दोसतार-३०

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 Dec 2019 - 1:07 pm

एकदाचे दप्तर भरून झाले. डबा घेऊन घरातून बाहेर पडलो. वाटेत योग्या सहावीतल्या तीन चार पोरांबरोबर चालताना दिसला . गणवेश आमच्याच शळेचे होते. असा एखादा गणवेश घालून चाललेला पोरांचा घोळका दिसला ना की गणवेशामुळे नाव माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. आपण आपसूकच त्या घोळक्यात सामील केले जातो. कधी होऊन जातो ते कळत पण नाही
मागील दुवा : http://misalpav.com/node/45845
सहावीतली मुले उंचीने एकदम लहान . त्यांच्यासोबत चालताना योग्याला काही ऐकायचे असेल तर वाकून चालावे लागते. चालताना पुन्हा या अशा बुटुक बैंगण पोरांच्या खांद्यावर हात ठेवण्या ऐवजी त्यांची मानगूट पकडून चालणे सोपे जाते. त्या मुळे योग्या त्या पोराला मानगुटीला पकडून शाळेत नेतोय की काय असे पहाणाराला वाटते.
शाळेत जाताना नेहमी कोण ना कोण बोलताना एखादा विषय काढतो त्यावर दुसरा काहीतरी बोलतो त्यातून तिसराच विषय निघतो . सिंदबाद च्या सफरीप्रमाणे एका बेटावरून दुसर्‍या बेटावर कधी पोहोचतो तेच कळत नाही. असे करत ज्याने विषय काढला तो आपण काय बोलत होतो तेच विसरून जातो.
घोळक्या बाहेरचा कोणी असला तर पार येडाच होतो ऐकताना.
" कळल का तुला "
" हो रे पण खरंच असेल का"
" हो रे खर्रच…. सकाळी सुमन ताईला सांगताना ऐकले."
" काय म्हणतो..... "
" सुमन ताई .... ती तीन पायाची मांजर वाली"
" तीन पायाची मांजर! . शक्यच नाही "
"तीच्या मांजरीच्या पायावरुन सायकलचे चाक गेले होते"
" सायकलीने मांजराचा पाय गेला? काय म्हणतो. सायकल कुठे इतकी जड असते."
"असते रे... हर्क्युलसची सायकल जड असते."
"त्या पेक्षा अ‍ॅटलासची लै भारी. माझ्या दादाला आणलीये."
"अ‍ॅटलस सोड त्या पेक्षा एच एम टी ची भारी. पायडलवर नुसता पाय ठेव बुंगा पळती. कुत्र्या सारखी."
" हरणा सारखी म्हण की. कुत्रा कुठे इतका जोरात पळतो."
"हरणाला कुणी पाहिलय पळताना. आपण कुत्र्याला नेहमी बघतोच की. एक दगड नुसता उगारायचा हातात घेऊन. कॅव कॅव करत पळतय."
" हे हे हे......"
"हे हे हे... काय करतो. आमच्या काळूला करून बघ. आल्सेशन आहे. त्याच्या भुंकण्याने तूच पळत सुटशील घाबरून. "
"हे आपण नाय घाबरत कशाला."
"काय सांगतो आन मागल्यावेळेला कोण घाबरले होते वर्गात मुख्याध्यापक आले म्हंटल्यावर."
"ते होय. मग बरोबर आहे की वर्गभर शेंगाची फोलपटे पसरली होती. मुख्याध्यापकानी बघितले असते ना तर आख्ख्या वर्गाला उठाबश्या काढायला लागल्या असत्या."
"उठाबश्या..... रोज जोर बैठका मारतो .. वीस वीस. मंडळात"
