व्यसनमुक्ती

निमीत्त मात्र's picture
निमीत्त मात्र in जनातलं, मनातलं
4 Nov 2008 - 9:16 am

अमेरिकेतील ऍक्रॉन शहरातील १९३५ मधील एक संध्याकाळ. त्या संध्याकाळी दोन अट्टल बेवडे एकमेकांना भेटले. गप्पा मारत बसले आणि चमत्कार म्हणजे गप्पा मारता मारता प्यायचं विसरले. त्यांच्या गप्पांतून दुनियेत एक नवीनच शोध लागला. दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा. पण त्या दोघांपैकी कोणीही मानसशास्त्रज्ञ नव्हता. एक होता शेअर दलाल बिल विल्सन तर दुसरा होता डॉक्‍टर बॉब स्मिथ.
खरे तर यापूर्वी मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहिले जाई (आज ही बरेचजण मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहतात) त्यांना उपदेशाचे डोस पाजले जात. पण समानतेच्या पातळीवरून त्यांना कोणी समजून घेत नव्हते. पण वरील दोन मद्यपाशग्रस्तांच्या गप्पांमुळे हे सिद्ध झाले की एक मद्यपाशग्रस्त दुसऱ्या मद्यपाशग्रस्ताला समजून घेऊ शकतो. एकमेकांना उपदेश न देता न रागवता सोबर राहण्यासाठी मदत करू शकतो.
ऍक्रॉन शहरात दोन मद्यपींच्या गप्पांतून निर्माण झालेली ही चळवळ हळूहळू पसरत गेली. ऍक्रॉन शहरच नव्हे, केवळ अमेरिकाही नव्हे, तर संपूर्ण जगात मद्यपाशग्रस्तांच्या सभा भरू लागल्या. शेकडो हजारो - लाखो मद्यपी मद्यमुक्ती अनुभवायला लागले.
ही संस्था कोणी काही ठरवून सुरू केली नाही. त्यामुळे तिचं कोणीही औपचारिक बारसे केली नाही. पण या संस्थेच्या सभासदांनी १९३९ मध्ये आपल्या अनुभवांचे एक पुस्तक "अल्कोहोलिक्‍स ऍनॉनिमस' (अनामिक मद्यपी) या नावाने प्रसिद्ध केले आणि या पुस्तकाचे नावच या संस्थेला मिळाले. आज ही संस्था ए. ए. (अल्कोहोलिक्‍स ऍनॉनिमस) या नावाने ओळखली जाते.
गमतीची गोष्ट म्हणजे ही संस्था सर्वस्वी मद्यपाशग्रस्तांद्वारेच चालवली जाते. या संस्थेचा सभासद होण्यास एकच अट असते, ती म्हणजे दारू सोडण्याची इच्छा. या संस्थेचा सभासद होण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही की डोनेशन्स गोळा केली जात नाहीत. मद्यमुक्ती हे एकमेव ध्येय असलेली ही संस्था सर्व तऱ्हेच्या विचारांपासून मतप्रवाहांपासून, धर्मांपासून अलिप्त आहे. कदाचित तिची ही अलिप्तता तिच्या दीर्घकालीन यशाचे गमक असेल.
आपण पाहिले की या संस्थेमध्ये कोणीही व्यावसायिक समुपदेशक वा मानसोपचारतज्ज्ञ नसतो. केवळ मद्यपाशग्रस्तच ही संस्था चालवतात. स्वतःचे अनुभवकथन हेच प्रत्येक मीटिंगचे सूत्र असते. एकमेकांच्या अनुभवातून शिकायचे असते. जुन्या मेंबरची व्यसनमुक्ती नवीन मेंबरमध्ये आशावाद निर्माण करते. दुसऱ्याचे अनुभव ऐकता ऐकता आपल्यातल्या चुका शोधल्या जातात. धोक्‍याचे प्रसंग कळतात. ते टाळण्यासाठी इतरांनी वापरलेले उपाय कळतात. या मीटिंगमधून एकटेपणाची जाणीव कमी होत जाते. मद्यमुक्तीच्या लढाईत मी एकटा नाही, हे केवळ माझ्याच एकट्याच्या वाट्याला नाही हे जाणवत जाते आणि नवा मेंबर ए. ए. परिसराचा घटक बनतो. तोही मग स्वतःच्या अनुभव कथनाने इतरांची व्यसनमुक्ती मजबूत करतो.
ए. ए. च्या मीटिंगचे सूत्र जरी अनुभव कथनाचे असले तरी ए ए.ची स्वतःची विचारधारा आहे. ही विचारधारा बारा पायऱ्यांद्वारे व्यक्त होते. या पायऱ्या केवळ दारूपासून दूर राहणे शिकवत नाहीत, तर स्वभाव बदलायला मदत करतात.
पहिली पायरी तुम्हाला नम्र बनायला सांगते. तुम्हाला वास्तवाला स्वीकार करायला सांगते. दारूपुढे आपले शहाणपण चालत नाही. हे एकदा पक्के कळले की पुढचा मार्ग मोकळा होतो. आतापर्यंत आपण स्वतःच्या हिमतीवर दारू सोडण्याचे अनेक प्रयत्न केले. पण आपण त्यात अपयशी ठरलो, तेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीच आपल्याला मद्यपाशातून बाहेर काढू शकते. दुसऱ्या पायरीत मांडलेली ही श्रेष्ठ शक्ती म्हणजे ठरावीक धर्माचा देव नव्हे, ही शक्ती प्रत्येकासाठी त्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे असेल. ही शक्ती ए. ए. ग्रुपच्या सामूहिकतेतून व्यक्त होत असते.
तुम्ही पहिल्या दोन पायऱ्या स्वीकारल्या की आपोआप तिसऱ्या पायरीवर येता. ही पायरी सांगते की जर तुमचे पिणे तुमच्या हातात राहिलेले नाही व तुमच्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीच तुम्हाला यातून बाहेर काढू शकते तर तुमचे जीवन, तुमच्या इच्छा आकांक्षा या शुभ शक्तीच्या स्वाधीन करा. आणि त्यासाठी तुम्हाला अधिकच जागृत व्हायला हवे. स्वत: ला शुभ बनायला सुरुवात करणे त्यासाठी आवश्‍यक आहे. आपले गुणदोष शोधणे, आजपर्यंत केलेल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारणे आणि त्या चुका पुन्हा न घडो म्हणून स्वतःला बदलते. हे प्रत्यक्ष कृतीत येऊ द्या. ज्यांना तुम्ही आजपर्यंत त्रास दिलात, त्यांची माफी मागा. त्यात कमीपणा नाही. त्यातून तुमचा अहंकार वितळत जाईल. तुमची अस्वस्थता नाहीशी होईल. या बरोबरच मानसिक बळ वाढवण्यासाठी प्रार्थना व ध्यान करत चला. शेवटची पायरी तर असे सांगते की हा सारा खटाटोप केवळ दारूपासून दूर राहण्यासाठी नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अधिक उन्नत होण्यासाठी आहे. जीवनात शांती व समाधान मिळवण्यासाठी आहे. तुम्हाला मिळालेला हा संदेश इतर मद्यपाशग्रस्तापर्यंत पोचवा. त्यांना मद्यमुक्त व्हायला मदत करा. पण लक्षात ठेवा, तुम्ही कोणावरही उपकार करत नाही. दुसऱ्याला मदत करण्याने तुमचीच व्यसनमुक्ती आणखी मजबूत होणार आहे.
पण हा सर्व बदल घडवून आणण्यासाठी घाई करण्याची आवश्‍यकता नाही. सबुरीने घ्या. स्वतःला बदलायला पुरेसा वेळ द्या. कोणत्याही बाबतीत अट्टहास नको. दारू कायमची सोडल्याची शपथही घेऊ नका, केवळ आजच्या दिवसाचाच विचार करा. शेवटी आपले आयुष्य एकेका दिवसानेच तर बनलेले असते.
आपणाला मद्यपाशाचा कायमस्वरूपी आजार आहे, हे कटुसत्य आपण स्वीकारलेच पाहिजे, पण तरीही दारूपासून लांब राहणे आपल्या हातात आहे, हेही तेवढेच वास्तव आहे. जीवनात मद्यपाशासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकत नाही, टाळू शकत नाही, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत व जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात आहेत पण आळसामुळे किंवा अज्ञानामुळे त्या करायचे आपण टाळतो. किंबहुना बऱ्याचदा आपल्या हातात काय आहे व हाताबाहेर काय आहे, हेच आपल्याला समजत नाही. म्हणून एएचे आपले मित्र प्रार्थना करतात. .

