तासगावचं घर :
श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं. शाळेसमोर, मेन रोड, तासगांव. असा पत्रिय पत्ता. तासगावात विचारायचे झाल्यास गोखले वकिलांचा वाडा. अस जर कोणाला विचारलं तर डोळे झाकून आणून सोडतील.
नरगुंदे बोळात मोठा दरवाजा त्यातल्याच एका दाराला छोटा दिंडी दरवाजा.. दरवाजातून आत गेलं की, उजव्या बाजूला रिकामा गोठा, डाव्याबाजूला एका ओळीत बिर्हाड करूंच्या खोल्या. मला आठवणारे बिर्हाड्करू म्हणजे माणगांवकर शिक्षक आणि एक कोणितरी नर्स . पुढे गेलं की, मोठ्ठ अंगण .. अंगणाच्या डाव्या बाजूला माडीवर जाण्यासाठी केलेला लाकडी जीना. बरोबर समोर.. सारवलेलं अंगण आणि जुन्या पद्धतीचं घराचं दार.. आत गेलं की, मोठी पडवी, मग मोठ्ठ सोपा.. सोप्याच्या एका बाजूला भला मोठा आजोबांचा दिवाण, दुसर्या बाजूला मोठा कडिपाटाचा झोपाळा. एक एकावर एक ५ मोठे कप्पे असलेलं कपाट.. एक टेबल, ब्लॅक एन्ड व्हाईट टिव्ही. कोनाड्यात श्रीकृष्णाची मूर्ती. कोनाड्याच्या चौकटीला रंगित मोत्यांचं तोरण. दुसर्या कोनाड्यात आजोबांच्या फ़ाईली. तिसर्या कोनाड्यात पितळी फ़ुलदाणी ज्यात कधीहीफ़ुलं ठेवली नाहीत. माजघरात जाण्याचा दरवाजा. त्या दरवाजातून आत जाताना त्या ६ फ़ुटी रूंद भिंतीत काढलेला पोट माळ्यावर जाणारा जीना. माजघारात एका बाजूला वापरात नसलेली मातीची चूल, नव्याने बांधलेला ओटा आणि तरीही खाली बसून स्वैपाक करण्यासाठी खाली ठेवलेला गॅस सिलेंडर आणि शेगडी.त्याच्या बाजूला पाट. आणि त्या पाटावर बसलेली नऊ वारीतलि माझी आजी.
माजघराच्या डाव्याबाजूला कोठीची खोली. त्या खोलीत एक भक्कम जुन्या पद्धतीची शिडि पोटमाळ्यावर जाण्यासाठी लावलेली. एक अंधारि खोली. ती पूर्वी बाळंतिणीची खोली असे आणि मग नंतर आम्हा नातवंडांना भिती दाखवण्यासाठी तिचा उपयोग न चुकता होत होता.माजघरा बाहेरच्या बाजूला एक चिंचोळा बोळ होता. तिथून वाड्याच्या मागच्या बाजूला जाता येत असे. तिथे राहणारे बिर्हाडकरू म्हणजे काकडे टेलर, विसापूरे .. आणखी कोणीतरी होतं. नीट आठवत नाही आडनाव. तिथे या बिर्हाड करूंच्या खोल्यांच्या समोर भलं मोठं चिंचेचं झाड आणि त्या झाडखाली ओळीने बांधलेले ५-६ संडास. वाड्याचा कुंपणाच्या भिंतीत काढलेले दोन नळ. आणि त्यातून सतत ठिबकणारं पाणी.
वरती असणार्या खोल्यांमध्ये बॅचलर रहात असत भाड्याने.
तासगावला माझे आजीआजोबा या वाड्यात रहात असत. माझ्या बाबांचं लहानपण याच वाड्यात गेलं. माझे पणजोबा ज्यांना अख्ख तासगांव आप्पा म्हणत असे ते स्वतः वकिल होते शिवाय पैलवानही होते. गोखल्यांचं तिथे तासगांवात मोठं कापडाचं दुकान होतं. पणजोबांबद्दल खूप ऐकायला मिळायचं. पण जेव्हा जेव्हा तासगांवला जाणं व्हायचं अर्थातच सुट्टीमध्ये.. तेव्हा तेव्हा मला नेहमीच त्या घराबद्दल एक अनामिक ओढ वाटायची. असं नाही की, मी त्या घरात खूप वर्षं राहिले होते.. पण तरिही त्याठिकाणी गेलं की, त्या घराच्या प्रत्येक खोल्यातून डोकावून यावं असं वाटायचं.
