एल्प्या सातवी ब ला समांतर रेषा शिकवायच्या म्हणून वर्गावर गेला. तो गेला . योग्या संगीता आणि जयु त्यांचे त्यांचे तास घेऊन आले.
तीघांचेही चेहेरे वेगळेच सांगत होते.....
मागील दुवा : http://misalpav.com/node/46136
शिक्षक दिनाला आठवीच्या बहुतेक सगळ्यांनाच काहीना काही शिकवायचे होते . त्यामुळे प्रत्येकाला हवा होता तोच विषय शिकवायला मिळाला होता असे झाले नव्हते. घाटे सरांनी आणि तारकुंडे बाईंनी त्या उलट ज्याला जे विषय कठीण जातो तोच शिकवायला सांगितला होत. योग्या खरे तर पी टी शिकवणार होता. पण त्याला सहावीच्या वर्गावर इंग्लीश चा तास घ्यायला सांगितला होता. त्यामुळे ते नक्की जमतय का आणि जमलं तर कसं जमतंय हे आम्हालाच काय पण योग्यालासुद्धा उत्सुकता होती.
योग्या तास घेऊन वर्गात आला तो हसत हसतच.
मायला हा हसत येतोय. म्हणजे याने नीट शिकवलेलं दिसतय.
"काय रे काय झालं. " हा प्रश्न शाळेत प्रतिज्ञा म्हणताना एकमुखाने की कायसे म्हणतात ना तशा एका आवाजात आला. प्रत्येकालाच ती उत्सुकता होती.
" अरे एकदम बेष्ट मजा आली. मस्त.. " योग्याने इतके म्हंटले . सगळ्यांनी कान टवकारले . हा काय म्हणतोय. आणि आपला तास याच्यापेक्षा जर्रासुद्धा कमी पडायला नको हे प्रत्येकालाच वाटत होते.
"सांग सांग अगदी सुरवातीपासून सांग"
"सुरवातीला हजेरी घेतली. सहावी अ वर ." योग्या रोज घरून येताना त्याच पोरांबरोबर येतो. त्याना शिकवणं तसे अवघड नसेल.
" म्हणजे तू रोज येतोस त्यांच्याबरोबर तीच ना"
" अरे तेच ना. मी वर्गावर गेलो आणि सगळे हसायलाच लागले. त्यांना पटतच नव्हते की मी वर्गावर शिक्षक म्हणून आलोय ते."
"मग"
" मग काय अगोदर सगळे हसायला लागले. मग मी त्यांना सांगितले की मी आज तुमच्या वर्गावर शिक्षक म्हणून आलोय. इंग्रजीचा तास घेणार आहे."
" मग"
" मग काय. मी घेतला तास. अगोदर तो जो धडा होता ती गोष्ट मी त्यांना मराठीत सांगितली. आणि नंतर धड्यातून इंग्रजीत वाचून दाखवली."
" मग ? "
" त्या पोरांना धडा अगोदर गोष्ट म्हणून मराठीत सांगीतल्यामुळे समजला होताच. इंग्रजीत धडा वाचून दाखवला. सुरवातीची काही वाक्ये मी वाचली.
नंतरची तीन तीन वाक्ये पोरांपैकी कोणाकोणाला वाचायला सांगितली. त्यांना त्याचा अर्थ सांगायला सांगितला. कठीण शब्दांचे अर्थ मी करून गेलो होतोच.
काही शब्दांचे अर्थ पोरांनीच विचार करून सांगितले. इतके होई पर्यंत तास संपल्याची घंटा झाली. अजून थोडा जास्त वेळ असायला हवा होता शिकवायचातास.
अरे आपण कुणाला एखादा धडा नीट शिकवायला लागलो ना की तो आपल्याला अगोदर नीट समजत जातो. हे बघ ना मला तो साधा" सीता गोपाल आणि अहमद रीड द बूक" चा धडा शिकवताना. चेंज द व्हॉईस समजले. अरे काय मज्जा येते शिकवायला.
योग्या काय काय सांगत होता. जयू चा चेहेरा जरा योग्या इतका नाही पण बराच आनंदी होता.
" मी सातवी ला शार्दूलविक्रीडीत वृत्त शिकवले. "
"म्हणजे मंगलाष्टके……"
" हो तेच ते. थोडेसे या योग्या सारखेच .अगोदर कुणी आपले ऐकेल का अशी भिती वाटत होती. त्या नंतर फळ्यावर वृत्त लिहीले. पण जसे मुलांना शार्दूलविक्रिडीत हे मंगलाष्टकांचे वृत्त आहे असे सांगितले तसे त्यांनीच मला एकेक श्लोक सांगायला सुरवात केली.
" नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजीरे.
माथा शेंदुर पाझरे वरीवरे दुर्वांकुरांचे तुरे."
मुलांना विचारलं की शार्दूलविक्रिडीत वृत्त ओळखणार कसे तर त्यांनी काय काय भारी उत्तर दिली सगळ्यात भारी म्हणजे ती अर्चना प्रधान. ती म्हणाली की मी श्लोक, कविता मंगलाष्टकाच्या चालीवर म्हणून बघते. अगदी त्या च्या शेवटी शुभ मंगल सावधान पण म्हणून बघते. ते एवढे बोलून थाम्बली नाही तर तीने एक कविता म्हणूनही दाखवली.
" गावाची शिव लागताच दिसते उंचावरी ती गढी.
भिंती ढासळल्या बुरूज खचले, ये खालती देवडी" शुभ मंगल सावधान."