जे टाळणे अशक्‍य, दे शक्ती ते सहाया ।
जे शक्‍य साध्य आहे, निर्धार दे कराया ।
मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय ।
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया ।

राहणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

4 Nov 2008 - 11:14 am | प्रकाश घाटपांडे


आपले गुणदोष शोधणे, आजपर्यंत केलेल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारणे आणि त्या चुका पुन्हा न घडो म्हणून स्वतःला बदलते. हे प्रत्यक्ष कृतीत येऊ द्या. ज्यांना तुम्ही आजपर्यंत त्रास दिलात, त्यांची माफी मागा. त्यात कमीपणा नाही. त्यातून तुमचा अहंकार वितळत जाईल. तुमची अस्वस्थता नाहीशी होईल.


हे खर इतरांनाही लागु आहे. आपल्या विद्वत्तेच्या कोषात वावरताना एक उन्माद आलेला असतो. नशाच ती. त्या अंमलाखाली असताना कळफलक बडवताना हे जालावर घडत असते. उतारा म्हणजे "ह घ्या" अशा "लिंगो" मध्ये सांगावे.
पण गंमत म्हणजे ज्याला त्रास दिला आहे असे आपल्याला वाटते तो ही वेगळ्याच नशेत असतो. मग पुढे काय होते
तुमचे गुण तुमच्या पाशी आमचे आमच्यापाशी
तुमचे दोष तुमच्या पाशी आमचे आमच्या पाशी
तु लई भारी तर जा तुझ्या घरी.
लेखनावर प्रेम करणारी पण लेखकाला जोड्याने बडवणार्‍या प्रतिक्रिया यातुनच तयार होतात.
प्रकाश घाटपांडे