नॉस्टॅल्जिया - पहिल्या अमेरिका वारीचा!

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
22 May 2019 - 4:13 pm

एका ग्रुपवर काही चर्चेनिमित्ताने अमेरिकेची पहिली वारी आठवली. प्रचंड अप्रूप होत आणि कदाचित तेच एकमेव कारण होत की इतर चांगल्या संधी न शोधता किंवा आलेल्या संधी लाथाडून एका IT कंपनीची ऑफर स्वीकारली होती; वेडेपणा!
असो, जर-तर ला काही अर्थ नाही.

पण त्या पहिल्या ट्रीप च्या आठवणी जाग्या झाल्या आणि आता मागे वळून बघताना अक्षरशः अद्भुत वाटतंय ते. सांगतो का ते :)

मला वाटतंय त्यावेळी क्लायंट ODC मध्ये लोकांना टिकवून ठेवण्यासाठी गाजर म्हणून ह्या वाऱ्या सुरु झाल्या होत्या. ३ महिन्यांसाठी एका वेळी ४ लोक जायचे. माझ्यासोबत सुदैवाने बहुतांश चांगले लोक होते.
ह्यातल्या गमतीजमती मी quora वर पण लिहिल्या होत्या.
तर वैशिष्ट्य म्हणजे इकडे एक सिस्टिम तयार झाली होती. म्हणजे आधी जे लोक जायचे त्यांनी जो ट्रेंड सेट केलाय तसेच सगळे जण करायचे.
म्हणजे शिरस्त्याप्रमाणे तिकडे गेल्यावर न्यूयॉर्क जवळच असल्याने पहिल्याच वीकेंडला न्यूयॉर्कला जाऊन येणे. त्यासाठी त्या बसचे १० फेऱ्यांचे पास घेणे. बहुधा ते एका माणसाने १० वेळा वापरण्यासाठी असायचे त्यामुळे स्वस्त पडायचे, पण आम्ही एकाच ट्रिप मध्ये संपवायचो(तेवढे लोक असायचे ना). तिकडे टाईम्स-स्क्वेअर मध्ये 'Swatch' शोरूम मधून घड्याळ घेणे आणि Dell चा लॅपटॉप ऑनलाईन मागवणे हे तर मला वाटत मी सोडून सगळ्या लोकांनी केले असेल.

त्या बसची अजून एक मजा म्हणजे, 'Atlantic city' ला जायला २०$ च्या आसपास काही तिकीट होत ते तिकडच्या कॅसिनो मध्ये बहुधा सगळंच encash करून मिळायचं, जेणेकरून त्या पैशानी तुम्ही कॅसिनो मध्ये खेळाल. आम्ही 'Per diem' वर गेलेली जनता. आधी ते २०$ खिशात टाकायचे आणि मग लै लै तर १-२$ त्या स्लॉट मशीन मध्ये उडवायचे!
अरे हां, $ वरून आठवलं. ते सगळ्यात आधी बँक अकाऊंट उघडायचं. घाई दोन कारणांसाठी. पहिले म्हणजे त्या Axis बँकेच्या प्रीपेड कार्ड वरून नियमित $ काढायचे आणि बँकेत ठेवून द्यायचे आणि दुसरं बहुधा आधीच्या अकाउंट धारकाला ५-१०$ refereal बोनस मिळायचा ना!

त्यावेळी 'radio cab' होत्या. मोबाईल शक्यतो कुणाचा नव्हता. एकाने थोड्या वेळासाठी काहीतरी प्रीपेड कार्ड घेतलं होत. पण शक्यतो हॉटेलच्या फोनवरून फुकट मागवता यायची कॅब. मग त्या ड्रायव्हर लोकांचे वेगवेगळे अनुभव. 'Weather' हा कसा जिव्हाळ्याचा विषय आहे हे सरावाने शिकलो होतो. तिकडे एकदा पावसात घोटाभर पाण्याला 'flooding' म्हणाल्यावर आम्ही २००५ च्या मुंबई पावसाचे किस्से सांगून हैराण केलं होत त्यांना.

