अंधार छाया
सात
शशी
आज शुक्रवार म्हणजे एच व्ही सर दाढी करून येणार आणि चिडणार! मग स्पेलिंग चुकलं की बसणार पट्ट्या हातावर! विचार करत मी एकनॉलेजमेंट म्हणजे पोच असे पाठ करत होतो. मनात येई दाढी करणं आणि रागावणं याचा काही संबंध असेल तर मी दाढी करणार नाही मोठेपणी!
आत आई, बेबी बोलत होत्या. लती काहीतरी दौत पेनाशी चाळे करत होती. आजी दुर्वा तोडायला फिरत होत्या बाहेर फुलझाडांपाशी. दादा सायकलवरून गेलेले पाहिले ऑफिसला, मग मी सकाळ घेतला हातात. ‘क्रीडा विषयक बातम्या हे पुढच्या पानावर का देत नाहीत? आहाला काय करायचय ते मंत्री काय म्हणताय ते वाचून.’ जरा सिनेमाच्या जाहिराती वाचेपर्यंत आईची हाक आली, ‘शशी, पाटी पेन्सिल आण.’ तसा उठलो आत आलो पहातो तो बेबीमावशीच्या हातात माळ ? नवलच होतं!
आईने ॐ नमःशिवाय पाटीवर लिहिलेले पाहिले. आईला म्हणाली, ‘आता म्हण बरं वाचून तर ही गप्प! मग आईने सांगितले मला की काल एका गुरुजींनी ॐ नमःशिवाय जप करायला सांगितलाय रोज एकशे आठ माळा.
सकाळी अंघोळ वगैरे करून मावशी बसली देवासमोर हातात माळ घेऊन, आई म्हणाली, ‘मोठ्यानं म्हण ग बाई. आम्हाला ऐकायला येऊ दे.’ बराच वेळ झाला ही बोलेना म्हणून, आई पोळ्या करता करता मागे वळून पाहते तो ही गप्प पुतळ्यासारखी! आई म्हणाली, ‘म्हणतेस ना?’
तर मावशी म्हणाली, ‘काय म्हणायच?’
‘अग ॐ मनःशिवायचा जप म्हणतेस ना? काल गुरुजींनी दिला नाही का आपल्याला?’ आई म्हणाली.
‘हो हो म्हणते’ म्हणून पुन्हा थांबली तशी आईने पोळ्या करायचे थांबवले. ‘काय झालं म्हणत का नाहीस?’ मावशी म्हणाली, ‘काय म्हणायच ते आठवत नाही!
आई चाट! मग आईने मला बोलावलं. पाटीवर लिहून वाचायला दिलन तिला. मावशी पाटीवर पाहून म्हणाली, ‘मला दिसत नाही.’ मी बावचळलो. अरे दिसत कसं नाही एवढ्या मोठ्या अक्षरातले?
तर म्हणाली, ‘मला दिसत नाही तर मी काय करू?’
आईने मला प्रथन पिटाळले दादांना बोलवायला. तस्सा मी धावत गेलो, पाय़ी चालत जायच्या अंतरावरच्या ऑफिसात. दादांना म्हटले, ‘लवकर घरी चला, आई बोलावतेय.’ डब्बलसीट मी मागे बसून आलो दादांबरोबर. तोवर आई, आजी, लता बसून होत्या मावशी जवळ.
दादा आले तशी आई म्हणाली, ‘अहो ही एकदाही म्हणायला तयार नाही जप! म्हण म्हटल तर आठवत नाही म्हणतेय! वाचायला दिसत नाही म्हणते! आता ओरडूनही पाहिलं तर पाटी टाकून दिलीन जोरात! पहा बाई काय करायच ते! दादा थोडे विचारात पडले. म्हणाले, ‘बर नाही तर नको वाचू. चहा करा थोडा थोडा.’
चहा घेता दादा आईजवळ हळूच म्हणाले, ‘जरा दमाने घे. थोड्यावेळाने तू तिला समोर बसव आणि म्हण म्हणाव, मी सांगते तू म्हण. पाहू काय होतय ते.
आई तिला जपमाळ घेऊन बसली. प्रेमळपणे म्हणाली, ‘बेबी काल ऐकलस ना काय ते? मग तू जर आता अडून बसलीस तर मग बरी कशी होणार तू? सांग बरं? आता तू असं कर की मी म्हणते मग तू म्हण’
मावशी म्हणाली, ‘अक्का कस सांगू. मी काही मुद्दाम केलं नाही! मला काही कळेच ना. मी तरी काय करू?
