मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल.
साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल.
पण वास्तवात असं आहे का? आजपर्यंत या उपायांनी(शनीच्या मंदिरात जाणे,उपास करणे वगैरे) साडेसाती गायब झाली आणि साडेसातीत त्रासच झाला नाही असं उदाहरण सापडणं अवघड अाहे.नुकत्याच जन्मलेल्या मुलालादेखील साडेसाती असू शकते.मग आपल्या कर्मांचे फळ शनी देतो वगैरे गोष्टींना फारसा अर्थ उरतच नाही.
तर लक्षात घ्या की शनी हा मुळातच फलज्योतिषात 'पापग्रह' म्हणून मानलेला आहे.'शनी तिथे हानी','शनी तिथे विलंब' हेच सत्य आहे.प्रयत्नांमधे अडथळे आणणं,मानसिक संतुलन बिघडवणं,पैसे खर्चायला लावून आर्थिक स्थिती ढासळवणं हेच शनी साडेसातीत करत असतो.अर्थात शनीचं गिर्हाईक काही तुम्ही एकटेच नाही त्यामुळे रोज उठून तो तुम्हालाच पीडत बसेल असे नाही.
मग साडेसातीत करावं तरी काय? यासाठी वास्तवात उपयोगी पडू शकणारे हे उपाय:
१. जमेल तितके तोंड गप्प ठेवा.कारण असल्याशिवाय कोणाशीही बोलायला जाऊ नका.भांडू किंवा वाद घालायला तर मुळीच जाऊ नका.जातकाला अडचणीत आणण्यासाठीचे शनीचे हे 'हुकमी हत्यार' आहे.राग कंट्रोल करायला शिका.
२. जमेल तितकी काटकसर करा.फारच गरज असल्याशिवाय पैसे खर्च करु नका.कारण पुढे काय नि किती खर्च वाढून ठेवलेयत आपण नाही सांगू शकत.
३. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तरच शनी किंवा मारुती मंदिरात शनीवारी जा.विश्वास नसेल आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून गेलात तर काहीच फायदा होणार नाही.शनी/मारुती मंदिरात गेल्याने तुमची साडेसाती जाते वगैरे काही होत नाही.फक्त तुमचे मनोधैर्य वाढते इतकेच.
४. घरातल्या लहान मुलांना साडेसाती असेल तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.लहान मुले धडपडी,फार सावध वगैरे नसतात.त्यामुळे धडपडून काही इजा होणे वगैरे शक्य असते.यासाठी मोठ्यांनीच लक्ष ठेवून असणे चांगले.त्यांच्या शालेय शिक्षणातही काही अडचणी येत असतील तर त्यातही लक्ष द्या.
५. साडेसातीत तुम्हाला होणारा मनस्ताप ही शनीभ्रमणाची फळे आहेत.त्यामुळे या काळात एखाद्याच्या गैरवर्तनाचा राग आला तरी तो नियंत्रणात ठेवायला शिका.कदाचित तुम्हीदेखील पूर्वी तुम्हाला साडेसाती नसताना एखाद्या साडेसाती असलेल्या माणसावर असेच डाफरला असाल.तस्मात हे आपल्यासोबत होणारच आहे.आहे त्या परिस्थितीपासून लांब पळून किंवा आहे ती नोकरी सोडून दुसरी पकडल्यास साडेसातीचा त्रास होणार नाही हा भ्रम आहे.तसं काही होत नाही.
६. आणि हे ज्यांना साडेसाती नाही त्यांच्यासाठी: तुमच्या अवतीभवती,आंजावर साडेसाती असलेले कोणी माहिती असल्यास त्यांची सध्याची अवस्था समजून घ्या.आज त्यांच्यावर डाफराल,अोरडाल.चोपून घ्याल.पण तुम्हालाही नंतर कधीतरी साडेसाती येणारच आहे याची जाणीव असू द्या.तस्मात थोडा संयम तुम्हीच दाखवा.कारण तुम्हाला साडेसाती नाहीये.त्यामुळे तुम्हाला ते चांगलं जमू शकेल.
७. सर्वात शेवटी लक्षात घ्या की ही साडेसात वर्षे कधीतरी संपणारच आहेत.त्यामुळे हा काळ पार करण्याची तयारी ठेवा.हा आपला बिकट काळ आहे आणि हा कधीतरी नक्की संपणार आहे हे सतत मनाला बजावत रहा.तग धरायला शिका.मन खंबीर राहू द्या.
प्रतिक्रिया
24 Jan 2020 - 11:16 am | ज्ञानोबाचे पैजार
इकडे मिपावर सुध्दा बरेच शनी आहेत आणि ते आकाशातला शनी पेक्षा जालिम आहेत.
इतके की आकाशातला शनी सुध्दा यांची पिडा टळावी म्हणून मारुतीला रोज ११ प्रदक्षिणा घालत असेल.
यांची साडेसाती सुरु झाली की अवतार संपलाच म्हणून समजयचे.
या करता काही उपाय असला तर सांगा, तो केला तर आकाशातला शनी सुध्दा आपोआप शांत होईल
पैजारबुवा,
24 Jan 2020 - 11:58 am | महासंग्राम
खिक्क ...
24 Jan 2020 - 2:00 pm | सुचिता१
24 Jan 2020 - 2:00 pm | सुचिता१
24 Jan 2020 - 5:52 pm | टर्मीनेटर
सर्वप्रथम आज माझी (वृश्चिक राशीची) साडेसाती संपल्याबद्दल मी माझे स्वतःचेच अभिनंदन करतो 😀
लेख आवडला. त्यातले बरेच मुद्दे आणि सल्ले (स्वानुभवावरून) पटले.
अर्थात माझा जन्म कुंडली / पत्रिका आणि ज्योतिषांवर अजिबात विश्वास नसला तरी फलज्योतिष हे प्रामुख्याने खागोलशात्राशी निगडीत निरीक्षणे, तर्कशास्त्र आणि सिद्धांतावर आधारित असल्याने त्याकडे एक शास्त्र म्हणून बघण्याची मानसिक तयारी नक्कीच आहे.
साडेसातीच्या कालावधीमध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या भोगायला लावण्यात त्या शनिदेवाचा हात आहे कि नाही हे तो सर्वज्ञानी परमेश्वरच जाणे, पण त्या समस्या येतात, आणि त्या काळात प्रचंड संयम पाळावा लागतो हे मात्र नक्की!
पुढील लेखनास शुभेच्छा!