आंजीने तीच्या नेहमीच्या लाल रेबीनी ऐवजी कसल्याशा मोठ्या प्लास्टीकच्या हिरव्या पिना वेणीला बांधल्यात. डोक्यात नाकतोडे बसल्यासारखे दिसतय
शुभांगी ने दुमडलेल्या वेण्या आणि त्यावर कसलासा गजरा घातलाय. तीचे डोळे चमकताहेत. पिवळ्या साडीत सगळ्यात ठळ्ळक दिसतेय. हसताना…
मागील दुवा : http://misalpav.com/node/46117
हसताना तीचे डोळे चमकतात हे आत्तापर्यंत कधी माहीतच नव्हते. आणि हसली की चेहेर्यावर पाँड्स पावडरचे फूल फिरवल्यागत हसतेय.
दिवाळीत ती हसणारी पिवळी फुले येतात ना तशी दिसतेय. मला तर ती" रंग रंगुल्या सानसानुल्या गवत फुला रे गवत फुला " ची कविता आठवायला लागली.
आपण असे काही बोललो की टंप्या ते जगजाहीर करणार. तो इथे नाहिये ते बरंच अहे म्हणा. त्याचं दप्तर तर दिसतय. एल्प्या त्याची ती समांतर रेषांची तयारी करतोय. त्याने काही कागदांवर आकृत्याही काढून आणल्या आहेत.
टंप्या शाळेत सगळ्यांपेक्षा लवकरच आला होता. आल्याआल्या तो थेट शिपाईमामांच्या बरोबर गेला. घरून येतानाच तो त्यांच्यासारखी गांधी टोपी डोक्यावर घालून आला होता. शाळा सुरू झाल्याची घंटा झाली तारकुंडे बाईंनी सर्वांना त्यांच्या आजच्या तासाबद्दल विचारले. प्रत्येकाची तयारी होतीच म्हणा. वेळापत्रकानुसार कोण कोण कुठल्या वर्गावर जाणार आहेत याची पुन्हा एकदा खात्री करून झाली.
प्रत्येकाने त्याला शिकवायला लागणार्या विषयाची तयारी करून आणली आहे. आणि प्रत्येकजण त्याचा अभ्यास करत बसलाय. सगळे जण अभ्यास करत बसलेत त्यामुळे असेल की काय पण तो वर्गातला फरफर्या स्टॉव्ह सारखा आमच्या सगळ्यांच्या बोलण्याचा एकत्रीत आवाज आज जरा कमी येतोय.
पहिला तास. योग्या , मंदार , श्रीपाद , संगीता, जयू सगळे तास घ्यायला त्यांच्या त्यांच्या वर्गावर गेलेत. एखाद्या मॅचमधे ओपनिंग बॅट्समन जावेत तसे . ते आल्यावर कळेल त्यांचे अनुभव काय आहेत ते .
शेजारच्या सातवी क च्या वर्गातून मुले कविता म्हणताहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकरांची सातवी क ला शार्दूलविक्रीडीत वृत्त शिकवतय कुणीतरी.
ज्याचे पल्लव मंगलप्रदक्षिणा, छाया जयाची हरी ।
गंधेयुक्त फुले, फळे ही असति ज्याची सुधेच्या परी ॥
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखीचे, भला ।
आम्रा त्या पिक सेविता समसमां संयोग की जाहला ॥
कोण शिकवतंय माहीत नाही पण सातवी क ची सगळी मुले एका सुरात कविता म्हणताहेत.
आपण ऑफ तासाला कविता शिकवली तर? गवतफुलाची कविता शिकवूया…. वा मस्त आयडिया. अगोदर ती बुध्या काकाची गोष्ट सांगुया. पण आज आपल्याला ऑफ तास मिळणार आहे का तेच माहीत नाही. कुणीतरी आजारी पडू देत म्हणजे त्याचा तास आपल्याला मिळेल.
हे म्हणजे क्रिकेट मॅचमधल्या बाराव्या गड्याने त्याच्या टीमम मधला कोणीतरी जखमी होऊ दे म्हणजे त्याला निदान ग्राउंडवर तरी जायला मिळेल अशी प्रार्थना करण्यासारखे आहे.