तासगाव तेव्हा तालुका ठिकाण असलं तरी मी रहात असलेल्या इचलकरंजी- कोल्हापूर या शहरांपेक्षा मागासलेलंच होतं. पाण्याची सतत बोंब. रूक्ष भाग. गणपतीला, दिवाळिमध्ये आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमचं तासगांवला जाणं व्हायचं. अंगणातल्या नळावरून तेव्हा पाणी भरून आणणं यात जबरदस्त थ्रील वाटत होतं. आजीने मला पेलवेल इतक्या आकारची कळशी आणली होती.. त्यामुळे ती छोटी कळशी घेऊन "अगदी घट डोईवर.. घट कमरेवर" श्टाईल मध्ये मी पाणी आणत असे आणि कळ्शी माजघरातल्या पिंपात ओतून हुश्श असा सुस्काराही टाकत असे... :)
तासगांवात आणखी एक धमाल असायची ती म्हणजे, सकाळी सकाळी पाणी आलेलं असायचं ... सगळी बच्चे कंपनी दात घासत अंगणात उभी असायची आणि घराच्या वरती पत्र्यांवर, कौलांवर माकडं असायची. खरंच सांगते मंडळी, रोज ही माकडं यायची. ती रोज कशी यायची ?? फक्त आमच्याच भागांत यायची.. की सगळ्या तासगांवात यायची?? बरं.. सकाळिच का यायची ? दुपारी, संध्याकाळी का नाही यायची?? हे असले प्रश्न मला रोज पडायचे. पण कधी त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न नाही केला. माकडं आली की, शेतातून आलेल्या भुईमूगाच्या शेंगाच्या पोत्यातल्या शेंगा हळूहळू एका शिप्तरातून बाहेर यायच्या.. आणि तासाभराने जर अंगणात फेरफटका मारला तर आजोबा खराटा घेऊन शेंगाची फोलपटं लोटताना दिसायचे. माकडांना शेंगा देण्यासाठी केलेला आरडाओरडा.. दंगा.. पूर्ण वाडा दणाणून निघायचा. सकाळी दूध आणायला जाणं यासाठी भावंडांमध्ये मारामारी.. कारण बाबर डेअरी घराजवळ होती आणि तो बाबर त्याच्या त्या मोठ्या किटलीतलं दूध मापट्याने मोजून आपण नेलेल्या किटलित कसा घालतो ते पहाणं. त्याच्या हाताची होणारि सफाईदार हालचाल आणि थोडं ही दूध न सांडता नाजूक धार धरत .. आपण नेलेल्या किटलीच्या चिंचोळ्या तोंडातून दूध ओतणं.. जबरदस्त वाटायचं. दूध घेऊन आलं की, समोर आजोबांनी शेंगाची फोलं पेटवलेली असायची त्याचा तो.. धुरकट वास सकाळी छान वाटायचा. इतक्यात कोणी आत्या आतून आवाज द्यायची "चला चहाला........!". मग आणलेल्या ताज्या दूधाचा तो चहा...! आम्हाला एरवी दूधच प्यायला लागायचं.. त्यामुळे चहाची ऐश फक्त तासगावला आल्यावरच. इथे आई-बाबाही काही बोलायचे नाहीत. चहा पिऊ द्यायचे. मजा असायची.
आजोबांनी तो पर्यंत तांब्याच्या बंबात लाकडं घालून पाणी ठेवलेलं असायचं.. आजोबा सगळ्यांना अंघोळ करून घ्या म्हणून मागं लागायचे पण कधीही दुपारी १२.०० च्या आत आम्ही अंघोळ नाही केली. आजीने / आईने/ आत्याने ... केलेला मऊ आटवल भात खायचा आणि मग आम्ही विहिरिच्या बाजूला खेळायला जायचो. तिथली माती घेऊन त्याची बोळकी बनवणे, ती माती चाळण्यासाठी माजघरातून आजीचं लक्ष चुकवून पीठ चाळायची चाळण आणणे ..मग ती माती चाळणे. मग ओरडून घेणे.. आम्ही विहिरीजवळ खेळतो म्हणून आजोबा रागावायचे. पण आम्ही ऐकत नाही हे पाहून त्यांनी त्या विहिरिवर एक तारांची जाळी टाकून विहिर बंद केली.