‘बर मी म्हणते तुझ्या बरोबर.’ अस म्हणून सरसाऊन बसली. म्हणाली, ‘असेल पंधरा वीस वेळा कशी बशी. पण मग एकदम ताठ झाली अन गप्प झाली! आईने म्हण म्हणताना ओरडली वसकन, ‘नाही म्हणत जा.’
तशी आईने आवाज वाढवला. ‘म्हणतेस की नाही ॐ नमःशिवाय?
ऐकायला नाही येत काय म्हणायचं ते!
दादा दुरून पहात होते. म्हणाले, ‘नाही ना ऐकायला येत? मग मंगला तू तिचा हात धर आणि तू म्हण ॐ नमः शिवाय’.
आणि असा त्यांचा जप चालू झाला. आजींनी बाकीचे जेवण बनवले. मी न लता थोडेसे खाऊन शाळेत पळालो. पण मावशीचे ते ताठर रुप डोळ्यासमोरून जाईना!
मंगला
मी बेबीचा हात धरून पंचवीस माळा केल्या. तोंडाला कोरड पडायला लागली माझ्या. कधी सवय नाही मोठ्याने जप करायची. थोडा वेळ उठून जेवणाची तयारी केली. हेही आले ऑफिसात जाऊन परत. मग जेवणानंतर बसलो पुन्हा जपाला. कशाबशा पन्नास माळा झाल्या पुढे दिवसाभरात. कधी ही गप्प बसे, हाताने हालवून म्हण म्हटलं तर झोपेतून जागी झाली असे करी. रात्री दहा पर्यंत बासष्ठ पर्यंत माळा झाल्या आणि ही सरळ अंथरुणावर जाऊन झोपली मग ह्यांनी मला खुणेनी थांबवल. रात्री पडले अंथरुणात. माझ्या मनातून हे जाईना की मी का अशी करत बसू रोज माळा? आज एक झालं! रोज कसं शक्य आहे? मुलांचा अभ्यास आहे, माझा भजनाचा क्लास असतो आठवड्यातून दोन वेळा. महिला मंडळाच्या मीटिंगा असतात कधी मधी. लोकं येतात ह्यांना भेटायला.
ह्यांना म्हटल तर हे एकच म्हणाले, ‘हे पहा, आता हिला ठीक करायच ठरलय ना? मग बाकीचे सगळे सोड. होईल काय व्हायचेय ते. पण तू पहिल्याच दिवशी असं म्हणायला लागलीस तर कसं होईल बरं?’
रात्र तशी शांतच गेली. सकाळी मी उठले पुन्हा एकशे आठ माळा जपाच्या करायच्या आहेत हे मनात येऊन माझ्यावर इतके जडपण आले क्षणभर सुचेना काय करावं ते. आज शनिवार, उद्या रविवार, परवाच भेटतील गुरुजी. आधी नाही! काय करावं?
विचार करत मच्छरदाणीतून बाहेर आले. घड्याळ अंथरुणाजवळून उचलून कपाटावर ठेवलं. नजर स्वामींच्या तसबिरीकडे गेली. नकळत हात जोडले गेले. ‘स्वामी मार्ग सुचवा आम्हाला’ असे मनातून म्हणताना डोळ्यातून पाणी आले.
अंघोळ करून भस्म लावून बसलो आम्ही दोघी देवासमोर जप करायला. शंकाच होती ही म्हणेल याची. म्हणायला चालू केलं आणि पटकन बेबी म्हणायला लागली हात हातात घेऊन! दोन-तीन माळा झाल्या. पाच-सात- दहा-पंधरा बसल्या बैठकीला पंचवीस झाल्या एकदाही थांबली नाही की काही ओरडली नाही, नाही म्हणणार म्हणून! आजींनी चहा दिला अर्धा अर्धा कप गरम गरम आणि आम्ही पुन्हा बसल्या बैठकीला पन्नास माळा केल्या मग माझंच अंग मोडून आलं म्हणून आम्ही थांबलो.
