हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
31 Oct 2019 - 2:17 pm

सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्‍या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय. मनमोहन कृष्ण पाणावलेल्या डोळ्यांनी अल्लाकडे बघतोय आणि हताशपणे जे घडतेय ते बघतोय. गाणे सुंदरच होते. थेट हृदयाला जाऊन भिडणारी गझल होती ती. मजरूह सुलतानपुरीचे शब्द, मदन मोहनचे अप्रतिम संगीत आणि लता मंगेशकरचा दैवी स्वर! मी पहिल्यांदाच ही गझल ऐकत होतो.

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह
उठती है हर निगाह खरीदार की तरह

वो तो कहीं हैं और मगर दिल के आस पास
फिरती है कोई शह निगाह-ए-यार की तरह
हम हैं ...

मजरूह लिख रहे हैं वो अहल-ए-वफ़ा का नाम
हम भी खड़े हुए हैं गुनहगार की तरह
हम हैं …

अंगावर अक्षरशः काटा आला. उर्दू शब्दांचे नेमके अर्थ कळत नव्हते पण एक ढोबळ अर्थ नक्कीच कळत होता. बाजारात विकल्या जाणार्‍या वस्तूंसारखे आम्ही आहोत. लोक आमच्याकडे बघतात गिर्‍हाईकाच्या नजरेतूनच. गाणं-बजावणं करून पोट भरणार्‍या तवायफांच्या आयुष्याची होरपळ या गीतातून अतिशय समर्पकपणे मांडली आहे. संतापाने पेटून उठलेला संजीव कुमार चाकू घेऊन रेहाना सुलतानकडे येतो आणि या प्रसंगावर ही अप्रतिम गझल संपली. मला या चित्रपटाविषयी उत्सुकता वाटायला लागली. मी १९७० मध्ये आलेला कृष्णधवल 'दस्तक' युट्युबवर लावला. दिग्दर्शक राजिंदर सिंग बेदी या चित्रपटलेखकाचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. संकलन होते ॠषिकेश मुखर्जींचे. हमीद आणि सलमा हे नवविवाहित जोडपे एक घर भाड्याने घेतात. हमीदची कमाई अगदीच तुटपुंजी असते. सलमा एका बुजुर्ग गायकाच्या घरात जन्मलेली खट्याळ, आनंदी मुलगी असते. तिच्या माहेरीदेखील दारिद्र्य पाचवीला पुजलेले! हमीद आणि सलमा त्यांच्या भाड्याच्या घरात संसार सुरू करतात. घर मोडकळीला आलेले असते. पहिल्या-दुसर्‍या दिवशीच त्यांच्या घराच्या दरवाज्यावर अपरात्री थाप पडते. कुणीतरी शमशादबाईचे गाणे ऐकायला आलेला असतो. संजीव कुमारच्या अंगाचा तीळपापड होतो. नंतर त्याला कळते की त्या घरात आधी शमशादबाई नावाची कलावंतीण राहत असते. तो मोहल्लाच अशा नायकिणींचा आणि कलावंतीणींचा असतो. समोरच्या पानाच्या दुकानाचा मालक (अन्वर हुसेन) चिंताक्रांत असतो. शमशादबाई गेल्यापासून त्याचा पानाचा व्यवसाय डबघाईला आलेला असतो. निरनिराळी रंगेल माणसे रात्री-अपरात्री येऊन हमीद आणि सलमाचे जीणे हराम करून टाकतात. पुरेसे पैसे नसल्याने त्यांना दुसरीकडे कुठे चांगले घर मिळत नाही.

हमीद ऑफिसात कामाला गेला की आस-पास राहणारे लोकं सलमाच्या घरात डोकावून पाहतात. ती दरवाजा बंद करून बसते. दिवसभर काय करायचे हा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा राहतो. एकटे घराबाहेर पडणे अशक्य असते. एकदा समोरचा पानवाला तिच्यासाठी पान घेऊन येतो. खूप आग्रह करून तिला पान खायला भाग पाडतो. हमीद तिच्यावर संतापतो. मोहल्ल्यातल्या लोकांनी तिला कधी-मधी गाणं गातांना-गुणगुणतांना ऐकलेलं असतं. पानवाल्यासकट सगळेच तिने कलावंतीण व्हावं म्हणून प्रयत्न करत असतात. एकदा खुद्द शमशादबाई येऊन तिला फूस लावून आपल्या घरी घेऊन जाते. तिथले वातावरण बघून सलमा घरी पळून येते. ती हमीदच्या हाता-पाया पडून त्याला दुसरे घर शोधायला सांगते. हमीद कसेबसे तीनशे रुपये जमवून एका एजंटला देतो पण राहिलेले सातशे न देऊ शकल्याने ते तीनशेदेखील गमावून बसतो. दरम्यान तो सुटी काढून सलमासोबत तिच्या माहेरी जातो. तिचा वृद्ध बाप थकलेला असतो. घरातल्या वस्तू विकून त्याची गुजराण सुरु असते. हे बघून हमीद आणि सलमा परत मुंबईला येतात. काही दिवसांनी हमीदला सलमाचे वडील एका पत्राद्वारे धाकट्या मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतात. हमीदचीच इकडे कठीण परीक्षा सुरु असते. काही दिवसांनी सलमाच्या वडिलांचे हमीदला अजून एक पत्र येते. त्यांची धाकटी मुलगी पळून गेलेली असते आणि आता ते ही कुठेतरी निघून गेलेले असतात. हमीद हतबल होतो. सलमाला मानसिक ताण असह्य व्हायला लागतो. शेवटी एक शेठ शमशादबाईचे गाणे ऐकण्यासाठी म्हणून हमीदच्या घरी येतो. सलमा तंबोरा जुळवत त्या शेठजीला 'तशरीफ रखिये' म्हणते आणि "हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…" गायला लागते. हमीदचा संताप अनावर होतो. तो हळू हळू चाकू घेऊन सलमाच्या दिशेने जातो. पुढे काय घडतं हे प्रत्यक्ष चित्रपटात बघायला पाहिजे.

