नमस्कार मिपाकरांनो,
सध्या आपल्या देशात सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान सुरु आहे. २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधे ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या कालावधीत सातही फेऱ्यांचे मतदान झाले की, २३ मे २०१९ रोजी निकाल जाहीर होऊन ह्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सांगता होणार आहे.
७ राष्ट्रीय पक्ष आणि २२००+ नोंदणी कृत प्रादेशिक पक्षांचे, तसेच अपक्ष असे सगळे मिळून १२२२८ उमेदवार, सुमारे ९० कोटी मतदारांना सामोरे जात आहेत.
भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून,आजही २६% जनता निरक्षर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या निरक्षर मतदारांना मतदान यंत्रावरील अनेक उमेदवारांच्या नावांमधून आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून कुठलीही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडणे हि अतिशय कठीण गोष्ट आहे, परंतु ती सोपी झाली निवडणूक चिन्हांमुळे!
इंग्रज भारत सोडून गेले त्यावेळी भारतातील केवळ १६ % जनता साक्षर होती. अशा परिस्थितीत लिहिता-वाचता न येणाऱ्या नागरिकांना देखील आत्मविश्वासाने आपले मतदानाचे कर्तव्य बजावता यावे ह्यासाठी भारतीय निवडणूक अयोगाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५१-१९५२ साली (२५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२) झालेल्या देशातली पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीपासून निवडणूक चिन्हांचा वापर करण्यास सुरुवात केली.
ओळखण्यास आणि लक्षात ठेवण्यास सोप्या अशा वस्तूंच्या चित्रांचा मतपत्रिकेवर निवडणूक चिन्ह म्हणून वापर करण्याचा निर्णय झाल्यावर त्या चिन्हांचे रेखाटन करण्यासाठी एम.एस.सेठी यांची ड्राफ्ट्समन पदी नियुक्ती करण्यात आली.
सहकारी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकांमध्ये चिन्हाचा विषय निश्चित झाल्यावर एम.एस.सेठी त्याबरहुकूम रेखाटन करीत असत.आज आपल्या परीचयाच्या असलेल्या सायकल, झाडू, चहाची किटली, पतंग, नारळ, शिट्टी, हत्ती अशा शंभराहून अधिक निवडणूक चिन्हांचे रेखाटन त्यांनी साध्या एच.बी.पेन्सिल्स वापरून प्रभावीपणे केलेले आहे.
१९९२ साली निवृत्त झालेल्या एम.एस.सेठी यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या सेवाकाळात रेखाटलेल्या निवडक १०० निवडणूक चिन्हांचा समावेश असलेली यादी एकोणीसशे नव्वद च्या दशकाच्या उत्तरार्धात निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली, जी आज मुक्त चिन्हांची यादी (List Of Free Symbols) म्हणून ओळखली जात असून देशातील कुठल्याही निवडणुकी दरम्यान ती प्रसारित केली जाते.
१९९६ साली तामिळनाडू विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत १०३३ उमेदवार रिंगणात होते, त्यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने सेठींच्या यादीतील चिन्हांमध्ये बदल करण्याची परवानगी उमेदवारांना दिली होती, मात्र त्यानंतर पुन्हा चिन्हांची संख्या १०० अशी मर्यादित करण्यात आली.
एम.एस.सेठी यांच्या निवृत्ती नंतर निवडणूक आयोगाने ‘ड्राफ्ट्समन’ हा हुद्दा रद्द केल्याने त्यांच्या जागी इतर कोणाचीही त्या पदावर नियुक्ती करण्यात आली नाही. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आज पर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये महत्वाची कामगिरी बजावणारा हा कलावंत मात्र दोन हजारच्या दशकाच्या सुरवातीला मृत्यू पावल्यानंतरही उपेक्षितच राहिला.
