मराठी दिवस २०२०

आत्तोबा

Primary tabs

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in जनातलं, मनातलं
4 Aug 2019 - 9:24 am

७५ वर्षाचा माणूस म्हंटल्यावर साधारणतः आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते हो ? ...

ज्याचे दोन्ही गुडघे झिजले आहेत आणि कंबर, पाठदुखी, मानदुखीमुळे जो दिवसाचा ८०% वेळ घरात आराम खुर्ची किंवा बिछान्यावर घालवत आहे.

कधी बाहेर काम पडलंच तर लगेच ड्रायव्हरला घेऊन चार-चाकी गाडी मध्ये फिरणारा,

स्वतःची सर्व वैयक्तिक कामे दुसऱ्यांच्या मदतीने करून घेणारा,

डायबिटिज, हायपरटेन्शन, आर्थराइटिस इ. रोगाने ग्रस्त आणि म्हणून मरणाची सतत चिंता करणारा,

किंवा रीटायरमेन्ट होऊन घरी आरामात आयुष्य काढणारा.. पण मी ज्यांना २ वर्षांपासून बघत आलो आहे ना त्यात वर वर्णिल्याप्रमाणे काहीच नाही. विश्वास बसत नाही ना...!!!

आजही ही व्यक्ती रोज सकाळी ५:३० वाजता उठून संस्थेची बरीचशी कामे करायला सज्ज होते.

"साधी राहणी - उच्च विचारसरणी" या उक्तीला अनुसरून अंगावर साधी शिवलेली बनियान आणि पांढऱ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केलेले ……

श्री. विलास बाळकृष्ण मनोहर..!!

श्री. विलास बाळकृष्ण मनोहर

बिरादरीत त्यांना कुणी "दाजी" म्हणतात तर आमच्या सारखी तिशी-चाळीशीतली मंडळी "आत्तोबा" असं म्हणतात. १९७० च्या दशकात पुण्यात रेफ्रीजरेशनचा व्यवसाय अगदी थाटात सुरु असतांना आदरणीय बाबा आमटे यांच्या प्रेरणेने आत्तोबा सर्वप्रथम आनंदवनाशी आणि नंतर लोक बिरादरीशी जुळले. बाबांच्या संपूर्ण "भारत जोडो" अभियानात आत्तोबा पूर्ण वेळ त्यांच्याच सोबत होते. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बाबांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचा बराच प्रभाव आतोबांवर आहे. बाबांचा स्पष्टवक्तेपणा हा आतोबांमध्येसुद्धा तेवढ्याच प्रखरपणे जाणवतो. वयाची ४५ पेक्षा जास्त वर्षे हेमलकसात घालवलेल्या आतोबांनी त्यांचे अनुभव एका नक्षलवाद्याचा जन्म, नेगल भाग १ (बाळगलेल्या वन्य प्राण्यांची कहाणी), नेगल भाग २ : हेमलकशाचे सांगाती, नारीभक्षक (कादंबरी), मला (न) कळलेले बाबा या पुस्तकांमधे केले आहे. तरुणाईला आतोबांची विशेष ओढ आहे. बिरादरीला आले की आतोबांना भेटल्याशिवाय त्यांची तृष्णा भागत नाही. खरे पाहता मला आतोबांवर खूप विस्तार पूर्वक लिहायचे होते, पण स्वतःच्या कामाबद्दल ते फारच कमी बोलतात. आणि जेव्हा - जेव्हा त्यांना मी विचारलं की, मला तुमच्यावर लेख लिहायचा आहे, त्यावर प्रत्येकवेळी त्यांनी मंद स्मित करून स्पष्टपणे नकार दिला. परंतु या दोन वर्षाच्या काळामध्ये मी आणि सोनुने (माझी पत्नी) ज्या काही गोष्टी त्यांच्याबद्दल स्वतः अनुभवल्या त्याच मी लेखनबद्ध करत आहे.

