आज (३१ ऑक्टोबर) महाराष्ट्र टाईम्स आणि सामना मधे वाचलेल्या बातम्यांप्रमाणे बाळासाहेब ठाकर्यांनी माहीती असलेली बातमी, "उद्धवच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली असताना मला भेटायला येण्याचे काय प्रयोजन ? " असे म्हणत काही प्रमाणात अधिकृत केली.
जो पर्यंत शिवसेना हा किमान महाराष्ट्रासाठी प्रबळ पक्ष आहे, तो पर्यंत त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रावर सहज पडू शकतो. त्यामुळेच या घटनेचे महत्व.
उद्धव ठाकर्यांबद्दल बरेच काही ऐकत आलो आहे - त्यांच्या मितभाषीपणा बद्दल, तसेच राजकारणी असण्यापेक्षा व्यवस्थापकीय दृष्टीकोन असल्याबद्दल वगैरे... शिवसेनेला एक अधुनिक दिशा देण्याची ही संधी एकाअर्थी बाळासाहेबांनी त्यांच्या डोळ्यासमोरच दिली आहे. केवळ वडापाव संस्कृती आणि मॉलमधील नोकर्या यांच्यावर भांडायचे का मराठी समाजाला विविध क्षेत्रात पुढे आणण्यासाठी, त्याचा त्यांनास्वतःला, समाजाला, देशाला (आणि अर्थात शिवसेनाला) फायदा करून घेण्यासाठी दृष्टी देयची ह्याचा विचार करायला लागेल.
वयाच्या ८-१० वर्षांपर्यंत मुलांनी रडारड केली तर ती योग्य असो वा नसो समजू शकतो, १० ते २० पर्यत टवाळक्या पण सभ्यतेच्या मर्यादेत असल्यातर वयपरत्वे म्हणू शकतो, पण चाळीशीचा माणूस जर लहान मुलासारखा आरडाओरडा अथवा विशीतील टवाळक्या करत वागू लागला तर त्याला प्रौढत्व (मॅच्युरीटी) आले असे म्हणता येणार नाही... जे माणसांचे तेच शिवसेनेसारख्या विशिष्ठ हेतूने तयार झालेल्या राजकीय पक्षाचे आहे.
शिवसेना निवडणुकीत नसलेला नगण्य पक्ष होती, पुढे महापालीका मिळवली... नंतर "एकच लक्ष" म्हणत विधानसभा लढली पण जनतेच्या दुर्लक्षाने स्वतःचेच "लक्ष" करून घेतले...सरते शेवटी युतीच्या आधाराने का होईना पण विधानसभा मिळवली - पण बर्याच अंशी जनतेच्या किमान अपेक्षांचापण भंग झाला... "त्यांनी चाळीस वर्षे खाल्ले, मग आमची पाच वर्षे असली तर काय बिघडले?" हे ऐकण्यासाठी काही मते दिली नव्हती... त्याचे वाईट परीणाम त्यांच्या राज्यात झाले नसतील इतके गेले दहा वर्षे त्यांच्या (शिवसेनेच्या आणि या संदर्भात भाजपाच्या) कमकुवत होण्याने झाले. स्वतःच्या फायद्यासाठी दूरदृष्टी ठेवताना स्वतःच्या राज्यासाठी मात्र लघूदृष्टी (शॉर्टसाईटेडनेस) ठेवली गेली... असे का व्हावे हा प्रश्न अनेक सामान्यांना पडला असेल, जरी आश्चर्य वाटले नसले तरी...
नंतरच्या काळात घरातील आणि घरभेद्यांच्या वादळाने शिवसेनेची नौका भरकटणार असे वाटले, पोटनिवडूका हरल्या पण नंतर स्वकर्तुत्वाने त्यांची भरपाईपण पण करून दाखवली आणि महानगरपालीका पण मिळवून दाखवल्या...अर्थात हे यश उद्धवचे आहे असे म्हणता येईल. त्यांचा चेहरा, नाव आणि नेतृत्व म्हणून शिवसेनेशी असलेली संलग्नता या काळात व्यवस्थित पुढे आणली गेली. दुरून पहात असताना त्याला त्यांनी न्याय दिला असे पण वाटते...
आता अर्थात त्यांच्या हातात पक्षिय सत्ता आली आहे, कदाचीत पुढच्या विधानसभा निवडणूकीत विधानसभेवर पण भगवा फडकवत "चेंज ऑफ गार्ड" पहायला मिळेल. पण ते सर्व होत असताना मला राहून राहून एक अब्राहम लिंकनचे , मला आवडणारे एक वाक्य आठवते: "Nearly all men can stand adversity, but if you want to test a man's character, give him power."