त्यांच्या काही वयोवृध्द मित्रांच्या आठवणीत त्यांचे व्यक्तिमत्व एक मृदुभाषी चित्रकार असे होते तर त्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या माहितीप्रमाणे ते सरकारी नोकरीत होते, परंतु आपल्या कार्याची ते कधीच वाच्यता करीत नसल्याने त्यांच्या कामाच्या स्वरूपाबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. २००३ साली त्यांच्या कुटुंबाला त्यांचे राहते घर विकण्यासाठी मदत करणाऱ्या इस्टेट एजंटच्या आठवणीनुसार त्यांना एकुलती एक मुलगी होती, आणि ते एक चित्रकार असून घराच्या एका कोपऱ्यात त्यांना काम करताना तो नेहमी बघत असे पण निवडणूक चिन्हांचे रेखाटन त्यांनी केले आहे हे त्याला माहीतच नव्हते.
दुर्दैवाने एम.एस.सेठी ह्यांना ओळखणाऱ्या कोणालाही त्यांच्या कुटुंबियांची नावे आणि चेहरे आठवत नाहीत. स्थानिक पोलीस स्टेशन, इस्टेट एजंट कडील नोंदी / कागदपत्रे तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे विद्यमान कर्मचारी अशा कोणाकडेही त्यांचे छायाचित्र उपलब्ध नाहीये. निवडणूक आयोगाच्या दफ्तरात केवळ त्यांनी निवृत्ती वेतना संबंधित कागदावर लिहिलेला चार ओळींचा त्यांच्या मृत्यु पश्चात कुटुंबीयांनी २००३ साली विकलेल्या सेक्टर ३, रोहिणी येथील जुन्या घराचा पत्ता एवढाच त्यांचा मागमूस शिल्लक राहिला आहे.
पुढील काळात मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये वेळोवेळी नवीन चिन्हांची भर पडत गेली, त्यामध्ये विविध वस्तू आणि खेळांशी संबंधित चिन्हांचा समावेश आहे उदा. बिस्कीट, प्रेशर कुकर, पर्स, बुद्धीबळाचा पट, फुटबॉल खेळाडू, फलंदाज इत्यादी इत्यादी.
तसेच मोर, वाघ, सिंह, उंट यासारख्या प्राण्यांची चिन्हे, जी आधी मुक्त चिन्हांच्या यादीमध्ये समाविष्ट होती ती, राजकीय पक्ष व उमेदवारांकडून प्रचार फेऱ्यांमध्ये / मिरवणुकीमध्ये ह्या प्राण्यांचा गैरवापर होत असल्याची तक्रार प्राणीमित्र व पर्यावरणवाद्यांनी केल्यामुळे पुढील काळात यादीतून वगळण्यात आली. ह्याला अपवाद म्हणजे बहुजन समाज पार्टीचे चिन्ह ‘हत्ती', महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (गोवा) आणि हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (मेघालय) या पक्षांचे चिन्ह ‘सिंह’ आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (पश्चिम बंगाल) पक्षाचे चिन्ह ‘वाघ’.
निवडणूक आयोगाने २३ जुलै २०१८ रोजी प्रसिध्द केलेल्या १६१ मुक्त चिन्हांचा समावेश असलेल्या यादीमध्ये ९ मार्च २०१९ च्या अधिसूचनेद्वारे त्यात आणखीन नवीन चिन्हांचा समावेश करत चिन्हांची संख्या १९९ केली आहे. गमतीची गोष्ट अशी आहे कि पहिल्या यादीतील शेवटचा अनुक्रमांक 161आहे, पण त्यात नवीन चिन्हांची भर घालणाऱ्या नवीन यादीतील पहिला अनुक्रमांक 163 आहे. ‘१६२’ अनुक्रमांकाचे चिन्ह कोणते आहे ते कळायला मार्ग नाही.
