युगांतर - आरंभ अंताचा! भाग २६

Primary tabs

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
10 Aug 2019 - 12:21 pm

युगांतर-आरंभ आंताचा!
भाग २६

कंसाने आकाशाकडे बघत हातातला सोमरसाचा प्याला नाचवला.
"बोल.... बोल आता.... तुझा मृत्यू जन्म घेतोय म्हणून....." जोरजोरात हसला , " या स्वतःच्या हाताने मृत्यूलाच मृत्यु देणारा एकमेव आहे हा कंस! सातही पुत्र यमसदनी धाडलेत मी. आणि आता आठव्यासाठी प्रतीक्षा कर."

"महाराज, एक प्रश्न आहे...."

"राजमंत्री.... काय विचारायचं आहे? आणि कोणाला ? याला?" कंसाने आभाळाकडे बोट दाखवत विचारलं.

"नाही महाराज... तुम्हाला."

"मग ठिक आहे. कारण तो प्रश्नांची उत्तरं नसतो देत."
कंसाला नशा चढली होती.

"महाराज, आठव्या पुत्रापासून भिती होती. मग आधीचे पुत्र का....?"

कंसाने त्याच्या कडे पाहिलं. महाराजांना विचारून आपण आपल्याच मृत्यूला आवाहन तर केले नाही ना! ' राजमंत्री घाबरला. कंस हसू लागला.

"तुला इतकं सरळं वाट्ट हे? त्यानी आठवा पुत्र सांगितला. पण त्याने कोणत्या पुत्राला प्रथम मानून मोजलय हे कोणाला माहिती आहे?"

"म्हणजे महाराज?"

"देव फसवणूक करतात राजमंत्री! बळीला दान म्हणून 'तीन पावलं' सांगून बळीच्याच डोक्यावर पाय दिला त्याने वामनाच्या रुपात. तो मला संपूर्ण सत्य काय सांगेल?" कंस हसत राहिला, "उलटी मोजणी करत पहिल्याच वेळी जन्म घेऊन येईल. शब्दांचे खेळ खेळतो तो!"

कंसाने पुन्हा प्याला तोंडाला लावला. तितक्यात दासी आली.

"महाराज, आपली भगिनी गर्भवती आहे." दासीने सांगितले आणि त्याला चढलेली नशा खाडकन उतरली.

नजर उग्र करत म्हणाला, "पहारा कडक कर, राजमंत्री. क्षणभरही नजर हटता कामा नये."

मथुरा नगरी कंसाच्या अत्याचारामुळे त्रासली होती. देवकीचा आठवा पुत्र सर्वांची एकुलती एक आस होती. दिवस सरत राहिले. क्षणाक्षणाची वार्ता कंसापर्यंत पोचत होती.

-------
भाद्रपद मासातली अष्टमी तिथीची अंधारी रात्र! आकाशमंडपात रोहिणी नक्षत्र सजले होते. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. सैनिक गाढ निद्रेत होते. मंत्रावल्या सारखा वासुदेव हातात त्याचे नुकतेच जन्मलेले निलवर्णी बाळ घेऊन बाहेर पडला. निळ्याशार सागरातल्या निळ्या आकाशाच्या प्रतिबिंबाच्या छटेने बनलेले मनमोहक रुप!

बेफाम पावसाने नदीला पूर आला होता. वासुदेव नदीत उतरून चालत राहिला बाळं डोक्यावर घेऊन! प्रवाहाचे पाणी वाढत राहिले. वासुदेवाला पूर्ण प्रवाहात पाण्याने वेढून ठेवलेले होते. श्वास गुदमरत होता. परावश असल्या सारखा तो चालत होता. हातात घट्ट धरून उंचावर धरलेल्या बाळाच्या पायाला नदीच्या वाढत्या पाण्याला स्पर्श झाला...... आणि पूर ओसरला. नदीच्या दुसऱ्या काठावर पोचून वासुदेव नंदच्या घरी रानवाट तुडवत गेला. दरवाजा उघडा होता. शय्येवर नंद, यशोदा झोपेत होते. शेजारी त्या दोघांचे नवजात बाळं झोपले होते!

....... जाग आली तेव्हा वसूदेव कारागृहात होता. हातात बाळं जोरजोरात रडत होते. देवकी जागी झाली. आश्चर्याने ती बालकाकडे पाहात राहिली. सैनिक जागे झाले. कंसाला समाचार गेला तसा तो धावत आला.
त्याने हिसकावून वासुदेवाकडून बाळं घेतले.
देवकीने त्याचे पाय पकडले.

