अर्ज है की..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
26 Nov 2019 - 10:27 am

मी एक अर्ज भरत होते. तो इतका किचकट होता की,तो भरता भरता माझी दमछाक होत होती. संपूर्ण नाव, पत्ता-घरचा, पत्ता-ऑफीसचा, तात्पुरता, कायमचा.

मग फोन नंबर. घरचा, ऑफीसचा, लँडलाईन, मोबाईल. मग पतीचे संपूर्ण नाव,ऑबलिक/पित्याचे संपूर्ण नाव. आईचे माहेरचे, सासरचे संपूर्ण नाव. आधार नंबर, पॅन नंबर.. मसणं नि माती. सतराशे साठ चौकशा. हा अर्ज फाडून टाकून, पेन फेकून देऊन, बाणेदारपणे घरी निघून जावं आणि मस्तपैकी एसी लावून झोपून जावं असा विचार मनात आला. पण तसं करणं शक्य नव्हतं. अर्ज भरणं भाग होतं. त्यात माझाच फायदा होता.

असं नेहमीच होतं.अर्जाचा फॉर्म भरायचा मला नेहमीच कंटाळा येतो. बँकेत जा, अर्ज. पोस्टात जा, अर्ज. आता पोस्टात जाणं कालबाह्य झालंय म्हणून ठीक.

पूर्वी परदेशात जाताना छोटे चौकोन असलेला इमिग्रेशन अर्ज भरायला लागायचा. पहिल्या परदेश वारीच्या वेळी तो कुठे मिळतो हे शोधण्यापासून ते रांगेत उभ्याउभ्या ऐनवेळी त्यातले तपशील पेन झटकत भरण्याचं टेन्शन आलं होतं. जणू आता वेळेत तो नीट भरला गेला नाही तर परदेश प्रवास रद्द होतो की काय. बाकी इतर ठिकाणीही अर्जच अर्ज. स्वतःच्याच ऑफिसात अर्ज. मुलाच्या शाळेत अर्ज. पासपोर्ट अर्ज. रेशन ऑफीस,अर्ज. मतदार यादीत नाव, अर्ज.

ऊन असावं, उकडत असावं, घामाच्या धारा लागलेल्या असाव्यात, आपल्याला तहान लागलेली असावी आणि सर्वांत कहर म्हणजे आपण रांगेत उभं असावं आणि उभ्यानं अर्ज भरत असावं. आपण खिडकीजवळ जाताच खिडकी बंद व्हावी.
तोंडात शिवीशाप आलाच पाहिजे. आता सगळं, किंवा बरंच कायकाय ऑन लाईन झालंय, पण माझ्या तरुणपणी नव्हतं हो,ऑन लाईन फीन लाईन. खूप अर्ज भरावे लागले आयुष्यात.

माझा मुलगा लहान असतानाची गोष्ट. आमच्या ऑफिसात एक फॉर्म भरुन दिला की, शाळेत भरलेल्या फी चे पैसे परत मिळत असत. मी खूप कष्ट करुन एक किचकट फॉर्म ऑफिसात भरुन दिला. त्याला शाळेत दिलेल्या फीच्या पावत्या जोडल्या. त्यावर साहेबांची सही घेतली. (सुदैवाने ते जागेवर सापडले.चहाला गेलेले नव्हते.) ते सगळं लचांड ऑफिसात क्लार्कला सबमिट केलं. ते कित्येक महिने तसंच पडून राहिलं. शेवटी अनेकदा आठवण केल्यावर ऑफिसकडून सांगण्यात आलं की, तुमच्या मुलाला मिडलस्कूल स्कॉलरशिप मिळते असं तुम्हीच अर्जात लिहिलयंत, म्हणून तुम्हांला फीची रक्कम मिळणार नाही.

