तमसो मा ज्योतिर्गमय ...

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
22 Mar 2020 - 4:23 pm

तमसो मा ज्योतिर्गमय ...

मुख्याध्यापक केतन कदम सरांनी आपला शाळेचा फेरा संपवला. ते नेहमी शाळेत शाळा सुरु होण्याआधी अर्धा तास शाळेत येत आणि सर्व शाळेत एक फेरी मारीत असत. सगळीकडे अगदी बारीक नजरेने पहात ते आपल्या हातातील एका वहीत आपली निरीक्षणे नोंदवून ठेवीत असत. मग ऑफिसमध्ये गेले की योग्य व्यक्तीला ते ते काम सुपूर्त करत असत . असा त्यांचा दिनक्रम असे. आपण काम केव्हा सांगितले आणि ते केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे पण त्या व्यक्तीशी बोलून ते त्या वहीत ते नोंद करून ठेवीत असत. शाळेच्या पटांगणात दोन तीन महिन्यापूर्वी लावलेल्या झाडांची निगा हा त्यांचा आवडीचा विषय होता. तसेच शाळेची स्वच्छता . आज त्यांनी बघितले कि शाळेचे बाकीचे आवार स्वच्छ होते पण शाळेच्या मैदानाच्या मध्यभागी जो ध्वज उभारण्याचा खांब होता त्याच्या कठड्यावर एका कुत्र्याने घाण करून ठेवली होती. त्यांनी शाळेत आल्या बरोबर शाळेच्या शिपायाला साद दिली.
“ रामू ! ! रामू ! जरा इकडे ये बघू.”
रामू जरा रमत गमतच त्यांच्या कडे आला . अतिशय आळशी आणि कामचुकार असा हा रामू... कदम सरांची एक डोकेदुखीच होता .या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कदम सर पाच महिन्यापूर्वी आले तेव्हापासून , सर कधी गोड बोलून तर कधी रागावून त्याच्याकडून काम करून घेत असत . कदम सरांचा असा विश्वास होता की कामात गोडी निर्माण झाली तरच मनुष्य मन लावून काम करतो .तशी रामूच्या मनात त्याच्या कामा बद्दल गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत होते. पण यात त्यांना फार काही यश मिळाले आहे असे त्यांना वाटत नव्हते. ते समोर आले कि रामू आपण फारच मन लावून काम करतोय असे दाखवायचा. त्यांची पाठ वळली रे वळली की रामू कुठेतरी चकाट्या पिटायला पसार व्हायचा .
आत्ता सुद्धा त्यांची हाक ऐकताच तो मोठ्या लगबगीने पुढे आला.
“ काय जी !” असे म्हणत तो आपले दोन्ही हात आपल्या पाठीशी बांधून थोडे वाकून कदम सरांच्या समोर आला. त्याच्या मते ही खूप आदब दाखवणारी पोज होती.
“ अरे रामू ...शाळेचे आवार नेहमी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मी तुला दिली आहे , नाही का ?”
“ होय जी ! मी आताच एक चक्कर मारून आलो ! सगळे कसे झाक हाये !”
“ सगळे स्वच्छ आहे पण त्या आपल्या ध्वजाच्या खाबापाशी कुत्र्याने घाण केली आहे ! ती ताबडतोब स्वच्छ करून घ्या.आता थोड्याच वेळात तिथे P.T.चा तास सुरु होईल .”
कदम सर आपल्या ऑफिस कडे जायला वळले पण त्यानी बघितले .. रामू तिथेच उभा आहे ...तो काही हालचाल करत नाही ..
“ काय रामू ? काय झाले अजून इथेच ?”
“ सर ती घाण काढणे माझे काम नाही .ती संडास बाथरूम साफ करणारी रखमाबाई मगाशीच सगळे साफ करून गेली. आता ती उद्या सकाळी येणार .आजकाल ही भटकी कुत्री लई उच्छाद मांडतात…..” रामू म्हणाला.
“ अरे मग काय आपण उद्या सकाळपर्यंत ती घाण तशीच ठेवायची ?”
“ काय करणार जी ? पायजेतर मी त्यावर थोडी माती टाकतो !” रामूने उपाय सुचवला.
कदम सरांच्या कपाळावर आठ्या पडल्या .म्हणजे मूळ समस्या तशीच ...फक्त त्यावर पांघरूण घालायचं .
त्यांनी थोडा विचार केला ...काही निर्णय घेतलाच पाहिजे.
“ बर एक काम कर . आतून एक बादली आणि एक खराटा घेऊन ये. तेव्हडे तरी करशील का ? का तेही मीच करू ?”
रामू मग पळाला. शाळेतून एक बादली आणि खराटा घेऊन आला. आता कदम सर काय करणार याचा त्याला काही अंदाज येईना . पण आपण ती घाण काढायची नाही असा त्याने निश्चय केला होता.
कदम सरांनी ती बादली आणि खराटा आपल्या हातात घेतली आणि ते भरभर चालत त्या ध्वजाच्या खाबापाशी गेले. त्यांनी खराट्याने ती घाण त्या बादलीत गोळा केली . आणि ती घेऊन ते मुलांच्या संडासाकडे गेले. तिथे ती घाण टाकून त्यावर पाणी ओतले आणि तो बादली स्वच्छ करून त्यात थोडे पाणी घेतले . मग परत भर भर चालत ते ध्वज स्तंभाकडे गेले आणि पाणी टाकून तो कठडा साफ करून घेतला. रामू मोठ्या आश्चर्याने हे सर्व पहात होता. या नवीन आलेल्या मुख्याध्यापक सरांचे सगळे काही वेगळेच होते. त्यांचा कामाचा झपाटा शाळेत सगळ्यांना अचंबित करीत असे. रामूला थोडे लाजल्यासारखे झाले .पण आपण हे काम केले नाही याचा त्याला जरा अभिमानच वाटला.
ती बादली आणि खराटा मग रामू कडे देत कदम सर म्हणाले,
“ हे आता आत नेऊन ठेव . अरे रामू शाळा आपली आहे ना ?
मग कामात कसले हे माझे नाही हे तुझे काम असे ? अरे आपण सोयीसाठी कामे वाटून दिली आहेतच ना ? पण जर तो माणूस आलाच नाही तर केव्हातरी आपण ते काम केले तर काय हरकत आहे ?”
“ होय जी !” रामू काही तरी बोलायचे म्हणून म्हणाला.