त्यांच्याशी असलेल्या अनुभवाची सुरुवात मला गोड म्हणजेच आईस्क्रीम ने करावीशी वाटते. उन्हाळा लागला रे लागला की आतोबांच्या किचनमधील फ्रीझर मध्ये वेगवेगळ्या २-३ फ्लेवर्स चे आईस्क्रीम बॉक्स हमखास मिळणारच. आतोबांना आईस्क्रीम ची प्रचंड आवड आहे. भामरागड मध्ये आता ३-४ वर्षांपासूनच आईस्क्रीम मिळणे सुरु झाले आहे. त्याआधी वीज नियमित नसल्यामुळे कुणीही आईस्क्रीम ठेवत नव्हतं. वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा कपाळ थंड होईपर्यंत आईस्क्रीम खातांना मी आतोबांना बघितलं आहे आणि तेही दररोज. त्यांच्या सोबत आईस्क्रीम खाण्याची मज्जा काही औरच. अकाली वादळामुळे झाडं पडून २-३ दिवस वीज गेली तरीही आता घरी सोलर बॅक-अप असल्यामुळे आतोबा आईस्क्रीम स्वतः तयार करतात. त्यामुळे जर तुम्ही आतोबांना उन्हाळ्यात भेटले तर ती भेट नक्कीच फायदेशीर ठरेल. हा... हा ...!

रेणुका आत्या

दुसरी महत्वाची आणि ज्याची खूप डिमांड असते ती गोष्ट म्हणजे आतोबांची लाल रंगाची दुचाकी गाडी "Pleasure". संस्थेमध्ये कुणालाही (खास करून तरुणाई) दुचाकी गाडीची गरज भासल्यास आतोबांची गाडी सदैव उपलब्ध असते. ते सर्वांना एकच गोष्ट सांगतात की, गाडीची चावी मुख्य हॉलच्या दारामागे लटकवलेली आहे जेव्हा वाटलं तेव्हा घेऊन जा. आम्हाला गाडी घेऊन जातो असं सांगायची काहीही गरज नाही. दोन वर्षात त्यांनी आम्हाला कधी "गाडीत पेट्रोल भरलं का रे ?" असं विचारलं सुद्धा नाही. अडी-अडचणीच्या वेळी आपलं काम सुरळीत पार पाडून आतोबांची ही दुचाकी आपल्या नावाप्रमाणे तेवढाच आनंद देते.

आतोबांची प्लेजर दुचाकी

मोबाईल, स्मार्ट फोन, सोशल मीडिया यापैकी कुठल्याही गोष्टींची आतोबांना फारशी आवड नाही. घरी रेणुका (सौ. रेणुका मनोहर) आत्याच टॅबलेट बघतात. पण आम्ही पाठवलेले पक्ष्यांचे व्हिडिओ, फोटो, रुही चे व्हिडिओ, आदिवासींचे व्हिडिओ मात्र आतोबा आवडीने बघायचे. आणि मग प्रत्यक्ष भेटल्यावर त्यावर चर्चा व्हायची. अर्थात, कंमेंट करण्यात ते फालतू वेळ घालवत नसत.

रेणुका आत्या

आम्ही बिरादरीत सामुदायिक आरोग्य विभागाचं काम बघायचो. बऱ्याच वेळा मी आतोबांसोबत फिल्ड व्हिजिटला गेलो आहे. या दरम्यान मला आतोबांकडून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एकदा भर उन्हात पेनगुंडा गावातून परत येतांना घेरदार आंब्याच्या झाडाखाली बसून आतोबांसोबत खाल्लेला उसळ-चिवडा मी कधीच विसरू शकणार नाही. या दुर्मिळ क्षणाचा मी एक सेल्फी सुद्धा घेतला आहे. आपलं मत निवडक योग्य शब्दांत लोकांना कसं पटवून द्यायचं हा गुण आतोबांकडून निश्चितच शिकण्याजोगा आहे.

