आशाताई आणि आपलं भावगीत विश्व
आशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या! 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते....
'जिवलगा...... राहिले रे दूर घर माझे.... पाऊल थकले.... माथ्यावरचे जड झाले ओझे.... जिवलगा.....'
ही जिवलगा... तान ऐकली तरी मन अस्वस्थ व्हायला सुरुवात होते; आणि मग चढत्या क्रमाने प्रत्येक शब्दागणिक आपण नायिकेच्या दुःखात सहभागी व्हायला लागतो. गीतकार आणि संगीतकारांनी यात कमाल केली आहे याबद्दल दुमत असणारच नाही. मात्र आशाताईंनी जो आर्त स्वर आळवला आहे त्याला तोड नाही.
' ही वाट दूर जाते... स्वप्नामधील गावा....' हे गाणं ऐकताना तो 'रावा' तिथे असेल या कल्पनेने गाणं एकणाऱ्या 'ति'च्या गालावर गुलाब नक्कीच उमलत असतील. कारण त्या उमलत्या गुलाबाची जादू आशाताईंच्या स्वप्नाळळेल्या आवाजात आहे.
'चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले...' हे गाणं ऐकताना तर शुभ्र वेशातली, मोगऱ्याच्या फुलांच्या माळांनी सजलेली एक नाजूक ललनाच डोळ्यासमोर येते. आपल्या धुंदीत मोहक मादक पावले टाकीत चालताना चालताना हातातल्या परडीमध्ये जणूकाही ती चांदण्या गोळा करते आहे.
श्रीकृष्णाच्या प्रेयसीच आपल्या मैत्रिणीला मनातलं गुज सांगण तर अप्रतिमच. 'मी मज हरपून बसले ग....' ऐकताना तो जो 'ग...' म्हणण्या अगोदरचा एक शतांश सेकंदाचा पॉज आहे त्यातल्या त्या हलक्या श्वासाचा.... परिणाम संपूर्ण गाणभर मनात गुंजतो. अप्रतिम शृंगार वर्णन असलेल्या या गाण्याला आशाताईंनी त्यांच्या श्वासाच्या ह्रिदमने आपल्या मनात जिवंत केले आहे.. असं म्हणण अतिशयोक्ति नक्कीच नाही.
'गेले द्यायचे राहुनी...' या गाण्यात 'फक्त... रक्त.... दगड...' असे शब्द आणि संगीत पं. हृदयनाथ मंगेशकरांचे आहे. म्हणजे 'अवघड' या शब्दाची परिपूर्णता. पण आशाताईना ऐकताना मात्र अस वाटत की आपण देखील सहज हे गाणं गुणगुणू शकतो.... आणि मग एक वेडा प्रयत्न होतो देखील!
प्रेयसी जर तिच्या प्रियकराला 'आवर ही सावर ही... चांदरात.....' आशाताईंच्या आवाजात म्हणाली तर ना रात आवरली जाईल ना प्रियकर सावरू शकेल. कारण त्या 'चांदरात.....' मध्येच त्या प्रेयसीच्या मनातल्या सगळ्या भावना आशाताईनि व्यक्त केल्या आहेत; अस मला वाटत.
'केव्हातरी पहाटे उलटून रात गेली... मिटले चुकून डोळे.... हरवून रात गेली...' अधुऱ्या मिलनाची ओढ आहे यात..... आणि शेवटच्या कडव्यातल्या '.... मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली.....' मधून तृप्ततेची भावना देखील आशाताईंच्या शब्दातून आपल्या मनात पाझरते.
'उष:काल होता होता...' ऐकताना आपल्या अंगावर
काटा उभा करण्याच सामर्थ्य देखील याच आशाताईंच्या आवाजात आहे. त्याच आशाताई जेव्हा 'कशी झोकात चालली कोल्याची पोर....' म्हणतात; तेव्हा नाकात नथ घातलेली चवळीच्या शेंगेसारखी कोल्याची पोर आपल्या डोळ्यासमोर नक्कीची उभी राहाते. 'काजल रातीनं ओढून नेला... सये साजन माझा...' या शब्दातून प्रेयसीची आर्तता आपल्या डोळ्या आसवं नक्कीच उभी करते.
'गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय?...' या गाण्यातला अवखळपणा ऐकताना ती गोमू असत-खिदळत तिच्या प्रियकराला जशी खेळवते आहे ते सहजच डोळ्यांसमोर उभं राहातच. तसच जेव्हा आपण 'नभ उतरू आलं... चिंब थरथरवल.... अंग झिम्माड झालं हिरव्या बहरा...' एकतो तेव्हा प्रियकराच्या प्रेमात एकरूप झालेली प्रेयसी नक्कीच जाणवते. बहिणाबाईंचा खोपा देखील तितक्याच ताकदीन आशाताईंनी आपल्या डोळ्यासमोर उभा केला आहे. 'नको मरूस हाक... मला घरच्यांचा धाक...' ऐकताना लग्नानंतर भेटलेल्या मित्रामुळे तारांबळ उडालेली तरुणी आपल्याला दिसते.
अशी असंख्य असंख्य गाणी आहेत आशाताईची. आपल्या प्रत्येक भावना अगदी योग्य रीतीने व्यक्त करता येतील अशी. आपलं भावविश्व आणि आशाताईंचा स्वर.... एक अपूर्व समीकरण आहे. त्यांच्या या गाण्यांबद्दल जितकं लिहू किंवा वाचू तितकं कमी. मात्र हे नक्की की आपलं भावविश्व समृद्ध करणारी आणि आपल्याच भावना आपल्याला सांगणारी ही गान सुराई.... ही मोहमयी स्वरगीतांजली.... आपल्याला आपल्या कळत्या वयापासून कलत्या वयापर्यंत लाभली आहे... यासारखे सौख्य नाही.
प्रतिक्रिया
20 Sep 2018 - 5:35 pm | प्रचेतस
'केव्हातरी पहाटे' हे गाणं आशाबाईंच्या आणि पद्मजा फेणाणी बाईंच्या आवाजात ऐकताना दोन गायिकांमधला फरक कळतो.
20 Sep 2018 - 8:18 pm | ट्रम्प
पदमजा फेणांनी नीं जो सूर लावलाय आह हा !!!!
आशाभोसले आहेत सुमधुर गोड गळ्यांच्या पण पदमजा नीं त्या गाण्यात मास्टर स्ट्रोक लावलाय .
20 Sep 2018 - 6:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख !
मराठीत जेवढी (चलतचित्रांबाहेरील) भावगीते लिहिली, गायली आणि समरसून ऐकली जातात, तितकी ती इतर भाषांत आहेत का हा प्रश्न आहे. विशेषतः गेल्या काही मराठी पिढ्या भावगीतांवर वाढल्या आहेत... आणि त्यात मंगेशकर बंधुभगिनींचे योगदान बर्याच वरच्या स्तराचे आहे.
20 Sep 2018 - 8:35 pm | अथांग आकाश
मागे एकदा आशाताईंचा एक लाईव्ह नाट्यसंगीताचा मेडले ऐकला होता! कुठल्याही पार्श्वसंगीताशिवाय फक्त त्यांच्या आवाजात त्यांनी गाणी गायली होती! त्या मेडले ची व्हीडीओ लिंक किंवा डाउनलोड लिंक कोणी देऊ शकेल का?
बाकी लेख छान झाला आहे! आवडला!
22 Sep 2018 - 2:12 pm | चौकटराजा
आशाबाई नी गायलेली जी गीते आपण दिली आहेत ती तर उत्तम आहेतच पण .... वसंत प्रभू , श्रीनिवास खळे , यशवंत देव यांच्या बरोबर ही त्यांनी लई भारी काम केले आहे. बाकी आपण भाव विश्व हा शब्द वापरल्याने सुधीर फडके, ओ पी नय्यर ,दत्ता डावजेकर,,राम कदम , वसंत पवार यांना मध्ये नको घ्यायला !
22 Sep 2018 - 6:25 pm | ज्योति अळवणी
आशाताईंनी अनेकांची गीते गायली आहेत. सगळीच लिहिणं शक्य नव्हतं. म्हणून मग सहज ओठावर रुळलेली आणि मनात गुंजणारी काही घेतली, इतकंच!