आज शिवसेनेच्या संदर्भात वरील अर्थाने उद्धवच्या "कॅरेक्टर"ची चाचणी चालू झाली आहे. त्यात ते किती यशस्वी ठरतात यावर त्यांचे आणि शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहेच पण तुम्हा-आम्हाला आवडो-न आवडो, पटो - न पटो पण सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, महाराष्ट्राचे भवितव्यही अवलंबून आहे.
त्या अर्थी हा "चेंज ऑफ गार्ड" महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरोत ही आशा - वेडी का वास्तव ते काळच ठरवेल.
डिसक्लेमरः मी कुठल्याच पक्षाचा सदस्य नाही. अमेरिकन भाषेत "स्वतंत्र" आहे. आपल्याकडे राजकीय उत्क्रांती घडवून आणायची असेल तर प्रत्येक सुजाण मतदाराने मतदान करून गरज असेल तर दरवेळेस सत्तांतर घडवून आणण्यात मदत करावी. जातीच्या, धर्माच्या राजकारणाला बळी न पडता निव्वळ पाच वर्षात आपण निवडून दिलेल्या नगरसेवकाने, आमदाराने, खासदाराने, मंत्र्याने नक्की काय केले आणि त्याचा मला, माझ्या सभोवतालाला नक्की काय फायदा अथवा तोटा झाला, ह्याचा विचार करून मग मतदान करावे..जेंव्हा आपल्याकडील राजकारण्यांना कळेल की राजकारण हे साडी, भांडी आणि बाटली देऊन विकत घेता येत नाही तेंव्हा खरा बदल घडायला सुरवात होईल.
प्रतिक्रिया
1 Nov 2008 - 8:35 am | अभिजीत
लेख आवडला.
>>"चेंज ऑफ गार्ड" महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरोत ही आशा - वेडी का वास्तव ते काळच ठरवेल
हे सांगणे अवघड आहे पण महाराष्ट्रात एका नव्या नेत्तृत्वाचा उदय झाला आहे नक्की.
शिवसेनेच्या कार्यपद्धतीत उद्धव ठाकरे यांनी केलेला लक्षवेधी बदल म्हणजे ग्रामीण/शेतकरी/बहुजन जनतेला शिवसेनेकडे खेचण्याचे प्रयत्न.
पक्षाचा पाया वाढवण्याचे प्रयत्न करणे हे राजकिय शहाणपण त्यांच्यात आहे ही चांगली गोष्ट आहे.
दोनेक वर्षापासुन शेतीच्या प्रश्नावर महाराष्ट्रात दौरे/आंदोलनं करताना पाहून शिवसेना शहरी भागातून ग्रामिण भागाकडे जात आहे असे दिसले. यात सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली/चेष्टा-मस्करीही झाली, पण उस, कापुस आंदोलनात त्यांना मिळालेला प्रतिसाद बघून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला परत प्रतिस्पर्धी मानायला सुरुवात केली.
त्यांचे इतर काही उल्लेखनिय प्रयोग -
- रिपाई/दलित पँथर बरोबर युतीचे संकेत देवून 'सोशल इंजिनीयरिंग' चे प्रयोग
- 'मी मुंबइकर' चा प्रयोग (हा फसला पण तेव्हा एकदम फ्रेश वाटला होता)
- अभिजीत
1 Nov 2008 - 3:41 pm | सुनील
आंध्रात एन्टीआर यांनी तेलगू अस्मितेच्या मुद्द्यावर तेलगू देशम या पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या आठच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळवले. एन्टीआर यांची अभिनेता म्हणून असलेली लोकप्रियता जमेस धरूनही, शिवसेनेला असे यश कधीच मिळाले नाही, असे म्हणावे लागेल. तीन दशकांनंतर विधानसभेवर भगवा फडकला, पण तोही भाजपाच्या साथीने - स्वबळावर नव्हे.
शिवसेनेच्या वाढीला दोन प्रकारच्या मर्यादा पडलेल्या दिसतात - भौगोलीक आणि सामाजिक.