नवीन यादीमध्ये अनेक आधुनिक उपकरणांचा समावेश केला आहे उदा. संगणक, माउस, पेन ड्राइव्ह, टि.व्ही.चा रिमोट, रोबोट,लॅपटॉप, सी.सी.टि.व्ही. कॅमेरा इत्यादी इत्यादी.
टि.व्ही वरील जाहिराती, छापील पत्रके, टोप्या, झेंडे, रिक्षावर भोंगा लाऊन दिलेल्या “ताई माई अक्का...विचार करा पक्का...xxx वर मारा शिक्का” किंवा “अबक पक्षाचे अधिकृत उमेदवार फलाणा फलाणा यांची निशाणी आहे xxx...xxx...xxx" तसेच “xxx समोरील बटन दाबून *** ह्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा" अशा घोषणांद्वारे मतदाराच्या मनावर संबंधित पक्षाचे / उमेदवाराचे निवडणूक चिन्ह बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो.
कॉंग्रेसचा ‘हाताचा पंजा’, भाजपचे ‘कमळ’, शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’, राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हि निवणूक चिन्हे प्रचारा मार्फत अशीच आपल्या मनावर बिंबवली गेली आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पक्ष, उमेदवार आणि मतदार या सर्वांसाठीच महत्वाच्या ठरलेल्या निवडणूक चिन्हांवरून गंमतीशीर प्रसंग, वाद-विवाद आणि पक्षांचे चिन्ह बदलण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
- २०१३ सालच्या मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत काही कॉंग्रेस समर्थकांनी “तलावांमधील कमळांमुळे, कमळ चिन्ह असलेल्या भारतीय जनता पक्षाचा प्रचार होत आहे, त्यामुळे मतदार प्रभावित होऊ शकतात,” असा दावा करून कमळ असलेले तलाव झाकण्याची अजब मागणी केली होती. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात भाजप समर्थकांनी “कॉंग्रेसची निशाणी हाताचा पंजा असल्याने, मतदारांना तुमच्या उघड्या हाताचे पंजे दिसू नयेत त्यासाठी तुमचे हात झाकून ठेवण्याची तयारी आहे का? ” असा प्रतिप्रश्न केला होता.
- निवडणूक प्रक्रियेत निवडणूक चिन्ह किती निर्णायक भूमिका बजावते, ह्याची जाणीव राजकारण्यांना झाल्याशिवाय राहिली नाही. जुलै १९५१ मध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह ठरविण्यासाठी राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र, त्या बैठकीत वादावादीच अधिक झाल्या. बैठकीत काँग्रेस, सोशालिस्ट, कम्युनिस्ट आणि शेकाप हे पक्ष नांगर या चिन्हावर कसा दावा करीत होते, याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या २ जुलै १९५१ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते.
चिडलेल्या समाजवादी पक्षाने “आतापर्यंत काँग्रेसने चरखा या चिन्हावर प्रतिनिधित्व केले, मात्र आज ‘नांगर’ चिन्हवर कसा काय दावा करतात” असा सवाल केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने स्वत:च निवडणूक चिन्हांचे वाटप करणे पसंत केले आणि नंतर तो त्यांच्या कार्याचाच भाग बनला.
‘नांगर’ चिन्हावरून सुरू असलेला वाद टाळण्यासाठी ते चिन्ह कोणालाच देण्यात आले नाही. काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित असलेली ‘बैल जोडी’ आणि समाजवादी पक्षाला ‘झाड’ हे चिन्ह देण्यात आले. इतर पक्षही आपल्याला मिळालेल्या चिन्हांवर समाधानी होते. हिंदू महासभेला त्यांना साजेसा ‘आक्रमक घोडा आणि स्वार’, शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला ‘हत्ती’ हे चिन्ह मिळाले. आता ते मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे चिन्ह आहे. - कॉंग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष. कॉंग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत बैलजोडी हे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह स्वीकारले होते. त्यानंतर कॉंग्रेसने हे चिन्ह बदलून इंदिरा गांधींच्या कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय-वासरू हे चिन्ह घेतले. त्यानंतर 1980 मध्ये कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यावर गाय-वासरू हे निवडणूक चिन्ह गोठविल्याने इंदिरा कॉंग्रेसने ‘हाताचा पंजा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.