आतोबांसोबत जंगलात चिवडा-उसळ खातांना सेल्फी

रोज संध्याकाळी आत्या - आतोबा पायी फिरायला निघतात. ते सहसा कुमारगुडाकडील रस्त्याकडे जातात. आम्ही पण बऱ्याचदा सायकलिंग करत त्याच मार्गे जायचो. वाटेत रोजच भेट व्हायची आणि मग आमची पक्ष्यांबद्दल चर्चा व्हायची. आतोबांना भामरागड मधील बऱ्याच पक्ष्यांची माहिती आहे. माझी पक्षी निरीक्षणाची आवड वाढवण्यात त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. त्यांना तर कोणत्या जातीचा पक्षी कोणत्या विशिष्ट जागी सहसा दिसतो हे सुद्धा माहिती आहे. एकदा आतोबांनी मला "मलाबार हॉर्नबिल" म्हणजेच धनेश पक्ष्याची एक विशिष्ट लोकेशन (बेजुर फाटा) सांगितली होती. आणि बरोबर ११-१२ महिन्यांनी मला तो त्याच जागी दिसला. आणि आनंदाची बाब म्हणजे मी त्याला माझ्या डी.एस.एल.आर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चरसुद्धा करू शकलो. मला आठवते मी आतोबांना लगेच फोन लावला होता पण त्यांनी काही उचलला नाही. लगेच सायकल जोराने आतोबांच्या घराकडे पळवली आणि त्यांना फोटो दाखवला. दीड वर्षांपासून मला धनेश पक्षी बघायचा होता. आणि आतोबांच्या कृपेने मला तो बघायला मिळाला यापेक्षा आनंदाची गोष्ट आणि काय असू शकते?

आतोबा संस्थेतील इतर कार्यकर्त्यांसोबत

सोनू गरोदर असतांना रेणुकाआत्या दररोज काही ना काही तरी नवीन पदार्थ करायच्या आणि आतोबा स्वतः सोनूला हॉस्पिटलमध्ये डबा पोहोचवून द्यायचे. त्या डब्यात काही प्रमाणात माझ्यासाठी पण एक्सट्रा असायचं. गरोदरपणात सततच्या उलट्यांमुळे अरुची असते. अशा वेळेस आत्यांनी बनवलेली आणि थेट हॉस्पिटलच्या वरच्या माळावर आतोबांनी पोहोचवलेली आंबील सोनू (आणि थोडीशी मी सुद्धा) खूप आवडीने खायची. गरोदरपणातल्या काही अविस्मरणीय आठवणींपैकी ही एक ....
बेजुर गाव हे हेमलकसाहून साधारणतः पायी दोन तास अंतरावर आहे. तिथे बाबलाई नावाची माडिया लोकांची देवी आहे. जंगलाच्या आत डोगंराच्या पायथ्याशी बाबालाई मातेचे पोच्यम (पूजनीय स्थळ) आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आतोबा काही सहकाऱ्यांसोबत बेजुर-बाबलाईला पायी जातात. एक वेळा सोनूला आणि दोनदा मला त्यांच्या सोबत जाण्याची सुवर्ण संधी मिळाली. भल्या पहाटे पूजेचे सामान घेऊन आम्ही नाले, जंगल-डोंगर वाटा ओलांडत बाबलाईला गेलो होतो. तिथे आतोबांनी पूजा करून उपस्थितांना प्रसाद वाटला होता. थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही परतीला निघालो. वाटेत त्यांचे अनुभव, थट्टा मस्करी, जंगल वाटां, पक्ष्यांची माहिती ऐकत ऐकत कसा वेळ निघून जायचा काही कळायचंच नाही. २०१८ च्या आमच्या या वारीची मी पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली होती.
(या लिंक वर क्लिक करा - https://studio.youtube.com/video/Gc3Xz7n70as/edit)