कदम सर मग बाथरूम कडे गेले .आपले हात पाय स्वच्छ धुवून ते आपल्या कार्यालयाकडे गेले. आपल्या खुर्चीत बसून ते आज आलेले टपाल बघू लागले. गणित त्यांच्या आवडीचा विषय .दहावीचे गणित ते घेत असत. आज सुद्धा अकरा वाजता त्यांचा तास होता. आजच्या तासाची तयारी त्यानी रात्रीच केली होती. तेवढ्यात शाळेच्या बाहेर एक पांढऱ्या रंगाची सुमो येऊन उभी राहिली. कदम सरांनी खिडकीतून बाहेर नजर टाकली आणि त्यांच्या कपाळावर नाराजीच्या आठ्या उमटल्या. गावाचे पुढारी शशिकांत साहेब मोठ्या दिमाखात गाडीतून उतरत होते. त्यांच्या बरोबर नेहमी असणारा राहुल मुकादम गाडीचे दार उघडून चौफेर नजर टाकत उभा होता. शशिकांत साहेब. त्यांना नेहमी साहेबराव असे सगळ्यानी त्यांना म्हणावे असा त्यांचा आग्रह असे. ...शुभ्र पांढऱ्या रंगाचा बुश शर्ट आणि त्याच रंगाची सलवार घालून ते आपल्या नेहमीच्या संथ चालीने चोहीबाजुला बघत कदम सरांच्या कार्यालयाकडे आले. आता खरे तर फारसे उन नव्हते पण त्यानी नेहमीसारखा काचांना बाहेरून सोनेरी रंग असलेला काळा चष्मा घातला होता. आपण यात खूप रुबाबदार दिसतो अशी त्यांची समजूत होती. शाळा सुरु असल्याने आत्ता बाहेर कुणी नव्हते ...याचे साहेबरावाना जरा वैश्यम्य वाटले. त्यांना नमस्कार करायला बाहेर कोणीच नव्हते. त्यांनी पायात आज कोल्हापुरी चपला घातल्या होत्या.. त्यांचा कर्रकर्र ….असा आवाज करत ते कार्यालयात आले. कदम सर उठून उभे राहिले आणि नमस्कार करत त्यांनी साहेबरावांचे स्वागत केले.
“ या साहेबराव ...बसा. आज काय काम काढले ? “ कदम सर सरळ मुद्द्यावर आले. त्यांना हा गृहस्थ अजिबात आवडत नसे. आता जवळ आलेल्या निवडणुकीत आपण नक्की आमदार होऊ असा त्यांचा विश्वास होता. आत्तापर्यंत ते बऱ्याच वेळा निवडणूक हरले होते पण यंदा त्यांना सत्तारूढ पक्षाकडून तिकीट मिळाले होते ...त्यामुळे यंदा आपण आमदार होणार याची त्यांना खात्री होती.
साहेबराव समोरच्या खुर्चीत एकदम ऐसपैस बसले . आपले पाय पुढे पसरता यावेत म्हणून त्यांनी खुर्ची थोडी मागे ओढली . त्याचा खर्र ….असा काहीतरी अंगावर शहरा उमटवणारा आवाज झाला. कदम सर एकदम दचकले . असे काही काही आवाज त्यांच्या अंगावर शहारे आणीत असे ...खुर्ची मागे सरकवण्याचा आवाज ...एखादे भांडे खाली पडले कि त्याचा होणारा ठन्न ...ठन्न...असा आवाज ….टेबलावर एखादी टोकदार वस्तू जोरात ओढली कि होणारा ...खर्र ..खर्र असा आवाज ...त्यांना अजिबात आवडत नसे….त्यांच्या अंगावर एकदम शहारा येत असे.का असा आवाज करतात ही माणसे ?
“ मग काय कदम सर ? येणार कि नाही आमचा मुलगा शाळेत पहिला ? “ साहेबराव हसत हसत म्हणाले. त्यांचा मुलगा रमाकांत यंदा बारावी मध्ये होता. डोक्याने बरा असलेल्या त्या मुलाला अभ्यासाची अजिबात गोडी नव्हती वडिलांसारखे आपण सुद्धा राजकारणात जावे असे त्याला वाटे. साहेबराव मात्र आपल्या मुलाने चांगले परदेशात जाऊन शिकून यावे आणि मग राजकारणात यावे अश्या मताचे होते. कदम सरांनी अनेकवेळा त्यांना सांगितले होते ... तुमच्या मुलाचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही . पण साहेबराव त्या कडे लक्ष देत नसत. आपण पाहिजे तेवढा पैसा खर्च करू ….डिग्री विकत घेऊ … अभ्यास करून काय उपयोग ? मुलाने आत्ता पासून तरूण मुलांची संघटना तयार केली पाहिजे, समाजासाठी कार्य केले पाहिजे अश्या मताचे साहेबराव होते.
रमाकांत मात्र संघटना म्हणजे दहा बारा रिकामटेकड्या मित्रांना घेऊन गावात मोटार सायकल वरून उगीचच मोठा आवाज करीत फिरणे .कुठल्यातरी हॉटेलात दारू पीत बसणे आणि पोरीबाळींची छेड काढणे .असा अर्थ काढत असे. आता असा मुलगा शाळेत पहिला यावा असे साहेबराव म्हणत असत हा एक विनोदच होता.
“मी तुम्हाला बारावीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आधीच आणून देतो, तुम्ही फक्त त्याची उत्तरे रमाकांत कडून लिहून घ्या .” साहेबराव म्हणाले.
“ हे पहा साहेबराव ….अश्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारात मी सहभागी होणार नाही . आणि तुम्ही सुद्धा असे काही करू नये असा माझा सल्ला आहे. परीक्षा ही तुमच्या ज्ञानाची चाचपणी असते. रमाकांत कडे तेच ज्ञान नसेल तर ? तो शाळेत पहिला आला तरी त्याच्या ज्ञानात काहीच भर पडणार नाही .” कदम सर म्हणाले.
तेवढ्यात रमाकांत आपला वर्ग सोडून आपल्या नेहमीच्या मग्रूर पणे आत यायची परवानगी न घेता ऑफिस मध्ये आला. वयाच्या मानाने थोराड शरीर ...गुढग्यावर फाडलेली जीन ….हिरव्या भडक रंगाचा टी शर्ट ..थोडीशी मुद्दाम वाढवलेली दाढी ..सध्या प्रचलीत असलेली डोक्याच्या वरच्या भागावर ताठ उभे केलेले केस अशी केश रचना ...आणि डोळ्यात आपल्या बापाच्या सत्तेचा माज …
