महाराष्ट्रातील एक तडफदार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयीन शिस्तीच्या कठोर कथांचे शूटिंग सध्या वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरूनही भरपूर प्रसारित होत आहे हे पाहून गंमत वाटते.
मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे आता वाहिन्यांना आपला एक कॅमेरामन आणि एक रिपोर्टर ‘मुंढे बीट’वर पर्मनंटली असाईन करावा लागणार आणि नागपूर महापालिकेत स्टुडिओ उभारावे लागणार असे दिसत आहे.
परवा शिवजयंतीदिनी मुंढे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना समजावून सांगितलेले कार्यसंस्कृतीविषयक भाषण अनेक वाहिन्यांनी लाईव्ह दाखविले.
ते चांगले होते, पण एक मुद्दा मागे राहातो.
कार्यालयीन कामकाजाच्या कोणत्याही भागाचे रेकाॅर्डिंग, शूटिंग वा प्रसारण करणे किंवा त्यासाठी परवानगी देणे अथवा प्रसारमाध्यमांसमोर ते करणे हे कार्यसंस्कृतीस धरून असते का?
मग राज्याच्या मुख्य सचिवापासून अन्य कोणत्याही खात्याचे सचिव किंवा अन्य महापालिकांचे आयुक्त किंवा कोणतेही आयएएस अधिकारी मुंढे यांचा कित्ता का गिरवत नाहीत?
सभोवती सतत प्रसार माध्यमांचा गराडा असला की कडव्या शिस्तीची चटक लागते व प्रशासनावर अंकुश राहतो हे यावरून सिद्ध होते.
प्रशासनातील प्रत्येकाने हे करायला हवे!
चोवीस तास बातम्यांच्या वाहिन्यांचीही त्यामुळे सोय होईल!
प्रतिक्रिया
24 Feb 2020 - 1:35 pm | चौथा कोनाडा
समयोचित लेख ! राज्य पातळीवर शाका (शासकिय कार्यलय) मधून ५ दिवसांचा आठवडा होत आहे या पार्शवभूमीवर ही चर्चा महत्वाची ठरावी.
संवेदनशील बाब आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, अर्थात संबंधीत यंत्रणा हे होणार नाही आणि झाले तरी ते लवकरात लवकर कोलमडून पडेल याची काळजी घेतील. हे करताना होणारा भ्रष्टाचार हा वेगळाच नवीन विषय निर्माण होईल !
बाकी मुंडे यांनी प्रचंड कडकपणा दाखवून आळसावलेल्या यंत्रणेला वठणीवर आणले हे प्रचंड मोठे यश आहे, पण प्रत्येक वेळी मुंडे कुठून आणणार हा प्रश्नच आहे.
पुण्याच्या पीएमपीत मुंडे यांनी केलेल्या सुधारणांमुळे माझया सारखा सामान्य खुपच आनंदला, पण त्यांची बदली होताच पुढील अधिकाऱ्याने संबंधित अनागोंदी आणि भ्रष्टाचारी यंत्रणांना सुखावणारा योग्य तो गलथानपणा दाखवलाच !