एकदा दुपारची जेवणं आटोपून आजोबा मला कोर्ट आणि जेल दाखवायला घेऊन गेले होते. आजोबा तेव्हा रिटायर्ड झाले होते. पण.. तिथे गेल्यावर भेटणारा प्रत्येक जण आजोबांना विचारत होता, " काय म्हणताय वकिलसाहेब?? ही कोण नात वाटतं?? " आजोबा म्हणत "हो नात. कोर्ट दाखवायला घेऊन आलो आहे". की पुन्हा, " हो का?? छान छान. नाव काय तुझं बाळ?".. मी "प्राजक्ता" असं थाटात उत्तर दिलं की, " छान छान.. गोड आहेस हं.. येऊ का वकिलसाहेब??" असं म्हणून तो निघून जायचा. मला चिक्कार अभिमान वाटला होता तेव्हा.. म्हणजे माझ्या आजोबांना इतका मान आहे म्हणून की, येणारा जाणार प्रत्येकजण माझीही चौकशी करत होता आणि "गोड आहेस" म्हणत होता म्हणून .. ते नक्की नाही सांगता येणार. पण त्यावेळी आपण कोणीतरी सिलेब्रीटी असल्याचं फिल मात्र नक्की आलं होतं. :)
दुपारी कित्येक वेळा आजोबा अंगणात शेकोटी करायचे आणि त्यावर शेंगा, कणसं भाजून द्यायचे. उन्हाळ्यात आजी नाचणीची आंबिल करायची. तेव्हा फारशी आवडायची नाही पण तरिही प्यायचो आम्ही. तासगावच्या बाहेर एक दत्ताचा माळ म्हणून एक टेकडी वजा माळ आहे. थोडं चढायला लागतं.. बाबा, माझा काका आणि आम्ही भावंडं तिथे जायचो. बाबांना तो माळ त्यांच्या लहानपणी खूप आवडायचा असं बाबा म्हणतात. तिथे जाऊन भरपूर भटकून, बरोबर नेलेले चुरमुरे, खारे शेंगदाणे.. फरसाण यांचा फन्ना उडवून आम्ही परत यायचो.
एकदा संध्याकाळी आजी खाली बसून पोळ्या करत होती. होतील तशा शेजारच्या वेताच्या लहान बुट्टीत टाकत होती. मी गरम पोळी खात होते.. इतक्यात मला आजीने नुकतीच बुट्टीत टाकलेली पोळी बुट्टीतून खाली सरकून कोठीच्या खोलीकडे पळत जाताना दिसली. मी ओरडले "आजी........... ते बघ!!" आजीने ते पाहून आजोबांना आणि बाबांना हाक मारली. आणि मग पोळी पळवणार्या त्या उंदराला.. त्या भल्या मोठ्या कपाटाखालून पोळीसकट बाहेर काढे पर्यंत रात्रिची जेवणाची वेळ टळून गेली होती.
तासगावला तसं राहणं खूप कधीच नाही झालं पण त्या घराने मला विलक्षण ओढ लावली.
गणपतीमध्ये ऋषिपंचमीला रथोत्सव असतो. तासगावच्या मंदिरातील गणपतीला.. हरीहरेश्वराच्या भेटीला रथातून ओढत गावकरी मंडळी घेऊन जातात. आणि संध्याकाळी परत घेऊन येतात. ही प्रथा गेले कित्येक वर्ष चालू आहे. दरवर्षी गणपतीत रथाला जायचं हा नेम ठरलेला. रथाला १०१ नारळांचं तोरण बांधायचं. आजोबा तासगावात होते तो पर्यन्त वरचेवर तासगावला जाणं व्हायचं. शेवट्ची १० वर्ष आजी- आजोबां कोल्हापूरलाच होते. आज आजोबांना जाऊनही १० वर्ष झाली. पण हा नेम नाही चुकवला गेला कधी.