आता सकाळी गडबड आणि शक्यतो एकत्र जायचो त्यामुळे कॅब परवडायची. पण संध्याकाळी बऱ्याच वेळा Lincroft च्या ऑफिस पासून हॉटेल पर्यंत मस्त चालत यायचो. सुदैवाने गेलो त्यावेळी थंडी नव्हती. येताना 'Acme' च्या स्टोअर मधून दूध/ब्रेड/केळी आणि आम्हाला नवीन असणारा पण काही जणांना लागणारा प्रकार म्हणजे 'chicken salami' आणायचो. ग्रोसरी च्या बिलाचे किस्से खतरनाक होते.

त्याआधी थोडी पार्श्वभूमी देतो. आम्ही शॉर्ट टर्म साठी गेल्यामुळे 'Per diem' वर गेलो होतो. त्यामुळे हॉटेल मध्येच राहायला लागायचे. बिल नाही दिले तर दिवसाचे ९०$ सरसकट मिळायचे किंवा ११०$ पर्यंत बिल देऊ शकायचो आणि वरतून ४०$ विना-बिल मिळायचे.
आता आम्ही हुशार लोक आणि बहुतांश बॅचलर! जवळपास सगळ्या रूम मध्ये ट्वीन-बेड असायचाच. मग हॉस्टेल पासून रूम शेअर करून राहत असताना तिकडे जाऊन स्वतंत्र खोलीचं अप्रूप कोणाला आहे. मग मस्त लीगल झोल! रूम एकाच्या नावाने घ्यायची आणि त्याने ११०+४० असे १५०$ reimburse करायचे. आणि दुसऱ्याने सरसकट ९०$ घ्यायचे. दोघात मिळून २४०$ झाले त्यातले ८०-९०$ रूम चे आणि बाकी थोडा फार खर्च. त्यामुळे सेविंग होऊ शकायच.
टॅक्सी, जेवण(बाहेर नाहीच, हॉटेल मध्येच बनवलेलं किंवा गरम केलेलं) इत्यादी गोष्टी सगळ्या कॉमन व्हायच्या त्यामुळे आठवड्याला खर्च सेटल करायचो.
आता त्यात एक महामाया आमच्या सोबत होती. जाणकारांनी ओळखलं असेलच!
एकटा मित्र सगळा हिशोब ठेवायचा आणि आम्ही काही चर्चा न करता सेटल करायचो कारण तो तसा पद्धतशीर ठेवायचा आणि त्यात किती कीस पाडणार. तर ह्या बयेने एकदा सांगितलं की त्या 'केळ्यांच्या' पैशांमधून तिला वगळा, कारण ती केळी खात नाही!!!!
डोकंच सटकलं होत. हीच बया होती जी chicken salami आणायची आणि आम्ही खाण्याच्या बिलाला सरळ ४ ने भागायचो. त्यामध्ये 'कोणी काय खाल्लं' याचा हिशोब कोण ठेवणार? आम्ही म्हटलं 'बाई, तूच हिशोब कर!'. मी तर रागाने म्हटलं, तू एक $ देऊ नको, दररोज फुकट येत जा जेवायला. कारण तिची रूम वेगळी होती(हो, सांगितलेलं बर) आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळी बरोबर टपकायची. काही दिवसांनी आम्ही तिला भांडीवाली बनवली होती हा भाग निराळा ;-)

सकाळी गडबडीमुळे ते 'स्वाद' चे फ्रोजन पराठे/ठेपले घेऊन जायचो आणि गरम करून खायचो. कधी कधी लंचला तिकडे एक डाळी/कडधान्ये असलेलं घट्ट सूप असायचं कॅन्टीन मध्ये, त्याच्यासोबत फुकट असणारी खारी बिस्किटे कुस्करून टाकून खायचो!
कधी तरी चालत येताना 'Dunkin' ची एक्सट्रा मिल्क/शुगर कॉफी आणि वाटलं तर डोनट.
संध्याकाळच्या जेवणाला नेहमीचा प्रकार म्हणजे खिचडी! म्हणजे दिसेल ते सगळं टाकून केलेला भात म्हणा! भाजी करायचा मूड असेल तर फ्रोजन चपात्या जरा बऱ्या असायच्या त्या अमूल बटर लावून तव्यावर गरम करायचो.
या भानगडीत धुरामुळे २-३ वेळा खोलीतला आगीचा अलार्म सर्रास वाजायचा. खाली फोन केला की ते बंद करायचे. पण खूपच जास्त झाला किंवा खोलीबाहेर धूर गेला की शिस्तीत बाहेर जायचं आणि काही मिनिटात अग्निशामक, पोलीस, रुग्णवाहिका सगळ्या गाड्या हजर. त्यांनी पूर्ण खातरजमा केल्याशिवाय अलार्म बंद नाही व्हायचा आणि आत पण जाता यायचं नाही.