"ओ माहितीये माहितीये... मंडळात जाऊन तुम्ही काय करता ते. साधं नुसतं वजन उचलायचा रीकामा रूळ उचलायचा म्हंटलं तरी जमणार नाही....."
हे सगळं ऐकताना सुमन ताई काय सांगत होती. आणि काय खरं आहे तेच विसरायलं झालं.
" काय रे काय खरं आहे....अन सुमन ताई काय साम्गत होती"
"काही तरी आपल्या शाळेत कोणीतरी आलंय. "
शाळेत कोण येणार.... फार तर कोणीतरी प्रमुख पाहुणे आले असणार.
"नाही रे आज पहाटे पाहिले म्हणे."
" मग बरोबर. प्रमुख पाहुणे पहाटे कशाला येतील"
" असेल रे काहीतरी प्रभातफेरी सकाळी सकाळी.
" प्रभात फेरी आत्ता कशाला. १५ ऑगष्ट ला काढतात प्रभात फेरी ते पण फक्त एन सी सी साठी असते"
" हो रे.... "
" शाळेत गेल्यावर कळेलच की. दारातच फलक लावलेला असेल.
" पण सकाळ तर होऊन गेली. आता कशाला ठेवतील ते फलक."
" काय माहीत.असेल पण किंवा नसेल पण"
" आपल्याला कसे कळणार मग?"
"कळेल की. सदू काका सांगतील की"
" हो. त्यांनाच विचारू आपण."
आम्ही इतके बोलतोय तोवर सावजीचे दुकान आले. शाळेच्या बाहेर ही गर्दी. सगळी मुले बाहेरच थांबलेली. दप्तरासकट.
शाळेच्या गेटजवळ पोलीसांची गाडी. आणि एक जीपही होती उघड्या टपाची.
काय झाले असेल रे?
मला काय माहीत आपण सगळेच सोबत आलो की.
म्हणजे सुमन ताई सांगत होती ते खरे आहे तर.
अरे हो... तेच तर आपण बोलत होतो. तीच ना ती तीन पायांच्या मांजरवाली."
"काय म्हणाली रे ती... "
ती म्हणत होती... शाळेत म्हणे... म्हणजे तीने प्रत्यक्ष पाहीले नाही ... ऐकले कोणीतरी बोलताना. प्रत्यक्ष पाहिले असते तर तिथेच ढप झाली असती सांगायला इथे आलीच नसती"
" काय रे काय झाले? " आमच्या बोलण्यात आता आणखी साताआठ जण सामील झाले.
काय झाले
काय झाले.
शाळेत वाघ आला होता.
वाघ?
वाघ म्हणजे खरा खुरा वाघ?
हो खरा खुरा
म्हणजे जंगलातला?
काय की म्हणे वाघ आला होता म्हणतात.
दोन पायांचा होता की चार पायांचा.
म्हणजे.
जंगीवाड्यात मोहरमला असतात ते दोन पायाचे वाघ.
नाही रे... तसे नसेल. त्यासाठी पोलीस कशाला येतील मग.
मग?
मग ?
ए ढापा मारू नकोस.
ढापा नाही. आई रक्ताशप्पथ. शप्पथ सुटली म्हण.
सुटली.
पोलीस आले असते का मी ढापा मारत असतो तर. आणि मी कशाला मारू ढापा. सुमन ताईनी ऐकलंय कोणीतरी वाघ बघितल्याचं
बापरे....
आता काय?
आता काय मजा बघ. वाघ कुठे लपलाय ते शोधायला हवं.
म्हणजे बघ वाघ सुतारकामाच्या वर्गात लपला असेल तर तिथे शोधायचा.
पण शोधणार कसा.
तेच की.
काय तेच की.
तो शिवाचा मामा जंगलखात्यात आहे. वाघ शोधायचा असेल तर ते त्याला ओरडून सांगतात.
म्हणजे आपण ओरडलो की वाघ पण ओरडतो?
हे म्हणजे आपण एखाद्याला घरातून बाहेर बोलवायचे असेल तर " टॉक्क..." करतो. त्याला ऐकू येते की मग तो बाहेर येतो.
