बिरादरीची माणसं - भाऊजी काका

Primary tabs

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in जनातलं, मनातलं
16 Jul 2019 - 10:24 am

ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’. सेनापती बाबांच्या या वानर सेनेमधील एक अतिशय संवेदनशील होते आमच्या बिरादरीचे “भाऊजी काका”. बिरादरीत ते “The Electrical Lineman of Biradari” म्हणून ओळखले जातात.
भाऊजी काका
अरे हो…..१९८८ मध्ये बिरादरीलगतच्या गावातले आदिवासी बांधव जनरेटरवर चालण्याऱ्या टी.व्हीवर जे रामायण-महाभारत बघायचे ना… तोच जनरेटर अविरत चालू ठेवण्याचे काम करणारी ही व्यक्ती!

"भाऊजी नारायण मडावी" यांचा जन्म ५/१०/१९६५ साली चंद्रपूर जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील ‘जामगिरी’ नावाच्या गावी एका गोंड आदिवासी कुटुंबात झाला. आईचा - लक्ष्मीचा जादूटोण्यावर प्रचंड विश्वास असल्यामुळे वडील सहा महिन्यांपासून रोगाने ग्रस्त असतांनासुद्धा मांत्रिकाकडे दाखवणे सुरु होते. परिणामी, भाऊजीकाकांच्या वयाच्या दुसऱ्याच वर्षी वडील त्यांच्या तरुणकाळातच मरण पावले. घराचा कणाच गेल्याने आईवर ५ मुला-मुलींची जबाबदारी आली. आईने आपल्या मालकीची शेतजमीन नातेवाईकांकडे ठेक्याने ठेवून स्वतः शेत-रानमजुरी केली. कष्टातून आलेल्या पैश्यांमध्ये मुलीचं लग्न केलं.

दरम्यान, भाऊजीकाका व त्यांच्या मोठ्या भावाला शरीरावर पांढरसर चट्टे यायला लागले. तपासणीमध्ये कळलं की कुष्ठरोग आहे. गावातल्या काही लोकांनी आईला आनंदवनाबद्दल माहिती दिली. आनंदवनाची महती आता सर्वदूर पसरली होती त्यामुळे गावकऱ्यांच्या आग्रहास्तव आईने जादू टोण्यावर विश्वास न ठेवता दोन्ही मुलांना उपचारासाठी वरोऱ्याला जाण्यास सांगितले. आईशी खूप जवळीक असल्याने भाऊजी काका सुरुवातीला वरोऱ्याला गेलेच नाही. मोठा भाऊ आनंदवनला उपचारासाठी गेल्यावर ३ वर्षांनी भाऊजी काका गेले तर ते कायमचेच. जन्मदात्या आई-बाबांनंतर, साधनाताई आणि श्री. बाबा आमटे हेच भाऊजी काकांचे आयुष्यभरासाठी आई-बाबा झाले.

कुष्ठरोगाच्या उपचारासाठी गेलेल्या भाऊजी काकांना बाबांनी आनंद बुनियादी प्राथमिक शाळेमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पहिल्या वर्गात प्रवेश दिला. शाळेमध्ये कधीही न गेलेल्या भाऊजी काकांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे पुस्तकी शिक्षण थोडे कंटाळवाणे वाटू लागले. त्यांनी बाबांकडे श्रमदानाची मागणी केली. बाबांचा बालमजुरीला खडतर विरोध पण श्रमाचे महत्व बालमनांमध्ये रुजावे म्हणून त्यांनी सकाळी १-२ तासांसाठी श्रमदान करण्यास होकार दिला. त्यावेळी श्री. अडसूळ सर हे सर्व कार्य समन्वयीत करत होते. बाबांच्या होकारामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला. रोज सकाळी भाऊजी काकांसमवेत इतर सर्व मुले बाबांची वाट बघायची. वयाची साठी ओलांडलेले बाबा या पहिली-दुसरीच्या मुलांचा उत्साह वाढावा म्हणून रोज कामाची सुरुवात करायला यायचे. बाबांनी स्वतः एक घमेलं माती टाकली की मग सर्व मुलं जिद्दीने कामाला भिडायची. मग रेती गाळून देणे, रस्ता बनवणे, पायवा तयार करणे इ. कामांमध्ये हातभार लावायची. आनंदवनमधील सध्या असलेला वेल्डींग वर्कशॉपचा पाया बांधण्यामध्ये या चिमुकल्यांनी अल्प का होईना पण हातभार लावला आहे.

