जिवाचा सखा..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
18 Aug 2019 - 1:19 pm

म्हातारपणी टीव्हीसारखा दुसरा मित्र नाही. सतत फक्त टीव्ही बघावासा वाटायला लागला की समजावे, आपले वय झाले.
(आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले.)

मलाही अशीच म्हातारपणाची जाणीव झाली ती टीव्हीमुळे.

पेपरमधल्या बातम्या बारीक अक्षरात वाचण्यापेक्षा टीव्हीवरच्या बातम्या बघायला जास्त आवडायला लागल्या. रेडिओवरच्या गाण्याबरोबरच टीव्हीवरची गाणी बघायला आवडायला लागली. टीव्हीवरच्या मालिकेतल्या सासवा सुना, सुनेचा छळ, नायिकेवर-नायकावर येणारी संकटे, त्यातली व्हरायटी, सासूने सुनेवर विषप्रयोग करणे, खलनायकाने नायकाचा अकारण द्वेष करणे यांसारख्या गोष्टीत मन रमायला लागले. एखाद्या दिवशी कुणी पाहुणे आले, कुठे बाहेर जावे लागले, पाऊस पडल्यामुळे टाटा स्काय बंद पडला आणि मालिका चुकली तर मनाला रुखरुख लगायला लागली. कालच्या एपिसोडमध्ये नायिकेला शेवटी फोन येतो. तो कुणाचा असेल? आणि तो शनिवारच्या एपिसोड मध्ये आला असेल तर पूर्ण रविवारभर उत्सुकता आवरून धरायची आणि अधीरपणे संध्याकाळच्या एपिसोडची वाट पाहायची. कुणाचा फोन असेल? मग सोमवारी कळते की तो राँग नंबर होता. आपण मूर्ख बनतो. सगळ्या मालिकांमध्ये काहीतरी एक सत्य नायिका किंवा नायक लपवत असतो. त्या एका लपवाछ्पवीवर पाच पाच वर्ष मालिका चालतात. नायिकेचे गरोदरपण कित्येक महिनोनमहीने चालते.

मालिकेत "तुझ्यासोबत हे काय घडत आहे?", "माझी मदत कर", "माझ्यावर हसू नकोस", अशी "त्यांच्या मराठी" भाषेतली वाक्ये वरचेवर येतात. सगळेजण एकमेकाना सारखे पाणी पाजत असतात आणि म्हणत असतात "तू आधी शांत हो पाहू", किंवा "जे काय करशील ते विचारपूर्वक कर."

"मला तुला काही सांगायचंय" असे म्हणत राहतात आणि एकदाचं पटकन काय ते सांगतच नाहीत.
मी एकदा माझ्या आजारी मैत्रिणीकडे तिच्या सोबतीला तिच्या घरी आठ दिवस रात्रीची जात होते. आठ दिवसाचे एपिसोड अर्थातच बुडाले. जान्हवी गरोदर आहे हे श्रीला कळले असेल का? या चिंतेने मी आठ दिवस हैराण झाले होते. आठ दिवसानी मैत्रीण बरी झाली. मी घरी आले. बघते तर काय?.. श्रीला "ते" गुपित अद्याप कळलेलंच नव्हतं. मधल्या आठ दिवसात काहीही नवं घडलं नव्हतं. माझं काहीही मिस झालं नव्हतं. पुढेही कित्येक एपिसोड ते गुपित श्रीला कळलंच नाही.

मालिकेत चांगली सज्जन माणसे अचानक दुष्ट बनतात. दुष्ट माणसे अचानक सुष्ट बनतात. मेलेली माणसे जिवंत होतात. मधेच पात्रे बदलतात. काही पात्रे कित्येक एपिसोड होईपर्यंत गायबच होतात. एक न दोन. हजारो दोष. शेकडो तर्कदुष्ट गोष्टी. तरीही म्हातारी माणसे टीव्ही बघतात. ओन्ली टू किल द टाइम. कुणीच सिरियल्सना सिरियसली घेत नाही. माझी एक मैत्रीण म्हणते, "मी नाही फालतू मराठी,हिन्दी सीरियल्स बघत. मी इपिक बघते. अॅनिमल प्लनेट बघते. डिस्कवरी बघते. इंग्रजी सीरियल्स बघते. इंग्रजी मूवीज बघते. तू पण बघत जा नं !"

