एवढं सोपं नसतं आपल्या माणसाला दुस-याचं होताना पहाणं आणि तरीही त्याचं आपलंपण अबाधित ठेवणं..
त्यासाठी मत्सर, असूया, राग अशा अनंत फण्यांनी डसू पहाणा-या कालियाला सतत ठेचावं लागतं..
सहनशीलतेचा गोवर्धन उचलावा लागतो..
जिरवावे लागतात कढ अश्रूंचे, आतल्या आत आणि जगाला दर्शन होतं ते सुहास्यरुपाचं...
हात बांधलेले असतात मायेनं, तरी तडफड धडपड होतेच मनाची, उन्मळून पडतात रुढी आणि परंपरांंचे वृक्ष आणि मोकळे होतात अपेक्षांचे आणि हक्कांंचे शापित गंधर्व..
अखंड पुरवत रहावं लागतं प्रेमाचं वस्त्र, उघड्या पडणा-या नात्याची लाज राखण्यासाठी..
अनया,
खळखळणा-या धारेच्या खिजगणतीतही नसलेलं आपलं अस्तित्व स्विकारण्याचं बळ कुठून आणलंस?
कशी जमवलीस त्या धारेच्या काठाकाठाने सोबत करत चालण्याची अखंड तपस्या?
तिच्या नजरेतली निळ्या रंगाची आभा कधी मावळलीच नाही, तरीही तिच्या भोवती शीतल छायेची चंद्रवलयं चितारताना कुठली स्वप्नं पाहिलीस?
तिची तहान कृष्णमेघाची, त्या मेघाची न दिसणारी चंदेरी किनार बनणं एवढंच फार फार तर तुझ्या हाती.
तिच्या मनाच्या मयूरपिसा-याला मलीन नाही होऊ दिलसं की
तिच्या मनातल्या बासरीच्या दैवी सूरावटीवर कधी मानवी चरा नाही उमटू दिलास...
कसं पेललंस हे शिवधनुष्य?
कर्मण्येवअधिकारस्ते... तू देखील जगलास..
जपलंस राधेला बकुळफुलासारखं...
अनया, पुरुष कसा असावा, माणूस कसा असावा हे तुझ्याकडून शिकावं.
राधेची महती सांगताना, अनया तुला विसरून कसं चालेल?
प्रतिक्रिया
26 Mar 2020 - 10:05 pm | पद्मावति
आहा... फारच सुरेख!
26 Mar 2020 - 10:29 pm | प्रचेतस
मस्त.
बाकी तुमचं राधेवर अंमळ अधिकच प्रेम आहे. :)
27 Mar 2020 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
29 Mar 2020 - 11:13 am | प्राची अश्विनी
खरंय. राधेवरच्या होऊ घातलेल्या एका programमधलं आहे हे.
29 Mar 2020 - 11:12 am | प्राची अश्विनी
धन्यवाद!
29 Mar 2020 - 2:45 pm | माहितगार
एक चांगल्या उद्दीष्टाचा लेख . चारेक वाक्यांबद्दल सविस्तर प्रतिसाद देणे आवडले असते म्हणून प्रतिसाद देण्यास वेळ घेतला. वेळ मिळेल तसे बघेन .