कॉंग्रेसच्या सरचिटणीस, आजी-माजी प्रभारी, वर्षानुवर्षांच्या निष्ठावंत नेत्या आणि बंडखोर-सुस्त-अकार्यक्षम नेते-कार्यकर्त्यांच्या कर्दनकाळ मा. मार्गारेट अल्वाताई यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे केवळ कॉंग्रेस नव्हे, तर अख्खा देश, संपूर्ण जग, किंबहुना (भारताचे यान चंद्रावर पोचल्यामुळे) परग्रहांवरील वातावरणही ढवळून निघाले. अवघे भूमंडळ डळमळले.
पृथ्वी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे, असे कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांना, निष्ठावंतांना वाटले असणार! (रामानंद सागरांच्या) रामायणातल्या इंद्रजीताप्रमाणे, (बी. आर. चोप्रांच्या) महाभारतातल्या दुर्योधनाप्रमाणे आणि एकता कपूरच्या कुठल्याही मालिकेतील सासू-सून यांच्याप्रमाणे तेही "क्या?' असे करून बेंबीच्या देठापासून ओरडले असणार!! कॉंग्रेसमध्ये चक्क उमेदवारीची तिकीटे विकली जातात? कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पैसे घेऊन उमेदवारी दिली, असा अतिशय गंभीर, कुणाही सर्वसामान्य कॉंग्रेसप्रेमी व्यक्तीचं हृदय विदीर्ण करणारा आरोप अल्वाबाईंनी केला. तोदेखील निवडणुकांमध्ये कॉंग्रेस तोंडघशी पडून सहा महिने झाल्यानंतर!!
आरोप जाहीर झाल्यानंतर अर्थातच त्याची कॉंग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्राणांची आहुती लावणाऱ्या घराण्याचे नेतृत्व ज्या पक्षाला लाभले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूंसारखे थोर नेते ज्या पक्षाने दिले, शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या महासागररूपी पक्षातल्या एका थेंबाने असा घाणेरडा आरोप करावा? साक्षात आपल्या पित्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत? छे छे! हा कहर झाला...
हिऱ्याप्रमाणे पारखून, प्रत्येकाच्या सचोटीची-निष्ठेची-कार्यक्षमतेची कसोटी पाहून उमेदवारी देण्याची पक्षाची महान परंपरा. काही जणांना मरणोत्तर "भारतरत्न' देतात, तसं काही नेत्यांना "उमेदोत्तर' (म्हणजे राजकारणातील त्याची उमेद संपल्यानंतर) उमेदवारी देण्याची थोर परंपरा असलेला हा पक्ष. त्यात पैसे देऊन तिकीटवाटप कसे होईल? असा घाणेरडा, खालच्या पातळीचा, पक्षप्रतिमा मलीन करणारा आरोप करणाऱ्या अल्वा यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी अनेकांनी दबक्या आवाजात आग्रह धरला असणार.
अल्वाबाईंचा हा "भावनिक उद्रेक' असल्याचा खुलासा कॉंग्रेसने अधिकृतपणे केला आहेच. महाराष्ट्रानेही असे अनेक भावनिक उद्रेक अलीकडच्या काळात अनेकदा पाहिले आहेत. प्रश्न हा आहे, की हा केवळ उद्रेक असेल, म्हणजे राजकीय ज्वालामुखी अजून उसळायचा बाकी आहे तर!
---
टीप : नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकमध्ये सार्वजनिक सेवेतील बसच्या तिकीट वापटपात गैरप्रकार, असा आरोप आपण केल्याचा खुलासा मार्गारेट अल्वा यांनी केला आहे. आपल्या विधानाचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला असून, (पक्षात असेपर्यंत) आपण असे घाणेरडे आरोप करणे शक्यही नसल्याचे म्हटले आहे!
प्रतिक्रिया
10 Nov 2008 - 9:23 pm | विनायक प्रभू
मार्गारेट मॅड्म नी आधी काँग्रेस हलवा कार्यक्रम केला. नंतर राजकिय नेत्याच्या सवयीनुसार स्वःत हलल्या.