आनंदवनमध्ये त्यावेळी प्रिंटिंग-प्रेस, हॅन्डलूम, टेलरिंग, पॉवर अँड इलेक्ट्रिसिटी वर्कशॉप असे नानाविध विभाग कार्यरत होते. बाबांनी पुढे याच तिसरी-चौथीत गेलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विभागात जाण्यास सांगितले. भाऊजींना इलेक्ट्रिक वर्कशॉपमध्ये आवड असल्याने ते तिथला अनुभाव घ्यायला लागले. चौथीपर्यंत शिक्षण झालं आणि पुढील शिक्षणासाठी भारती वहिनींनी [डॉ. भारती आमटे] भाऊजी काकांना मनोहरधाम दत्तपूर, वर्धा येथील शाळेमध्ये पाठविले. आनंदवनाशी खूप जवळीक असल्याने भाऊजी काका वर्धेतील शाळेत फक्त दोन महिनेच थांबले आणि दिवाळीच्या सुट्टीत घरी आले तर मग परत गेलेच नाही. भाऊजी काका शाळा सोडून आल्यामुळे भारती वहिनी नाराज झाल्या. बाबा आणि साधनाताईंप्रमाणेच कुष्ठरोग्याला शिकवून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा भारतीवहिनींचा सुद्धा आग्रह असायचा. पण ‘आनंदवन प्रमाणे आपलेपणाची वागणूक कमी जाणवल्यामुळे आपण शाळा सोडली’ असे भारती वहिनीला कसे सांगायचे या पेचात पडले असतांना भाऊजी काकांना श्री. पुंडलिक बहादूरे [भाऊजी काका यांना मामा म्हणायचे] यांनी मदत केली. भारतीवहिनींना मनवून त्यांनी भाऊजीकाकांना आपल्या विभागात घेतले. तिथे भाऊजीकाकांनी इलेक्ट्रिक फिटींग, पंप बसवणे, प्लम्बिंग, ऑइल इंजिन दुरुस्ती इ. सर्व कामे पुंडलिकमामांकडून शिकून घेतली. आणि पुढील काही वर्ष ही कामे आनंदवनात केली. विकासभाऊ [डॉ. विकास आमटे], काकांना वरोऱ्याहून १५० किलोमीटर नागपूरजवळ अशोकवनात गहू थ्रेशर मशीन घेऊन पाठवायचे. अशोक वनामध्ये शेती असल्यामुळे तिथे भाऊजी काकांची मदत लागायची.
दरम्यान, भाऊजीकाकांची ओळख आशा [रोहिणी]शी झाली. आईला कुष्ठरोग असल्यामुळे त्या सोबत आंनंदवनला आल्या होत्या. आणि २५/५/१९८७ साली इतर ५ जोडप्यांसमवेत सामुहिक पद्धतीने आनंदवनातील मुक्तांगणात लग्न झालं. साधना ताई, बाबा, विकास भाऊ, भारती वाहिनी आणि जवळपास इतर ४००० हज्जार लोकांच्या समवेत हे सामुहिक विवाह पार पडले.

भाऊजीकाकांना लहानपणापासून कसरती करायची सवय होती. त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये लवचिकता होती. छोट्याश्या लोखंडी रिंगणामधून पूर्ण शरीर पार करणे, आगीच्या रिंगणातून कोलांटी उडी मारणे, काचेच्या बाटल्यांवर लाकडी पाटी ठेवून त्यावर तोल सांभाळणे इ. अनेक प्रकार काका करायचे. आनंदवनात भाऊजीकाकांनीं बऱ्याच वेळा नानाविध कार्यक्रमांमध्ये असे केले होते.