“ रमाकांत .तू वर्ग सोडून का आलास ? आणि शाळेचा गणवेष का नाही आज ?” कदम सर म्हणाले. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या.
“ माझा बा आलाय ..मग मला यायला नको ? माझ्या बद्दलच बोलणार आहात ना तुम्ही ?” रमाकांत जरा नरम पणे म्हणाला . त्याला कदम सरांचा शिस्त प्रिय स्वभाव माहित होता. मागच्या वर्षी वडिलांच्या आग्रहाने रमाकांत कदम सरांच्या घरी शिकवणीला जात होता. कदम सर अश्या शिकवणी च्या विरुद्ध होते ….शिक्षकानी मुलाला शाळेतच शिकवले पाहिजे. त्याचाच त्यांना पगार मिळतो. पण साहेबराव अगदी गयावयाच करायला लागले. तेव्हा मी फी घेणार नाही .आणि मी सांगेल तो सर्व गृहपाठ बरोबर केलाच पाहिजे अश्या अटीवर त्यांनी रमाकांतची शिकवणी सुरु केली होती . पण एक दोन महिन्यातच तो यायचा बंद झाला. तो गृहपाठ अजिबात करत नसे आणि गृहपाठ केला नाही तर कदम सर त्याला एकवीस सूर्य नमस्कार घालायला लावीत असत. असली शिस्त त्याला अजिबात मान्य नव्हती …..तुम्हाला काय शिकवायचे ते शिकवा कि ? मला वर गृहपाठ कशाला करायला सांगता ? अशी काही तरी त्याची समजूत होती. नाही तरी मी राजकारणातच जाणार ...मला काय करायचे आहे ते गणित आणि भूगोल शिकून ? मी आपला पदवी विकत घेणार ! अशी विचारसरणी असणारा हा मुलगा सुधारावा म्हणून कदम सरांनी खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि मग ....रमाकांत येईनासाच झाला आणि मग साहेबराव पण त्या विषयावर काही बोलत नसत .
“ असू दे त्याला . त्याला पण कळायला पाहिजे …” साहेबराव म्हणाले.
“ हे पहा साहेबराव या मुलाने अभ्यास केला पाहिजे. पैसे देऊन पदवी हे खूळ याच्या डोक्यातून तुम्ही काढून टाका ...अहो राजकारणात सुद्धा अभ्यास लागतो ...जनतेचे प्रश्न समजून घेऊन ..त्यांचा साधक बाधक विचार करून .अभ्यास करून ते सोडवायला लागतात. ….”
“ राजकारणात आजकाल तसे काही नसते .हा अभ्यास वगैरे करायला आपण माणसेच नेमू की आपण तुमच्या सारखी .आणि सेक्रेटरी असतातच कि , पण ते जाऊ दे.हे बघा तुम्ही हे आमचे काम एवढे कराच . सगळे पेपर याच्याकडून लिहून घ्या. काय आपले तीन चार दिवसाचे काम !
आम्ही तुम्हाला दहा लाख द्यायला तयार आहोत. …..”
“ साहेबराव माझी काही तत्वे आहेत आणि मी ती मोडणार नाही ...तुम्ही कितीही पैसे दिले तरी नाही ...तुम्ही आता जाऊ शकता.”
“ अहो कदम सर ..माझ्या मनात तुमच्या बद्दल आदर आहे म्हणून मी तुमच्या कडे आलोय. चला ! तुमच्या साठी म्हणून वीस लाख देतो .आता नाही म्हणू नका . पुढच्या काही दिवसात माझ्या कडे पेपर येतील .मग आपण कामाला सुरुवात करू …”
“ अहो साहेबराव मी मराठीतच तुम्हाला सांगतोय की मला पैशाचे आमिष दाखवू नका. ….हे मला जमणार नाही ..” कदम सर आता आपल्या खुर्चीतून उठून उभे राहिले .
“ कदम सर याचा परिणाम चांगला होणार नाही .तुम्हाला या गावात राहायचे आहे ना ?” साहेबराव आता एकदम बदलले .मला नाही म्हणतो हा मास्तर ?
“ तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करू शकता ...पण माझा निर्णय बदलणार नाही ..”
“ आजकाल गावात फार गुंड मोकाट सुटलेत .परवाच मी शाळेजवळ काही गुंड रात्री फिरताना बघितले . तुम्ही शाळेत संध्याकाळी बराच वेळ असता .सांभाळून रहा म्हणजे झाले….” साहेबराव बेरकी पणे म्हणाले.
“ साहेबराव मला धमकी देऊ नका .आपण आता इथून जावे हे उत्तम .” कदम सरांचा राग आता वाढायला लागला होता .
“ पप्पा . हा मास्तरडा असा ऐकणार नाही .आपण याच्या बायकोलाच पळवून नेऊ ! लई माल आहे याची बायको .मी शिकवणीला जात होतो तेव्हा बघितली आहे ना !” रमाकांत ने आपले गुण आता दाखवायला सुरुवात केली . ..
“ रम्या ..आता गप बसशील का हाणू तुला ?” साहेबराव खोटा राग आणून म्हणाले . खरे म्हणजे असेच काही तरी करायला पाहिजे असेच त्यानाही कदम सरांच्या सुंदर बायकोला पाहिल्या पासून वाटत होते.
पण आता कदम सरांचा राग अनावर झाला ..ते आपल्या टेबलामागून एकदम पुढे आले आणि काय होते आहे हे कळायच्या आत रमाकांतच्या थोबाडात ठेऊन दिली. रमाकांत त्या धक्क्याने मागे कोलमडला. साहेबराव आश्चर्यचकीत होऊन एकदा रमाकांत कडे आणि एकदा कदम सरांकडे पहात उभे राहिले .मग त्यांनी आधार देऊन रमाकांतला उभे केले . कदम सरांना आपण एक ठोसा ठेऊन द्यावा असे त्यांना वाटले पण ..त्यांनी एकदा कदम सरांच्या तालमीत तयार झालेल्या मजबूत शरीरयष्टी कडे पाहून आपला विचार बदलला ….त्यांच्या बरोबर असणारा मुकादम पण लांब गाडीत बसून गाणी ऐकत होता. याचा आपण नंतर सूड घेऊ असा विचार करून कदम सरांकडे रागाने पहात ते म्हणाले,
