लॉकडाऊन चालू आहे. तो कदाचित वाढेल अशा बातम्या येताहेत. किंवा अंशतः हटेल.देशाचा काही भाग सील केला जाईल,काही भाग मोकळा ठेवला जाईल असंही बोललं जातंय. दिवसागणिक रुग्ण वाढताहेत. म्रुतांचा आकडा वाढतोय.बरेचसे भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर झालेत. रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स,नर्सेस इतर स्टाफही कोरोनाला बळी पडतोय.व्ही आय पी लोकांच्या घराच्या आसपासही कोरोना शिरलाय. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आय सी यूत आहेत. राणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्लस् क्वारंटाईन झालेत.
रोजच्या अशा बातम्या वाचून सुन्न व्हायला होतंय.न्यूजपेपर बंद झालेत. टीव्हीवर फक्त कोरोनाच्याच बातम्या. सुरुवातीला जिज्ञासेनं बघितल्या बातम्या,पण आता निर्लज्ज मन इतकं निबर झालंय की त्याच त्याच बातम्या बघायचा कंटाळा आलाय.
'कंटाळा'! .. किती बेशरम झालोय आपण. एखादं हट्टी,मूर्ख मूल नवं काहीतरी हवं म्हणतं तसंच! मग कुठेतरी मारामारी, दगडफेक वगैरेची बातमी हा 'चेंज' वाटायला लागलाय. जणू मनोरंजक बदल.. माध्यमांनीच सारखी 'ब्रेकिंग न्यूज' दाखवून सनसनाटी निर्माण करुन ठेवलीय आपल्या मनात! हावरट झालोय आपण सनसनीखेज बातम्यांसाठी. टीव्ही मालिकाही जुनंच दाखवताहेत. अनेक उद्योग बंद पडलेले. कामगार उपाशी, बेघर झालेले. रस्त्यांवर शुकशुकाट. सिनेमा नाही, नाटक नाही. लायब्ररी नाही. सगळेजण घरांत बंद. आयुष्यच बंद झालंय. थांबलंय. एवढा मोठा देश लॉकडाऊन. तुरुंगवासच.
माझंही मन बंद झालं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. कंटाळून गेले होते. क्रिएटिव्ह काहीच नाही. विरक्ती आली होती. माझा नातू माझ्याजवळ आला. त्याचं तर खेळायचं, धडपडायचं वय. पण तो घरात डांबून राहिलाय.
समजूतदारपणे वागतोय. काहीतरी नवीन तो शोधत असतो. कुणालाही त्रास देत नाही. आपला आपला जीव रमवतो. तो मला म्हणाला,"तुझ्याकडच्या जुन्या सीडीज् मला दे.( घरातला सीडी प्लेयर मोडलेला. आता कुणी दुरुस्तही करुन देत नाही. पूर्वी कॅसेट्स जुन्या ठरल्या होत्या, त्यापूर्वी रेकॉर्ड्सच्या तबकड्या जुन्या ठरल्या होत्या..) मी तुला सीडीवरून पेन ड्राईव्हवर तुझी आवडती गाणी कॉपी करून देतो."
त्याचाही त्यात वेळ जाईल म्हणून मी मलूलपणे उठले. त्याला अंदाजाने अनेक हाताला लागतील त्या सीडीज् काढून दिल्या. त्यानं कॉम्प्युटरवर त्या उघडून त्यातल्या फाईल्स पेन ड्राईव्हवर टाकल्या आणि तो टीव्हीला जोडून मला ऑडिओ ट्रँक लावून दिला.
(वय वर्षें जेमतेम बारा)
पहिलंच गाणं लागलं 'बाबूजी धीरे चलना,प्यारमें जरा संभलना' गायिका गीता दत्त. संगीतकार माझा लाडका ओपी. त्यांतल्या संगीताच्या चटपटीत इंटरल्यूडस् नी माझा कंटाळा पळून गेला. मी उल्हसित झाले. तोंडावर बर्फाचं पाणी मारल्यावर जसं खडबडून जागं व्हायला होतं तसं झालं. एकदम ताजंतवानं , टवटवीत वाटलं. वा!झकास! मग मी माझ्या कोचावर अंग सैलावून बसले. पाय टीपॉयवर पसरले. मान कोचावर मागे टेकली आणि डोळे मिटून ऐकायला लागले. गाणी अँसॉरटेड लागत होती.