हा काळ असेल १९८७ चा, लोक बिरादरी प्रकल्प सुरु होऊन जवळपास १४ वर्षे झाली होती. लोक बिरादरी शाळेमध्ये बाबा पालकमेळावा घ्यायचे. बाबांना भाऊजी काकांचे हे कसरती कौशल्य माहित होतं म्हणून त्यांना ते घेऊन आले. अर्थात काकांना याबद्दल कानोकानी खबर होऊ दिली नाही. मग भाऊजी काकांना काचेच्या बाटल्यांवर तोल सांभाळण्याची कसरत सर्व माडिया आदिवासींसमोर करायला लावली. चार काचेच्या बाटल्यांवर स्टूल ठेवला त्यावर भाऊजी काकांनी तोल सांभाळला. नंतर अलगद एक शिशी काढण्यात आली. तोल सांभाळून नंतर छोट्याश्या लोखंडी रिंगणातुन पूर्ण शरीर काढून दाखविले. सर्व माडिया बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. मग बाबा सर्वांना म्हणाले, "हे बघा तुमच्याचं आदिवासी बांधवाने (भाऊजी काका हे गोंड आदिवासी) किती सहजपणे हे करून दाखवलं. हे अभ्यासाने आलेलं कौशल्य आहे आणि यात कुठलाही जादू-टोणा नाही. "माडिया आदिवासींना जादू-टोणा, अंधश्रद्धेच्या विळाख्यातून काढण्यासाठी तो बाबांचा एक प्रयोग होता.

१९८७ साली भामरागड मध्ये ‘ वीज येणार’ अशी खबर आली. विकासभाऊंनी भाऊजीकाकांना बोलावले आणि विचारले, "भाऊजी, भामरागडला वीज येणार अशी खबर आली आहे, लोक बिरादरी मध्ये इलेक्ट्रिक लाईन फिटींग साठी तू जाशील का? काही महिने तिथे थांबावं लागेल" त्यावर भाऊजी काका म्हणाले, "विकास भाऊ…आपण जे म्हणाल ते करीन". आणि लगेच आशाताई आणि इतर कारागीरांसोबत बिरादरीला आले. अवघ्या २ महिन्यामध्ये बिरादरीतील दवाखाना, आश्रम शाळा, मेस, भाऊंचे घर, गाय बंडा, गोडाऊन इ. ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन फिटींग केली. नंतर काही महिने होऊन गेले तरी पण वीज यायचा पत्ताच नाही. बाबा भाऊजीकाकांना म्हणाले, 'वीज तर नाही येत आहे तर तू चल आता परत आनंदवनला'. पण प्रकाश भाऊ म्हणाले की, "वीज आज नाही पण कधी तरी तर नक्कीच येईल त्यामुळे तू इथेच थांब. बिरादरीला तुझी आता खरी गरज आहे". घनदाट जंगल, काळोख, वीज नाही, कुठलीही करमणुकीची साधने नाही हे लक्षात घेता भाऊजीकाका थोडे भावुक झाले पण कुणाचेही मन न दुखावता ते कायमचे बिरादरीलाच थांबले.

आपणा सर्वांना तर माहीतच आहे, "ही बिरादरी आहे, इथे सर्वांना सर्वच कामे करावी लागतात... चांगल्या कामासाठी इथे “नाही” हा शब्द वापरला जात नाही". सुरुवातीला काही वर्षं दिवसातून फक्त अर्धा-एक तास लाईन यायची. म्हणून इलेक्ट्रिकची कामे कमी असायची. मग भाऊजी काका शेतीची कामे, जंगलातून बांबू गोळा करणे, बांबूची कुंपणे बांधणे, धानाची शेती करणे, शेतामध्ये ऑइल इंजिन बसवणे, जळाऊ लाकूड गोळा करणे, शेताला पाणी देणे इ. सर्व कामे करायचे. नंतर हॅन्डपंप दुरुस्तीचे कामसुद्धा भाऊजीकाका प्रकाशभाऊंकडूनच शिकले.
(जेव्हा वीज पुरवठा सुरळीत झाला तेव्हा) ऑपेरेशन थिएटर मध्ये भाऊ-वहिनी शस्त्रक्रिया करत असतांना विजेचा काही प्रॉब्लेम झाला तर भाऊजीकाकांना दुरुस्तीला यावं लागायचं. भाऊजी काकांना शस्त्रक्रिया चालू असलेल्या पेशंटकडे बघायला खूप भीती वाटायची. तेव्हा पेशंटकडे न बघता घाबरत घाबरत पटापट आपलं काम आटपून भाऊजीकाका चटकन निघून जायचे. असे हे आमचे भाऊजी काका!
प्रकाश भाऊंबद्दल भाऊजी काका आदराने सांगतात की, "पाऊस पडला की भामरागड एक वेगळा देशचं व्हायचा. जगाशी पूर्णपणे संपर्क तुटायचा. मग या देशाचे राष्ट्राध्यक्ष, रक्षामंत्री, आरोग्यमंत्री, न्यायाधीश, गृहमंत्री इ. सर्व आमचे प्रकाश भाऊच असायचे."