आमच्या ऑफिसकडून मेडिकल बिलही मिळतं असं ऐकलं, म्हणून आजारी पडल्यावर मी एकदा मला आलेलं डॉक्टरचं बिल, औषधाचं बिल सबमिट करायचं ठरवलं. एक किचकट अर्ज भरला. औषधाच्या बिलाच्या झेरॉक्स काढल्या, त्या अटेस्ट केल्या. मग ते नेहमीचे कॉलम, पतीचे नाव, पत्ता, ऑफिसातली पोस्ट, बेसिक, महागाई भत्ता, पे स्केल इ.इ. सगळं भरुन, साहेबांची सही घेऊन ऑफिसात सबमिट केलं.
नेहमीप्रमाणे ते पडून राहिलं. लाजलज्जा गुंडाळून, बेशरमपणे पुन्हा पुन्हा पैसे कधी मिळणार असं विचारलं तेव्हा"तुम्ही घेतलेली औषधं ऑफिसातल्या 'ऍडमिसिबल मेडिसिन्स'च्या यादीतली नाहीत". असं उत्तर मिळालं. मी चिकाटी न सोडता ती यादी पाहिली. ते खरं होतं. चुकूनमाकून, योगायोगानं एक औषध 'ऍडमिसिबल' होतं. त्याचे वीस रुपये मला मिळाले.
एवढा किचकट फॉर्म भरुन फक्त वीस रुपये? पुन्हा ऑफीसकडे काही मागायचे नाही असा निश्चय केला. आमचा एक क्लार्क 'ऍडमिसिबल' औषधांची फक्त लिस्ट देऊन प्रत्यक्षात शांपू, आफ्टरशेव्ह लोशन, बायकोची सौंदर्यप्रसाधनं घ्यायचा.

एक साधी रिफील हवी असली तरी एक रिक्विझिशन फॉर्म भरायचा आणि रिकामी रिफील सबमिट करायची. सरकारी खाक्या! मी जन्मभर स्वतःच्या पैशातून घेतलेल्या पेननेच ऑफीसचं काम केलं. ऑफीसनं दिलेली रिफील उठायची नाही हे आणि वेगळंच! मनापासून काही लिहायला घ्यावं आणि पेन उठू नये, माझा तर मूडच जातो.

आकाशवाणीत आम्ही ओ बी ला जायचो. ओबी म्हणजे बाह्यध्वनिमुद्रण. तिथं गेलं की, डीए मिळायचा. त्याच डीएत चहा, कॉफी, जेवणखाण सगळं.

ऑफीसची गाडी मिळायची.जाताना कार रिक्विझिशन, मशीन रिक्विझिशन हे फॉर्म भरायला लागायचे. तिथून आलं की एक फॉर्म भरायला लागायचा. त्यात ओबीला जाण्याची वेळ, येण्याची वेळ, ए एम, पीएम., जाण्याचे ठिकाण, किती तास, किती किलोमीटर्स. इत्यादी खूप किचकट माहिती भरायला लागायची. मी डीए चा फॉर्म भरायचीच नाही. कंटाळा! पण त्यामुळे अर्थात मला डीए मिळायचाच नाही. तो फॉर्म भरण्यापेक्षा डीए न मिळण्याचं आर्थिक नुकसान मला चालायचं. माझा एक कलिग होता. नाटकाची आवड असलेला,खूप मेहनती, तो आणि त्याचे मित्र एक नाट्यसंस्था चालवायचे. तो म्हणाला,"मी तुमचे फॉर्मस् भरत जाईन. तुम्ही फक्त सही करा.
तुमचा भत्ता माझ्या नाट्यसंस्थेला द्या." मी तयार झाले.
त्यानंतर माझे अर्ज तो भरायचा आणि नाट्यसंस्थेकडून देणगी मिळाल्याची पावती इमानेइतबारे आणून द्यायचा.