- सध्या काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा असले, तरी ते सुरुवातीला कामगार नेते आर. एस. रुईकर यांच्या नेतृत्वाकालील फॉरवर्ड ब्लॉकचे चिन्ह होते. मात्र, यातील तपशिलवार फरक म्हणजे कॉंग्रेसच्या निवडणूक चिन्हातील हाताच्या पंजाची बोटे एकमेकास चिकटलेली असून फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हातल्या हाताच्या पंजातील बोटांमध्ये अंतर होते.
- इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर 1977 मध्ये सत्तेत आलेल्या जनता पार्टीचे चिन्ह ‘नांगरधारी शेतकरी’ होते. जनता पार्टीत विलीन झालेल्या भारतीय जनसंघाचे ‘पणती’ हे चिन्ह गोठविण्यात आले. पुढे जनता पार्टीत फूट पडल्यावर स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने ‘कमळ’ चिन्हाचा स्वीकार केल्यानंतर ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह गोठविण्यात आले.
- सातत्याने होणाऱ्या फाटाफुटीमुळे जुने निवडणुक चिन्ह गोठविले जाऊन नवे चिन्ह स्वीकारण्यापासून देशातील डावे व साम्यवादी पक्षपण दूर राहिले नाहीत. भारतातील साम्यवाद्यांमध्ये 1964 मध्ये फूट पडल्यानंतर भारतीय साम्यवादी पक्षाने ‘विळा आणि कणीस’ हे परंपरागत, तर मार्क्स वादी साम्यवादी पक्षाने ‘विळा-हातोडा व एक तारा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले.
- समाजवादी पार्टी, तेलगु देसम पार्टी आणि जम्मू अँड कश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी ह्या तीनही प्रादेशिक पक्षांचे निवडणुक चिन्ह ‘सायकल’ आहे. मणिपूर मधील मणिपूर पीपल्स पार्टी आणि केरळ मधील केरळ कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील ‘सायकल’ होते. परंतु आता दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या सक्रीय नाहीत.
- महाराष्ट्रातील शिवसेना आणि झारखंड मधील झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ आहे.
- बहुजन समाज पार्टी आणि आसाम मधील असोम गाना परिषद या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘हत्ती’ आहे.
- केरळ मधील केरळ कॉंग्रेस एम (प्रादेशिक पक्ष) आणि तमिळनाडूतील ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझागम (एआयएडीएमके) या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘झाडाची दोन पाने’ आहेत.
गेल्या ६८ वर्षांच्या निवडणुकांच्या इतिहासात, छापील मतपत्रीकेपासून सुरु होऊन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रापर्यंतच्या आपल्या प्रवासात, निवडणूक चिन्हांना अढळ स्थान प्राप्त झालेले आहे. त्यांच्या स्वरुपात, संख्येत काळानुरूप बदल होत गेले आणि भविष्यातही होत राहतील परंतु त्यांचे महत्व अबाधित राहील.
प्रतिक्रिया
7 May 2019 - 8:41 pm | प्रसाद_१९८२
अतिशय माहितीपूर्ण लेख.
या विषयावर अजून वाचायला आवडेल.
--
लेखात दिलेल्या दोन्ही लिंक चालत नाहीत.
7 May 2019 - 8:55 pm | टर्मीनेटर
धन्यवाद प्रसादजी. डाउनलोड लिंक्स आहेत त्या... खालच्या ट्राय करून बघा.
पहिली यादी
दुसरी यादी
7 May 2019 - 9:00 pm | यशोधरा
रोचक आणि माहितीपूर्ण.
दिलेले दुवे नंतर पाहते.
