता प्रभू रामचंद्र आपल्या भावाला म्हणाले, अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा... प्रतिकूल परिस्थितीत सामान्य माणसं तुटून मोडून पडतात पण असामान्य माणसं मात्र सामान्यांकडून अपेक्षित असलेल्या वागणुकीच्या सीमारेषा तोडून उत्तुंग अवस्थेला पोहोचतात. त्यांच्याकडून जमेल तितकं शिकत बसायचं एवढंच आपलं काम असतं.

स्वतःच्या क्षणिक आणि भ्रामक सुखासाठी काही जण पोलिसांची किंवा डॉक्टरांची पर्वा करत नाही आहेत हे टीव्हीवर दाखवलं जात होतं. मला फिरायला मिळालं पाहिजे मग माझ्यामुळे समाजाला त्रास झाला तरी चालेल अशा मानसिकतेच्या माणसांच्या बातम्या दाखविल्या जात होत्या आणि इथे मात्र प्रभू सांगत होते, संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार, अयोध्येस नाहीं येणें सत्य हें त्रिवार...

गाणं पुढेपुढे सरकत होतं आणि मी माझ्या मनात अधिकाधिक खुजा होत चाललो होतो. स्वतःच्या अर्थार्जनासाठी आपल्याच संस्थेच्या किंवा राज्याच्या अथवा देशाच्या इभ्रतीची तमा न बाळगणारी माणसं ब्रेकिंग न्यूज बनवत असतात आणि इथे मात्र प्रभू रामचंद्र भरताला सांगत होते, मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा...

इतर वेळी गीतरामायण ऐकताना पटापट गाणी संपली असं वाटायचं पण आज मात्र हे एकच गाणं सुद्धा बराच वेळच नाही तर किंबहुना आपलं अवघं आयुष्य व्यापून बसलंय असं वाटायला लागलं. गाणं झाल्यावर उठलो खरा पण डबडबलेल्या डोळ्यांपुढे आजवर जमविलेली सगळी माया पुढचा बराच वेळ मला अंधुक दिसत होती.

मांडणीविचारलेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

11 Apr 2020 - 11:03 am | ज्योति अळवणी

गीतरामायण खरंच मनाच्या गभ्यात जपून ठेवलेला ठेवा आहे

शशिकांत ओक's picture

11 Apr 2020 - 11:03 pm | शशिकांत ओक

गीत रामायण पुन्हा गायले जात होते. त्या कार्यक्रमात हवाईदलातील विमानांच्या घरघरीचे प्रचंड आवाज येऊन रसभंग होत असे. तेंव्हा माडगूळकरांच्या चिरंजीवाना सुचवले होते की गीताचे शब्द सरक पट्टीवर दाखवले जायची व्यवस्था करावी...
अनेकदा रस्त्यावरील गोंगाट, अन्य सदस्यांचे मोबाईलवरून मोठ्याने बोलणे यामुळे देखील रसभंग होतो. गाण्याच्या ओळी सरकत्या ठेवल्या तर फार बरे होईल.