आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
13 Jan 2019 - 9:40 pm

अॅक्सिडेंटल प्रॉयमिनिस्टर*****

जनता दल राजवटीमध्ये जसे कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले आणि देवेगौडा यांच्या भाळी पंतप्रधान पदाचा मानटिळा लागला.

त्यात मुलायमसिंग, लालूप्रसाद यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि हेगडे,शरद यादव यांचे धोरणी दूरदृष्टी मनसुबे याचा परिपाक म्हणून देवेगौडा यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही.
अगदी तसेच कुणाच्या ध्यानीमनीही नसलेले (पंतप्रधान होतीलच म्हणून) अश्या फारसं उपद्रवमूल्य नसलेल्या व्यक्तीला (फक्त कॉंग्रेस ला एकनिष्ठ राहिले आहेत हा बोनस गुण) मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले.
आता हे माहीत असलेलेच तपशील पुन्हा एकदा सांगण्यात काय हशील असं वाटत असेल सुद्धा,पण हा काही सिंघम नाही की,रजनीपट नाही याचं भान ठेवून दिग्दर्शक (संजय बारूआच्या नजरेतून) हा पंतप्रधान पदाचा लेखाजोखा आणि तत्कालीन अदृष्य सत्ताकेंद्रे (त्यांच्या कुरघोड्या) याचा राजकीय सारीपाट मांडला आहे.
कथानायक मनमोहन सिंग असले तरी, फक्त त्यांचेच उदात्तीकरण किंवा अवहेलना असं केलेलं नाही.ज्या ठिकाणी ममोनी कणखर भूमिका घेतली तिथे यथोचित सन्मान देण्यात दिग्दर्शकाने (आणि पटकथा संवाद लेखकाने सुद्धा) कुचराई केली नाही हे आवर्जून लक्षात येते.
आता काहींचा आक्षेप असेलही परंतु ज्या व्यक्ती हयात आहेत, संदर्भ ताजे आहेत (विशेषतः फक्त दशकांपूर्वी असलेल्या घडामोडींची) अशावेळी तोलून मापून वाव आहे हे लक्षात ठेवावे लागते.

ममोंच्या राजकीय कारकीर्दीत नरसिंह राव यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. अगदी तसेच बारूआंच्या लेखी मनमोहन सिंग यांचे (त्यांच्या मनात) आहे.ते वरचेवर ठळकपणे जाणवते.
पक्षश्रेष्ठींच्या मूकसंमती ने आणि कृपाशीर्वादाने पंतप्रधान पदाचा अनादर करणे हेच इतिकर्तव्य असल्या सत्तापिपासू नेत्यांबाबत अगदी मोजके पण परिणामकारक प्रसंग पेरले आहेत ््
वाजपेयींच्या न बोलता सूचक संवाद साधण्याचा सकारात्मक प्रसंग अशा बाबी उल्लेखनीय आहेत.
पात्र निवड ही कुणाला खटकेल वा खटकणार नाहीसुद्धा.
अनुपम खेर यांचे काम (देहबोलीतून आणि मुद्रभिनयातून) संयत पण सशक्त अभिनयाने रंगले आहे.
अक्षयखन्ना बारुआ जगलाय इतका प्रसंगानुरूप शिष्टाचार, सुरक्षित अंतर, मुत्सद्दी व झारीतील शुक्राचार्य,शकुनी यांच्याशी केलेला तोडीसतोड सामना आवर्जून बघण्यासारखे.
इतरांना मोजून मापून वाव आहे.सोनियांची भूमीका करणारी विदेशी अभिनेत्री ने अभ्यास केला आहे हे नक्की जाणवते
राहुल गांधी यांच्या भूमिकेतील कलाकाराने राजपुत्राला न्याय दिला आहे.
पूर्णपणे कपोलकल्पित असते तर सिब्बल आदि फौज असलेल्या पक्षाने पुस्तकावर बंदी घातली असती आणि खटलासुद्धा दाखल केला असता.
जे पुस्तकात आणि सिनेमात दाखवलं आहे ते सत्य आणि सत्यच आहे असा दावा कुठेही केलेला नाही पण पुस्तकाचा स्वीकार केला म्हणजेच तथ्यांश नक्कीच आहे.
हतबलता, अपरिहार्यता आणि पक्षनिष्ठा यांच्या कात्रीत सापडलेल्या एका उत्तम अर्थतज्ञ व्यक्तीला (त्याच्या राजकीय गुरूला मृत्यू पश्चात पक्षाने दिलेली अवमानकारक वागणूक अनुभवातून) काहीच शिकले नाहीत याचं आश्चर्य जरूर वाटते

बराच भाग बारीक तपशील लक्षात ठेवले तर उमजून त्यातला न सांगताच दिलेला संदेश कळतो.

दस्तुरखुद्द मनमोहन सिंग यांनाही हा सिनेमा आवडला असावा.

पेज थ्री पुस्तकांपेक्षा त्याची गोची सांगण्यासाठी सिनेमापेक्षा सशक्त माध्यम दुसरं कुठलंही नाही हे नक्की!!!

भाजपद्वेषींनी नक्कीच पहावा असा सिनेमा.

माझ्या मुलाला हट्टाने हा सिनेमा पहावसा वाटला आणि आवडला हेच मला भावले.

पिटातील प्रेक्षकांचा चुकार वाचकांची पत्रेवाला नाखु

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

13 Jan 2019 - 10:02 pm | यशोधरा

थोडक्यात परीक्षण आवडले. चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट बघेन असं वाटत नाही पण वेड्या डब्ब्यावर आला तर नक्की बघणार.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2019 - 10:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

नक्की बघायलाच हवा
पैजारबुवा,

कुमार१'s picture

14 Jan 2019 - 11:21 am | कुमार१

चांगला परिचय
सावकाश तू नळीवर वा NF वर बघू

खिलजि's picture

14 Jan 2019 - 3:47 pm | खिलजि

अक्षय खन्ना , हा माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहे , त्याचे चित्रपट नेहेमीच जरा हटके असतात . त्यामुळे मला तरी हा चित्रपट थेटरात जाऊन बघायची इच्छा आहे . बघू पुढे काय होतंय ते .
एकंदर लिखाण छान झाले आहे आणि हे वाचून पुन्हा एकदा चित्रपट पाहण्यासाठी मन उचंबळून आलेले आहे ..

कधी काळी , मॅटिनीचा राजा असलेला आणि ब्लॅक करणाऱ्यांचा मोठा गिर्हाईक असलेला , एक तर्हेवाईक गिर्हाईक

स्वलिखित's picture

14 Jan 2019 - 10:29 pm | स्वलिखित

कधी काळी , मॅटिनीचा राजा असलेला आणि ब्लॅक करणाऱ्यांचा मोठा गिर्हाईक असलेला , एक तर्हेवाईक गिर्हाईक____आता कळले इतकी मिरची का लागते ते

मला आपला प्रतिसाद व्यवस्थित कळलेला नाही आहे . मिरचीप्रकरणावर जरा विस्तृत प्रकाश टाकलात तर बरे होईल ,, आणि राहिला " मॅटिनीचा राजा" तर ते बिरुद आम्ही लग्नानंतर तिलांजली देऊन मोकळे झालो आहोत . ते दिवस काही औरच होते ..

चांगला परिचय.
आवडला.