त्यावेळचं सगळ्या बाबतीत विश्व खूप मर्यादित होत, एकदा आमच्यातली बया म्हणाली "आज शामको मै पास्ता बनाऊंगी!" मी लगेच विचारलं, मग जेवणाचं काय! म्हणजे पास्ता खाऊन जेवण होऊ शकत हे पचनी पडणारच नव्हतं. आम्ही दोघे पट्टीचे खाणारे बाकीच्यांना सांगायचो, तो मोट्ठ्या कुकर मधला भात तुम्हाला हवा तेवढा खा, कितीही राहूदे, आम्ही संपवूच! त्याच्या निम्मी पण भूक नाही राहिली आता!
किचन(केवढुसं ते, कट्टाच म्हणा फक्त) एवढं खराब करायचो, त्यांनी एकदा आठवड्याचं क्लिनिंग करायला पण नकार दिला!

आता आश्चर्य वाटतंय की त्यावेळी चारचाकी रेंट वर वगैरे न घेता ३ महिन्यात आम्ही केवढं फिरलं होतो. आम्ही राहायचो तिकडे भारतीय खाण्याचे पदार्थ मिळायचे नाहीत. मग तिकडे लोकल ट्रेन स्टेशनला टॅक्सी, तिकडून मधल्या एका स्टेशनला उतरून आधीची क्रॉसिंग गाडी ५च मिनिटे आधी गेलेली असल्यामुळे ५५ मिनिटे थांबून पुढच्या गाडीने एडिसन/ओक ट्री रोडला जायचो खरेदीसाठी. त्या मधल्या सुनसान स्टेशनात आम्ही (तिथल्या मानाने) किरकोळ थंडीत कानटोपी घालून बसलेलो असायचो तर तिथले काही स्थानिक लोक आस्थेने विचारायचे 'इंडियन का?'
येताना डाळ तांदुळासकट जाड पिशव्या घेऊन परत उलटा हाच क्रम; कारण थेट टॅक्सी परवडायची नाही(एवढ्या अंतरासाठी मिळत होती की नाही हे पण नाही माहीत).

वर म्हटल्याप्रमाणे न्यूयॉर्क, अटलांटिक सिटी व्हायचंच जवळपास. पण आम्ही त्या चायनीज बस च्या वीकेण्ड टूर ने अगदी फिलाडेल्फिया, वॉशिंग्टन, बाल्टिमोर. नायगारा सगळ्याला पाय लावून आलो होतो. वॉटर राफ्टिंग, सिक्स फ्लॅग्स पण केलं. एका बीचला बरीच मारामार करून गेलो होतो. संध्याकाळ झाल्यावर पार्कमध्ये आत अडकून पडलो; २-३ किमी आत प्रायव्हेट रोड आणि कोणी कॅब यायला तयार नाही. चालत गेट पर्यंत आलो मग.

खूप चिंधीगिरी केली, पण त्यामुळे खूप गोष्टी मिस झाल्या होत्या. म्हणजे पैशाचा विचार एवढा करायचो(कारण जाण्याचं मुख्य कारण 'जमेल तेवढे छापणे' हेच होत) त्यामुळे तिकडच्या 'टेबलवर बसून ऑर्डर करण्याच्या' रेस्टोरंट मध्ये गेल्याच आठवतच नाही आहे. McD किंवा तत्सम फास्टफूड आणि कॉफी एवढीच मजल. (त्याची कसर नंतर काही वर्षांनी अशाच २ बिझनेस ट्रिप मध्ये भरून काढली म्हणा!)
आमच्यातला एकटा शाकाहारी होता तर त्याने नायगाराच्या ट्रीपला २-३ वेळेला पोहे करून नेले होते तेच खाल्ले आणि नंतर केळी!