तासगावच्या त्या घरात जसं मी म्हंटलं माझं रहाणं असं खूप नाही झालं तरीही खूप छोट्या छोट्या आठवणी साचून राहिल्या आहेत. त्यातलीच एक......सोप्यावर असलेल्या त्या झोपाळ्यावर खेळताना.. तिथे मातीतल्या भिंतीत एकदा मी हातातल्या न उठणार्या पेन ने एका ओळीत "प्राजक्ता, प्रज्ञा (चुलत बहिण), विक्रांत (भाऊ), वैभव्(चुलत भाऊ).. " अशी नावं कोरली होती. त्यादिवशी बाबा मला खूप रागवले होते. पण आजोबा बाबांना म्हणाले होते, " नंदू, अरे तिचं अक्षर किती सुरेख आहे ते तरी बघ!" ..
आजोबा गेले.....घर पोरकं झालं. भाडेकरू होते. वर्षातून - दोन वर्षातून एकदा संपूर्ण म्हणजे सगळ्या भाडेकरूंची मिळून भाड्याची रक्कम रूपये १५००.. आम्हाला मिळू लागली. पण आजोबांच्या माघारी ते घरही घटका मोजू लागलं होतं. दुकानाची जागा आजोबा हयात असतानाच विकली होती. कधी गणपतीला म्हणून गेलो तर भाडेकरू सांगायचे.. कौल फुट्लं.. भिंत घुशीने पोखरली.. एका बाजूने दरवाजा मोडला. त्या घराच्या मरंमतीसाठी खूप खर्च करूनही ते घर साथ देइना. भाडेकरूही आता नव्या नव्या ठिकाणी रहायला गेले होते. वाडा विकायचा ठरलं. .. पोटात कालवाकालव झाली. काही सुचेना. आणि अचानक एकेदिवशी समजलं.. एका डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलसाठी ती जागा घेतली. त्यातलं असलेलं नसलेलं सामान बाहेर काढण्यासाठी मी ही हट्टाने गेले तासगावला. एकेक जुनी ट्रंक, पिंपं, बंब.. बाहेर आणून ठेवत होती सगळीजण. जेव्हा झोपाळा काढायची वेळ आली.. तेव्हा ती भिंतीवरची लिहिलेली नावं बघून.... माझा श्वास कोंडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. ...... किती वेळ मी नुसतीच रडत होते..
त्यानंतर खूप वर्षानी मी तासगावला गणपतीमध्ये गेले... सहज म्हणून "श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं शाळेसमोर, मेन रोड, तासगांव" या पत्त्यावर गेले... भलं मोठं हॉस्पिटल.. शुभ्र पांढर्या रंगात.. आणि दिंडी दरवाज्याच्या जागी एक प्रशस्त मोठा कोरीव काम केलेली लाकडी चौकटी असलेला काचेचा दरवाजा पाहिला.... त्या स्पिरिटच्या घमघमाटात माझ्या आजोबांनी पेटवेल्या शेंगाच्या फोलांचा धुरकट वास कुठे हरवला होता??
(मी खूप वेळा माझ्या या तासगावच्या घराला माझ्या स्वप्नात पाहिलं आहे.. मला ही स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत. म्हणून हा खटाटोप केला. माझ्या या भावना अनेक जणांनी आधीच कुणीतरी लिहिलेल्या वाचल्या असतील. पण आज एका बैठकीत हे लिहिल्या नंतर मला जे समाधान मिळालं आहे.. ते कुठेच नाही मिळणार)
- प्राजु
प्रतिक्रिया
5 Nov 2008 - 12:10 am | यशोधरा
प्राजू... :(
अगदी गं, अशीच आपली नाळ जुळलेली असते गं आपल्या घराशी...
माझ्या आजोळी पण कोणीच नसतं आता, आणि ते एवढं मोठं घर... होता होईतो ते जपायचं अस मनात आहे माझ्या....
5 Nov 2008 - 12:30 am | कपिल काळे
सुंदर लेखन. गावाकडची आठवण करुन देणारे.
