खाली दिलेल्या लिंकवर जे गाणे आहे त्यावर काहीतरी खरडलंय.
https://youtu.be/kWOXZmIIrSo
२ दिवसांपूर्वी ९ वीच्या अभ्यासक्रमातील 'मेंदू'शी झटापट सुरू होती. उजवा बाजूला कुठली केंद्र व डाव्या बाजूला कसले हिशोब असं काय काय चर्वीचरण चालू होतं. "संगीत, नृत्य अशा कलांची जबाबदारी उजवा भाग घेतो." वाक्य वाचून झालं. आता हे शिकवायचं कसं ? का घेतो? कशी घेतो? कोण व कधी ठरवतं? जन्मतः घेऊन येतो हे सेटिंग का समाज व परिस्थितीनुसार बदलतं? हा माणूस अरसिक / रसिक असणार हे उजवा किंवा डावा भाग छापून आणत असतील तर बरंच आहे. मी पण घोषित करेन की आमच्या मेंदूचा उजवा भाग जरा सुस्तावला असल्याने आमचा कलांशी संबंध जोडला जाऊ शकत नाही. ( डाव्यानेही काय दिवे उद्दीपित केलेत ते आमच्याशिवाय कोणालाच माहीत नाही.) नाहीतर आम्ही पण कोण्या खां साहेबांचं नाव कानाच्या पाळी खेचत खेचत लोकांसमोर मिरवलो असतो की.
त्याच दिवशी हरिहरन यांनी एका मैफिलीत गायलेलं 'रोजा जानेमन' कोणीतरी पाठवलं होतं. साहेब पेटीवर भाता ओढत ओढत सुरू होतात. व्हिडीओमधे २:१३ ला त्यांचा मेंदू ( कोणता भाग ते माहीत नाही) त्यांचे दोन्ही हात लांब फैलावून साथीदारांना थांबायला सांगतो. लोकांना 'रोजा' म्हणायला लावता लावता २:२८ ला एकदम गाडी सारेगम ची स्टेशन्स् घेऊ लागते. 'नि सा' ऐकू शकतो 'ध नि' सुद्धा झेपवतो आम्ही पण हे काय पुढे 'नि प...' एवढंच तर म्हणालेत ते. त्याने आमच्या मेंदूच्या उजव्या भागाने आमचं बोट पॉजवर का ठेवलं? मागे नेऊन नेऊन का ऐकतोय तो? अरे, पुढे ऐकू दे की उजव्या, अशी नम्र धमकी दिल्यावर म प, म प ग रे उध्वस्त करत होतं तेवढ्यात रे ग रे च्या हिंदोळ्यावर रेललो तोच 'रे नि ध प' ने साफ आडवं पाडलं राव. उठतोय तो परत एकदा 'रे नि ध प' वरून येऊन कोसळलं. शेवटच्या नि सा...पर्यंत आमचा सुपडा साफ झाला होता
बरं वर जी काही अक्षरं सूरांकरता लिहिली आहेत ही आपली लिहायची म्हणून आहेत. जी मला फक्त लिहिता येतात वाचता येत नाहीत हाहाहा. लहानपणी काही गानकंटक म्हणताना ऐकलं होतं शास्त्रीय संगीत म्हणजे आऊ आऊ करणे, एरंडेलचा वास किंवा चव घेतल्यागत चेहरे वाकडेतिकडे करत विव्हळणे, त्यांना रे रे करताना ग प करायला हवं नाहीतर सा प बोलवायला हवं, अजूनही काहीबाही होतं. पण मगाशी आपण शिकलो की हा तर त्यांच्या मेंदूच्या डाव्या भागाचा आगाऊपणा असणार, तेव्हा ते सोडून देऊ.