7 May 2019 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूप माहितीपूर्ण आणि रोचक लेख. या इतिहासाबद्दलची माहिती प्रथमच वाचली !
7 May 2019 - 9:46 pm | शाम भागवत
मस्त लिहले आहे.
7 May 2019 - 11:15 pm | तुषार काळभोर
छान माहितीपूर्ण समयोचित संग्रहणीय लेख
8 May 2019 - 3:40 am | सोन्या बागलाणकर
अभ्यासपूर्ण लेख!
निवडणूक चिन्हांचा इतिहास आवडला.
8 May 2019 - 7:35 am | कुमार१
विवेचन आवडले.
8 May 2019 - 7:38 am | भंकस बाबा
लेख आवडला.
8 May 2019 - 8:11 am | वरुण मोहिते
माहिती
8 May 2019 - 9:16 am | टर्मीनेटर
यशोधराजी, डॉ सुहास म्हात्रे, शाम भागवत, पैलवान, सोन्या बागलाणकर, कुमार१, भंकस बाबा आणि वरुण मोहिते आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार _/\_
8 May 2019 - 9:33 am | उगा काहितरीच
छान लेख, रोचक आहे विषय.
8 May 2019 - 10:57 am | अभ्या..
रोचक आणि सविस्तर इतिहास.
गम्मत म्हणजे हि सर्व चित्रे जरी एम एस सेठींच्या नावावर असली तरी ती एकाच ड्रॉइंग स्टाइलमध्ये नाहीयेत. काही चित्रे लाईन वर्क मध्ये आहेत, काहीमध्ये क्रॉसहॅच पध्दतीचे शेडिंग आहे तर काही सिंगल कलर ग्राफिक्स स्टाइलने आहेत. काहिमध्ये रिअलीस्टिक ड्रॉइंग आहे तर काहीमध्ये फोटो हाफटोन वापरला आहे. इलेक्शन कमिशनने ह्या सर्वांचे स्टँडर्डायझेशन करावे असे फार वाटते. रिप्रॉडक्शनच्या दृष्टीने विचार करता हे आवश्यक आहे. इव्हन लेखात दिलेल्या चित्रातील डिश अँटेना हे चिन्ह असे नाहीये. त्याचे ड्रॉईंग वेगळे आहे. अर्थात वेगवेगळे पक्ष त्यांच्या कुवतीनुसार, काही विचारसरणीने थोडेसे बदल चिन्हात करतात पण ते त्यांच्या अॅड्व्हरटायझिंग मटेरिअल मध्ये असते. इलेक्शन कमिशननुसार मात्र स्टॅण्डर्ड चिन्हेच वापरली जातात. उदा. शिवसेनेने त्यांचे चिन्ह धनुष्यबाण हे रेग्युलर वापरासाठी जरा फिनिश आणि ठळक करुन घेतले. मनसे ने त्यांन्च्या रेल्वे इंजिनाची दिशा बदलली.
काहि मजेदार चिन्हे म्हणजे ह्या चिन्हात ल्युडो आहे, एक्स्टेन्शन बॉक्स आहे, नूडल्सचा बाऊल आहे, रिस्टवॉच, टेबल क्लॉक आणि वॉलक्लॉक हे तिन्ही वेगवेगळे आहे, उगवता सूर्य (द्रविड मुन्नेत्र कळ्ळ्हम चे चिन्ह, सन चॅनेलला पण वापरतात ते) तसेच किरणरहित सूर्य आहे(झोराम नॅशनल पार्टीचे चिन्ह आहे). फ्राइंग पॅन वेगळे आहे आणि नुसते पॅन (कढई) वेगळे आहे. बूट वेगळे आणि सॉक्स वेगळे. पेन स्टॅन्ड वेगळा आणि सात किरणासह पेनाचे निब वेगळे. अगदी सीसीटिव्ही कॅमेरा, पंचिंग मशीन आणि भिंतीवर कपडे अडकावयाचे हुकपट्टी पण आहे.