“ मास्तर ...हे तुम्ही बरे केले नाही ...याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील ….”
कदम सरांनी काहीही न बोलता नुसता दरवाजाकडे हात केला . साहेबराव आणि त्यांचा तो दिवटा मुलगा डोळ्यासमोरून गेल्यावर कदम सर आपल्या खुर्चीत जाऊन बसले .थोडा वेळ शांत बसून राहिल्यावर त्यांनी समोरचा पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि एका घोटात तो रिकामा केला . मग त्यांचा राग थोडा शांत झाला. मग त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे एक कागद समोर घेतला आणि आता आपण काय पाउल उचलले पाहिजे याचा एक आराखडा तयार केला . साहेबराव आता गप्प बसणार नाही आणि तो पहिला वार प्रमिलेच्या दिशेने करेल आणि मग आपल्यावर पण हल्ला करेल अशी त्यांनी अटकळ बांधली. कॉलेजमध्ये असताना ते मुष्टियुद्ध खेळत आणि नेहमी तालमीत सुद्धा जात होते आणि आज सुद्धा योग आणि नियमित व्यायाम करून आपली शरीरयष्टी त्यानी मजबूत ठेवली होती .त्या मुळे त्यांना आपली फारशी काळजी वाटत नव्हती . सर्व गोष्टींची नोंद केल्यावर त्यांनी परत एकदा त्याचा विचार केला. मग काही निर्णयावर येत त्यांनी आपल्या मोबाईल वरून इन्स्पेक्टर पवार यांना फोन लावला. हे मागच्या वर्षीच इथे या गावात बदलून आले होते आणि एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. कदम सरांची आणि त्यांची ते दोघेही कॉलेज मध्ये असल्या पासून ओळख होती . ते वयाने लहान होते तरी सुद्धा विद्यार्थी चळवळीत त्या दोघांनी खूप काम केले होते. त्या वेळी कदम सर संघटनेचे अध्यक्ष होते आणि पवार नुकतेच त्या चळवळीत आले होते. कदम सरांच्या आदर्शवादी वागणुकीमुळे पवार त्यांना खूप मानत होते आणि आत्ता सुद्धा तो आदर कायम होता.
आजचा सर्व त्यांनी प्रसंग इन्स्पेक्टर पवारांना सांगितला. पवारांना सुद्धा हा साहेबराव काय माणूस आहे आणि तो काय करू शकतो याची पूर्ण कल्पना होती.
“ सर मी लगेच एक पोलीस तुमच्या घराजवळ तैनात करतो . शाळेजवळ सुद्धा गस्त वाढवतो . आपण दोन दिवस पाहू काय होते ते ..मग परत भेटून विचार करू .” पवार म्हणाले. त्यांच्या आवाजातील काळजी कदम सरांना जाणवली. आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी कदम सरांना परत एकदा खात्री पटली. आत्ता लगेच प्रमिलेला काही सांगायचे नाही ...संध्याकाळी घरी गेल्यावर पाहू असे त्यांनी ठरवले. तेवढ्यात तासाची घंटा झाली. नेहमी प्रमाणे सरांनी पुढचे दोन तास घेतले. आजचा प्रसंग त्यांनी आपल्या विचारातून बाजूला काढला आणि शिकवण्यावर लक्ष केंद्रित केले. तास संपल्यावर ते ऑफिस मध्ये येऊन आपले काम शांत पणे करत बसले. शाळा सुटल्यावर सुद्धा किती तरी वेळ ते आपले काम करत राहिले.
संध्याकाळी सात वाजता त्यांनी ऑफिसला कुलूप लावले आणि ते घराच्या दिशेने जायला लागले. सूर्यास्त केव्हाच झाला होता. पण अजून थोडा संध्या प्रकाश होता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती . ते थोडे पुढे गेले तेवढ्यात चार पाच तरूण मुलांचे टोळके त्यांच्यावर चाल करून आले. रमाकांत त्यांना चटकन ओळखला . बाकीच्या मुलांपैकी त्यांना पटकन कोणी ओळखता आले नाही .कदम सर थोडे मागे झाले ...पण त्या तरुणांनी त्यांना चोहोबाजूने घेरून त्यांच्यावर हल्ला केला. एकाने त्यांच्या पाठीत लाथ घातली ..एका मुलाकडे हॉकी ची स्टिक होती ..ती त्याने त्यांच्यावर उगारली ..कदम सर खाली वाकले आणि तो घाव आपल्या खांद्यावर घेतला ….एक सणसणीत कळ त्यांच्या डोक्यात गेली. कदम सरांना एकदम आपण मुष्टियुद्ध खेळताना घेतलेले फटके आठवले . सरळ होत ते परत थोडे मागे झाले आणि त्यांनी रमाकांत कडे नजर टाकली ...तो मुसंडी मारून त्यांच्या कडेच येत होता ...कदम सरांनी क्षण भर विचार केला ..हा तर आपला विद्यार्थी ...कसा याच्यावर हल्ला करायचा ? पण त्यांचे मुष्टियुद्धा चे शिक्षण क्षणात वर आले आणि त्यांची उजव्या हाताची मुठ केव्हा आवळली आणि रमाकांतच्या नाकावर आदळली हे त्यांचे त्यांना सुद्धा कळले नाही ...खच ...असा काही तरी आवाज झाला ...रक्ताचे शिंतोडे सगळी कडे उडाले.रमाकांतच्या नाकाचे हाड मोडले असले पाहिजे असे कदम सरांना जाणवले .रमाकांत नाकावर हात धरून विव्हळत खाली पडला .