गाणं ऐकताना गाणारे एकदम सरगम घेऊ लागले की मलाही काही वर्षांपूर्वी थोडा रसभंग झाल्यासारखं वाटायचं. ( केवढी पापं केली असतील गेल्या जन्मी याची कल्पनाच केलेली बरी) संपूर्ण संसार अंगाखांद्यावर घेऊन डोलणारे वृक्षसुद्धा निष्पर्ण होत होत संन्यास घेतात व योग्य वेळी शून्यातून नवीन सृष्टी निर्माण करत राहतात. आमच्या अहंकाराचा संभार कमीच होत नाही, दंभाची पालवी कोमेजतच नाही. तर नूतन कोवळ्या ज्ञानाची रुजवात कशी होणार? तर सांगत होतो की अलीकडे शब्द सोडून सारेगमप मध्ये डुंबावसं वाटतं. शोधावसं वाटत शब्दांमागे दडून आपल्या कानांत, हृदयात जादू उलगडत जाणाऱ्या त्या बदमाश सूरांना. शब्दरुपी पानं फुलं फळं यांनी लगडलेल्या वृक्षापेक्षा मातीत मुळांचा तानपुरा रोवत आभाळ व्यापून टाकणारे सूर रोमारोमांतून छेडणारे वाळलेले वृक्ष जवळचे वाटतात. ना अर्थाची सक्ती ना भपका. सजलेली आहेत म्हणून शोभेची झाडं घरात कोणीही ठेवायला तयार होईल हो. पण अंगावर फक्त रियाजाची व गुरुकृपेची विभूती फासून निष्पर्ण सरगम कोण डोक्यावर घ्यायला तयार होईल? मनाला येईल तेव्हा अंगाअंगातून हिरवं विश्व पैदा करू शकणारे हे तपस्वी मंत्र म्हणत नसतात तर आतल्याआत सूरांचं नाम घेत घेत इतरांसाठी मंत्र तयार करतात. झाडांना मेंदूच नसतो मग कोणते भाग आणि काय? म्हणून हे पण सोडूनच देऊ.
सातंच तर आहेत सा रे ग म प ध नि बस्स. सात लाटा व त्यांच्यापासून झालेले रागांचे समुद्र. प्रहराप्रहराला वेगवेगळ्या लाटा. अवखळपणा वेगळाच प्रत्येकीचा, आत आत ओढून नेणाऱ्या, स्वत्व विसरायला लावणाऱ्या लाटा. बघा की २:३६ च्या 'नि प' ने मला काही सेकंद अधांतरी लटकवून ठेवलं होतं ते पण श्वास अडकवून. आम्ही ठो अज्ञानी ह्या प्रांतातले. तरी आमची अशी हालत होत असेल तर जाणकारांचं काय व्हावं? सूर जाणणारे सुर व न जाणणारे असुर असं म्हणावं तर आम्ही नक्कीच राक्षस. सात पैकी काही हातावर घ्यायचे प्रेमाने मायेने वळायचे, गळ्यातल्या तेजाने चेतवले की हृदयात सुरांची वात तेवत राहत असेल नाही. मग व्यवहार शिल्लक उरतो का हो? एकाच क्षणात सूरांच्या पावित्र्याने लपेटलो गेलो की सगळंच संपलं. गाणं शिकलो असतो तर हमखास कफल्लक झालो असतो. मीरा आठवा की, एका वस्त्रात स्वतःला लपेटून घेत कानाशी तारा जुळवत कृष्णाचं स्मरण करणारी. चुकलो, स्मरण करायला ती विसरत कधी होती? आम्हासारख्या नाठाळांना अक्कल शिकवायला शब्दांचा आधार घ्यायला संतांना, अन्यथा त्यांना भाषेपलीकडला सूरांचा उगम असा हरी उमगल्यावर का उगाच अर्थाची कालवाकालव केली असती?