"गीता दत्त"नंतर लागलं मन्ना डे , लताचं 'जहॉं मैं जाती हूँ. मग नूरजहॉची'जवां हैं मुहबत, दिया जलाकर आप बुझाया, आवाज दे कहॉं है.' लागली.
नूरजहाँ माझी लता,आशा खालोखाल लाडकी गायिका. मस्त आहे आवाज! तिची बरीच गाणी माझ्या कलेक्शन मधे आहेत. मी तिला प्रत्यक्ष पाहण्याचा प्रश्नच नाही, कारण तेव्हा माझा जन्मच झालेला नव्हता. पण मी तिचे फोटो पाहिलेत. देखणी होती.
मग ऐकली लताची जिया ले गयोजी, आपकी नजरोंने समझा(अनपढ), विकल मोरा मनवा(ममता). लताला मी भेटलीय. तिची मुलाखत घेतलीय. ती मी जपून ठेवलीय. फोटो मात्र नाही. तिचा आवाज अमृतासारखा आहे. तिच्या आवाजाचा कंटाळा येत नाही. तासामागून तास मी तिची गाणी ऐकू शकते.
रफीही माझा लाडका.त्याचं 'ऐसे तो ना देखो', 'हम बेखुदीमें', 'तुझे क्या सुनाऊं' ही ऐकली. 'मेरे मेहबूब तुझे' हे गाणं मला विनाकारण आवडतं. ऐकताना साधनाचे सुंदर डोळे आठवले.
बिचारीचे नंतरचे डोळेही आठवले. रफीही मी तासन् तास ऐकू शकते. त्याच्या आवाजाच्या मी प्रेमात आहे.
लता, रफीच्या आवाजात एक विश्वासार्हता आहे. सच्चेपणा आहे. ते जेव्हा मुझे तुमसे मोहोब्बत है'म्हणतात तेव्हा ते खरं बोलताहेत असं वाटतं. ते सिन्सियर, एकनिष्ठ प्रेमिक वाटतात. आशा ,किशोर तसं म्हणतात तेव्हा वाटतं ते मस्करी करताहेत. लाईटली घेताहेत. टाईम पास करताहेत. अर्थात् हे माझं मत. कुणाला दुखवायचा हेतू नाही.
लताच्या 'श्रद्धांजली'तली काही गाणी ऐकली. त्यात मूळ पंकज मलिकनं म्हटलेलं 'ये राते, ये मौसम,ये हसना हसाना' हे गाणं लताच्या आवाजात ऐकलं. काळजाला भिडतं ते गाणं! लता रफीचं 'याद आने लगी,दिल दुखाने लगी' हे माझं ऑल टाईम फेव्हरिट गाणं. अमीरबाई कर्नाटकीचं 'अखियॉं मिलाके' तलतचं,'फिर वहीं शाम,वही गम,' 'सीनेमें सुलगते हैं अरमान'(लताबरोबर)आशा ,रफीची 'अभी न जाओ,' 'जाने कहाँ होके बहार आयी',आशाची ओपी कडची सर्व गाणी,मला सदैव आवडतात. आणि सुरैय्या! ओहो,लव्हली!' आपसे प्यार हुवा जाता है' कैफी आजमीची रचना, त्यातलं एक कडवं' इस तमन्नामें कि तुम दोगे सजा,दिल गनेहगार हुवा जाता है।' मस्त.
शमशादचा आवाज खणखणीत!ती आणि ओपी एकत्र म्हणजे या अल्लाह!
खूप, खूप गाणी ऐकली. फार,फार,फार, बरं वाटलं. मनावरचं मळभ दूर झालं. मनात ऊन लखलखलं. मी गार पाणी प्यायले. पुन्हा बातम्या लावल्या. आणि बातमी होती," कोरोनावर लस सापडल्याचा शास्त्रज्ञांना विश्वास. माणसांवर प्रयोग चालू."
"दिल हैं छोटासा, छोटीसी आशा.."
प्रतिक्रिया
8 Apr 2020 - 7:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी तुमची गाणी आवडली. आणि तुमच्या आठवणीही. तुम्ही सांगितलेली गाणी ऐकून पाहीन.
तुम्ही म्हणालात तसं मन आता निब्बर झालंय, बातम्यांमधे चेंज हवाय त्याच त्याच बातम्यांचाही कंटाळा येतो.
तुमचं लेखन छान असतं. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
8 Apr 2020 - 8:05 pm | चांदणे संदीप
गार झुळूकीसारखा लेख.
