सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?
काल तेरावा झाला.आज गंगापूजन.त्या फोटूच्या पुढंचं बारकाली पोर जेवत होती. वश्या ही त्यातचं होता.त्याला काहीचं कळत नव्हतं.अजून साळात त्याचं नावच नव्हतं टाकलं.आवदाच साल टाकायचं ही नव्हतं.चुलतीची बारकी पोरगी…सीती..! लयं गांधनमाशी. आगीचं घरचं ती.तिच्याच हा वाट जायचं उगच तिला हात लावायचा.ती हात लावला की किरकास आरडायची.ती आराडली की हयो नुसता पळायचा.बाकीची गाबडी मग नुसती हासायची.कुणी त्याला इचारलं की दादा कुठं गेलेत रं तुझं. तर तेव्हं म्हणयचा….. देवाच्या घरी खाऊ आणायला. असं तेव्हं बोलला की आय नुसती रडायची.आता त्याला काहीच कळत नव्हतं. लहान आसलेलं बरचं म्हणायचं. त्याचा काळजाचा असा डोंभ तरी होत नसलं ना ?
सारं आवरून आम्ही बाहेर आलोत. मामा,आई,मी व वश्या रस्त्याला लागलोत. मला काळेगावाला बोर्डींग सोडायला मामा नी आई निघाले होतं.मोठाई पार शिवणीच्या पटटीत होती. ती आता पार थकली.तिला चालवत नाही. आता दादा गेला नी ती गप्पच झाली.म्हतारपणाला देवानं लयं दु:ख दिलं.नवरा गेला इज पडून.आता कर्ता धर्ता पोरगा गेला. पोटचा गोळा सा-या लोकांनी तिच्या समोर जाळून टाकला.ती नुसती आरडत राहीली.तिची दातखिळी बसं. लोकाला वाटायचं गपकून तिचा श्वास निघून जाईल.तिचा श्वास सुटला नाही. उलट ती तडफडत राहीली.मरणं मागून थोडचं मिळत?
एक लेक गेला हे जग सोडून…. आता सांज्च्याला दुसरा जाणार कारखान्याला पाठीवर बि-हाडं टाकून. आयीनं अर्धा कोयता केला होता.दादाचं कर्ज फेडायासाठी मुकादमाचा नुसता तगा होता .आईचं टॅक्टरं उया येणारं होतं.मोठाई एकटीचं राहणारं घरी. गावाल्या आमच्या घरी.पडकं. चारं पत्रयाचं.तिथचं ती राहती.दादान फाशी घेतली तवा तिला इथं वस्तीवरल्या घरी तिला आणलं होतं. नाहीतर एकटीचं राहती त्या वाडयात भूतावाणी…
आज सारेच पांगणारं होतोत आम्ही.तिला ही गावातल्या घरी जायचं होंत. त्या घराचं एक खीळपाटं पडलं होंतं. तेवढं रचून दे जातानी असं ती नानाला लयं बा-या म्हणाली.त्यांनी नाही लक्ष दिलं. त्यांच्या माग ही लयं काम होती. दादाचं सारं त्यानाचं करावं लागलं होतं.चुलती एकादा चांगलीच वसाकली.” रहा की गप तिथं. कोण खातं तुम्हाला?
“मला कशाला कोण खाईल? राहते तशीचं. माणं काय आता सोनं व्हायचं?” ती पुनहा कुणला म्हणली नाही. गप झाली.ति चं ऐकलं असं कोण होतं तिचं आता.
जिथं दादाला जाळलं होतं तिथचं.त्या दगडाच्या खिळयावर दगडं टकीत होती.तिनं तिथचं एक आळ केलं होतं. त्यात मोठी चाफयाच्या झाडाची फांदी लावली होती.त्या झाडाच्या जवळचं तुळसं पण लावली होती.माझ्या दादाची समाधी बांधावी अशी इच्छा होती मोठाईची .पण आयनी नाय बांधली.आय तरी कुठून बांधीनं ? दाव्यला ना दिवसालाच मुकादमानं पैसं दिलं होतं. कारखान्याला न्यायाला बाजरी नव्हती. पाच पायल्या बाजरी मामानी त्याच्या बागायदाराकडून आणली होती.समाधीचं कुठं घोडं धामटीनं?
आम्ही आलोत की काठी टेकीत टेकीत… पार बांध चढून वर वाटला आडं आली. मामा सहज म्हणाला.”मामी कशाला उन्हात तडफडताहेत आता?”
“कशाला तडफडू आता….काय उरलं माझं ? बसल्या जाग्यावर दम नाय निघत.नुसतं पोटात कालीत बघा. सारं पोटातलं खंवधळत .नुसतं चित्र पुढं येतेत त्याचं.नुसतं आग आग व्हती जीवाची.”