तेव्हड्यात कदम सरांच्या डोक्यावर कोणी तरी मागून कसला तरी फटका मारला . बहुतेक हॉकी ची स्टिक. कदम सरांच्या डोळ्यासमोर एकदम अंधार पसरला आणि ते जमिनीवर कोसळले ….एक हात पुढे करून त्यांनी पडताना जमिनीचा आधार घ्यायचा प्रयत्न केला .पण नंतर त्यांना काहीच समजले नाही …

ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना पहिल्यांदा दिसली ती त्यांची बायको प्रमिला .आपले टपोरे डोळे रोखून ती मोठ्या काळजीने त्यांच्या कडे पहात होती . ते शुद्धीत आले हे समजताच तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य पसरले. कदम सरांनी उठायचा प्रयत्न केला पण तिने त्यांचे खांदे धरून त्यांना खाली दाबल्यासारखे केले. अगदी हळुवार पणे.
“ उठू नका ...तुम्ही हॉस्पिटल मध्ये आहात आणि तुमच्या डोक्याला मार लागला आहे . …” प्रमिला म्हणाली. तेव्हड्यात डॉक्टर सुद्धा आले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांची नाडी पाहायला लागले. इन्स्पेक्टर पवार सुद्धा हळूच पुढे आले.
“ कसे आहात सर ? बरे वाटते आहे का ? डॉक्टर यांनी माझ्याशी बोलले तर चालेल का ?”
“ अगदी निसटसा घाव आहे .जखम वर वरची आहे .पण आपण चोवीस तास Observation खाली ठेऊ . शरीराला मुका मार मात्र बराच आहे . आणि मुख्य म्हणजे कोणतेही हाड तुटलेले नाही त्यांना शक्य असेल तर अवश्य बोलू दे. .काही काळजी करू नका सर ...तुम्ही ठीक आहात ..” असे म्हणून डॉक्टर निघून गेले. प्रमिलेचा चेहरा जरा खुलला .तिची थोडी काळजी कमी झाली.