मला फोटोग्राफीची आवड म्हणून वाटेत आतोबा भेटल्यावर मी पण कधी कधी त्यांचे फोटो काढायचो. आतोबाही त्यांच्या मजाकी मुड मध्ये म्हणायचे, "फोटो बरोबर काढ रे, वर गेल्यावर फ्रेममध्ये छान दिसला पाहिजे". वयाची ३० वर्ष टीव्ही न बघितलेल्या आतोबांना आता मात्र काही निवडक मराठी डेली सोप आवडतात आणि न विसरता ते दररोज बघतात. आतोबा बऱ्याच वेळा पुणेरी पाट्या, पुणेरी जोक्स त्यांच्या अंदाजात सांगतात. हं … पुणेरी बाणा मात्र त्यांनी तेवढाच जपला आहे.
आतोबां-आत्यांसोबत घालवलेले सर्व क्षण अविस्मरणीय आहेत. लोक बिरादरीची भेट यांना भेटल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कधीही लोक बिरादरीला गेले की आत्या-आतोबांना नक्की भेटा.

शब्दांकन:
लोकेश तमगीरे
सोनू मेहेर

व्यक्तिचित्रणलेखअनुभव

प्रतिक्रिया

लोकेश तमगीरे's picture

4 Aug 2019 - 9:50 am | लोकेश तमगीरे

बेजुर गाव हे हेमलकसाहून साधारणतः पायी दोन तास अंतरावर आहे. तिथे बाबलाई नावाची माडिया लोकांची देवी आहे. जंगलाच्या आत डोगंराच्या पायथ्याशी बाबालाई मातेचे पोच्यम (पूजनीय स्थळ) आहे. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आतोबा काही सहकाऱ्यांसोबत बेजुर-बाबलाईला पायी जातात. एक वेळा सोनूला आणि दोनदा मला त्यांच्या सोबत जाण्याची सुवर्ण संधी मिळाली. भल्या पहाटे पूजेचे सामान घेऊन आम्ही नाले, जंगल-डोंगर वाटा ओलांडत बाबलाईला गेलो होतो. तिथे आतोबांनी पूजा करून उपस्थितांना प्रसाद वाटला होता. थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही परतीला निघालो. वाटेत त्यांचे अनुभव, थट्टा मस्करी, जंगल वाटां, पक्ष्यांची माहिती ऐकत ऐकत कसा वेळ निघून जायचा काही कळायचंच नाही. २०१८ च्या आमच्या या वारीची मी पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली होती.

(या लिंक वर क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=Gc3Xz7n70as&feature=youtu.be)

श्वेता२४'s picture

4 Aug 2019 - 10:16 am | श्वेता२४

लिहित रहा पु भा प्र

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:23 am | लोकेश तमगीरे

मनःपूर्वक धन्यवाद ...!

नावातकायआहे's picture

4 Aug 2019 - 10:43 am | नावातकायआहे

पु भा प्र

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:25 am | लोकेश तमगीरे

नक्कीच प्रयत्न राहील ... धन्यवाद ..!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2019 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे

अजून एका सुंदर जीवनाची सुंदर ओळख !

पुभाप्र.

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:28 am | लोकेश तमगीरे

धन्यवाद डॉ सुहास म्हात्रे.
आत्या-आतोबा आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत.

जेम्स वांड's picture

4 Aug 2019 - 11:36 am | जेम्स वांड

अतिशय हृद्य लेखन, खूप खूप आवडले

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:33 am | लोकेश तमगीरे

आभार ... !

nishapari's picture

4 Aug 2019 - 12:00 pm | nishapari

खूप छान ... ग्रेट ..

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:34 am | लोकेश तमगीरे

धन्यवाद ..!

बघू संधी मिळाली की एक भेट देणारच. फोटोही मस्त.

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:43 am | लोकेश तमगीरे

नक्कीच भेटा .... छान अनुभव राहील.
प्रकाश काका - मंदा काकूंची भेट अविस्मरणीय राहील.
आत्या - आतोबांना आणि संस्थेतील जुन्या कार्यकर्त्यांना अवश्य भेटा.