आजी
मंगलाला चहा करून दिला कढत कढत. बसलीय बहिणी बरोबर जपाला म्हणून. थोडी धाप लागली होती सकाळपासून. पण एफिड्रिनची आणखी एक गोळी टाकली तोंडात. स्टो पेटवला. उभे राहून मला नाही जमत. मी आपली खालीच बसते स्टो उतरवून जमिनीवर. कधी मधी वाटले तर.
कपबशा मोरीपाशी नेऊन ठेवल्या. अन बसले मंगलापाशी. बाधाबिधा आहे म्हणतात हिच्या बहिणीला! इतकी वर्ष झाली पण मी कधी पाहिले नव्हते असले! स्दाशिव भाऊजींकडे होते इंदुरात, तिथे आमच्या वाड्यातल्या पिंपळाबद्दल म्हणायचे लोक काही बाही. नागूभाऊजी त्याच्या मुळेच भ्रमिष्ट झाले म्हणे! पुढे काय झाले काही कळले नाही नीट. माझा भाऊ होता पुर्वी संस्थानिकांच्या अमदनीत फौजदार. तो सांगे भुता खेतांच्या गोष्टी. आमचा घोडा कसा बुजला. रात्री पलिते कसे दिसले, जंगलात पळताना काय अन काय!
काल बेबीचा झंपर पाहिला धुवायला टाकलेला. काजळाच्या रेषांनी भरली होती पाठ. बाईला धुवायला टाकलान मंगलाने. मी घेतला चुबकायला अंघोळीला बसताना. गंगव्वा विचारत बसेल कसल्या फुल्या पाठीवर म्हणून. कशाला इतरांना वाच्यता!
मंगला पुन्हा माळ करून घ्यायला बसली. सकाळची शाळा आटपून मुले येथील. जनार्दनही येईल म्हणून भात टाकायला उठले.
दादा
‘प्रसाद टेक्सटाईल्समधे मुकुंदराव परांजपे आलेत मुंबईहून शेठ बरोबर. ते येणार आहेत संध्याकाळी गप्पा मारायला. गाण्या बिण्याचा शौक आहे त्यांना. मिलच्या गेस्टहाऊस मधे राहतात ते.’ मी मंगलाला सांगत होतो. ही म्हणाली, ‘अहो जरा मला विचारले असतेत बोलावू का तर बरं झालं असतं. ही बेबी आपल्याकडे. एकशे आठ माळा झाल्या शिवाय मला हालता येत नाही. मला ही पटलं तिचं म्हणणं.
सुपारीचं खांड तोंडात टाकून लवडलो कॉटवर. दुपारचा चहा केला आजींनी. माझ्यापुढे ठेवत म्हणाल्या, ‘ऐशी माळा होत आल्यात. संध्याकाळपर्यंत आले तुझे कोण ते, तरी चालतील. वाटले तर मी टाकीन खिचडी-पोहे.’
मुकुंदराव गेले गप्पा मारून. मंगला चहाचे कप नेता नेता म्हणाली, ‘अहो बेबीनं केल्या बर का एकशे आठ माळा! खर तर तुम्हाला आत बोलावून सांगणार होते. पण म्हणलं इतकं नको उतावीळ व्हायला!
‘झाल्या? छान’ मी म्हणालो, शशीने कान टवकारलेलच होते. म्हणाला, ‘दादा, आईनंच केल्या एकशे आठ माळा. मावशी बसली होती हात धरून आईचा. कधी म्हणे कधी बसे गप्प. पण आज उठून नाही गेली रागावून.’
आज सोमवार. पुन्हा एकशे आठ माळांचा जप झाला. मंगलाला मी म्हटले, ‘हे बघ, मुलांना घेऊन जाऊ गुरूजींना भेटायला. सगळ्यांनीच घेऊ मंत्र. म्हणजे तुझ्या एकटीवर ताण पडायचा नाही. मुले ही तिचा हात धरून म्हणायला लागतील.’ शशी, लता तयारच होते. म्हणाले, ‘आम्हाला नाही भीती वाटत मावशीची. आम्ही धरू मावशीचा हात!’
गुरूजींकडे मी व मुलांनी मंत्र घेतला. गुरूजी म्हणाले, ‘जातील, अजून एक दोन आठवडे जातील. मग आपोआप ती स्वतःच म्हणायला लागेल! तोपर्यंत तुम्हीच म्हणा. पण तिचा हात हातात असायलाच पाहिजे.