“ मला इथे कोणी आणले ? नक्की काय झाले मला समजेल का ? मी शाळेतून घरी निघालो असताना काही गुंडांनी माझ्यावर हल्ला केला ..एवढेच मला आत्ता आठवते आहे.” कदम सर म्हणाले .
“ आमचा गस्त घालणारा पोलीस ,तुमच्यावर हल्ला झाला त्या नंतर काही वेळाने तिथे पोचला .तुम्ही खाली पडला होतात .पोलीस येत आहे हे पाहून हल्ला करणारे पळून गेले .पोलिसांनी मग जवळच्या काही लोकांच्या मदतीने तुम्हाला हॉस्पिटल मध्ये दाखल केले. .तुमच्यावर हल्ला करणाऱ्या पैकी कोणी ओळखीचे होते का ? “ इन्स्पेक्टर पवार म्हणाले.
“ पवार साहेब ...आत्ता मला काहीही आठवत नाही ...पण एक दोन दिवसात मला सगळे आठवायला लागेल .पण मी आत्ता मात्र तुम्हाला अशी विनंती करतो की मला आज रात्रीच कोल्हापूरला जायची परवानगी डॉक्टरांकडून काढून आणा. मला आणि माझ्या बायकोच्या जीवाला या गावात धोका आहे असे त्यांना पटवून सांगा .माझ्यावर खूप उपकार होतील तुमचे …” कदम सर म्हणाले .
“ सर ,उपकार कसले ? खरे तर मीच तुम्हाला तसे सांगणार होतो .मीच तुम्हाला कोल्हापूरला आमच्या जीप मधून पोचवतो ...मी आत्ता आलो.”