आयुष्यात येत नाहीत अशा खूप गोष्टी आहेत. सगळ्यांची खंत नाही. काहींची रुखरुख जाऊनयेऊन असते. पण सूर न जाणता येण्याचा सल अलीकडे जिवंत होऊ लागलाय. आमचे मित्र संगीत शिक्षक श्री.गोखले सर गाणं ऐकलं की हा राग तो राग, इथे हा कोमल आहे इथे हा तीव्र आहे, निषाद, धैवत, गंधार असं काय काय सुरू करतात. अस्मादिक व अस्मादिकांचे अज्ञान लपवायला जागाच मिळत नाही या अवनीवरती. क्षणाक्षणाला करोडो वायफळ हवेचे बुडबुडे काढणारे आम्ही शिक्षण घेऊनही सात अक्षरं न समजणारे ढेपसाळ, हेच खरं. हां आता ऐकायला आवडणं ह्यात डिग्री देत असाल तर उत्तीर्ण होऊन दाखवू. दोन्हीकडचे आजोबा उत्तम गायचे, बाबांचे बाबा उत्तम पेटी वाजवायचे व गाणंही शिकवायचे. दोन्हीकडच्या आज्या छान गोड अभंग म्हणायच्या. आम्ही काही वर्षे तबल्याशी झटापट करून अभ्यासापोटी म्यान करून ठेवला तो ठेवलाच, त्यालाही युगं लोटली. लहान भावाला कडेवर घेऊन माझा हात धरून आई जवळपास अर्धा तास तंगडतोड करत मला तबला शिकवायला न्यायची. सगळं लक्षात ठेवून कृतघ्नपणे विसरलो. आजकाल मोबाईलवर बोटं आपटून हे असलं काहीतरी लिहीत तबला न वाजवण्याची भरपाई करत असतो.
दहावीला असताना आमच्या शाळेतल्या भिडेबाईंनी मला दोन तीनदा साथीला बोलावलं होतं. "सावळाच रंग तुझा.."ह्या गीतासाठी धा धी ना धा तू ना असं करायचं होतं. त्यातल्या एक सराव जीवघेणा रंगला होता. म्हणजे मी तबला वाजवतोय आणि भिडेबाई गातायत असं काही वेगवेगळं शिल्लक राहिलं नव्हतं. साथ शब्द खोटा पडला होता. दोन्ही उर्ज्या वेगळ्या असूनही एकाच सूरांतून एकवटून धावता धावता एक झालेल्या. बाईंना स्पर्धेसाठी ते तयार करायचं होतं. स्पर्धा न होताच त्या जिंकल्या होत्या, मी साक्षी होतो त्यांच्या विजयाला. आणखी एकदा "निमडी कोलीमा रंगमा वसुंधरा.." हे आपल्या पूर्वेकडील कोणत्यातरी प्रदेशांतील भाषेमधलं गाणं होतं. त्यावर आमच्या वर्गातील मुलींनी नृत्य बसवलं होतं. मला फक्त डग्ग्यावर ठेका द्यायचा होता. तो समाजाला आवडल्यामुळे वगैरे आम्ही बरेच ठिकाणी तो सादर करायला गेलो होतो. त्यातील एक नक्कीच विसरणार नाही. स्टेज तकलादू बांधलं होतं. आमच्या सर्व मुली नाचून धुमाकूळ घालत होत्या, त्याने स्टेज, मी व माझा डग्गा गदगदत होतो. मी अपर्णा नावाच्या माझ्या मैत्रिणीला खूण करून सांगत होतो की 'जरा सबुरीने घ्या नाहीतर मी खाली कोसळणार." पण नृत्यविलासात दंग असल्याने त्या बालिकेला मी नाच छान होत आहे असं सांगतोय असं वाटल्याने ती अजून जोरात थयथयाट करू लागली, त्याबरोबर इतर साळकाया म्हाळकाया पण थिरकू लागल्या. लोकं तर पेटलेच होते टाळ्या काय आणि शिट्या काय. शंकराने तिसरा डोळा उघडल्यावर पृथ्वी डळमळली वगैरे अशी वर्णनं तुम्ही वाचलीत का? मी अनुभवलीत दोन्ही हातांनी डग्गा बडवत बडवत ठेका न चुकवत, चेहरा शक्य तितका हसरा ठेवत. गाण्यातले शब्द कळत नव्हते पण वाटलं सूरसुद्धा हसत होते माझ्या फजितीला. Once more मिळालाच होता पण आयोजकांनी न घेतल्याने माझा 'कोलमड' राग वाचला.
