तुम्हाला असं कधी होते का ? भाग - २ .....

Prakashputra's picture
Prakashputra in जनातलं, मनातलं
8 Sep 2018 - 8:29 am

पहिला भाग इथे वाचा : तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १

मला एकदा झोपेत स्वप्न पडले (जागेपणी पण पडतात, पण त्याबद्दल नंतर कधीतरी ) आणि मला पक्के कळत होते की मी स्वप्नात आहे. मला 'Lucid Dreams' का काय ते पडतात, म्हणजे मला बऱ्याच वेळा मी स्वप्नात आहे हे स्वप्न बघत असताना समजत असते. तर या स्वप्नात मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि त्याच्या नेहमीच्या घराऐवजी तो एका मोठया बंगल्यात रहात होता, एवढा मोठा बंगला कि गाडी आत आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे रस्ते होते. बागेत माळी काम करत होता, घरासमोर Ferrari उभी होती आणि घराची Bell वाजल्यावर एका नोकराने दार उघडले ( नेहमी मित्राची बायको दार उघडते आणि चेहऱ्यावर "आला माझ्या नवऱ्याला बिघडवायला" असे भाव असतात). नेहमी लेंग्यात आणि बनियनवर असणारा मित्र एकदम सुट आणि टाय घालून आला.

मी त्याला सांगायला लागलो, " अरे अमित, तू आत्ता माझ्या स्वप्नात आहेस. हे जे सगळे आहे ते खरे नाहीये, त्यामुळे तुझा स्वप्नभंग होणार आहे, म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. पण चल , स्वप्न संपेपर्यंत मजा करू, तुझ्या Ferrari मध्ये फिरून येऊ. ". तो एकदम चिडला आणि म्हणाला, "मी काय हे सगळे घेऊ नाही शकत का ?". मी त्याला म्हणालो, "अरे, खरंच घेऊ शकतोस. पण कालपर्यंत इथे DSK विश्वची सात मजली इमारत होती आणि त्यात ५६ कुटुंबे राहत होती. त्यातल्या सगळ्या लोकांना हाकलून देऊन, एवढा बंगला उभा करायला काही वर्षे तरी लागतीलच कि ?" मग तो पण विचारात पडला.

एवढ्यात मी जागा झालो. स्वप्नाची आणि स्वप्नात असताना आपण स्वप्नात असल्याचे माहित असण्याची मजा वाटत होती. हे अमितला सांगावे म्हणून त्याच्याकडे निघालो. तिथे पोचलो तर काय, तोच मोठा बंगला आणि बंगल्याबाहेर अमित Ferrari मध्ये बसून माझाकडे बघून हसतोय. मला तर काहीच समजेनासे झाले कि हे चाललंय काय ?

आणि तेवढ्यात दारावरची बेल ऐकून मी परत एकदा जागा झालो. स्वप्ना मध्ये स्वप्न पडले होते. दार उघडले तर अमित लेंगा घालून उभा होता आणि मिसळ खायला जायचं का असं विचारत होता.

--प्रकाशपुत्र

कथासाहित्यिकलेख

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

8 Sep 2018 - 3:23 pm | मार्मिक गोडसे

स्वप्नातला अमित
https://youtu.be/AgN8N810a_0

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2018 - 5:12 pm | मराठी कथालेखक

स्वप्नामध्ये स्वप्न असं काहीसं होतं कधी कधी.. अगदी नेमकेपणानं नाही सांगता येणार पण थोडक्यात असं की हे स्वप्न आहे असं स्वतःला समजवत आपण एका स्वप्नातून बाहेर पडतो पण नंतर पुन्हा खरेच जाग येते आणि दुसरे स्वप्नही मोडते असे काहीसे.
मला यावरुन आठवले.. माझ्य स्वप्नात नेहमी मांजरी येतात, कधी मोठी मांजर कधी पिलं .. पण अनेकदा आणि अनेक वर्षापासून. कधी माझ्या स्वप्नातल्या मांजरी बोलतात देखील. नंतर जाग येते आणि कळते अरे हे तर स्वप्न आहे मांजरी कुठे बोलू शकतात का ?
तर एकदा असेच स्वप्न पडले .. एक मांजर माझ्याशी बोलत होती, माझा भाऊ पण तिथे जवळच होता मी त्याला म्हणालो की हे बघ मांजर खरेच बोलतेय हे काही स्वप्न नाही तु ही ऐकतो आहेस ना मांजरीचे बोलणे म्हणजे हे काही माझे स्वप्न नाही नक्कीच.. नंतर थोड्या वेळाने जाग आली आणि हे माझे स्वप्न होते याची जाणीव झाली !!

श्वेता२४'s picture

10 Sep 2018 - 5:56 pm | श्वेता२४

मला बऱ्याचदा मी स्वप्नात असते याची जाणीव असते. इतकेच नाही आधिच्या स्वप्नात झालेल्या नवीन ओळखी/संदर्भ नंतरच्या स्वप्नात चालू राहतात. तसेच एखादे चालू स्वप्न आवडले नसेल तर बदलता देखील येते. हे मी कसे करते माहित नाही पण होते. आणखीन एक आपण मरु असे वाटणाऱ्या गोष्टी घडतात. जसे की, समुद्रात बुडणे, खोल दरीत पडणे, किंवा धोकादायक परिस्थितीचा सामना करणे इ. पण आपण स्वप्नात मरायच्या आतच पटकन जाग येते, असाही माझा अनुभव आहे.

मेघनाद's picture

14 Sep 2018 - 12:40 am | मेघनाद

मला तर अशी फार निरनिराळी स्वप्न पडतात.

१. जस कि उंचावरून पडणं, प्राण संकटातून वाचण वगैरे वगैरे
२. कुठल्या तरी परीक्षेत पेपर ला आलो असताना काहीच ना आठवल्याने होणारी बेचैनी.
३. कुठल्यातरी तणावपूर्ण परिस्थितीतून स्वप्न भंगल्याने अचानक होणारी सुटका

वरील सर्व स्वप्न अनुभवत असताना येणारी मजा काही औरच आहे. आणि त्यानंतर स्वप्न होते का, सुटलो बाबा हि अवस्था तर नक्कीच हायसं वाटणारी असते.

रच्याकने : स्वप्न ह्या विषयावर मिपा वरील डॉक्टर परिवाराने सखोल प्रकाशझोत टाकल्यास फार उपकार होतील.