मूळात शिवसेनेचा मराठी अस्मितेचा मुद्दा हा कधीच निर्भेळ मराठी अस्मितेचा नव्हता. परप्रांतीयांमुळे हिरावले गेलेले रोजगार हाच मुद्दा प्रभावी होता. साहजिकच शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पलीकडे कित्येक वर्षे सरकलीच नाही. पुढे महाराष्ट्रात हातपाय पसरवायला त्यांनी हिंदुत्वाचा आधार घेतला आणि मराठी अस्मिता पुन्हा बॅक बर्नरवर गेली!
दुसरे म्हणजे, अवघा मराठी भाषिक समाज हा शिवसेनेबरोबर कधीच गेला नाही. राज्यात मोठ्या संख्येने असलेला मराठी दलित समाज तर शिवसेनेच्या विरुद्धच होता. मराठी उच्चावर्णियांनाही शिवसेनेबद्दल फारसे ममत्व नव्हते. त्यांचा ओढा होता तो संघाकडे. मराठा समाज हा प्रामुख्याने काँग्रेसबरोबर होता. सेनेचा मुख्य जनाधार होता ओबीसी समाज.
उद्धव यांनी ह्या दोन्ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. वर अभिजित यांनी शिवसेनेने हाती घेलेलेल्या शेतीच्या प्रश्नाबद्दल लिहिलेच आहे. "मी मुंबईकर" मोहिमेद्वारी त्यांचा अमराठींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न जरी पूर्ण फसला असला तरी दलित आणि उच्चवर्णियांच्या मनातील शिवसेनेबद्दलची अढी घालवण्यात ते बर्यापैकी यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
सध्या शिवसेनेपुढे सर्वात मोठे अव्हान उभे आहे ते राजचे. त्या आव्हानाला उद्धव कसे तोंड देतात ते पहायचे.
बकिंगहम पॅलेसमधील चेंज ऑफ गार्डचा सोहळा हा पर्यटकांच्या मनोरंजनासाठी असतो. सेनेचा तसा ठरू नये! महाराष्ट्राला प्रबळ प्रांतिक पक्षाची आवश्यकता आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Nov 2008 - 12:40 am | विकास
सध्या शिवसेनेपुढे सर्वात मोठे अव्हान उभे आहे ते राजचे. त्या आव्हानाला उद्धव कसे तोंड देतात ते पहायचे.
कुठेतरी अजून वाटते की कुठल्यान कुठल्याप्रकाराने पण हे टर्मिनेटरचे दोन तुकडे परत जुळले जाऊ शकतात. जेंव्हा निवडणूकांनंतर खरी एकमेकांची गरज लागेल तेंव्हा दोन्ही बाजूने "शहाणपण शाबूत" राहील अशी आशा करूया ("commonsense prevails").
1 Nov 2008 - 5:28 pm | सहज
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली "यशस्वी पक्ष" बनतोय की महाराष्ट्राला चांगले नेतृत्व देतोय हे काळच ठरवेल.
मनसे, शिवसेनाच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा जास्त फायदा व्हावा ही अपेक्षा.
1 Nov 2008 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सत्ता संघर्ष हे वसंत पळशीकरांनी संपादीत केलेले एक चांगले पुस्तक सध्या बाजारात आले आहे, सध्याच्या महाराष्ट्रातल्या पक्षांचा प्रवासाचा चांगला आढावा घेतलेला आहे. असो,
शिवसेना, या पक्षाने दादा, आप्पा, साहेब, ही सर्व परंपरा मोडली आणि सामान्य माणसाकडे सत्ताकेंद्रे आणली याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. मात्र आता त्याचाही काँग्रेस झाला असे म्हणनारी मंडळी आपल्याला जागोजागी भेटतील. बाळासाहेबांच्या राजकारणातील स्वेच्छा निवृत्तीनंतर शिवसेनेचा पुढील प्रवास कसा असेल या बाबती विश्लेषण करणे कठीण आहे. शिवसेनेचा वारस शोभतो तो राज ठाकरे, पण उद्ध्वच्या हातात नेतृत्त्व देऊन एक मिळमिळीत नेता, पण बहुसंख्य लोक मागे अशा प्रतिमेमुळे नेताही सद्य परिस्थितीत धकून जाईल. शिवसेनेला काँग्रेसच्या विरोधात काही ओरड करण्याची गरज नाही. हे सरकार त्यांच्या नशिबाने जाइल. पण शिवसेना काय देणार ! मराठी माणसांना नौकर्या, सामाजिक विकास, स्वच्छ राजकारण, शासन व्यवहारात पारदर्शकता, मराठी माणसाच्या मागे खंबीपणे उभे राहील. हिंदु म्हणुन अपराधी असणार्यांना वकील देणे, म्हणजे कट्टर हिंदुला पुन्हा शिवसेनेकडे वळवणे, या आणि अशा कितीतरी गोष्टींचे नेतृत्त्व करण्याची ताकद उद्धव ठाकरेंमधे आहे, मला मात्र ते त्या योग्यतेचे वाटत नाही. उद्धव ठाकर्यांना मुख्यमंत्री करावे असा एक गट म्हणतो. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर नियंत्रण राहील असे असले तरी सर्वात डोकेदुखी ठरणार आहे ती मनसेच. कारण दोघांचाही अजेंडा एकच आहे,ज्याचा मी वरती उल्लेख करत आहे. मग महाराष्ट्राला भले दिवस येणार असे म्हणायचे का तर मला वाटते नाही ! कारण पुढील काही वर्षात शिवसेनेत मोठा नेता असणार नाही. त्यांचे काही पदाधिकारी विखूरले जातील तेव्हा सेनेची मोडतोड होईल. बरेच काही होणार आहे, तेव्हा आपण मात्र महाराष्ट्राला भले दिवस यावे या पेक्षा दुसरी कोणती अपेक्षा ठेवणार ?