संजीव कुमार (हमीद), रेहाना सुलतान (सलमा), अन्वर हुसेन (पानवाला), अंजू महेन्द्रू (मारिया), मनमोहन कृष्ण (वृद्ध चाचा), कमल कपूर (शेठजी) या सर्वांनीच उत्कृष्ट अभिनय केलेला आहे. अंजू महेन्द्रूने हमीदवर जीव असणारी त्याच्या ऑफिसातली मारियाची छोटी भूमिका छान वठवली आहे. अन्वर हुसेनचा नायक-नायिकेला त्रास देणार्‍या व्यक्तीच्या आणि खलनायकाच्या भूमिकांमध्ये हातखंडाच होता. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दर्जेदार होते. याच चित्रपटात "बैया ना धरो…" हे गाजलेले गाणेदेखील आहे. मजरूह, मदन मोहन, आणि लता हे समीकरण या चित्रपटात पर्फेक्ट जुळून आले आहे.

१९७१ मध्ये या चित्रपटासाठी संजीव कुमार आणि रेहाना सुलतान यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मदन मोहन यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

हा चित्रपट तर उत्कृष्ट होताच पण "हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…" हे गाणे या चित्रपटाची जान आहे. या गाण्यासाठी आणि या गाण्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीसाठी हा चित्रपट अवश्य बघा!

संगीतचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

31 Oct 2019 - 2:20 pm | कुमार१

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…" हे गाणे या चित्रपटाची जान आहे

.
>>>>
+१११

गाण्याविषयी काय बोलावे? मदन-मोहन आणि उमेदीतली लता म्हणजे विषयच संपला - एकाहून एक रत्ने दिलीत ह्यांनी.

जाता-जाता - मता-ए-कूचा-ओ-बाज़ार हणजे गल्लीच्या बाजारत ठेवलेली चीजवस्तू (मता/माता - वस्तू/commodity, कूचा=गल्ली). तुम्ही लावलेला अर्थ बरोबरच आहे. :-)

ऋतु हिरवा's picture

31 Oct 2019 - 3:17 pm | ऋतु हिरवा

अप्रतिम गाणे

चौकटराजा's picture

31 Oct 2019 - 5:40 pm | चौकटराजा

एकमेकान्च्या अगदी जवळ रहाणारे मदन मोहन जी लतादीदी बरोबर एका भावाचे नाते जपून होते पण गीतात त्यानी निराश व आनन्दी अशी दोन्ही लता पेश केली ! हिदी फिल्म संगीतातील सर्वोत्तम भागीदारी म्हणजे मदन्मोहन लता ! त्या जोडीचे भट्ट्टी न जमलेले गीत शोधून सापड्ने देखील मुश्कील !

समीरसूर's picture

1 Nov 2019 - 1:46 pm | समीरसूर

"रस्म-ए-उल्फत को निभायें तो निभायें कैसे…." हे पण एक अप्रतिम गाणे...काय सूर आहे...काय जादू आहे...चित्रपट 'दिल की राहें'...

नूतन's picture

31 Oct 2019 - 5:43 pm | नूतन

आणि आवडतंही.
या चित्रपटातील सगळीच गाणी सुंदर आहेत . पण रफीच्या स्वरातील ..
तुमसे कहू एक बात परोंसे हलकी हलकी....लाजवाब ....तरल..

चित्रगुप्त's picture

1 Nov 2019 - 2:55 pm | चित्रगुप्त

गाण्याचा आणि सिनेमाचा सुंदर परिचय करून दिल्याबद्दल अनेक आभार.
लेखात उल्लेखिलेली दोन्ही गाणी अनेकदा ऐकलेली आहेत, परंतु मी एकंदरितच फारच कमी सिनेमे बघितलेले असल्याने अनेक आवडती गाणी असलेले सिनेमे कोणते, हे देखील ठाऊक नाही. तूनळीपूर्व काळात एकदा पिच्चर थेट्रातून गेला की गेलाच, तो पुन्हा बघणे अशक्यच असायचे. गाणी सुद्धा रेडियोवर जेंव्हा वाजतील, तेंव्हाच ऐकायला मिळत. रस्त्यावरून जात असता अचानक एकादे आवडते गाणे पानपट्टीच्या दुकानातल्या रेडियोवर वाजताना ऐकून भर पावसात देखील ते ऐकत उभे राहून गाणे संपल्यावर पुढे जाण्याचे अनेक प्रसंग अनुभवले आहेत. अश्या दुर्मिळत्वामुळे ती गाणी आणखीनच मौल्यवान वाटायची.

सुबोध खरे's picture

1 Nov 2019 - 6:56 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन
गाणं बऱ्याच वेळेस ऐकलं आहे आणि त्याचा थोडा फार अर्थही माहिती होता परंतु आज त्याचा संदर्भ लागला
धन्यवाद