सायकल एष्टी बस इतकी लांब झाली होती. इतकी की आळीतल्या रामाच्या देवापुढच्या वळणावरून सायकल वळवायला शुक शुक करत मधे येणार्या तीन चार जणांना बाजूला करण्यासाठी त्याला सायकलवरून खालीच उतरावे लागले
मागील दुवा http://misalpav.com/node/45789
त्या लांबलचक बांबुचे एक टोक सायकलच्या दांडीवरून बरेच पुढे आलेले होते. हँडल वळवताच येत नव्हते. रहदारी साम्भाळत ,थोडे मागे पुढे करणे सायकल उचलून वळवणे अशी सरकस करत करत सायकल वळवत होता. त्यातच मधे कोणी आले की ही सरकस आणि तिथली रहदारी दोनहीही एकमेकात अडकायचे. एक तर मधे आलेला आनि हा मांडववाला दोघेही अगोदर निघायच्या प्रयत्नात गोंधळायचे नाहीतर मग कोण अगोदर जातोय याची वाट बघत थांबायचे. ट्रकवाल्यांचे बरे असते. रहदारी अडवायला तो त्याचा आन देव जान देव करत ड्रायव्हरला आणि रहदारीला सांगणारा किन्नर तरी असतो. इथे हा बिचारा एकटाच लढत होता. मांडववाल्याची सायकल गल्लीच्या कोपर्यातून पूर्ण वळून जाईपर्यंत एकदम गम्मत आली. उद्या ही गम्मत एल्प्याला सांगायचीच. टम्प्या असता तर त्याने हे अगदी स्वतः सायकल सारखे चालून वळवून दाखवले असते.
घरात आलो. घाटे सरांनी सांगीतलेली चतुष्पदी ची तीन गणीते , भुगोलाच्या भामरे सरांनी पाठ वाचून यायला सांगीतलाय. इंग्रजीची कविता. करुन टाकूया म्हणजे सकाळी सकाळी गडबड नको. एखादे गणीत अडले की पुढचा सगळा अभ्यास तसाच अडकतो. अडलेले गणीत दातात बडीशेपची काडी अडकावी तसे डोक्यात अडकून रहाते आणि टोचत रहाते. दुसरे काहीच सुचत नाही. बडीशेपची काडी निदान काढता तरी येते. डोक्यात अडकलेले गणीत कसे काढणार..
डोक्याचे केस बारीक ठेवले की डोक्यात विचार अडकत नाहीत. असे तानुमामा नेहमी म्हणतो. त्याचे केस एकदम बारीक असतात. प्रत्येक केस सुट्टा उभा असतो. अगदी टाचणी स्टंडवर टाचण्या खोवून ठेवल्यासारखा. चित्रात जुन्याकाळच्या ऋषीमुनींच्या आश्रमात शिकणार्या विद्यार्थ्यांची डोकी एकदम गोटा केलेली दिसतात ती बहुतेक या कारणामुळेच असावीत. विद्यार्थ्यांची डोकी एकदम तुळतुळीत. त्याना शिकवणार्या शिक्षकांच्या डोक्यावर बुचडा बांधण्याइतके केस. डोक्यातून काही निसटून जाउ नये म्हणून..
आईला हे सांगीतले तर ती हसतच सुटेल म्हणेल काय काय चालतं रे तुझ्या डोक्यात.
झोपायला जाताना इंग्रजीचा अभ्यास कधीच करायला घ्यायचा नाही. पुस्तकातले सीता गोपाल आणि अहमद स्वप्नात येऊन शब्दांचे अर्थ विचारतात.
इंग्रजीतले व्हॉईस नावाचा प्रकार कधी समजणार कोण जाणे. राम अंबा खातो. असे थेट न म्हणता " राम कडून अंबा खाल्ला जातो" असे म्हणायचे.
कुठल्यातरी जुन्या सिनेमात एक ढोंगी साधू असेच बोलायचे. माझे नाव अमूक अमूक असे न बोलता या देहाचे नाव अमूक अमूक . या देहाकडून अंबा खाल्ला जातो.
त्या सिनेमातली एक नऊवार नेसलेली बाई तीच्या नवर्याला विचारायची " इकडून येणे झालं का?" लिहीणाराने तो सगळा सिनेमा च पॅसीव्ह व्हॉएस चा गृहपाठ म्हणून लिहीला होता.
काका कसले जोरदार घोरतात हे वाक्य काकां कडून घोरले जाते. हे निदान बरोबर तरी वाटते कारण काका स्वतः होऊन घोरत नाहीत. पण अंबा खाणारा माणूस अंबा स्वतः होऊनच खातो की.
इंग्रजीचे पुस्तक हातातून कधी पडून गेले हे समजलेच नाही. व्हॉईस मधे बोलायचे तर पुस्तकाकडून हातातून कधी पडणे झाले ते समजलेच नाही.
" सुधा नरवणे आपल्याला प्रादेशीक बातम्या देत आहेत" या वाक्याने सकाळची सुरवात होते. त्या अगोदर कधीतरी दूधवाले दादा येवून जातात.
अंघोळ वगैरे झाली शाळेचे आजचे दप्तर भरणे हा एक कार्यक्रम तासभर तरी चालतो. यात नुसते शाळेचे दप्तर भरणे इतकेच नसते. कालचा अर्धा राहीलेला ग्रुहपाठ पूर्ण करणे.दप्तरातली नुसती कम्पासपेटी उघडली तरी बरीच कामे निघतात. पेन्सीलीला टोक आणणे , टोक केलेल्या पेन्सीलीच्या चुर्यातले गोल शंकूच्या आकारातल्या टोप्या न मोडता पुस्तकात ठेवणे, पेनात शाई भरणे , कंपासात ल्या सगळ्या वस्तू बाहेर काढून पुन्हा भरणे , कर्कटक आणि गोल काढायच्या कम्पासचे नटबोल्ट आवळणे. रंगीत खोडरबरचा वास घेऊन बघणे. साध्या रबरी खोडरबरचे कोपरे टेबलावर घासून स्वच्छ करणे . अशी बारीक सारीक कितीतरी कामे निघतात. सर्वात शेवटी कंपासपेटीच्या आतील बाजूवर चिकवटलेले वेळापत्रक पहाणे. त्यातल्या शा. शि , सा. अ., ना शा,वगैरे चे अर्थ नीट पाहून त्या नुसार दप्तर भरणे. हे सर्वात शेवटचे काम.
एकदाचे दप्तर भरून झाले. डबा घेऊन घरातून बाहेर पडलो. वाटेत योग्या सहावीतल्या तीन चार पोरांबरोबर चालताना दिसला . गणवेश आमच्याच शळेचे होते. असा एखादा गणवेश घालून चाललेला पोरांचा घोळका दिसला ना की गणवेशामुळे नाव माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. आपण आपसूकच त्या घोळक्यात सामील केले जातो. कधी होऊन जातो ते कळत पण नाही.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Jul 2020 - 12:43 pm | चौथा कोनाडा
काय, काय निरगसपणा जपलेला असतो लेखकाने आपल्या लेखात !
अॅक्टिव्ह, पॅसिव्ह व्हाईसची उदाहरणं पण भारी आहेत !
:-))
22 Jul 2020 - 12:46 pm | चौथा कोनाडा
दोसतार - ३०
22 Jul 2020 - 12:53 pm | चौथा कोनाडा
वरचे चुकलेय.
हे खालचे बरोबर आहे:
पुढील भाग :
दोसतार - ३०