हे असं वाइट वाटू नये म्हणून आम्ही सध्या आमचं गावाकडचं घर पुन्हा बांधतोय. प्लान जुनाच ठेवला आणि बाकी सगळं आधुनिक. विशेष म्हणजे दरवाजे, खिडक्या, जुनेच वापरणार. झोपाळा कोण टाकेल? जुना फिल येण्यासाठी बरीच धडपड करतोय.
http://kalekapil.blogspot.com/
5 Nov 2008 - 12:40 am | चकली
सगळ डोळ्यासमोर उभ राहीले.. छान लिहलंयस!
चकली
http://chakali.blogspot.com
5 Nov 2008 - 12:45 am | विसोबा खेचर
त्या स्पिरिटच्या घमघमाटात माझ्या आजोबांनी पेटवेल्या शेंगाच्या फोलांचा धुरकट वास कुठे हरवला होता??
वा!
सुंदर आठवणी, सुंदर लेख..
प्राजू, अगदी मनापासून लिहिलेलं तुझं हे लेखन वाचून अंमळ हळवा झालो...
तात्या.
5 Nov 2008 - 3:17 am | आजानुकर्ण
मीदेखील.
आपला,
(हळवा) आजानुकर्ण
5 Nov 2008 - 3:24 am | कोलबेर
मी देखिल..
(मूळचा कोडगा) कोलबेर :)
5 Nov 2008 - 4:18 am | भास्कर केन्डे
मस्त लेखन प्राजूताई!
अशाच लिहित रहा.
आपला,
(हळवा वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.
5 Nov 2008 - 12:51 am | टारझन
प्राजु तै .. किती इमोशनल असावं माणसानं आणि असलं तर एवढं लेखणीतुन कसं काय उतरवावं ...
एवढ्या भावना गुंतणे भविष्याच्या दृष्टीने चांगलं नाही बरं . . . . तुझ्या घराबद्दलच्या भावणांनी अंमळ उचंबळून आलं ..
क्लास .. अजुनही लिहा ... समाधानी व्हा !!!
असंच आम्हाला आमचं दहावीचं वर्ष आठवतं ... आमचा तो पहिलाच अनुभव होता ...... स्वप्नही पडायची आधी .. आत्तात्ता कमी झाली ... की ती कुठे तरी भेटली ... सोडा .. नो कमेंट्स ... इट वॉज प्राजु इफेक्ट ...
-(युएस/ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नात हरवलेला)
टारुबाळ
5 Nov 2008 - 3:05 am | baba
सुंदर लिहिलाय प्राजुताई..
...बाबा
5 Nov 2008 - 3:23 am | चतुरंग
असंच असतं ते घर जिथे आपण लहानाचे मोठे होतो.
एकेका दगडात, विटेच्या तुकड्यात, दाराच्या चौकटीत, खिडकीच्या झापात, कौलाच्या ठिकरात, मातीच्या ढेकळात, हौदाच्या मातकट मचूळ पाण्यात, थंडगार शहाबादी फरशीत जिकडे तिकडे आठवणीच आठवणी चिकटून राहिलेल्या असतात! आणि असं काही वाचायला लागलं की पाझरायला लागतात डोळ्यांतून....
प्राजू, जुनी खपली निघाली आणि रक्ताऐवजी अश्रू आले! पण तुझी चूक नाही हे असंच असतं. :)
सुंदर, हळवं लेखन!!
चतुरंग
5 Nov 2008 - 9:19 am | सहज
सुंदर, हळवं लेखन.
5 Nov 2008 - 9:26 am | पक्या
छान लेख. आवडला. धन्यवाद.
5 Nov 2008 - 10:00 am | अमोल केळकर
लेख आवडला
मुळचा सांगलीचा असुनही तासगावचा संबंध फक्त गणपती मंदिर , द्राक्षे एवढ्या पुरताच आला होता. ग्रामिण जिवनाचे यतार्थ वर्णन आपण केले आहे.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
5 Nov 2008 - 10:43 am | अरुण मनोहर
घर म्हणजे माती दगड विटांची रचना नाही. ती जुनी रचना मोडून आता हॉस्पिटल उभारल आहे.
