दोसतार-४१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
9 Mar 2020 - 7:15 am

मी डोळे मिटून घाटे सरां नी सांगितली असती तसे .काहितरी गम्मत सांगतोय तशा आवाजात भिंतीला गोष्ट सांगतोय . " खूप गोड गळ्याने भजने गायचा अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती होती."
माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारतय. छे मुलांनी शंका विचारताना अशी सरांच्या खांद्यावर थाप मारायची नसते….
मागील दुवा : http://misalpav.com/node/46184

मी दचकून पाहिले, टंप्या माझ्या खांद्यावर थाप मारत होता. टंप्याला त्या शिपाईमामांच्या टोपीत मी अगोदर पटकन ओळखलेच नाही. म्हंटले कोण आल्ं हे. बाकाच्या मधोमध बसलो होतो म्हणून ठीक कडेला असतो तर दचकून पडलोच असतो.
काय रे… काय झाले.
काय झाले ! अरे किती हाका मारायच्या तुला. मघासधरनं बोलवतोय .
का
चल चल लवकर तिसरा तास सातवी ब वर दिलाय. तुला . ऑफ तास आहे. आठवी अ मधला प्रभाकर घेणार होता, तो तास घ्यायचाय. तो आला नाहिय्ये.
तीसरा तास मला घ्यायचाय?
मग काय सांगतोय. चल चल. तारकुंडे बाईंनी मघाशीच सांगितलं होतं. मलाच यायला उशीर झाला.
आता .
आता काय! दुसर्‍या तासाची घंटा होईलच आत्ता. वर्गावर जा थेट तू. ऑफ तास घ्यायला. तयारी आहे ना तुझी ?
तयारी आहेना ! हा प्रश्न टंप्याने विचारावा ! ज्या ऑफ तासाची एरवी आम्ही विद्यार्थी म्हणून वाट पहातो त्या ऑफ तासाची मी शिक्षक म्हणून वाट पहात होतो. तो समोर आलाय.
हो फुल्ल तयारी आहे.
मग जा वर्गावर . मी घंटा द्यायला जातो.
हा काय निघालोच.
तुला खडू डस्टर वगैरे काही हवं असेल तर तास संपवून बाहेर येईल त्याच्याकडून घे. सातवी ब वर एल्प्याचाच तास आहे. चल बेष्ट लक.
टंप्याने बेश्ट लक दिलाय . बघु या. काय होतंय ते. इतर वर्गांवर दुसरा तास चालू आहे. सहावीच्या क च्या वर्गात इंग्रजीचा धडा चालला आहे.खिडकीतून दिसतंय शुभांगी शिकवतेय. बाकांच्या रांगेतून फिरत ती मुलाना काहीतरी विचारतेय. मुले हात वर करून काही तरी उत्तर देताहेत. या वर्गात असतो तर मी पण हात वर करुन सगळी उत्तरे दिली असती. बरोबर आणि चुकीची सुद्धा…… अरे पण आपण तासावर निघालोय ऑफ तासावर. आपला तास पण असाच होणार. एकदम झकास. मी प्रश्न विचारणार . मुले उत्तरे देणार. आता हे म्हणतोय खरा पण बुध्या काकाच्या गोष्टीत काय प्रश्न विचारणार. ती गोष्ट आहे. धडा थोडाच आहे प्रश्न विचारायला.
नाहीतरी पुस्तकातले धडे म्हणजे तशा गोष्टीच असतात की. त्यात फक्त ते कोणे एके काळी आणि आटपाट नगर नसते इतकेच. हे पुस्तकवाले पण ना. एखाद्या छान गोष्टीचा धडा करून टाकतात आणि मग त्या वर कोण कोणास म्हणाले, संदर्भासह स्पष्टीकरण असलं काहीतरी करायला लावून त्यातली गम्मत घालवून टाकतात. उगीच नाही मराठीत " धडा शिकवणे " हा वाक्प्रचार आलेली. एखाद्याला धडा शिकवणे याचा अर्थ गोष्टीतली गम्मत घालवून त्यातल्या निरर्थक बाबींवर चर्चा करायला लावणे असाच सांगायला हवा आता.
सहावी क, सहावी अ , सातवी ब चा वर्ग जवळ येत चाललाय. तसतसे पोटात काहितरी वेगळेच हलके हलके व्हायला लागलंय. सहावी क चा वर्ग आला. खिडकीतून एल्प्या मुलांना शिकवताना दिसतोय. एल्प्याने फळ्यावर समांतर रेषा काढल्या आहेत. काहीतरी प्रमेय ही लिहीलंय. तो मुलाना काहीतरी विचारतोय. मुलेही उत्तरे देताहेत. पण एल्प्याच्या चेहेर्‍यावर काहीतरी वेगळंच दिसतय. नेहेमी गप्पा मारताना असतो तसा नाही दिसत. मुलांशी बोलतोय पण परिक्षेत पेपरला बसल्या सारखा बोलताना एकसारखा ओठावरून जीभ फिरवतोय .दिसतोय. त्याने डस्टरने फळा पुसला. पुन्हा काहीतरी काढतोय. एल्प्या हे काय करतोय. काहीतरी गडबड आहे.
एका मुलीने प्रश्न विचारलाय. बाहेर इकडे व्हरांड्यात ऐकू येत नाही. पण ती काहितरी विचारतेय. एल्प्या ते समजून घेतोय….
आपल्याला असे कुणी काही विचारले तर आपण काय उत्तर देणार हा अभ्यासच केलेला नाहिय्ये. बापरे..... नकोच असे व्हायला. उगाच फजिती व्हायची. मला अचानक पोटात काहीतरी ढवळल्यासारखे वाटतेय. सकाळी कधीतरी घाईची लागल्यावर अचानक होते ना तसे . वर्गावर जायलाच नको असं वाटतय. आपण इथून पळून गेलो तर..... उजवीकडचा व्हरांडा मोकळा आहे. तेथून जाता येईल . पण तिकडच्या दारात मुख्याध्यापक सरांचे ऑफिस आहे. एखाद वेळेस सर तिथे असतील. मग विचारतील. डावीकडून गेलो तर आठवी ब चा वर्ग लागेल. वर्गातले सगळे पहातील . दोन्ही कडच्या वाटा बंद. सिंहगडावरच्या लढाईत सूर्याजीने गडावरून खाली उतरण्यासाठीचे दोर कापून टाकले होते. म्हणाला होता पडून मरा किंवा लढून मरा. मी दोर कापून टाकले आहेत. इथे मीच मावळा आणि मीच सूर्याजी.
घण घण घण. तीन टोल पडले. दुसरा तास संपून तिसरा तास संपायची घंटा. आता तर परतीचा कोणताच विचारही करणं शक्य नाही. चालायचं तर फक्त वर्गाच्या दाराच्या दिशेने वर्गात जाण्यासाठी. एल्प्या पण फळा पुसून बाहेर येण्यासाठी निघालाय.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2020 - 8:57 am | सुधीर कांदळकर

ऑफ तासासाठी शुभेच्छा. आवडले. धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Mar 2020 - 9:17 am | ज्ञानोबाचे पैजार

पुढचा भाग लवकर टाका
पैजारबुवा,

नववीत असताना याच परिस्थितीतून मी गेलो होतो पण दहावी मध्ये माञ खुप खुप मजा आली होती. न घाबरता मुलांना शिकवलं होतं.

विजुभाऊ's picture

13 Mar 2020 - 8:55 am | विजुभाऊ