भाऊजी काका म्हणतात, "लोक बिरादरी हे एक घर आहे. इथे भाऊ-वहिनींनी आम्हा सर्वांना एकत्र जिव्हाळ्याने बांधून ठेवलं आहे. रागाला या ठिकाणी जागाच नाही. आला तरी तो सहज विसरून जायचं ... परिस्थितीशी जुळवून घ्यायचं …कामावर त्याचा बिल्कुलही परिणाम होता कामा नये, हेच भाऊ-वहिनींकडून आम्ही शिकलो आहे. भाऊ-वहिनींनी त्यांच्या जीवनात खूप हाल-अपेष्टा भोगल्या आहेत. मनामध्ये त्यांच्या बद्दल खूप-खूप आदर आहे. आता पिल्लू दादा [डॉ. दिगंत आमटे], अनिकेत दादा, अनघा ताई, समिक्षा ताई हे सर्वजण इतर सहकाऱ्यांसोबत बिरादरीचे कार्य उत्तमपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या कुठल्याही सहकार्यासाठी मी सदैव हजर आहे.” खरं आहे यालाच म्हणतात समर्पित जीवन.

कंदीलाच्या प्रकाशातून आता बिरदारी प्रकाशमय झाली आहे. बऱ्याच ठिकाणी सोलर पॉवर आणि अत्यावश्यक ठिकाणी जनरेटर बॅकअप सुद्धा आहे. ते नियमित सुरु राहावं याची जबाबदारी आमच्या भाऊजी काकांचींच.४५ डिग्री सेल्सिअस तापमानात उष्माघात झालेल्या रुग्णाची आज कूलरच्या हवेत कोल्ड स्पॉंजिंग होते, नेओनॅटल हायपोथर्मिया झालेल्या नवजात बाळाला आज रेडियन्ट वॉर्मरद्वारे ऊब मिळते, जोखमीच्या मातांची डिलिव्हरी आज व्हॅक्युम कप लावून होते इ. अशा वेळी सुरळीत वीज पुरवठा करण्याची जबाबदारी भाऊजी काकाच घेतात.

आज लोक बिरादरी हॉस्पिटलला, वार्षिक शस्त्रक्रिया शिबिरामध्ये ३०० हुन अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जातात. बाहेरून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येते. अशावेळी अखंडित वीज पुरवठा व्हावा या साठी भाऊजी काका त्यांच्या चमूसहित सदैव तयार असतात.

सद्य स्थितीत बिरादरी मध्ये कुठलाही कार्यक्रम भाऊजी काकांचा हात लागल्याशिवाय पूर्णत्वास येत नाही. दवाखान्यातील डॉक्टरांप्रमाणेच आमच्या भाऊजी काकांची सेवा पण २४ × ७ असते. म्हणूनच “The Electrical Lineman of Biradari” म्हणजेच आमच्या भाऊजी काकांना बिरदरीचा सलाम...!!!

शब्दांकन:
डॉ. लोकेश व डॉ. सोनू

समाजव्यक्तिचित्रणलेख

प्रतिक्रिया

झेन's picture

16 Jul 2019 - 6:34 pm | झेन

समर्पण म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण __/\__

लोकेश तमगीरे's picture

16 Jul 2019 - 8:48 pm | लोकेश तमगीरे

अगदी बरोबर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jul 2019 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एका समर्पित जीवनाची ही ओळखही खूप आवडली ! पुभाप्र.