आणि अॅडिशनल म्हणजे १६२ नंबरचे चिन्ह हे खिडकी (विन्डो) हे आहे. ओरिजिनल पीडीएफमधे नाहीये ते पण अॅडेन्डम फाईलीमध्ये अद्याप कुणा पक्षाने न वापरलेल्या चिन्हात आहे ते.
8 May 2019 - 8:17 pm | गामा पैलवान
अभ्या..,
बरीच माहिती मिळाली. धन्यवाद.
१६२ क्रमांकाचं चिन्ह खिडकी आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट निवडणुकीस उभं राहिलं की त्याला हा क्रमांक वापरता येईल.
आ.न.,
-गा.पै.
8 May 2019 - 8:24 pm | अभ्या..
हा ना आ न गा पै,
आणि गम्मत म्हणजे चार खान्याचीच खिडकी आहे.
चिन्हात दाखवल्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टने विन्डोज पण ओपन(सोर्स) केली की मेलिंडा असो की बिल, निवडून येनारच.
9 May 2019 - 6:24 pm | गामा पैलवान
अभ्या..,
'मायक्रो' आणि 'सॉफ्ट' असलं तर 'उभं' कसं राहणार? आणि कुठल्या खिडकीतून काय कार्य करणार? इत्यादि तात्विक प्रश्न उपस्थित होतात.
अर्थात आपल्याला चिता करायची गरज नाही. यांची उत्तरं मिळवण्यास निवडणूक आयोग समर्थ आहे.
आ.न.,
-गा.पै.
8 May 2019 - 11:02 am | अनिंद्य
@ टर्मिनेटर - रोचक माहिती.
@ अभ्या - प्रतिसाद आवडला.
8 May 2019 - 11:07 am | टर्मीनेटर
धन्यवाद अनिंद्यजी.
8 May 2019 - 12:11 pm | अभ्या..
थॅन्क्स अनिंद्यराव, टर्मिनेटरजी.
शरदरावांच्या समाजवादी कॉंग्रेसचे चिन्हही चरखा होते. ८४ ला पुलोद आघाडीत निवडणुका लढवताना ह्या चिन्हाचा वापर केला. पूर्वी राष्ट्रध्वजावर अशोकचक्र नसताना काँग्रेसने तिरंग्यावर चरखा हाच ध्वज वापरलेला होता. हिच आयडीया शरदरावांनी राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ वापरताना खुबीने त्यात तिरंगा सामील करुन वापरली.
सोलापूर आणि बार्शीमध्ये विधानसभेला अनुक्रमे धर्मवीर म्हणून गाजलेले वि. रा. पाटील आणि रामभाउ पवार हिंदू महासभेकडून उभे राहायाचे. आला घोडा, येणार घोडा, निवडून द्यायचाय आपल्याला घोडा हि स्लोगन फेमस असायची व ते त्या कालावधीत टांग्यानेच फिरायचे. इंदिरा गांधीच्या काँग्रेसची "नका विसरु गाय वासरु" हि स्लोगनही तितकीच फेमस होती म्हणे.
अगदी चार पाच वर्षापूर्वी आजोळी माढा गावात किल्ल्याच्या भिंतीवर चुन्याने रंगवलेले जनता पक्षाचे नांगरधारी शेतकर्याचे चित्र पाहिल्याचे आठवते. त्याकाळचा चुना खरोखर दर्जेदार असावा. ;)
8 May 2019 - 1:57 pm | नाखु
चुना वापरला जायचा,आता लावला जातो
मूळ धागा आणि अभ्याची मौलिक माहीतीचा प्रतिसाद भारीच रोचक आहेत
9 May 2019 - 8:07 am | टर्मीनेटर
:) :) :)
8 May 2019 - 11:05 am | टर्मीनेटर
धन्यवाद 'उगा काहितरीच' आणि 'अभ्या..' कलाकाराच्या दृष्टीकोनातून तुम्ही दिलेली पूरक माहिती देखील मोलाची आहे.