घर म्हणजे आठवणी.
आठवणी मायेच्या
साठवणी जन्मभराच्या
सावल्या प्रेमाच्या, उबेच्या, अगदी अंधारी खोलीतल्या भीतीच्याही!
खूप चित्रदर्शी वर्णन केलंस प्राजू. असेच (पण) विविध येऊदे.
5 Nov 2008 - 10:51 am | विसुनाना
पण तासगावातच रहात असल्याने वाडा, शाळा , पोस्ट, गोपूर,(तुमच्या आजोबांचे (!) -) पानाचंद चित्र मंदिर, 'ड्रीम गर्ल' सिनेमा (त्यातला हेमामालिनीच्या खांद्यावरून चालणारा इटूकला धर्मेन्द्र) , कापूर ओढा - असले बरेच,बरेच काही आठवते.
तासगावच्या आठवणी जागवल्याबद्दल आभार.
5 Nov 2008 - 8:51 pm | प्राजु
माझ्या आजोबांचं च ते चित्रमंदीर.. बरोबर समोर सिद्धेश्वराचं देऊळ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Nov 2008 - 1:57 pm | जैनाचं कार्ट (not verified)
खुप मस्त लिहलं आहेस प्राजु !
एकदम आठवणी जाग्या होतात असं काही तरी वाचलं तर !
मनापासुन आवडलं !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
5 Nov 2008 - 2:06 pm | स्वाती दिनेश
सुंदर आणि हळवं ! किती आठवणी जागल्या हे वाचून .. आता किती वेळ त्यात रमेन माहित नाही,
स्वाती
5 Nov 2008 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते
कमीत कमी ५-६ वेळा वाचलं. खूप सुंदर आणि परिणामकारक. पहिल्यांदा वाचला तेव्हाच लिहिणार होतो. पण सुचत नव्हते काही.
नुकताच जाऊन आलो गावाला आमच्या. वाडा नुसता 'आहे' म्हणायचा. नुसत्याच भिंती राहिल्या आहेत. आत काहीच नाही. रेल्वे स्टेशनजवळच्या लॉज वर राहिलो होतो, ज्या गावात आमचे पूर्वज जमिनदार म्हणून वावरले. कालाय तस्मै नमः
:(
बिपिन कार्यकर्ते
5 Nov 2008 - 8:52 pm | प्राजु
माझ्याकडे फोटोही नाहिये बिपिन्दा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Nov 2008 - 2:27 pm | राघव
प्राजुताई,
ज्या घराच्या आठवणींसाठी सुद्धा आपण क्षणात हळवे होतो, ते घर म्हणजे खरं घर असतं.
ते घर प्रेम लावतं. असं घर असेल तर माणूस कुठेही गेला तरी त्याच्या ओढीनं परत येतो.
भाग्यवान आहात, असे घर तुम्हाला मिळालेले आहे (होते नाही म्हणायचेय हां!).
खूप सुंदर लेखन!
(भाग्यवान!) मुमुक्षु :)
5 Nov 2008 - 7:28 pm | छोटा डॉन
+१, असेच म्हणतो ...
बाकी लेख अप्रतिम उतरला आहे ह्यात शंकाच नाही.
एकदम सहजसुलभ आणि हळवा झाला आहे ...
प्राजुताई, आत्तापर्यंत तुझ्या वाचलेल्या साहित्यामधल्या सर्वोत्तम लेखांपैकी हा नक्कीच एक लेख आहे ...
कदाचित मनापासुन व हळवेपणाने लिहल्यामुळे हे जमले असेल ...
असो. लिहीत रहा. पुलेशु.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
5 Nov 2008 - 8:53 pm | प्राजु
घर तुम्हाला मिळालेले आहे (होते नाही म्हणायचेय हां!).
हो.. आहेच. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Nov 2008 - 2:39 pm | मनस्वी
खूपच मस्त लिहिलंएस प्राजू. जुन्या वाड्याच्या आठवणीत गेले.
खरंच..
5 Nov 2008 - 3:47 pm | निखिलराव
खूप सुंदर लेखन, मनापासुन आवडलं...