ह्या वाक्यावर खुदकन हसायला झालं. :)
सं - दी - प
8 Apr 2020 - 10:05 pm | पहाटवारा
हेवा वाटतो तुमचा :)
जर शक्य असेल तर आम्हालाहि ऐकवा ती मुलाखत ..
-पहाटवारा
9 Apr 2020 - 3:53 am | चामुंडराय
हेच्च म्हणतो +१
8 Apr 2020 - 11:57 pm | विजुभाऊ
खूप सुंदर लिहिता आहात ग आज्जी.
खरेच गाण्याचे क्षण किती सुंदर असतात हे आपल्याला अशा एकटेपणी जास्त जाणवते.
9 Apr 2020 - 8:47 pm | चौथा कोनाडा
वाह, आजीबै, मस्त लिहिलंय !
गाण्याची छान सफर घडवून आणलित !
खरंच "थोडा हैं, थोडे की जरूरत हैं" हेच खरं !
जिंदगी फिर भी यहाँ खूब ss सुरत हैं !
10 Apr 2020 - 9:42 am | मदनबाण
मो.रफी यांचे मला सगळ्यात आवडते गाणे देतो आहे...
हा चित्रपट मी अनेकवेळा पाहिला आहे तरी जेव्हा केव्हा तो परत पहायला मिळतो तेव्हा मी त्याच आवडीने पाहतो. :)
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Tu Hi Hai Aashiqui... :- Dishkiyaoon
10 Apr 2020 - 2:27 pm | वामन देशमुख
कौन है जो सपनों में आया
कौन है जो दिल में समाया
लो झुक गया आसमां भी
इश्क़ मेरा रंग लाया
ओ प्रिया, ओ प्रिया...
किती अप्रतिम गाण्याची आठवण करून दिलीत मदनबाण!
माझंही हे अगदी फ़ेवरीट गाणं आहे, हजारो वेळा ऐकलंय आणि दशको वेळा गाण्याचा प्रयत्न केलाय, पण ओ प्रिया... ही तान काही घेता येत नाही आणि मग मी आआआ... असा कसातरी विचित्र आवाज काढतो आणि मग बाजूला उभ्या असलेल्या (माझ्या) बायकोला हसू आवरत नाही आणि मलाही...
25 Apr 2020 - 1:10 am | मुक्त विहारि
मुळ गाणे खाली देत आहे. ..
https://youtu.be/ApjA9OfAUk4
10 Apr 2020 - 2:26 pm | वामन देशमुख
मस्त लेख, आजी! लिहीत रहा, वाचकांचा तुटवडा नाहीच...
23 Apr 2020 - 8:44 pm | आजी
प्रा. डॉ. दिलीप बिरुटे.-" तुमचं लेखन छान असतं. लिहीत राहा." या तुमच्या अभिप्रायानं बरं वाटलं. धन्यवाद. मला खूप खूप गाणी माहिती आहेत अहो. लेखात थोडीशीच घेतली आहेत.
चांदणे संदीप-"बिचारीचे नंतरचे डोळे आठवले"ह्या वाक्यावर तुम्हांला हसू आलं हे वाचून वाईट वाटलं. "मला तिचे नंतरचे डोळे आठवले" ते माझं वाक्य मुळात pathetic अर्थाने आहे. अर्थात तुमचा दोष नाही. माझीच कम्युनिकेट करताना लिखाणात चूक झाली असावी. सॉरी. " गार झुळुकीसारखा तुमचा लेख"हा अभिप्राय वाचून समाधान वाटलं. धन्यवाद
पहाटवारा-लताची मी घेतलेली मुलाखत तुम्हांला ऐकवता आली असती तर आनंद झाला असता. पण आता ती मिळणं शक्य वाटत नाही. जुनी गोष्ट आहे.
चामुंडराय- माझा लेख आवडला हेच्च म्हणता की वो तुमी! धन्यवाद..
विजुभाऊ-मी सुंदर लिहिते!वाचून आनंद.धन्यवाद.
चौथा कोनाडा-"आजीबै" हे मस्त लिहिलंयत. धन्यवाद.
मदनबाण-तुम्हांलाही रफी आवडतो.द्या टाळी.
वामन देशमुख- तुम्हीही टाळी द्या. "मस्त लेखन"या अभिप्रायासाठी धन्यवाद.
सर्वांनी काळजी घ्या. शक्य तितके घरातच रहा आणि सुखरूप रहा.
24 Apr 2020 - 12:24 am | गवि
उत्तम गाणी आणि उत्तम लेख. पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.