चिंब

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
2 Jul 2018 - 5:21 pm

बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली.

पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते.

तिच्या जन्माच्या वेळी वेड्यासारखं बरसून त्यानंही आनंद साजरा केलेला. पहिल्यांदा दप्तर पाठीवर लावून, त्यावरून रेनकोट घालून ती जशी शाळेला जायला निघाली तसा तोही आलाच. पहिल्या दिवशी खिदळत शाळेत पोहोचणारी ती एकटीच. आणि मग तर तिला सवयच लागली, पाऊस आला की दप्तराला रेनकोट घालायचा आणि आपण चिंब भिजत घरी यायचं.

कॉलेजला जायला लागल्यावर सुध्दा इतकी सुंदर सवय कोणी मोडेल का बरं!
फरक फक्त इतकाच असायचा की आता तिच्या सोबत भिजणारं अजून कोणीतरी होतं. ते आता त्याला पाऊस आवडत होता म्हणून की ती आवडतं होती म्हणून चालायचं हे तिलाही कधी कळालं नाही की पावसाला कधी उमगलं नाही.

कॉलेज मध्ये असताना एकदा नुसतं कोकणातला पाऊस बघायचा म्हणून गेलेली ती. तेव्हा धोधो कोसळून धमाल आणणारा तोच तर होता. आणि दोस्तांशी भांडणं झाल्यावर तिला शांत करणारा सुद्धा तोच.

कधी कधी पकडापकडी चा डाव पण होई त्यांच्यात. तिला भिजायचं असे तेव्हा तो दडी मारून बसे आणि ती छान तयार होऊन कोणासोबत कॉफी प्यायला निघाल्यावर तो बरसू लागे आणि मग आडोसा शोधता शोधता तिची तारांबळ उडे. कधी शर्यत पण लागे दोघांत, सायकलवरुन ती आधी घर गाठते की तो तिला गाठतो!

तिचा स्वभावही पावसा सारखाच. कधी बेधुंद-उन्मत्त, कधी धीरगंभीर, तर कधी सगळ्यांवर रुसून बसणारा. ती पावसाशी बोलायची देखील, आणि तोही तिचं सगळं ऐकायचा. गाडी वरून जाताना मनवायची ती, 'नको ना रे आत्ता येऊस. दिवसभर मला एसी मध्ये काकडत बसावं लागेल'. किंवा कधी दुष्काळजन्य परिस्थिती आली की तिला पर्जन्यसूक्त लागत नसे, पोटतिडकीने ती त्याला बोलावे, 'ये की रे आता, किती दिवस झाले आपल्याला भेटून' आणि तो विरघळलाचं म्हणून समजा.

तिच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा, आत अक्षता पडत होत्या आणि बाहेर हा. ते आशिर्वादच असावेत, आणि कदाचित आनंदाश्रू.

या सगळ्या आठवणी पावसाच्या धारांसारख्याच झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. तेवढ्यात मागून येऊन तिच्या लेकीने तिला क्षणभर मिठी मारली आणि पावसाला बिलगायला ती गेली सुध्दा. पावसामध्ये मनसोक्त भिजणाऱ्या लेकीला बघून 'एक जलचक्र पूर्ण झालं' असं तिलाही वाटलं आणि त्यालाही!

Rainy Day Walk With Mom by Vickie Wade

चित्रः Rainy Day Walk With Mom by Vickie Wade
साभारः https://fineartamerica.com/featured/rainy-day-walk-with-mom-vickie-wade....

साहित्यिकमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

कधी दुष्काळजन्य परिस्थिती आली की तिला पर्जन्यसूक्त लागत नसे, पोटतिडकीने ती त्याला बोलावे, 'ये की रे आता, किती दिवस झाले आपल्याला भेटून' आणि तो विरघळलाचं म्हणून समजा.
अप्रतिम.

मराठी कथालेखक's picture

2 Jul 2018 - 5:59 pm | मराठी कथालेखक

चित्र आवडलं...

राजाभाउ's picture

3 Jul 2018 - 10:02 am | राजाभाउ

मस्त . एखादी कविता वाचवी इतक छान

श्वेता२४'s picture

4 Jul 2018 - 2:08 pm | श्वेता२४

या सगळ्या आठवणी पावसाच्या धारांसारख्याच झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. तेवढ्यात मागून येऊन तिच्या लेकीने तिला क्षणभर मिठी मारली आणि पावसाला बिलगायला ती गेली सुध्दा. पावसामध्ये मनसोक्त भिजणाऱ्या लेकीला बघून 'एक जलचक्र पूर्ण झालं' असं तिलाही वाटलं आणि त्यालाही शाळेत असताना कलिंगड नावाची कथा अभ्यासाला होती. मला वाटतं लेखिका गौरी देशपांडे. तुमची कथा वाचल्यावर अगदी तसंच वाटलं. खूपच छान