“आता त्याला काय इलाज.मराणं काय कुणाला चूकलं ? इसरायचं हळूहळू…”
“आता कशाचं इसरतं? हयो दु;खचा जाळ महया संगच येणारं….”
“आता आपण काय जीव दिला तरी ते काय परत येणरेत का?”
“म्हतारं पणाला काय हयो दिवस आणलं त्या दुश्मानं म्हयावर….त्याच्या अगोदर मला न्यायचं व्हतं त्यानं.तिचं डोळ पुन्हा दाटून आलं. देवाला मोठाई सारख्या शि व्या देती.म्हतारी मात्र देवाला भेत नाही. ती म्हणायची देवाची माझी दुश्मनी.त्याच्या कमून आरत्या करू? चेह-यावरल्या सुरकुत्याच्या रेषातून घळाघळा पाणी ओघळू लागलं.पदर डोळयाला लावला. पदूर पार ओला झाला.
“आता माझी ही लेकरं वनासी झाली.उघडी झाली.” माझ्या चेह-यावरून तिनं हात फिरवला. तेव्हं खरबूड हात मला टोचला.त्या टोचण्यात उगचं मला दादाचा स्पर्श वाटला. आजीनं माझी लाडानं पप्पी घेतली.माझ्या चेह-यावरून हात फिरवून बोटं मोडली.माझं डोळं पुन्हा भरून आलं.तिनं कबंराची पिसी काढली. त्यातून चापून चापून एक पाच रूपायाचा ठोकळा काढला.त्यात तेवढाचं एक असेल! माझ्या हातावर मांडला.पुन्हा माझा चेहरा कुरवाळला.
“चांगलं शिक बाई. त्याची लयं इच्छा होती तुला शिकवायची.मोठं सायबीनं करायचं व्हतं तुला.तिचं ते गहीवरले शब्दं माझं काळीजं पघळून गेले.मी तिच्या पाया पडायाला खाली वाकले.
आई,खरचं मी लयं अभ्यासं करीन. मी मोठी होईन. दादा म्हणायचं आंजे,तू इन्स्पेक्टरं हू गडया.”
“ पाव्हणं तसलं काही मनातआणू नका. हे आमचं खानदानी रक्त हाय. हे नाय नासायचं. हिचा पाय नाय वाकडा पडायचा तिनं पुन्हा मला कुरवाळलं.माझं डोळं डबडबून आलं. आईच्या डोळयातून पाणी ओघळलं होतं.ती गपगप उभी होती.
“ शिकवायचं तिला.बोर्डगीत नाव घातलं तिचं.” मला पैसं दिलेले वश्यानं पगीतलं. त्यानं तिथचं खळ धरलं. मला पण पायजेत.जाग्यावरचं पायानं माती उकरू लागला.थयाथया नाचू लागला.आजीनं पुन्हा पीसीत चापल्यावाणी केलं.
“नाय तर राजा, तेवढचं होतं.” आता आजीचं बोलणं वश्याला कुठं कळतं असतं?त्यानं मग तर पिपाणीचं सुरू केली. आईनं धमकून पाहीलं. ते गप बसत आसतोस व्हयं कुठं?म्याचं मझ्याकडलं पैसं त्याला दिलं. तव्हा तेव्हं गप झाला.
“आता जा घरी. आता परत येते हीला सोडून.मग सकाळ सकाळ गावात सोडीन.”
“ आग आक्के ,म्हतारी एकटीच कशी राहील?अंधार कीडं पडणं आता.” मामाला मोठाईची काळजी वाटली.
“ये, मला कोण खातयं? माजं दोन वाघं इथं.”दादाच्या व आण्णंच्या दगडाकडं हातं करत मोठाई म्हणाली.
“चाफयाच्या झाडाला थोडं आळं करते. हे एवढं शॅण टाकते.हे झाडं मोठं झालं तर तेवढीचं सावली पडलं माझ्या राज्याच्या अंगावर…. आलचं झाडं तर फुलं पडतेल अंगावर.”शेणाची पवटी उचलायला खाली वाकली. एका हातात काठी. एका हातान शॅण घेऊन चालू लागली. मामा , आय, मी नुसतं तिच्या कडं पगत बसलोत.चालताना ती तिरघड होती.
“आक्के ,म्हतारी, कशी राहीलं एकटी.आता श्रीरपा दाजी आज हालत्यालं सांजंच्याला.तू उदया. आयला माणसाचा जल्मच लय आवघडं. काय भोग आलेत तिच्या वाटयाला.तिचं डोळं झाकायचं ते लेकाच्या थडग्यावर पाणी घालायचा टायम आला तिच्यावर.लय दिवस नाय टिकायची ती आता. पार गाडगाडली.”