मी केला प्रयत्न, पण मला त्याचा कंटाळा आला. मला तर बातम्याच सगळ्यात मनोरंजक वाटतात. किती उद्दिपित होऊन तारस्वरात, वाघ मागे लागल्यासारखे फास्ट, तेचतेच बोलत असतात. टीव्हीच्या निम्या भागात निवेदक,उरलेल्या भागात दृश्य. सर्वात वर एक बातमी सरकत असते. सर्वात खाली एक बातमी सरकत असते. त्याखाली बारीक अक्षरात आणखी एक पट्टी. नेमके काय पहायचे? चर्चा म्हणजे तर नुसता गोंधळ.

असे म्हणतात की म्हातारपणी बागकाम करावे, पुस्तके वाचावीत, हास्यक्लबला जावे. पण हे सगळे करूनही एक वेळ अशी येतेच की गात्रे थकतात, डोळे शिणतात, कान दमतात. उसने आणलेले अवसान गळून पडते, मित्र,मैत्रिणी दूर जातात. मग एकच विरंगुळा उरतो. टीव्ही. आई शप्पथ,जस्ट टू किल द टाइम. बाकी काही नाही...

.

जीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

18 Aug 2019 - 1:35 pm | चौथा कोनाडा

झकास लेख !
आजकालच्या मराठीच्या वापराबद्दल काय बोलणार ? सगळं दिव्य मराठी झालंय !


मालिकेत चांगली सज्जन माणसे अचानक दुष्ट बनतात. दुष्ट माणसे अचानक सुष्ट बनतात. मेलेली माणसे जिवंत होतात. मधेच पात्रे बदलतात. काही पात्रे कित्येक एपिसोड होईपर्यंत गायबच होतात. एक न दोन. हजारो दोष. शेकडो तर्कदुष्ट गोष्टी.


या तुचियागिरीवर आख्खी टिव्ही इंडस्ट्री जगतेय !

आता आपल्यासारख्यांसाठी टिव्ही हे एकमात्र साधन राहिलेय हे वाचून डोळे पाणावले ! खरंय !
(धागा लेखिका आजी सभासद होउन फकस्त १६ तास झालेत ! या माई कुरसुंदीकर तर नाहीत ना अशी शंका येतेय)

नाखु's picture

18 Aug 2019 - 8:17 pm | नाखु

थेट मालिकांना हात घालतील असे वाटत नाही.

आणि हो नुकताच चिनार्या भेटला होता तेंव्हा सुद्धा माई फक्त शरीरानेच वयस्कर दिसत होत्या.

चिनार्याने ख्याली खुशाली कळविलेला टपाली दूरस्थ नाखु बिनसुपारीवाला

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 2:32 pm | जॉनविक्क

नेटफलिक्स वगैरे ला शिफ्ट व्हा. मग जीवाला सखे भेटतील

जालिम लोशन's picture

18 Aug 2019 - 4:08 pm | जालिम लोशन

छान

ज्योति अळवणी's picture

18 Aug 2019 - 9:16 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहात आजी. पण अलीकडे on line कथा कथन आणि असंच खूप काही देखील असू शकतं. बघा विचार करून

मराठी कथालेखक's picture

19 Aug 2019 - 2:52 pm | मराठी कथालेखक

मालिकांना बाकी कितीही नावे ठेवा.. पण ते 'काह्हीही हं श्री' मात्र खरंच खूप ग्रेट होतं .. :)

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार. सर्वांनी माझ्या लेखनाचं स्वागत केल्याबद्दल मला आनंद आहे. टीव्हीला पर्याय असले तरी निवृत्तीनंतर दहा वर्षे होत आल्यावर एकूण वाढत्या वयात नव्याने काही तंत्रज्ञान किंवा नवीन माध्यम आकलन करुन घेण्याची शक्ती आणि मुख्य म्हणजे इच्छाच कमी होत जाते. इंटरनेटवर लेखनही इतर कुटुंबियांकडून वेळोवेळी तांत्रिक मदत घेऊन करावं लागतं. तरीही प्रयत्न करत आहे.

अर्थात यालाही अनेक ज्येष्ठ नागरिक अपवाद असतात हेही आहेच. ते सराव करून इंटरनेटवर लेखन किंवा कॉम्प्युटरवर फोटो, व्हिडीओ बऱ्यापैकी सहजतेने एडिट करताना दिसतात.

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

छान लिहिलंय खास करून शेवटच्या ३/४ ओळी जास्ती भिडल्या.
लिहित राहा.

विनिता००२'s picture

28 Aug 2019 - 4:59 pm | विनिता००२

आणि तोही बघवेनासा झाला की समजावे की आता फारच वय झाले. >> खूप हसले :)

छान लिहीताय आजी!