लोकेश तमगीरे's picture

17 Jul 2019 - 9:40 am | लोकेश तमगीरे

थँक्स डॉ सुहास म्हात्रे ..!

जॉनविक्क's picture

16 Jul 2019 - 9:33 pm | जॉनविक्क

लोकेश तमगीरे's picture

17 Jul 2019 - 9:40 am | लोकेश तमगीरे

धन्यवाद ...!

नाखु's picture

17 Jul 2019 - 10:46 am | नाखु

परिचय लेख

लोकेश तमगीरे's picture

17 Jul 2019 - 12:19 pm | लोकेश तमगीरे

@नाखु : धन्यवाद ..!

अभ्या..'s picture

17 Jul 2019 - 1:34 pm | अभ्या..

आमटे परिवार आणि लोकबिरादारीच्या कार्याचा पूर्ण आदर राखून हे लेख का कोण जाणे एकसुरी वाटायला लागले आहेत आता. एकाही व्यक्तीचे स्वतंत्र असे अस्तित्व नावासाहित डोळ्यासमोर उभेच राहत नाहीये. थोडा ग्याप घेऊन किंवा वेगवेगल्या पद्धतीने परिचय दिल्यास फरक पडेल असे वाटते.
बाकी कार्यास आणि आणि ह्या समर्पित व्यक्तिमत्वांना शुभेव्हचा8 आहेतच.

टर्मीनेटर's picture

17 Jul 2019 - 2:02 pm | टर्मीनेटर

लोकबिरादारीच्या कार्याचा आदर आहे. १८ जून २०१९ ते १६ जुलै २०१९ अशा उण्यापुऱ्या १ महिन्यात पल्लो मामा, मनोहर काका, गोविंद काका, जगन काका आणि भाऊजी काका अशी पाच व्यक्तिचित्रे वाचणे एकसुरी वाटते हे खरे आहे. ह्या व्यक्तींचा वावर, त्यांचे कार्यक्षेत्र एका ठराविक कक्षेत बंदिस्त असल्याने तसे वाटणे स्वाभाविक आहे.
तुम्ही खूप छान प्रकारे त्यांची ओळख करून देताय, ह्या सर्व लेखांचे संकलन करून एक संग्राह्य पुस्तक प्रकाशित होऊ शकेल. पुढील व्यक्तीचित्रणे प्रकाशित करताना दोन लेखांमधील अंतर किमान १० दिवसांचे ठेवावे अशी नम्र विनंती.

लोकेश तमगीरे's picture

17 Jul 2019 - 5:05 pm | लोकेश तमगीरे

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ...!

आता बिरादरी खूप स्थिरावली असेल, पण जेव्हा ती आकाराला येऊ लागली होती, तेव्हा ह्या सर्व शिलेदारांनी किती कष्ट घेतले असतील, शून्यातून बिरादरीचे विश्व कसे उभे केले असेल, किती अडचणींचा सामना केला असेल, ह्याचा विचार केला तरी थक्क व्हायला होते.

आणि इथे हे वाचले नसते तर ह्या नावांचा, नावामागील लोकांचं अस्तित्व माहिती पडणे सुद्धा शक्य नव्हते. आमटे आणि बिरादरी हे नाव प्रसिद्ध आहे पण ती प्रसिद्धी ह्या अशा निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर उभी आहे.

जिद्दी माणसे. खूप छान वाटते आहे हे लेख वाचताना. लिहीत रहा.

लोकेश तमगीरे's picture

23 Jul 2019 - 10:42 am | लोकेश तमगीरे

@यशोधरा :
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद ...!
लेखन करतांना या जुन्या कार्यकर्त्यांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहे.

लोकेश तमगीरे's picture

25 Jul 2019 - 9:40 am | लोकेश तमगीरे

भाऊजी काका

लोकेश तमगीरे's picture

25 Jul 2019 - 9:42 am | लोकेश तमगीरे

 भाऊजी काका

लोकेश तमगीरे's picture

25 Jul 2019 - 9:44 am | लोकेश तमगीरे

भाऊजी काका