ज्ञान कर्म भक्ती ह्या तीन मार्गांव्यतिरिक्त संगीत हा चौथा रस्ता मानतो मी. स्वतः साधकच साधन असतो व साध्य काहीच तर करायचं नसतं. आत तर आहे सगळं, हेच कळायला हवं ना? ते तर एकेका सूराबरोबर उलगडत जात जाईल की. पुढेपुढे सूरांची पण साथ मागे पडेल राहील फक्त गुणगुणणं स्वतःशीच. हा "स्वतः" जुना नव्हे बरं का. नवीनच गवसलेला स्वतःलाच. नवीन जन्म झालेला आपल्याच आतून. कसा सांगू ? साधना संपवून डवरायला तयार झालेल्या त्या ध्यानाला बसलेल्या वृक्षातून जन्माला येणाऱ्या पालवीसारखा.
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
२६.१२.२०१९
प्रतिक्रिया
28 Dec 2019 - 2:32 pm | कुमार१
छान लिहिलंय
28 Dec 2019 - 3:35 pm | आनन्दा
तुमची प्रस्तावना वाचून ते गाणं ऐकलं, आधी तुम्ही काय म्हणताय ते कणभर पण कळलं नव्हतं, पण त्या 2:40नंतर येणाऱ्या कोणत्यातरी एका क्षणाला डोळे अचानक मिटले गेले, संपूर्ण जगाचा विसर पडून कोणत्यातरी अनामिक दुःखाची हवीहवीशी अनुभूती आली...
धन्य आहे हे सगळे!
28 Dec 2019 - 4:13 pm | प्रमोद देर्देकर
अप्रतिम रसग्रहण.
सुधीर काका नंतर तुम्हीही आम्हाला रागदारीचे ज्ञान द्या.
फक्त 4 रागांची तोंडओळख झालेला पम्या
28 Dec 2019 - 5:21 pm | श्वेता२४
फार सुरेख लिहिलय तुम्ही. हरिहरन हा अतिशय हरहुन्नरी कलाकार म्हणायला हवा. या श्रेष्ठ कलाकाराचा लोण्याहुनही मऊ व गोड असा आवाज. या आवाजात क्लासिकल तितकंच गोड वाटतं, एखाद्या रॉक गाणंही ही तितकीच गोड वाटतं आणि गझल ही तितकीच गोड वाटते .माझा आवडत्या गायकांपैकी हा आहे. बाकी स्टेज वरचा किस्सा धमाल वाटला
28 Dec 2019 - 6:55 pm | जॉनविक्क
अन्यथा या लेखाला शब्दबंबाळ म्हणावे वाटले नसते
29 Dec 2019 - 4:33 pm | आनन्दा
आमचे छिद्रान्वेषण, नाहीतर या प्रतिसादाला नेमके काय (खोचकपणा की शालजोडीतले) म्हणावे असा प्रश्न पडला नसता..
31 Dec 2019 - 3:37 pm | मायमराठी
भारतीय संस्कृतीत पाहुण्याला प्रेमाने जेवू खाऊ घालणं ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अर्थात आग्रह नाही तर पंगत नाहीच. लेख लिहीताना यजमानाला पाहुण्याचे मन अब्ब करून टाकावे असं वाटतं. जेणेकरून अतिथी तृप्त होऊन जाईल आणि पुन्हा पुन्हा येईल. मी जेवणात फारसा आग्रह करत नाही परंतु लिखाणात शब्द भरभरून येतातच. आणि मिपा वर 'हाडाचे' खवय्ये आहेत.
आपला अभिप्राय सर आँखों पर। आपल्या चोखंदळ प्रतिक्रियेची नेहमीच उत्सुकता असते.
29 Dec 2019 - 6:19 am | कंजूस
सध्या आम्ही सोनी इंडिअन आइडॉल कार्यक्रमावरच समाधान मानून आहोत.
29 Dec 2019 - 7:48 am | सुधीर कांदळकर
आवडले लेखन.
हे अगदी खरे. पण आता सुदैवाने चांगले बदल होताहेत. एखादा अपवाद वगळता आता चेहरे वाकडे करणे टाळतात. मुख्य म्हणजे अशा कुरूप गोष्टी टाळण्यासाठी आयोजक पण दबाव आणतात.
लेखन आवडले, धन्यवाद.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
29 Dec 2019 - 5:35 pm | मुक्त विहारि
रागदारी आवडत नाही, पण लेखन आवडले.
31 Dec 2019 - 3:28 pm | मायमराठी
सर्वांचेच मनापासून आभार