पण वाघाला बोलवायला टॉक्क करून कसे चालेल.
मग डरकाळी फोडायची. वाघाला ते ऐकू येईल. आणि तो ओ देईल.
मग समजेल की इथे वाघ आहे म्हणून.
ए हेहे हेहे,,,वाघाला काय येडा समजलास का. एकदम हुशार असतात वाघ.
कशावरून.
तो नववी ब मधला सुधाकर वाघ आहे की हुशार.
अरे तो वाघ नाहिय्ये. तसला वाघ नव्हे. जंगलातला वाघ म्हणतोय मी.
पण वाघ कोणत्या प्रकारचा होता.
म्हणजे. वाघ म्हणजे वाघ.
तसे नव्हे वाघ म्हणजे बिबट्या होता की पट्टेवाला वाघ.
ते काय माहीत नाही. पण पकडल्यावर कळेलच की.
पण वाघ आला कसा.
कसा म्हणजे मागच्या ओढ्यातून आला असेल.
हो ना. तिकडे भरपूर झाडी आहे. बसला असेल तिकडे.
पण शाळेत कशाला आला असेल.
गृहपाठ करायला.
अरे काय ....
"कुठे दिसला वाघ. "
पाण्याच्या टाकीजवळ दिसला म्हणे.
कुणाला दिसला.
काय माहीत.
वाघ आणि तीन पिल्ले होती
पिल्ले असतील म्हणजे . वाघीण असेल रे.
"पण इकडे शाळेत कशाला आली असतील ती."
आता प्रश्न विचारणारांची संख्या वाढत चालली होती. ज्या पोराने त्याच्या सुमनताईला कोणालातरी शाळेत वाघ दिसला हे कोणीतरी सांगितले हे कोणालातरी सांगताना ऐकले होते तो सगळ्यांना उत्तरे देत होता. त्याच्या भोवती पोरांचा गोल तयार झाला होता.
कोण कसा , कोणाला ?कधी "कुठे" कशाला" किती वाजता ?इतक्या सकाळी? प्रश्नावर प्रश्न येत होते. कोण काय विचारतय तेच कळत नव्हते. अभिमन्यु कौरवांच्या चक्रव्युहात अडकावा तसा तो प्रश्नांच्या गराड्यात अडकला होतात. शाळेत नक्की काय झालंय ते त्याला माहीत होते.
या सगळ्यातून शाळेत वाघ आला होता. तो पाण्याच्या टाकी च्या आसपास फिरताना कोणीतरी पाहिले होते हे समजले .
आमचे चेहरे या वेळेस कोणी पाहिले असते तर त्याला त्यावर भिती आनंद उत्सुकता गम्मत असे सगळे काही नाचताना दिसले असते.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वाचले. २८ अगोदर वाचला होता, संदर्भासाठी पुन्हा वाचला.
लांबलचक वस्तू दुचाकीवरून नेतांना गंमत येते खरी. गावात अवजड पाईप्स, गवत कापायचे मशीन अशा लांबलचक वस्तू दुचाकीवरून तिघेतिघे नेतांना जवळजवळ रोज पाहतो आणि अचंंबा वाटतो. नेणार्‍यांचे कौतुकही वाटते.
चेंज ऑफ व्हॉईस मस्त. मुलांच्या बोलण्यातले विषय कसे मस्त घरंगळतात ते छान दाखवले आहे. उंचीतल्या फरकाने मानगूट पकडणे छान. चित्रदर्शी, वास्तव असले तरी ताजे टवटवीत लेखन. आवडले. धन्यवाद.

विजुभाऊ's picture

26 Dec 2019 - 2:35 pm | विजुभाऊ

सुधीर जी धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

22 Jul 2020 - 1:05 pm | चौथा कोनाडा

धमाल गप्प्पा .... आणि आता वाघाबद्दल उत्सुकता !
रमवणारी लेखमाला +१

पुढील भाग :
दोसतार - ३१