एकुणात हे अर्ज किमान दोन भाषांत असायचे. ते काव आणायचे. म्हणजे भरायचा एकाच भाषेत, पण छापील शब्द दोन भाषेत. एकाच फॉर्मवर दोन्ही भाषा असतील तरी ठीक.
दोन्ही भाषांची तुलना करून अर्थ लावता येई. पण फक्त एकाच भाषेतला अर्ज मिळाला तर? हिंदीतले 'ज्ञापन'(उच्चारी ग्यापन), अनुज्ञप्ति, आबंटन, हे आणि असले शब्द सरकारी नोकरीत असूनही मला समजत नसत. नंतर ऐंशी नव्व्यदच्या दशकांत कॉम्प्युटरमुळे की काही म्हणा, चौकोन चौकोनवाले फॉर्म आले. माहिती भरताना ती त्यांनी दिलेल्या चौकोनांत मावेल की नाही? चौकोन संपले तर काय करायचं?(आणि ते अर्ध्या पत्त्यात संपायचे, रस्त्याचं नाव, लँडमार्क वगैरे कुठे टाकायचं?) एक्स्ट्रा चौकोन आपणच आखायचे का? ही चिंता मला सतावत असे.
ती माहिती निळ्या शाईनं लिहायची की काळ्या? बॉल पेननं की शाई पेननं? ब्लॉक लेटर्स की स्मॉल लेटर्स? अजूनही उगीच नंतर गडबड नको व्हायला म्हणून मी कोणताही फॉर्म, गरज असो वा नसो, कॅपिटल लेटर्स आणि काळ्या शाईनेच भरते.

आता म्हातारपणी फारसे अर्ज भरावे लागत नाहीत.माझ्या बँकेतली माझ्या ओळखीची एक मुलगी मी 'ज्येष्ठ नागरिक'म्हणून माझे सगळे अर्ज भरुन देते.

आता सगळं ऑनलाईन झालंय. मला ते समजत नाही. करता येत नाही. पण पुढची पिढी ते सगळं करतेय. नव्या पिढीची तरी ह्या 'अर्जदारीतून' सुटका झालीय असं वाटतं.

.. किंवा ती व्हावी असा आशीर्वाद आहे.

पुढच्या पिढीसाठी जीवन सुटसुटीत होणं याचा मला आनंद आहे.

जीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

26 Nov 2019 - 12:01 pm | विनिता००२

खरंय :)
मला पण जाम कंटाळा आहे अर्ज भरण्याचा!

संजय पाटिल's picture

26 Nov 2019 - 12:11 pm | संजय पाटिल

.. किंवा ती व्हावी असा आशीर्वाद आहे.
आमेन!!!

अनिंद्य's picture

26 Nov 2019 - 12:46 pm | अनिंद्य

@ आजी,

लेख खुसखुशीत आहे पण अर्ज सोपे सरळ का करता येत नाहीत हा प्रश्नच आहे. आपल्या सरकारी खाक्याप्रमाणे काहीही 'वापरणाऱ्यांच्या सोयीचं' होऊ नये यासाठी जणू डोळ्यात तेल घालून बघितल्या जाते. :-)

सोप्पे सोप्पे म्हणून टॅक्स भरतांना 'सरल' फॉर्मच्या ४-५ वेगवेगळी व्हर्जन्स बघून, मेडीक्लेमसाठीचे फॉर्म्स भरतांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्जसाठी तासंतास खोळंबलेले पेशंट्स बघून, विमा किंवा गृहकर्ज, संपत्तीचे हस्तांतरण, सरकारदरबारी नावात बदल करणे वगैरे कामांसाठी लागणाऱ्या अर्ज आणि कागदपत्रांच्या गुंत्यात अडकलेले लोक बघून वाईट वाटते. वृद्ध, अपंग, अल्पशिक्षित/अशिक्षित/अननुभवी अश्या लोकांची तर बिकट अवस्था असते साध्या साध्या कामासाठी.

.. किंवा ती व्हावी असा आशीर्वाद आहे..... हा आशीर्वाद फळावा असे म्हणतो.

मुक्त विहारि's picture

26 Nov 2019 - 2:59 pm | मुक्त विहारि

जन्म दाखला ते मृत्यू दाखला. ..

आणि मग दाखलेच दाखले..

आणि मग ते दाखले हरवू नयेत म्हणून वजने..

3-13-1760 हा एकच ग्रह उत्तम....

आजी's picture

2 Dec 2019 - 10:32 am | आजी

विनीता-दे टाळी.

संजय पाटिल- धन्यवाद. आमेन नाही. शुभसुरुवात.

अनिंद्य- तुम्हांलाही अनेक 'सरल'अर्ज भरायचा अनुभव आलेला दिसतोय! दमछाक होते की नाही?

मुक्तविहारी- दाखले हरवू नयेत म्हणून वजने, बरोबर बोललात.