5 Nov 2008 - 4:12 pm | ललिता
प्राजक्ता, खूप छान लिहिलंय! माझ्यादेखिल विजापूरच्या आजोळच्या आठवणी आहेत....अशाच आहेत, थोडाफार फरक असेल... हळवेपण कसं दाटून आलंय!
5 Nov 2008 - 4:17 pm | Punyacha Bajirao
खुप खुप अप्रतिम चित्र उभे केले तुम्हि तुमच्या मनातले ...
मनात आगदि विचाराचे वाद्ळ झाले आणि आठवणिनिचा पाला डोळ्यात जाउन पाणि आल...
खुपच छान...
5 Nov 2008 - 4:25 pm | वल्लरी
खुप खुप खुप छान,सुंदर लेख,
गावचे घर आणि लहानपणी केलेली धमाल त्या आठवणी,,,,,,,,,,सगळे ..सगळे...चित्र डोळ्यासमोर उभे राहिले
वाचून अंमळ हळवी झाले...
5 Nov 2008 - 4:25 pm | वल्लरी
खुप खुप खुप छान,सुंदर लेख,
गावचे घर आणि लहानपणी केलेली धमाल त्या आठवणी,,,,,,,,,,सगळे ..सगळे...चित्र डोळ्यासमोर उभे राहिले
वाचून अंमळ हळवी झाले...
5 Nov 2008 - 4:27 pm | विनायक प्रभू
दरवर्षी जुन्या घराला न चुकता भेटून येतो. बरे वाटले लेख वाचून.
5 Nov 2008 - 4:51 pm | चाफा
छानच वर्णन, त्यातली भावुकता एकदम भिडली ! मला आजोळ असे काही नाही त्यामुळे अनुभव असा नाही :(
5 Nov 2008 - 7:13 pm | शितल
प्राजु,
खुप लिहिले आहेस.
मनात घर करून राहिले असे :)
5 Nov 2008 - 8:54 pm | प्राजु
आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Nov 2008 - 8:57 pm | सर्वसाक्षी
ओघवत्या शैलितलं अगदी मनातून उतरलेल लेखन आवडल.
6 Nov 2008 - 2:46 am | नंदन
म्हणतो. लेख अतिशय आवडला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Nov 2008 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तासगावच्या आठवणी सही उतरल्या आहेत.
लेखनीच्या सहज सुंदर शैलीने तासगावचे चलचित्र डोळ्यासमोरुन सरकत जाते..
सुंदर !!!
-दिलीप बिरुटे
5 Nov 2008 - 9:34 pm | स्वामि
एवढं सेंटलमेंटल लिहीलं की रडु येतं. :''( . पण ही जुनी घरं स्वप्नात का बरं येतात?
5 Nov 2008 - 9:39 pm | धनंजय
लहानपणाची आठवण हळवी करते.
5 Nov 2008 - 11:36 pm | अथांग सागर
खुपचं छान वर्णन केलयं....घरच्या व बालपणातल्या आठवणी डोळ्यासमोर आल्या...
फारच छान!!!
--अथांग सागर
6 Nov 2008 - 12:02 am | शाल्मली
प्राजु,
खुपच सुंदर लिहिलं आहेस !
तू केलेल्या सुंदर वर्णनाने माझ्या डोळ्यासमोर तुझं घर उभं राहिले.
खूपच मस्त..अजून लिही.
--शाल्मली.
6 Nov 2008 - 11:09 pm | लिखाळ
तू केलेल्या सुंदर वर्णनाने माझ्या डोळ्यासमोर तुझं घर उभं राहिले.
सहमत आहे.
प्राजु, खुपच छान लिहिले आहेस..
-- लिखाळ.
6 Nov 2008 - 8:17 am | प्राजु
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Nov 2008 - 11:55 pm | इनोबा म्हणे
छान वर्णन केले आहेस प्राजु... गावातील घराची मजा काही वेगळीच असते.
शेवट खूपच हळवा आहे. विशेषकरुन "त्या स्पिरिटच्या घमघमाटात माझ्या आजोबांनी पेटवेल्या शेंगाच्या फोलांचा धुरकट वास कुठे हरवला होता??" ही ओळ मनात घर करुन गेली.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
7 Nov 2008 - 6:34 am | रविराज
खुप छान लेख प्राजुताई!!