आमचा त्यावेळचा मॅनेजर म्हणायचा की तसल्या एका ट्रिप मध्ये लोकांच्या व्यक्तिमत्वात पण बराच फरक पडतोय, आत्मविश्वास वाढायचा. आता कळतंय की आम्ही अगदी ज्युनियर असताना तिकडच्या सिनिअर लोकांसोबत काम करायचो आणि त्यांनी आम्हाला कधीच जाणवू नाही दिल.
त्याचा अजून एक किस्सा आठवला. तिकडे एक सिनियर मॅनेजर होता, खूप मानायचा तो आमच्या टीमला. आमचा तिकडचा 'legal guardian' च म्हणा ना! एकदा एकाला pollen ची ऍलर्जी झाली तर डॉक्टरकडे घेऊन गेले तत्परतेने, कारण आम्हाला तर कळलंच नव्हतं काय झालं ते. एकदा बेसबॉल मॅच बघायला अख्खी टीम गेली होती, आम्ही अंदाज नसल्याने गरम कपडे नेले नव्हते. तिकडचं ऍडमिन बघणारी एक बाई होती तिने आपल्या मुलांचे स्वेटशर्ट वगैरे आणले होते आमच्यासाठी! तिला आम्ही हॉटेल मध्ये बोलावून पावभाजी खाऊ घातली. ती म्हणे, "I love spicy food, but this is spicy!"

हां, तर त्या मॅनेजर ने आमच्या पहिल्या दिवशी आमच्यातल्या मुलीला सहज अभिवादन म्हणून गालावर किस केलं होत. तो तिला मुलीसारखंच वागवत होता. आम्हाला काही वावगं वाटलं नव्हतं(तरी बर, तीच ती 'पास्ता'/'सलामी' वाली होती त्यामुळे मॉडर्न होती). काही दिवसांनी शिल्पा शेट्टीला जाहीर कार्यक्रमात किस करण्यावरून गदारोळ माजला होता तेव्हा त्याने आम्हा दोघं मुलांना बोलावून घेतलं आणि घाबरत म्हणाला की अरे, तुमच्याकडे तस चालत नाही बहुधा त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना झाला माझ्या वागण्याचा.

जाता जाता अजून एक किस्सा! दुसऱ्या एका ट्रीपमध्ये शेवटच्या दिवशी आम्ही एयरपोर्टसाठी टॅक्सीत बसत होतो तर एक मुलगी तिथे मागे थांबणाऱ्या एका माणसाच्या(हो, मुलगा नाही, बराच मोठ्ठा होता आमच्यापेक्षा) एवढं गळ्यात पडून रडत होती की ड्रायव्हर आम्हाला म्हणे की हे दोघे नवरा-बायको आहेत का! आणि कहर म्हणजे दोघांचंही लग्न ठरलेलं होत(वेगवेगळ्या लोकांशी)

अशा बऱ्याच गोष्टी होत्या, थांबतो!
एकंदरीत नंतरच्या luxurious ट्रिप पेक्षा त्या पहिल्या ट्रीपचीच आठवण जास्त जवळची आहे. त्यावेळी अजून एक झालं, बरीच माणसं कळली आणि काही खूप जवळचे मित्र झाले.
पहिल्या गोष्टीचं अप्रूप जास्त असत त्यामुळे एवढं वाटत असेल. बऱ्याच जणांना साधारण असा अनुभव असेलच, नवीन काही नाही. पण जरा नॉस्टॅल्जिक झालो एवढच! :)

देशांतरप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

22 May 2019 - 4:31 pm | कुमार१

छान अनुभव !
पु ले शु

उगा काहितरीच's picture

22 May 2019 - 4:31 pm | उगा काहितरीच

"लई भारी" लिहीलंय की!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2019 - 5:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं अनुभव !