“मी तरी काय करू? कारखन्याला नसतं गेलं तर संभाळलं आसतं. महया माग हयो कहार..लयं बुचका करून ठेवलाय त्यांनी रीनाचा.आता हयो लेक हायतं. म्हतारीचा इचारचं करत नाय.”
“त्याच्या भी मागं लयं व्यापं.त्याला तरी काय बेलापूराला गेल्याशी भागतं का? हयो कुणबाटयाचा जल्मचं लयं वाईट.”
“पुढच्या वर्षी नाही जाणारं. पोरीची सोय भी लागलं.म्हतारी भी राहील माझ्या पाशीच.” आयी म्हणाली.आता आय तरी काय करणार होती. दादा व्हता तव्हा ही ते म्हतारीला संभाळू शकले नाहीत. आता आय काय करील ?तिला तर जाणचं आल.त्या मुकादमाचं सारखा तगादा माग.
“म्हतारी कसं करीत आसलं. कसं खात आसलं ?” मामाला प्रश्नच पडला. मामाला कुणाची भी लय दया येती.त्याचं काळीजच लयं हालकं.
“खाती. कसं भी. सकाळ दुपार करती थोडी काही खयाला मंगळवारी, शुक्रवारी ,पुनवेला बस्ती भोन्याच्या देवळात…. कधी कधी जोगवा मागती.” हातावर परडी आली म्हणून मोठाई अराधीण झाली. चार घर मागून तरी खाती. मोठाई जोगवा मागती पण पोरं पोरी लयं चिडीत्यात तिला.तिची राडोळी करत्यात. दादा नव्हता मागून देत तिला जोगवा. जोगव्याला मोठयाई निघाली की दादा खवळयाचा.
“आरं, हे देवीचं ताटं….तसं नक्कू करू….उग चार घर मागते.” असं मोठयाई म्हणायची खरं पण सा-या गावात ती जोगवा मागायची.पोतावर घालायला तॅल मागायची. चांगलं बूटकूलं भरून तॅल आणायची. आता तर जोगावा मागूनच खाती. आरं,ती आमच्या सा-याची पोंटं भरीत होती.तिला एकटीचं पोटं भरणं काय अवघडं.”
आम्ही पुन्हा सारंच माग वळून पाहत होतो. तेव्हा मोठाई कळशी घेऊन पाण्याला चालली होती.तिला त्या आळयात पाणी ओतून चाफा फुलवायचं होता. मोठाई साधी म्हतारी नव्हती. देवासंगच तिची दुश्मनी होती.
परशुराम सोंडगे,पाटोदा
9527460358
अजून कथा वाचण्यासाठी भेट दया व मला फालो करा
Blog:-prshuramsondge.blogspot.com
प्रतिक्रिया
23 Nov 2018 - 7:21 am | विजुभाऊ
एकदम डोळ्यासमोर उभे राहिले चित्र.
23 Nov 2018 - 9:15 am | परशुराम सोंडगे
मनस्वी धन्यवाद
23 Nov 2018 - 6:30 pm | नाखु
फार दिवसांनी इतकी सशक्त कथा वाचली.
कोरसाबाहेरचा कोरडाठाक नाखु वाचकांची पत्रेवाला
24 Nov 2018 - 1:37 pm | परशुराम सोंडगे
धन्यवाद
24 Nov 2018 - 1:37 pm | परशुराम सोंडगे
धन्यवाद
24 Nov 2018 - 1:59 pm | अथांग आकाश
हृदयस्पर्शी कथा!
पण छोट्या वाक्यांच्या आवडीपायी दोन दोन शब्दांनंतर पूर्णविराम देण्याचे टाळा राव! वाचताना रसभंग होतो, तिथे स्वल्पविराम वापरा असा अनाहूत सल्ला देतो!
बाकी लिखाण आवडले!
25 Nov 2018 - 3:19 am | परशुराम सोंडगे
मनस्वी धन्यवाद
प्रेरक प्रतिसादाबद्दल व अमूल्य सल्ल्याने बाबत
25 Nov 2018 - 9:48 am | विशुमित
तुमचं लिखाण जणू सुई घेऊन छाताडावर बसले आहे, अन वाक्या गिनीज काळजावर टोच्या मारत आहे.
....
ही परिस्थिती फक्त शिक्षणच बदलू शक्ती. आळ्यातला चाफा फुलवू शकते.
...
अप्रतिम..!
25 Nov 2018 - 9:39 pm | परशुराम सोंडगे
मनस्वी धन्यवाद
25 Nov 2018 - 9:39 pm | परशुराम सोंडगे
मनस्वी धन्यवाद
25 Nov 2018 - 9:39 pm | परशुराम सोंडगे
मनस्वी धन्यवाद