7 Nov 2008 - 7:31 am | मीनल
अगदी बारकाव्यासह लिहिले आहे.त्यामुअळे थेट त्या जागी,त्यावेळी जाऊन उभी ठाकले.
बाहेर पडवेना.
मीनल.
7 Nov 2008 - 7:06 pm | येडा खवीस
प्राजु,
अप्रतिम लिखाण्....दुर्दैवाने आमचं बालपणीचं अनुभवविश्व एवढं समृध्द नाहीये...आजोळ आमच्या गावातच होतं, त्याच्या ज्या काही थोड्याफार आठवणी आहेत त्या सुध्दा आता संपल्या कारण, कालपरवाच तो वाडा पाडुन आता टोलेजंग इमारत उभी रहातेय
-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
7 Nov 2008 - 11:31 pm | अभिज्ञ
अतिशय सुंदर लिहिले आहे.
अभि़ज्ञ.
8 Nov 2008 - 12:35 am | राम दादा
खुप छान लिहलयस..मन भरून आले बघ..
तुझा हा लेख न विसरण्यासारखा आहे..
राम
8 Nov 2008 - 2:27 am | खादाड_बोका
प्राजु...
मलाही माझ्या आजोबांच्या घराची आठ्वण ताजी झाली.... :) :)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
8 Nov 2008 - 5:54 am | मिना भास्कर
मी तासगाव पाहिलेले नाही. आणि आजी आजोबांचे घर ही नाही. आम्हांला आजोळचे सुख नाही मिळाले. पण वाचताना आजोळी गेल्या सारखे वाटले. =D>
29 Nov 2009 - 1:37 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख आठवणी!!!
चुचु
29 Nov 2009 - 2:19 pm | jaypal
फोटोतील मुली एवढा झालो. जगजीत सिंग यांनी गायलेली " ये दौलत भी ले लो, ये शौहरत भी ले लो" या गझलची आठवण झाली. उत्तम गवई नेहमी चांगलेच गातो पण एखद्या कर्यक्रमाचीच मैफील होते. तशी मैफील जमली आज.
(गाववाले आस्ल्याने धन्यवाद देत नाही)
29 Nov 2009 - 7:08 pm | भोचक
डोळ्यात पाणी आलं.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
29 Nov 2009 - 7:25 pm | बट्ट्याबोळ
"... वाडा विकायचा ठरलं. .. पोटात कालवाकालव झाली. काही सुचेना. आणि अचानक एकेदिवशी समजलं.. एका डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलसाठी ती जागा घेतली. त्यातलं असलेलं नसलेलं सामान बाहेर काढण्यासाठी मी ही हट्टाने गेले तासगावला. एकेक जुनी ट्रंक, पिंपं, बंब.. बाहेर आणून ठेवत होती सगळीजण. जेव्हा झोपाळा काढायची वेळ आली.. तेव्हा ती भिंतीवरची लिहिलेली नावं बघून.... माझा श्वास कोंडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. ...... किती वेळ मी नुसतीच रडत होते.."
अंगावर काटा आला वाचून !!
आणि हो, अर्रार आबा कुटं राहतात ? :)
27 May 2011 - 12:25 am | आनंदयात्री
वाह, प्राजुताईचा हा नितांतसुंदर लेख वाचायचाच राहिला होता, त्या देशपांडेबाईंनी लिंकवल्या मुळे अमृतप्राशन झाले :)
27 May 2011 - 6:03 am | पैसा
>> तेव्हा ती भिंतीवरची लिहिलेली नावं बघून.... माझा श्वास कोंडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. ...... किती वेळ मी नुसतीच रडत होते.."
वाचून परत जखमेवरची खपली निघाली.
पण वाचणं आवश्यक होतंच. एखाद्या व्यक्तिचित्राइतकाच सुंदर लेख आहे. लेखाची आठवण करून दिल्याबद्दल मकीला हजारों वेळा धन्यववा!
28 May 2011 - 6:15 am | गोगोल
हा लेख तर सुटूनच गेला होता.
लेख आवडला.