" मग"
"मग काय आणखी काही जणांना आणखी काही श्लोक कविता सापडल्या. मुले जसजशी एक एक कविता म्हणत होती. ते पूर्ण झाले की बाकीचे शुभमंगल सावधान म्हणायचे. मग ते वृत्त सांगताना ते वृत्तातले " मसजसततग " पण शिकवले. काय मज्जा आली . मुलांच्याच काय माझ्याही आयुष्यभर लक्षात राहील शार्दूलविक्रिडीत वृत्त. योग्यासारखाच मलाही तास कमी पडला. "
जयु हे सांगत होती. सांगताना ती अगदी वर्गात शिकवतेय अशीच सांगत होती. तीला जशी मज्जा आली तशी आपल्याला ही मज्जा यायला पाहिजे. हे वर्गातल्या प्रत्येकालाच मनात होते.
संगीता ला जरा वेगळा अनुभव आला.
" मी अगोदर खूप घाबरले. मग वर्गात कोणीतरी खोकल्याचा आवाज काढला. नंतर सगळा वर्गच खोकायला लागला. मी काहीच शिकवू शकले नाही. फळ्यावर काही लिहायचे याचीही मला भिती वाटत होती. खूप चांगली तयारी करूनही हे असे का होतय तेच कळत नव्हते."
"बापरे असेही होते?" आपीचा संगीताच्या सांगण्यावर विश्वासच बसत नव्हता.
" हो ना. त्या मुलांना काही शिकायचेच नव्हते."
"मग तू काय केलेस"
काय करणार गप्प बसा शांत बसा गप्प रहा म्हणून ओरडले तरीही काहिही उपयोग होत नव्हता.
" मग"
मग काय मी दंगा करणार्या काही मुलांना अंगठे धरून उभे करेन म्हणून सांगीतले.
" झाली मुले शांत त्यामुळे"
" कुठले काय . ती चेकाळलीच त्यामुळे . आणखी दंगा करायला लागली. आपण वर्गात दंगा करतो आणि सरांनी शांत बसा सांगितले तर बसतो का शांत"
" बापरे …. मला वर्गात असली मुले नको ग बाई" वैजु असल्या वर्गात तास घेण्याच्या कल्पनेने घाबरून गेली.
" वर्गात कोणीतरी मग कागदाचा बोळा उडवला"
" छान…. कमालच म्हणायची. पण मग तू काय केलेस."
" मी काय करणार? ती मुले दंगा करायचा हे बहुतेक ठरवूनच आली असावीत."
" मग?"
" माझम डोकं फिरलं. मुलांना शिक्षा करता आली असती तर सगळ्यांना वर्गाबाहेर काढले असते मी. सगळेच दंगा करत होते . यांना गप्प कसे बसवावे तेच कळत नव्हते.
" मग"?
घरी माझा धाकटा भाऊ लहान असताना दंगा करायला लागला की त्याला एका जागी ठेवण्यासाठी दोन तीन छोटे चेंडू आणि एक बादली द्यायची. आणि ते चेंडू लांबीन बादलीत टाकायला सांगायची. मला ते आठवलं मी फळ्यावर एक छोटा गोल काढला. कागदाचा बोळा उडवणार्या मुलाला मी उभे केले. त्याला म्हणाले की मागच्या भिंतीला टेकून उभा रहा आणि कागदाचा बोळा त्या फळ्यावरच्या गोलात बरोब्बर बसला पाहिजे असा फेक बघुया किती जमतय. च्वॅलेंज तुला. दहा वेळा फेक. निदन निम्म्या वेळेला तरी गोलाच्या मधोमध नेम बसला पाहिजे"
" आणि" आपीची उत्सुकता थाम्बत नव्हती.
" आणि काय. तसे केले आणि गम्मत म्हणजे वर्गातले सगळे खोकल्याचे आवाज बंद झाले. त्या मुलाचा नेम दहा पैकी कितीवेळा चुकतोय हे सगळेजण मोजू लागले. नेम बसला की टाळ्या वाजवायचे. काही जमले काही नाही. मग आणखी एक जण पुढे आला. म्हणाला मी करून पाहू का? त्यानेही नेमबाजी करून पाहिली.
मग काही मुली पुढे आल्या. सगळे नेमबाजी करून पहायला लागले. वर्गातला दंगा आटोक्यात आला पण शिकवायचे राहून गेले. "
"म्हणजे तुझा तास वायाच गेला म्हण की"
" वाया नाही गेला. मी शिकले की त्यातून. मी घाबरले असते तर त्या पोरांनी रडवलं असतं मला." पण आता जर पुन्हा कधी अशा वर्गावर जायची वेळ आली तर अजिबात भिती वाटणार नाही."
अरेच्चा हे पण आहेच की. शिकवताना आपण बरेच शिकत असतो.
क्रमशः
प्रतिक्रिया
24 Feb 2020 - 10:27 am | king_of_net
वाचतोय!!
24 Feb 2020 - 2:11 pm | श्वेता२४
पु.भा.प्र.
24 Feb 2020 - 3:34 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त लिहिताय विजुभाउ
वाचतो आहे, हा भागही आवडला. शेवटचे वाक्य शिकवताना आपण बरेच शिकत असतो.
हे विषेश आवडले
पैजारबुवा,
1 Mar 2020 - 5:06 pm | सुधीर कांदळकर
हसलो तर मला अंगठे धरून उभा करणार कां?
मज्जा आली. धन्यवाद.
4 Mar 2020 - 1:16 am | बांवरे
वा वा !! फार मजा आली वाचताना.
पु.भा.क ???
5 Mar 2020 - 7:03 am | विजुभाऊ
टंकून टाकलाय http://misalpav.com/node/46184