नको रे कशाला कुणाला आजारी पाडायचे. पाटणला असताना गण्या आसाच शेजारच्या संदीपला तरी काहीतरी म्हणाला होता . संदीप म्हणाला कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही. गण्याने एवढ्यावर थांबावे की नाही. तो संदीपलाच विचारू लागला यातले ढोर कोण आणि कावळा कोण.. आज शिक्षक दिनाला गण्या असता तर त्याने काही शिकवायच्या ऐवजी तो मुलांनाच प्रश्न विचारत बसला असता.
पुढचा तास एल्प्या सातवीला भूमीती शिकवायला जाणार. योग्या संगीता जयु आले की कळतीलच शिकवतानाचे त्याचेअनुभव. आम्ही सगळेच अभ्यास करत बसलोय. यावेळी कुठल्याही शिक्षकांनी न सांगता. गप्प बसा शांत रहा हे पण कोणी कोणाला सांगत नव्हते. आठवीच्या इतर वर्गावतही हे असेच असणार. एखादी गोष्ट मनावर घेतली की त्याना त्याबद्दल काही सांगावे लागत नाही. सगळे आपोआप स्वतः होऊन करत असतात. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापने सारखे.
आपण केलेला अभ्यास बरोबर आहेका हे जे कोण तास घेणार नाहीत अशांना तीन तीन वेळा सराव म्हणून शिकवून झालंय. अर्थात असे फारच थोडे जण होते. मी ऑफ तास घेणार म्हणजे नक्की काय करणार होतो ते कुणालाच माहीत नव्हते. त्यामुळे आपण आज शिक्षक असणार आहोत की कसे तेच सांगता येत नव्हते.
एकच धडा तीन तीन दा शिकल्यामुळे जे न शिकवणारे होते त्यांचीपण आता इतर वर्गावर शिकवण्याची तयारी झाली . मला बुध्या काकाच्या गोष्टीची तयारी करायची होती. ती गोष्ट कोणाला सांगायची हा प्रश्न होताच. जे जे न शिकवणारे होते ते ते शिक्षक म्हणून शिकवणार्या बाकिच्यांचा भडिमार झेलत होते. मी एल्प्याकडे पाहिले तो त्याच्या समांतर रेषा कुणाला शिकवायच्या हाच विचार करत असावा. तो ही माझ्याकडेच पहात होता.
आता एल्प्याकडून समांतर रेषा म्हणजे काय हे शिकायचे म्हणजे डोक्यातले अगोदरचे सगळे फळा पुसल्यासारखे पुसून जाणार. त्यात ती बुध्या काकाची गोष्ट पण पुसली जाणार.
तो माझ्या कडे येत असतानाच पहिला तास संपल्याची घंटा झाली.
ए दुसरा तास , सातवी ब ला समांतर रेषा शिकवायला जायचेय ना तुला " एल्प्याला चंदूने आठवण करून दिली .
अरे हो की. ए मला बेष्ट लक दे की.
बेष्टलक … पण कशा बद्दल रे.
कशाबद्दल म्हणजे. आत्ताच्या तासाबद्दल बेष्टलक मुळे मी तास चांगला घेता यावा म्हणून
छॅ… आपण शिक्षक आहोत. काय परिक्षा देतोय का? आपली तयारी असेल तर बेष्टलकची गरजच नाय पडत. आणि तयारी नसेल तर दहा जणांनी बेष्टलक दिले तरी फरक पडत नाय. आणि एरवी तुला काय वाटतं की घाटेसर वर्गावर येताना सोनसळे सरांकडून बेष्टलक घेऊन येत असतील?
चुकलंच माझं तुला विचारायलाच नको होतं मी बेष्टलक साठी. पण आपली फुल्ल्ल तयारी आहे तासाची. काय पण विचार.
ए बाबा तासावर जा की. बोलत काय बसला आहेस.
हो हो……
एल्प्या सातवी ब ला समांतर रेषा शिकवायच्या म्हणून वर्गावर गेला. तो गेला . योग्या संगीता आणि जयु त्यांचे त्यांचे तास घेऊन आले.
तीघांचेही चेहेरे वेगळेच सांगत होते.....
क्रमशः