माझी कुंडली पाहिली त्यांनी. म्हणाले, ‘सिंह राशीला साडेसाती आहे काही वर्षांनी. तेंव्हा जपलं पाहिजे तुम्हाला, जॉईंट्सचे दुखणे, मधुमेह संभवतात. आणखी एका अपत्याचा योग दिसतो.’
मी म्हटलं, ‘माझी अध्यात्मिक प्रगती कुठवर आहे? माझा हा पेटंट प्रश्न असतो कोणी असे भेटले की!
ते म्हणाले, ‘म्हणावी तशी गती येणार नाही.’
मुलांच्या पत्रिकाही पाहिल्या त्यांनी. ‘पत्रिका ठीक आहेत. शिक्षणं बेताचीच आहेत. बुद्धी सामान्य आहे. सांपत्तिक स्थिती चांगली असेल. ‘
लता
भाग्यश्री हेंद्रे आणि माझा अभ्यास घेऊन आई थांबली. आत शशी आणि मावशी कशी जप करतायत हे पहायची इतकी गडबड झाली मला. माझे लक्षच नव्हते अभ्यासात. एकीला जाऊन आले. पलंगावर चढून मावशी जवळ बसले.
पाटीवर पंचाऐशीचा आकडा होता. मी पेसिल घेऊन बसले. मोठा तांबडा मणी येऊन गेला. तशी मी पाटीवरचा आकडा पुसून बदलला. शशी म्हणाला, ‘लते घेतेस का माळ करायला? मावशी मी जरा लघवी करून येतो.’ मी मावशीचा हात घट्ट धरला. आणि ॐ नमः शिवाय म्हणायला लागले. थोड्यावेळाने मावशी म्हणाली, ‘आण माळ इकडे. मी माळ ओढते. तुला नाही जमत.’ मावशीने माळ हातात घेतली. बसली हात धरून माझा. जप मी करत होते. ती फक्त माळ ओढत होती. शशी आला. इतक्यात त्याच्याकडे मित्र आले, सुभ्या, रवी जोशी. म्हणाले, ‘पुर्षा फडके बोलावतोय रिंग खेळायला.’ मी हातानेच ‘जा’ म्हटलं. तो गेला. थोड्यावेळाने आई-आजी आल्या पाहायला, मी कशी करतेय जप. आजींना कौतुक वाटलं माझ्या बरोबर त्याही म्हणायला लागल्या!
रात्री दादांच्या कुशीत झोपले मुरकुटून. इतकी मज्जा वाटली जप करायची!
प्रतिक्रिया
21 Jan 2020 - 10:41 am | विनिता००२
वाचतेय.
21 Jan 2020 - 12:29 pm | आंबट गोड
काही मुद्दे असे
१. शीर्षक प्रॉपर टाका. खूप मोठं वाक्यच्या वाक्य दिसतं
२. अगदी बोलल्या सारखे लिहायला हवे असे नाही. उदा.. ही म्हणाली, ‘अहो जरा मला विचारले असतेत बोलावू का तर बरं झालं असतं. ही बेबी आपल्याकडे. एकशे आठ माळा झाल्या शिवाय मला हालता येत नाही. मला ही पटलं तिचं म्हणणं.-- यात मला ही पटलं तिचं म्हणणं...हे वाक्य दादांच्या तोंडी आहे. ते समजतच नाही. कारण मंगलाच्या वाक्यानंतर " हा कॉमा पूर्ण झालेला नाही.
३. हेही आले ऑफिसात जाऊन परत.- हे वाक्य 'हेही ऑफीसमधून परत आले.' असे हवे होते.
अशा अनेक चुका आहेत.
पहा. राग मानू नका.
पण चांगल्या कथानकाचे वाचन करताना रसभंग होतो म्हणून लिहीले.
21 Jan 2020 - 2:40 pm | शशिकांत ओक
शीर्षकात भागातील ठळक गोष्ट वाचली जावी म्हणून हा प्रयोग केला आहे. नुसतेच ठोकळेबाज भाग अमूक असे वाचायला प्रभावी वाटले नसते. असो.
कादंबरीतील कथन त्या त्या व्यक्तीच्या बोलीतील बाजाने ठेवून वाचकांशी जवळीक निर्माण करायला प्राधान्य दिले आहे.
काही ठिकाणी आपण म्हणता तशी दुरुस्ती हवी आहे. ती करून ठेवली आहे. या नंतरच्या भागात असे होऊ नये म्हणून प्रयत्न करतो.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.