टॅटू ...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
20 Oct 2018 - 9:38 am

टॅटू !

आॅपरेशन झालं. अगदी व्यवस्थित पार पडलं. शांत पहुडलेल्या त्या पेशंटकडे समाधानानं पाहात डाॅक्टरांनी मास्क काढला. ग्लव्हज काढून बिनमध्ये टाकले आणि बेसिनवर हात धुवून तोंडावर पाण्याचा सपकारा मारून ते तसेच ओटीमधल्या त्यांच्या आरामखुर्चीत बसले.
ती त्यांची सवयच होती. नेहमीच आॅपरेशन पार पडलं की ते इथे बसायचे. तोवर बाकीचा स्टाफ आवराआवर करायचा आणि आरामखुर्चीतून डाॅक्टरांची नजर पेशंटवर खिळलेली असायची.
आजची पेशंट वृद्ध असल्याने डाॅक्टरना थोडी काळजी वाटत होती. पण सारे काही सुरळीत झाल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
काही वेळ गेला.
डाॅक्टरनी घड्याळाकडे पाहिलं, आणि ते उठून पेशंटजवळ गेले.
आता ॲनस्थेशियाचा अंमल कमी होऊन ती वृद्ध पेशंट शुद्धीवर येईल ही त्यांची खात्री होती.
काही क्षणांतच त्या वृद्धेने डोळे उघडले.
समोर डाॅक्टरना पाहून तिने मंद स्मित केले. डाॅक्टरांनी तिच्या खांद्यावर हलकेसे थोपटून हसत तिला प्रतिसाद दिला.
‘सक्सेसफुल झालंय तुमचं आॅपरेशन... तुमच्या आजाराला पार हुसकावून लावलंय... आता मस्त लाईफ एन्जाॅय करा!’ डाॅक्टर म्हणाले आणि त्या वृद्धेनं पुन्हा एकदा हसत त्यांना प्रतिसाद दिला.
पेशंट चांगला शुद्धीवर आला होता.
आता डाॅक्टर तिच्याशी थोडा वेळ गप्पा मारणार हे स्टाफला माहीत होते.
डाॅक्टरनी त्या वृद्धेच्या बेडशेजारचे स्टुल ओढले, आणि त्यावर बसून पुन्हा एकदा त्यांनी त्या वृद्धेच्या खांद्यावर हात ठेवला.
आॅपरेशनच्या वेळी लक्षात आलेल्या गोष्टीचं कुतूहल त्यांच्या मनात जागं होतं...
त्या वृद्धेच्या पोटावरचं अॅबस्ट्रॅक्ट शैलीतलं टॅटू पाहून डाॅक्टरना कमालीचं कुतूहल वाटलं होतं. खूप वर्षांपूर्वी कधीतरी या वृद्धेनं तिच्या तरुणपणी पोटावर ते टॅटू गोंदवून घेतलेलं असणार ... त्यातील अमूर्त भाव डाॅक्टरना आवडले होते...
‘बाय द वे, तुमच्या पोटावरचं ते अॅबस्ट्रॅक्ट टॅटू कमाल आहे... किती सुंदर...’ डाॅक्टर तिच्याकडे पाहात म्हणाले, आणि त्या वृद्धेचा चेहरा कसानुसा झाला.
ती ओशाळवाणं हसली, आणि एक उसासा टाकून तिनं क्षणभर पापण्या मिटल्या...
आपण केलेलं कौतुक तिला फारसं रुचलं नाही असं डाॅक्टरना उगीचच वाटलं.
तेवढ्यात तिने डोळे उघडले, आणि मिश्किल नजरेनं डाॅक्टरांकडे पाहात ती म्हणाली, ‘ते ना, खूप वर्ष झाली. मी वीसएक वर्षांची होते तेव्हा मी ते हौशीनं गोॅदवून घेतलं होतं... मोठं सुरेख होतं...’
डाॅक्टरनी मान हलवून सहमती दर्शविली....
‘पण मी गोंदवून घेतलं तेव्हा ते पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचं सुंदर चित्र होतं... आता बघा, कसं अॅबस्ट्रॅक्ट होऊन गेलं...’
... आणि ती खळखळून हसली!
पेशंट मस्त बरा झाल्याच्या खात्रीने डाॅक्टर बाहेर पडले!

समाजजीवनमानप्रकटनआरोग्य

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

20 Oct 2018 - 3:54 pm | तुषार काळभोर

वैयक्तिक अनुभव - पूर्ण भूल दिल्यावर ४-६ तास आपण पूर्ण भुलीखाली असतो. मग आपण हळू हळू य जगात परतू लागतो. मग हळू हळू शब्द कळू लागतात, पण उत्तर देता येत नाही. शस्त्रक्रियेच्या आधी काही तास अन्नाचा कण व पाण्याचा थेंबही ना घेतल्याने घोटभर पाण्यासाठी जीव आसुसलेला असतो.
डॉक्टर व पेशंट संवाद दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्याचं कथेत असतं तर वास्तविक झालं असतं.

बाकी आयुष्यात, जगण्यात किती बदल होतात ते मोराच्या टॅटू च्या अबस्ट्रॅक्ट बनण्यातून दाखवण्याची संकल्पना स्तुत्य आहे.

दिनेश५७'s picture

20 Oct 2018 - 7:18 pm | दिनेश५७

बरोबर आहे. ही तांत्रिक त्रुटी असू शकते. माझ्या काही अनुभवांनुसार काही आॅपरेशन्समध्ये ॲनस्थेशियाचा अंमल तीनचार तासांत उतरून पेशंट बऱ्यापैकी बोलण्याच्या स्थितीत आल्याचे पाहिले आहे. कदाचित त्याचा प्रभाव तपशिलावर पडला असावा.

दिनेश५७'s picture

20 Oct 2018 - 7:18 pm | दिनेश५७

बरोबर आहे. ही तांत्रिक त्रुटी असू शकते. माझ्या काही अनुभवांनुसार काही आॅपरेशन्समध्ये ॲनस्थेशियाचा अंमल तीनचार तासांत उतरून पेशंट बऱ्यापैकी बोलण्याच्या स्थितीत आल्याचे पाहिले आहे. कदाचित त्याचा प्रभाव तपशिलावर पडला असावा.

ज्योति अळवणी's picture

22 Oct 2018 - 1:18 am | ज्योति अळवणी

आवडली कथा

एकनाथ जाधव's picture

23 Oct 2018 - 1:27 pm | एकनाथ जाधव

आवडली कथा

सिरुसेरि's picture

23 Oct 2018 - 2:24 pm | सिरुसेरि

छान अॅबस्ट्रॅक्ट कथा