8 May 2019 - 11:37 am | श्वेता व्यास
माहितीपूर्ण लेख, आवडला.
सहजच एक प्रश्न पडलाय की, समान चिन्ह असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच ठिकाणी उभे असतील तरी चिन्ह गोठवले जात असेल का? म्हणजे शिवसेनेने झारखंड मध्ये उमेदवार दिला तर काय होईल.
8 May 2019 - 12:24 pm | टर्मीनेटर
समान चिन्ह असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच ठिकाणी उभे असतील तरी चिन्ह गोठवले जात असेल का? म्हणजे शिवसेनेने झारखंड मध्ये उमेदवार दिला तर काय होईल.
अशा परिस्थितीत चिन्ह गोठवले जात नाही. समजा शिवसेनेनेचा उमेदवार झारखंड मधून निवडणूक लढवत असेल तर झारखंड मुक्ती मोर्चा हा तिथला प्रादेशिक पक्ष तेथे शिवसेनेपेक्षा प्रबळ असल्याने निवडणूक आयोग त्यांना 'धनुष्यबाण' या त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्यास अनुमती देईल पण झारखंड हे शिवसेनेचे प्रभावक्षेत्र नसल्याने त्यांच्या उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर लढत द्यावी लागेल. हीच परिस्थिती महाराष्ट्रात उलट होईल, शिवसेनेला 'धनुष्यबाण' या त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवता येईल पण झारखंड मुक्ती मोर्चाला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.
प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_
8 May 2019 - 12:38 pm | श्वेता व्यास
@टर्मीनेटर उत्तरासाठी धन्यवाद , नवीन माहिती समजली :)
9 May 2019 - 8:53 am | शाम भागवत
अभ्याजी, बरेच बारकावे समजावून सांगितले.
_/\_
9 May 2019 - 9:09 am | मुक्त विहारि
आवडला...
9 May 2019 - 10:31 am | नि३सोलपुरकर
रोचक आणि माहितीपूर्ण.
@ टर्मिनेटर ,अभ्या - लेख आवडला, बरेच बारकावे समजावून सांगितले.
धन्यवाद .
9 May 2019 - 7:27 pm | टर्मीनेटर
धन्यवाद मुवि आणि नि३सोलपुरकर _/\_
9 May 2019 - 8:18 pm | शेखरमोघे
उद्बोधक आणि मनोरन्जक लेख.
सहज म्हणून डॉ. गुगळेन्चे मत विचारले असता पुढील दुवा सापडला https://www.cnn.com/style/article/india-election-party-symbols/index.html
त्यावरून जाणकाराना आणखीही खुलासे करता येतील.
9 May 2019 - 9:34 pm | ज्योति अळवणी
खूपच माहितीपूर्ण लेख. इतक्या निवडणुका बघितल्या आणि काही निशाण्यांची रोचक चर्चा देखील वाचली ऐकली आहे. पण इतकी व्यवस्थित माहिती पहिल्यांदाच वाचली
10 May 2019 - 4:07 pm | पद्मावति
अभ्यासपुर्ण आणि रोचक लेख.
11 May 2019 - 10:56 am | टर्मीनेटर
शेखरमोघे, ज्योति अळवणी आणि पद्मावति आपले मनःपूर्वक आभार _/\_
14 May 2019 - 11:52 am | श्वेता२४
बरीचशी माहिती नव्याने समजली.
22 May 2019 - 7:55 am | टर्मीनेटर
धन्यवाद श्वेताजी _/\_
22 May 2019 - 9:07 am | सुधीर कांदळकर
22 May 2019 - 9:08 am | सुधीर कांदळकर
22 May 2019 - 9:11 am | सुधीर कांदळकर
22 May 2019 - 9:12 am | सुधीर कांदळकर