मित्रहो's picture

4 Aug 2019 - 2:54 pm | मित्रहो

सुंदर लिखाण. त्यांची पुस्तके वाचली आहेत

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:48 am | लोकेश तमगीरे

वाह खूपच छान ... त्यांच्याशी भेट पण अविस्मरणीय राहील.

सुधीर कांदळकर's picture

4 Aug 2019 - 5:46 pm | सुधीर कांदळकर

हा लेख असे दोन्ही लेख वाचले. आजकाल डॉक्टरलोक सक्तीच्या प्रशिक्षणातून लबाडीने चोरवाटा काढून शहरात दवाखाने थाटून पैसे कमावण्याचे दिवस असतांना आपले उभयतांचे कार्य डोळ्यात भरण्याजोगे आहे. कौतुकाला शब्द नाहीत.

एकीचे बळ संदर्भात आपण सिल्व्हिया अ‍ॅश्टन हिचे टीचर हे पुस्तक जरूर वाचावे. तिने न्यूझीलंडमधील शिक्षणात मागे पडणार्‍या आदिवासींसाठी प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बनविला होता. नंतर तो तिथल्या नोकरशाहीने गाडला पण. मराठीत त्याचे भाषांतर मी वाचले होते. परंतु पुस्तकाचे तपशील दुर्दैवाने आता माझ्याकडे नाहीत.

धन्यवाद, पुलेशु.

लोकेश तमगीरे's picture

5 Aug 2019 - 9:58 am | लोकेश तमगीरे

आपल्या दोन्ही लेखांवरच्या प्रतिक्रिया मला अजून लिहायला प्रेरित करणाऱ्या आहेत. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ...!

आमचं काम फार मोठं नाही. फक्त कामाचं समाधान खूप मोठं आहे. शिवाय अशा जागी काम करणं हा आमचा एरिया ऑफ इंटरेस्ट सुद्धा आहे. मग त्यापुढे बाकीच्या गोष्टी दुय्यम वाटतात. आणि अशा ठिकाणी काम करायला प्रेरित करण्यास आमच्या कॉलेज (टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई) चा पण मोठा वाटा आहे.

टीचर पुस्तकाचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच वाचायला आवडेल.

सुधीर कांदळकर's picture

4 Aug 2019 - 5:47 pm | सुधीर कांदळकर

हा लेख असे दोन्ही लेख वाचले. आजकाल डॉक्टरलोक सक्तीच्या प्रशिक्षणातून लबाडीने चोरवाटा काढून शहरात दवाखाने थाटून पैसे कमावण्याचे दिवस असतांना आपले उभयतांचे कार्य डोळ्यात भरण्याजोगे आहे. कौतुकाला शब्द नाहीत.

एकीचे बळ संदर्भात आपण सिल्व्हिया अ‍ॅश्टन हिचे टीचर हे पुस्तक जरूर वाचावे. तिने न्यूझीलंडमधील शिक्षणात मागे पडणार्‍या आदिवासींसाठी प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बनविला होता. नंतर तो तिथल्या नोकरशाहीने गाडला पण. मराठीत त्याचे भाषांतर मी वाचले होते. परंतु पुस्तकाचे तपशील दुर्दैवाने आता माझ्याकडे नाहीत.

धन्यवाद, पुलेशु.

महासंग्राम's picture

6 Aug 2019 - 10:35 am | महासंग्राम

तुमचा धागा ४५,००० हजारी आहे आणि अतिशय सुंदर आहे पुलेशु

लोकेश तमगीरे's picture

7 Aug 2019 - 10:28 am | लोकेश तमगीरे

आपल्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल धन्यवाद.
तेवढी माझी लायकी नाही.
आयुष्यातल्या चांगल्या आठवणी, अनुभव शब्दरूपात लिहून ठेवायचे याच उद्देशाने हे लिखाण सुरु केले.
आणि उत्तम वाचक वर्ग असलेला मिपाने मला तो योग्य प्लॅटफॉर्म दिला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.