विसरलेल्या आठवणी वा नकळत निसटून गेल्या क्षणांचा मोह कधी परतून एकांतात एखादा विराग सूर छेडून मनाला वाऱ्याबरोबर हलके करेल वा एखाद्या ओल्या कापसाच्या ओझ्याप्रमाणे भारी करेल हे सहसा सामान्य बुद्धीच्या पालिकडे! कदाचित काळाला खुणगाठ बांधता आली असती वा एखादा क्षण मोरपिसाप्रमाणे वा त्या पिंपळाच्या पानाप्रमाणे जीवनाच्या पुस्तकात राखता आला असता तर नक्कीच सुखकर झाले असते. एखाद्या मंतरलेल्या ठिकाणी जगाची तमा न बाळगता आपल्यातील अनामिक कवी जसा जागृतावस्थेत येतो अन अचानक कित्येक काळापासून गुंतलेल्या लोकरीचे टोक सापडून सरसर गुंता सुटत जावा त्याप्रमाणे एकामागोमाग एक अशा अनभिज्ञ काव्याच्या ओळींचा हिशोब मनपटलावर सुटत जातो तेव्हा शरीराचे झालेले हलके कागदी विमान जमिनीपासून काही उंचीवर तरंगू लागताना तेव्हाच साऱ्या जगाचा ताळमेळ आपल्याला आपल्या नजरेतून मोकळा होऊ लागतो. नात्यांच्या क्लिष्ट नाट्यमय शिष्टाचारापेक्षा पावसाप्रमाणे भेटणारे एखादे मैत्र त्यावेळी एवढा स्वर्गीय परिमळ दरवळून समाधानाचे रोपटे अंकुरीत करून पुन्हा नजरेआड जाताना त्या क्षणाचे पारडे वर्षानुवर्षे निभावलेल्या एखाद्या नात्यापेक्षा उजवे ठरवून अनेक अनुत्तरीत प्रश्नांची लड समोर तेजवून जाते. भारावलेल्या भावनांचा अन मोकळ्या माळरानाचा नेमका संबंध हळूहळू उलगडू लागतो, अलंकारीत अन भरजरी जाम्यानिम्यापेक्षासुद्धा उजाड पण लांबच लांब आभाळाची सीमा दर्शविणारे मोकळे मैदान अनवाणी तुडवण्याची इच्छा मनात उपजणे म्हणजेच जीवनाच्या अनंत सागरात स्वतःला झोकून देण्याचे साहस अजूनही आपल्यात जिवंत असण्याची अनुभूती होय!
कुणाशीही संवाद साधताना जेव्हा भात्यातील गप्पांचा ओघ बेमालूम वाहताना त्या प्रवाहाची दिशा क्षुल्लक वाटू लागते वा काळाचा पसारा निष्प्रभ अन निर्जीव वाटून जातो, आपल्यातील असलेल्या रसिकतेला दुसरा रसिक तितक्याच खुल्या दिलाने जेव्हा स्वीकारून दाद देतो तेव्हा नकळतच आपल्यातील छंदाला आणखी वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे श्रेय त्याचेच!! गर्द वनराईतून जंगलास निश्चलावस्थेत छेदून घुमणाऱ्या पाखराचे गुंजारव भयावह असले तरी ते स्वतंत्रतेचा अनभिषिक्त मक्ता मिरवून जंगलावर अधिराज्य मिरवण्यासाठी आव्हान उभे करीत नसेल कशावरून! एक हळवा पण हक्काचा हुंदका हृदयाच्या कुपीमध्ये वर्षानुवर्षे साठवून जेव्हा अचानक व्यक्त होण्याची तडफड करू लागतो, आपल्यातील 'मी' ला आपल्यातील 'तो' न जुमानता त्या इंद्रधनुष्याच्या प्रत्यंचेवर स्वत्वाचा तीर ताणून या दृश्य जगाच्या रहाटगाड्यापलीकडे अज्ञातात जाण्याचा हट्ट धरू लागतो, सभोवतालच्या व्यवहारापेक्षा फक्त अर्पण होण्यामध्ये असणारी धन्यता नादमधुर पावलांनी दैवी संगीताचा अविभोर प्रवास खुणावू लागते तेव्हा आणि तेव्हाच कदाचित त्या अनमोल हुंदक्याचे अस्तित्व वा त्या हुंदक्यासाठीचा हा जीवनप्रवास क्षितिजावरील लालीप्रमाणे आवार आच्छादून टाकतो ते कायमचेच!!
प्रतिक्रिया
5 Nov 2018 - 12:57 am | मुक्त विहारि
पण काहीच समजले नाही...
(ढ) मुवि...