कदम सरांना आपल्या बायको समोर काहीच सांगायचे नाही हे पवारांनी ओळखले होते. आज दुपारच्या फोन प्रमाणे यात साहेबराव किवा त्यांचा मुलगा गुंतलेले होते याची त्यांना कल्पना होती . त्या दोघांनी आणखीन काही खेळी करण्यापूर्वी कदम नवरा बायकोना कोल्हापूरला सुरक्षित नेणे त्यांना ही जरूर वाटले. आपला एक विश्वासू माणूस त्यानी साहेबरावांच्या मागावर ठेवलाच होता.

डॉक्टरांची परवानगी घेऊन आणि कदम सरांच्या घरून काही जरुरीचे सामान घेऊन मग ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले होते. पहाटे पाच सहा पर्यंत आपण कोल्हापूरला कदम सरांच्या घरी पोहोचू अशी त्यांना खात्री होती.

संपूर्ण प्रवासात कदम सर शांत पणे कसला तरी विचार करत होते. पवारांनी पण त्यांना जास्त काही विचारले नाही . कदम सरांची बायको प्रमिला मधेच केव्हा तरी कदम सरांच्या खांद्यावर डोके ठेऊन झोपी गेली होती . पवारांचा वाहन चालक आजूबाजूला सावधनतेने पहात जीप चालवत होता . कोल्हापूरच्या जवळपास केव्हातरी प्रमिला अचानक जागी झाली ..आणि कदम सरांना म्हणाली ,
“ सकाळ झाली का ? उजाडले का ?”
कदम सर आपल्या विचारातून जागे झाले .आपल्या तंद्रीतच ते म्हणाले ..
“ उजाडले का ? इतक्यात कुठले उजाडायला ? अजून पहाट नाही झाली ...त्याच्या आधी काळोख अजून दाट होईल .त्या गर्द अंधारातूनच केव्हातरी तांबडे फुटेल .आणि मग हळूच प्रकाशाची किरणे हळूच पृथ्वीवर अवतरतील ...नाही प्रमिले सकाळ व्हायला अजून खूप वेळ आहे.अजून खूप लांबची वाट आहे .झोप तू ..”