-दिलीप बिरुटे
4 Nov 2008 - 12:57 am | विकास
मग महाराष्ट्राला भले दिवस येणार असे म्हणायचे का तर मला वाटते नाही ! कारण पुढील काही वर्षात शिवसेनेत मोठा नेता असणार नाही.
महाराष्ट्राला चांगले दिवस हे शिवसेना अथवा उद्धव अथवा अजून कुठल्या एका व्यक्ती/पक्षामुळे येतील असे मला म्हणायचे नव्हते आणि तसे म्हणत नाही आहे. लेखाचे तत्कालीन निमित्त हे उद्धव आणि शिवसेना असले तरी...
महाराष्ट्राला मोठे दिवस येयचे असतील तर स्वतःचे "नेतृत्व" सिद्ध करण्यासाठी काहीतरी भरीव/सकारात्मक करायला लागणे - सत्तेत असल्यावर अथवा नसताना याची जेंव्हा विविध पक्षातील नेत्यांना गरज वाटेल, त्या आणि केवळ त्याच संदर्भात विविध राजकीय पक्षांमधे आणि नेतृत्वामधे जेंव्हा इरीशिरीने (स्पर्धात्मक) काम करायची वेळ येईल तेंव्हा चांगले दिवस येऊ लागतील. तसे होण्यासाठी सामान्य जनतेला विविध पद्धतीने राजकीय नेतृत्वांना जाब विचारावा लागेल...
एक साधे उदाहरण आपापल्या मतदार संघातील प्रत्येक नगरसेवक, आमदार, खासदार यांना लाखांपासून कदाचीत कोटींपर्यंत आपापल्या मतदारक्षेत्राचा विकास करायला म्हणून निधी असतो. तुम्हाला तुमचे नगरसेवक, आमदार, खासदार नक्की कशाला वापरतात याची कल्पना आहे का? कधी या वरून प्रश्न विचारला आहे का?
उद्धव ठाकरे/शिवसेना हे त्यातील एक घटक आहेत. तसेच काँग्रेस (जे कोणी "श्रेष्ठींनी " ठरवलेले नेतृत्व), राष्ट्रवादी (सुप्रिया सुळे + साहेबांना जो कोणी भावेल तो), भाजप (मुंढे. गडकरी + ?) आणि अर्थातच स्वयंभू होत असलेला राज ठाकरे...
2 Nov 2008 - 7:00 am | विसोबा खेचर
काळाच्या ओघात शिवसेनेने केन्द्रात सत्ता मिळवण्याकरता हिंदुत्वचा नारा दिला. पण त्यामुळे कुठेतरी मराठीचा मुद्दा मागे पडला..
बाळासाहेबांनीही आता जवळजवळ निवृत्तीच जाहीर केली आहे.. त्यांचं जो पर्यंत नेतृत्व होतं तो पर्यंत ठीक होतं. शिवसेनेमध्ये उद्धवच काय परंतु बाळासाहेबांव्यतिरिक्त इतर कुणाचंही नेतृत्व आम्हाला मान्य नाही. गेल्या ४० वर्षांपासून नाही, आताही नाही..!
आता मराठीचा मुद्दा, महाराष्ट्राचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे तेव्हा एक मराठी माणूस या नात्याने या पुढे माझं मत मनसेला...!
तात्या.