"भ्राताश्री.... कन्या आहे ही."

कंसाने बाळाकडे पाहिले. तो ही आश्चर्यचकित झाला. मग वेड्यासारखा हसू लागला.

"बघ राजमंत्री... म्हणलो होतो ना मी. फसवणूक!"

बाळाला घेऊन जाऊ लागला तसा देवकीने पुन्हा पायावरची पकड घट्ट केली.

"भ्राताश्री.... कृपा करा. तिला जगू द्या..... तिला ठार मारून काय मिळणार आहे तुम्हाला?"

"समाधान! पराभवाची एकही शक्यता शिल्लक न राहिल्याचे समाधान!"
तो देवकीच्या हातांची केविलवाणी पकड झटकून तळकक्षाकडे गेला.
"हे काय झालं नाथ.... हे काय झालं!" देवकी रडत राहिली. वासुदेव तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता.
'आकाशवाणी असत्य कशी असू शकते...?'

"शांत हो, देवकी.... तुला आठवतयं सातव्या गर्भावेळी काय झालं होतं?"

"काय नाथ?"

"रोहिणी भेट घ्यायला आली होती इथे...."

"हो नाथ.... आठवते आहे. रोहिणीदेवींच्या उदरातही तुमचा गर्भ होता. पुत्रप्राप्तही झाली. त्याचे बलराम नाव ठेवलेत तुम्ही!" दु:खी मनाने तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले, "आणि माझ्याकडून ना तुम्हाला आपत्य सुख मिळाले, आणि ना तुम्हाला त्यांच्या सोबत राहण्याचे सुख मिळाले!"
ती परत रडू लागली.

"देवकी, मला काही वेगळे सांगायचे आहे." दीर्घ श्वास घेऊन सोडत तो म्हणाला, "मला विश्वास वाटतो, की बलराम आपला सातवा पुत्र आहे."

"काय बोलता नाथ?" ती उठून उभी राहिली.

"हो देवकी..... तोच सातवा पुत्र जो कंसाच्या कचाट्यातून वाचला..... नव्हे.... वाचवला गेला."

"नाथ? मला समजले नाही काहीच."

"तुला सातवी गर्भ धारणा झाली तेव्हा पासून तुझ्या उदराभोवती एक दिव्य तेज दिसायचे मला, देवकी."
"काय?"

"हो.... भेटून जाताना ती सदिच्छांचीच नाही तर नकळत का होईना....काही अजूनही अगम्य आदला-बदल करून गेली."

"म्हणजे, नाथ?"

"रोहिणी भेटून जाऊ लागली, तेव्हा ते तेज तिच्या उदरात जाणवले मला."

"नाथ?"

"हो देवकी."

"गर्भ बदली झाला असे म्हणायचे आहे आपणास, नाथ? गर्भ प्रत्यारोपण झाले? पण हे कसं शक्य आहे?"

"ज्याच्या पासून उत्पती होते, त्या विधात्यासाठी काय अशक्य आहे? ....आणि म्हणून मला खात्री आहे की दैवी शक्तीने जसे आपल्या पुत्राला-बलरामाला वाचवले, तसेच आपल्या आठव्या पुत्रालाही नक्की वाचवेल. कारण तुझ्या उदरात तेच तेज ठळकपणे अधिक प्रकाशित रुपाने आपल्या दोघांनाही या गर्भावेळी जाणवले. "
देवकी विचारात पडली.

कंसाने बाळाचा एक पाय धरून उलटे उचलले. बाळाच्या कर्कश्श रडण्याचा आवाज ऐकून कंसाच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले. त्याने उलट्या अवस्थेतच बाळाला वेगाने हवेत उंच धरून गोलाकार फिरवले. सुकलेल्या रक्ताचे डाग लागून पूर्णतः तपकिरी- किरमिजी रंगाच्या भासत असणाऱ्या खडकावर बाळाला आपटणार, इतक्यात त्याच्या मजबूत हातांची पकड सुटली.

.... आणि खाली पडण्याऐवजी हवेत तरंगू लागले. बघता बघता एक तीव्र प्रकाश तळकक्षात पसरला. बाळं दिव्य प्रकाशात गुप्त झाले. त्याजागी योगमायेची आकृती प्रगटली. कंस गारठल्या सारखा बघतचं राहिला.

घुमल्या सारखा आवाज कंसाच्या कानी पडला, "मुढ कंसा, तुझा कर्दनकाळ सुरक्षित आहे. तुझ्या कर्मांची फळे भोगायला सज्ज हो कंसा!"

©मधुरा

धर्मइतिहासलेख