टवाळ कार्टा's picture

22 May 2019 - 5:56 pm | टवाळ कार्टा

भारी
पहिल्या जॉबमध्ये ह1ब नाकारलेला कमी पैसे देत होते म्हणून आणि नंतर ऑनसायटीची चेरी पॉप व्हायला लै वेळ लागलेला मला...लय नॉटी किस्से जमलेत त्यानंतर ;)

दुर्गविहारी's picture

22 May 2019 - 7:07 pm | दुर्गविहारी

आय.डी. प्रमाणेच लिहीले आहे. अजून काही किस्से असतील तर येउ देत. वाचायला मजा आली. :-)

आनन्दा's picture

22 May 2019 - 7:56 pm | आनन्दा

छान लिहिलय.

आयला यावरून आठवलं

मी कंपनीमध्ये नवीन असताना आमचा एक ग्रुप झाला होता, २ मुलगे, १/२ मुली वगैरे. त्यातलया मुलीला मी चक्क "अय्या, तू लिपस्टिक लावतेस? शी" असे विचारुन भोवळ आणली होती.

आता परत कोणत्या मुलीला असे विचारयची हिंमत होणार नाहे हे पण खरे. गेले ते दिवस.

अत्यंत प्रामाणिक लेखन आणि एवढं लिहून देखिलही मी किती हुशार हा अविर्भाव नाही.

टर्मीनेटर's picture

22 May 2019 - 8:03 pm | टर्मीनेटर

मस्त!
मजेशीर किस्से आवडले वाचायला.

सोन्या बागलाणकर's picture

23 May 2019 - 7:19 am | सोन्या बागलाणकर

काय राव आम्हाला पण नॉस्टॅल्जिक केलं ना!

मी पण २००७-२००८ मध्ये ओक ट्री रोड वर एका गुजराती कुटुंबात भाडेतत्वावर राहत होतो. गुजराती मावशी खूपच मायाळू होत्या. ५००$ मध्ये राहणे, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर द्यायच्या. उत्कृष्ट गुजराती पद्धतीचं जेवण मिळायचे त्यामुळे बाहेर जेवायची किंवा बनवायची गरजच पडली नाही.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच कार नसूनही भरपूर भटकलो. पहिलाच विकांत नायगाराला जाऊन साजरा केला. त्यासाठी खास सोनीचा कॅमेराही खरेदी केला होता. त्यानंतर सिक्स फ्लॅग्स, वॉशिंग्टन डी सी, फिलाडेल्फिया, कॉर्निंग ग्लास म्युसिअम, व्हर्जिनियाच्या शॅनॉनडोह गुंफा, टाइम्स स्क्वेअर, एम्पायर स्टेट बिल्डिंग, ऑर्लॅंडोचे थिम पार्क्स, अटलांटिक सिटीच्या स्लॉट मशीन्स मध्ये केलेली पैसे वाचवण्याची चिंधीगिरी सगळं आठवलं. यू एसच्या पहिल्या दोन्ही भेटी तुमच्यासारख्याच माझ्याही अतिशय जिवलग आहेत. अगदी हावऱ्यासारखं हे बघू का ते असं व्हायचं. मला आठवतंय गुरुवारपासूनच वीकांताचं प्लांनिंग सुरु व्हायचं.

खूप सारे अनुभव आहेत - एका मित्राला ऍलर्जीमुळे झालेला त्रास, त्यावर आमचे भन्नाट उपाय (कोरफडीचा काढा), मेट्रो पार्कच्या अपार्टमेंटमधील ढेकूण, दीप आणि स्वादचे पराठे - एक ना दोन

अजून येऊ द्या!

लई भारी's picture

26 May 2019 - 9:58 am | लई भारी

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद! _/\_

Quora ची लिंक मिस झाली असल्यास परत देतोय. ते काही किस्से विंग्रजीतच वाचायला मजा येईल बहुधा आणि तेच परत नको म्हणून इथे लिहीत नाही.
https://qr.ae/TWNVoc

वरुण मोहिते's picture

26 May 2019 - 11:02 am | वरुण मोहिते

अजून येउद्यात

मुक्त विहारि's picture

6 Apr 2021 - 11:42 am | मुक्त विहारि

परदेशी काही कालावधीसाठीच जायचे असेल तर, प्रत्येक जण "चिंधीगिरी" करतोच ...