कोचमन अलिचे पत्र ( भाग १)

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जनातलं, मनातलं
11 Nov 2008 - 2:08 pm

कोचमन अलिचे पत्र
(पूर्वार्ध)
पहाटेच्या धूसर प्रकाशात शुक्राची चांदणी चमचमत होती. रस्त्यापल्याडच्या घरांतला दळणाचा ध्वनी वार्‍यासोबत येत होता. बायकांच्या ओव्या आकाश भरत होत्या. त्याचवेळी १०० ठिकाणी उसवलेले कपडे घालून एक म्हातारा रस्त्यावरुन चालला होता. पहाटेच्या गारठ्यापासून वाचण्यासाठी आपली कापडे त्याने घट्ट आवळुन धरली होती. अर्धवट उजाडलेल्या उत्तर रात्रीतले एकटेपण विसरायला त्या वार्‍यावरून येणार्‍या ओव्यांशी एक होऊ पाहत होता. गावात तशी स्मशान शांतताच होती. मधूनच पक्ष्यांची किलबिल , कुत्र्यांचे भुंकणे आणि सकाळीच उठलेल्या एखाद दुसर्‍या बायामाणसांचे आवाज तिचा भंग करित होते. सकाळच्या गारठ्यामुळे फारसे कोणी उठलेले दिसत नव्हते. म्हातारा आपल्या वाटेवर अविचल जात होता. हळूहळू म्हातारा गावाच्या टोकाकडच्या सरळ रस्त्यावर आला. तिथून तो आतल्या चिंचोळ्या गल्लीत वळाला. येत येत एका जुन्या इमारतीपाशी उभा राहिला. इमारतीच्या जुन्या लाकडी बोर्डावर रंगवले होते -- टपाल-कचेरी.
म्हातारा आपल्या गंतव्यावर पोहचला होता. पायर्‍या चढून तो वर्‍हांड्यात आला. दोघे तिघे काम करत असल्याचे त्याला समोरच्या दारातून दिसले. स्वत:च्या कामात ते इतके मग्न होते की बाहेर कोणी आलेयं, याचा सुगावा ही त्यांना लागला नाही. म्हातार्‍याने बाहेरुन स्पष्ट ऐकले. सुप्रिटेण्डन्ट. यानंतर म्हातार्‍याने काही काळ वाट पाहिली.स्वत:चे नाव ऐकायला मिळेल असे त्याला वाटलें; नव्हे त्याच विश्वासाने तो उभा होता. पण गार कापरी वारा त्याला वर्‍हांड्यात उभा राहू देईना. तो आत गेला . एका मागोमाग नावे पुकारत पोष्टमास्तर पित्तन खेराणीला पत्र देत होता - कमिशनर, दिवाणसाहेब, सुभेदारसाहेब. अचानक त्याने नाव उच्चारले - कोचमन अलि. म्हातार्‍याच्या हाती स्वर्ग लागला. तो ऊठून समोर जाऊन म्हणाला.
- गोकुल भाई
-कोण आहे ?
- तुम्ही कोचमन अलि म्हणालात ना ? मी - अलि - पत्रासाठीच आलोय.
- खेराणी काय वेडे असतात बघ लोक. पत्रासाठी रोज बसून राहतात. आजपर्यत कधी एक पत्रही आले नाही.
म्हातारा हळूहळू परत आपल्या जागी गेला. जवानीत अलि निष्णात शिकारी होता. ससा, हरिण, तितर सहज मारायचा. शिकार म्हणजे त्याच्यासाठी खेळ होता. हळूहळू त्यातली मजा संपली. दिवसरात्र विचार करकरुन विरहाच्या दु:खापासून कोणाचीही मुक्तता नाही अशा निष्कर्षावर पोचला होता. आयुष्यात एकाकी असणे किती भयाण ?
जगातील ती रया गेलेली ती सर्वात हतदरिद्र टपाल कचेरी त्याच्यासाठी तीर्थस्थान बनली होती ती याचसाठी . कचेरीतील सगळेजण त्याची मस्करी करायचे. मजा बघायला कोणीही अलिचे नाव पुकारी. अलि तडक उठून येई. सर्वजण हसू लागत. काही झाले तरी अलिने कचेरीची वारी तोडली नव्हती.
एक दिवस स्वत:च्या जागी अलि चुपचाप बसला होता. नि:शब्दपणे खेराणी व पोष्टमाष्टरचे काम बघत होता. काम संपल्यावर सर्व जण जाऊ लागले. तेव्हा कचेरीला सलाम ठोकून अलिही जाऊ लागला. पोष्टमाष्टरला नवल वाटले. तो खेराणीला म्हणाला.
- माणसे पण काय वेडी असतात ?
- याच्याबद्दल बोलताय साहेब. खरेय ते. गेल्या पाच वर्षापासून हा रोज येतो. उन असो, पाऊस असो नाहीतर थंडी, त्याला पर्वा नाही. पण मजा ठाऊक आहे साहेब? गेल्या पाच वर्षात त्याला कोणीही चिठ्ठी पाठवलेली नाही.
- ते मला ठाऊक आहे रे. पण याला चिठ्ठी पाठवणारे आहे तरी कोण ?

(क्रमशः)

साहित्यिकभाषांतर

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2008 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते

रोचक वाटतंय... पण खूपच छोटा आहे रे भाऊ हा भाग :(

पुढे टाक लवकर.

बिपिन कार्यकर्ते

महेश हतोळकर's picture

11 Nov 2008 - 2:23 pm | महेश हतोळकर

वातावरण छान उभं केलय. पु.भा.प्र.

महेश हतोळकर

नंदन's picture

11 Nov 2008 - 2:24 pm | नंदन

सुरूवात झकास झालीय. पुढच्या भागांची उत्सुकता आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विजुभाऊ's picture

11 Nov 2008 - 2:37 pm | विजुभाऊ

लिखाणावर अन्तोन चेकॉव्ह ची छाप आहे. चाम्गले लिहिलय

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

अनिल हटेला's picture

11 Nov 2008 - 2:48 pm | अनिल हटेला

सुरुवात छान आहे ....

पून्हा क्रमशः

[( [-(

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

लिखाळ's picture

11 Nov 2008 - 4:18 pm | लिखाळ

छान सुरुवात..
पुढे वाचायला उत्सुक-

खेराणी म्हणजे काय?
-- लिखाळ.

अभिरत भिरभि-या's picture

11 Nov 2008 - 7:06 pm | अभिरत भिरभि-या

पोष्टमास्तर पित्तन च्या हाताखाली खेराणी पोस्टमन आहे

आनंदयात्री's picture

11 Nov 2008 - 7:21 pm | आनंदयात्री

मस्त रे भिरभिर्‍या .. येउदे अजुन !!

कपिल काळे's picture

11 Nov 2008 - 7:32 pm | कपिल काळे

छान!!

रशियन पार्श्वभूमी वाटते.

http://kalekapil.blogspot.com/