प्रमिलेला झोपेत काही समजले नाही पण अजून सकाळ व्हायला खूप वेळ आहे हे मात्र समजले . तिने परत विश्वासाने कदम सरांच्या खांद्यावर डोके ठेवले आणि मग परत काही तरी आठवून ती म्हणाली ,
“ आपण आपला सगळा संसार त्या गावातच सोडून आलो की ! किती हौसेने मी सगळे गोळा केले होते.”
“ ते आपण परत जमा करू पण मी माझ्यातला शिक्षकच तिथे सोडून आलो आहे .तो मला परत केव्हा भेटेल कुणास ठाऊक ?” कदम सर म्हणाले .
प्रमिला आता पूर्ण जागी झाली . काही तरी भयंकर घटना घडली आहे आणि आपल्याला हे गाव असे तातडीने सोडायला लागते आहे याची तिला हळू हळू कल्पना आली होती. शिक्षक हा कदम सरांसाठी नुसता व्यवसाय नव्हता .तो त्यांचा ध्यास होता हे तिला माहित होते .
स्त्रियांच्या ठायी असणाऱ्या जन्मजात शहाणपणाने ती म्हणाली ,
“ असे का म्हणता ? काही कारणाने जरी तुम्हाला तुमच्यातला शिक्षक तिथे सोडायला लागला तरी ,तुमचा मार्ग बरोबर असणारच ..त्या मार्गावर केव्हातरी तो पुन्हा भेटेल ..वेगळ्या वेषात असेल ..वेगळ्या रुपात असेल ...पण भेटणार नक्की …”
कदम सरांना आपल्या बायकोचा हा जन्मजात शहाणपणा माहीत होता . अनेक निराशेच्या क्षणी तिने असेच काही तरी बोलून त्यांना निराशेतून बाहेर काढले होते. त्यांना एकदम हुरूप आला ..
“ अगदी बरोबर बोललीस . तू आत्ता विचारलस ना ? सकाळ झाली का ? अजून नाही झाली पण ,हा आपला मार्ग प्रकाशा कडेच जाणारा आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा. मला असे वाटत होते की तरूण पिढीत सुधारणा घडवायची असेल तर शिक्षकच झाले पाहिजे . आज मला लक्षात आले कि तो मार्ग महत्वाचा आहे पण त्याही पेक्षा भारताच्या राजकारणाला लागलेली कीड नाहीशी कारणे जास्त महत्वाचे आहे. कारण ही कीड कोणत्याही झाडाला फळे ,फुले येऊ देत नाही ….मला आता राजकारणात जाऊन माझी स्वच्छता मोहीम राबवायला हवी आहे. राजकारणाला लागलेली स्वार्थी मनोवृतीची कीड नाहीशी करायला लागणार आहे ...संपूर्ण गावात किती तरी सालस माणसे आहेत . पण फक्त एका विषारी वृत्तीच्या माणसासाठी मला गाव सोडायला लागत आहे. ही विषारी ...स्वार्थी वृत्ती राजकारणातून नाहीशी करायला हवी .त्याला एकच उपाय निस्वार्थी पणे काम करणारे लोक या राजकारणात यायला हवेत.
अंधार जर नाहीसा करायचा असेल तर एक मिणमिणता का होईना दिवा लावायलाच हवा.
विद्यार्थी संघटनेचे कार्य करताना ,अनेकांनी मला सांगितले की तू राजकारणात जा ..पण मी हट्टाने शिक्षक झालो . ..माझी चूक मला आता समजली आहे . नालायक राज्यकर्ते कुणालाच काही चांगले कार्य करू देत नाहीत .ही परिस्थिती बदलायची असेल तर चांगल्या ध्येयवादी माणसांनी राजकारणात यायला हवे. .” कदम सर थोडेसे स्वतःशी तर थोडेसे प्रमिलेला आणि इन्स्पेक्टर पवारांना उद्देशून बोलत होते.

कदम सरांना उपनिषदातील प्रार्थना आठवली .
“ॐ असतो मा सद्गमय ।,
तमसो मा ज्योतिर्गमय ।,
मृत्योर्मा अमृतं गमय ।,
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥”

मग जणू त्यांना पहिल्यांदाच समजल्यासारखे झाले ! प्रकाशाकडे जाणारा मार्गच सत्याकडे जाणारा असतो .
राजकारणात शिरून साऱ्या समाजाला प्रकाशाकडे नेणारा ...सत्याकडे नेणारा ...सुद्धा एक शिक्षकच असतो की !
“ होय प्रमिले ! म्हणजे माझ्यातला शिक्षकाला मला फक्त वेगळे रूप द्यायला हवे ….
तो मला सोडून कसा जाईल ?” कदम सर म्हणाले .
त्यांनी बाहेर डोकावून पाहिले .पूर्वे कडून तांबडे फुटायला लागले होते .
शेवटी पहाट व्हायला लागली होती तर !...

*********************************************************************************************************
जयंत नाईक .

कथाविचारलेख