10 Nov 2008 - 10:36 pm | कलंत्री
खरी समस्या ही घराणेशाही अथवा कंपुशाही ही आहे. एखाद्या नेत्याचे पुत्र, भाऊ अथवा जवळचे नातेवाईक असणे हीच मोठी पात्रता झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे साम्यवादी सोडले तर सर्वांनाच याची बाधा झाली आहे.
10 Nov 2008 - 11:37 pm | आजानुकर्ण
खरी समस्या ही घराणेशाही अथवा कंपुशाही ही आहे.
सहमत. :)
आपला
(साम्यवादी) आजानुकर्ण
11 Nov 2008 - 12:59 pm | विजुभाऊ
साम्यवादी सोडले तर सर्वांनाच याची बाधा झाली आहे
त्याला साम्यवाद्यांचा नाईलाज आहे. त्यांच्या घरातले लोक भांडवलदार होऊन उद्योग्धन्दे सुरु करतात
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
10 Nov 2008 - 11:28 pm | सुक्या
काँग्रेसी नेते काय किंवा कुठलेही तथाकथीत नेते काय. .. एका माळेचे मणी. राजकारण हा एक धंदा झाला आहे. सर्वात मोठी कीड ही घराणेशाही आहे. देशासाठी कित्येकांनी प्राणांची आहुती देली आहे. परंतु एकाच घराण्याचा उदोउदो करत अन् शेपटी हलवत त्या घरासमोर नमनारे आमचे तथाकथीत नेते या देशाला विकुन ढेकर देतील.
अल्वाताई काय सांगतील . . पैसे देऊन तिकीटवाटप होते हे शेंबडं पोरगं पन सांगेल. निवडुन आल्यावरचा मलीदा असा फुकट मिळतो काय?
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
10 Nov 2008 - 11:41 pm | आपला अभिजित
धन्यवाद, मित्रहो!
काँग्रेस आणि तत्सम सर्वच राजकीय पक्षांतील गलिच्छ, तुच्छ, हीन राजकारणाबद्दलचा आपला सात्विक संताप मी समजू शकतो. पण सध्याच्या राजकीय जीवनाचे विदारक चित्र समाजासमोर मांडणे हा माझ्या लेखनाचा हेतू नसून, लेखणीची खुमखुमी जिरवणे आणि बुद्धीला (असलीच तर!) गंज न चढू देणे, हा आहे.
तेव्हा राजकीय भाष्य करण्याबरोबरच माझे लिखाण टुकार, भिकार, बरे, वाईट, टाकाऊ, कामचलाऊ, उत्तम, सर्वोत्तम....वगैरे वगैरे, यापैकी कसे आहे, त्यावरही एखादी ओळ खरडलीत, तरी चालेल!
10 Nov 2008 - 11:41 pm | आपला अभिजित
धन्यवाद, मित्रहो!
काँग्रेस आणि तत्सम सर्वच राजकीय पक्षांतील गलिच्छ, तुच्छ, हीन राजकारणाबद्दलचा आपला सात्विक संताप मी समजू शकतो. पण सध्याच्या राजकीय जीवनाचे विदारक चित्र समाजासमोर मांडणे हा माझ्या लेखनाचा हेतू नसून, लेखणीची खुमखुमी जिरवणे आणि बुद्धीला (असलीच तर!) गंज न चढू देणे, हा आहे.
तेव्हा राजकीय भाष्य करण्याबरोबरच माझे लिखाण टुकार, भिकार, बरे, वाईट, टाकाऊ, कामचलाऊ, उत्तम, सर्वोत्तम....वगैरे वगैरे, यापैकी कसे आहे, त्यावरही एखादी ओळ खरडलीत, तरी चालेल!
11 Nov 2008 - 8:36 am | अनिल हटेला
राजकारण हा आपला नावडता विषय ,
आणी गांधीगीरी फक्त मुन्नाभाई च्या चित्रपटात च शोभते,असा आमचा विश्वास ...
लिखाण टुकार, भिकार, बरे, वाईट, टाकाऊ, कामचलाऊ, उत्तम, सर्वोत्तम....वगैरे वगैरे,
असं कसं ?
के बी सी ला ४ पर्याय देतात...
अजुन तीन पर्याय द्या की ....................
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..