साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची. आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो.
हं लिही,
स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम
जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!
हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते.
मुगाची डाळ एक किलो
गुळ अर्धा किलो
शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको. नाहीतर आई परत करायला येईल म्हणावं!
खोबरे पाव किलो - वास अजिबात नको.
असे सगळे सांगत सांगत यादी तयार होत असे.
यादी व्यवस्थित खिशात ठेव. सुरेशला सांग की सगळे व्यवस्थित दे. नाहीतर आई येईल. अशा सगळ्या धमक्या माझ्याकडून वदवल्या जात.
शेवटी मी न रहावून विचारेच, आई बिस्किट?
बरं लिही एक पारले!
तोवर पाटावर बसून यादी लिहिल्याने घातलेली मांडी दुखायला लागत असे. कारण आईची यादी ही प्रत्येक जिन्नस किती शिल्लक आहे हे पाहात पाहत चाले.
मग तेल. तेलाची आमच्याकडे एक किटली होती. आई तेल संपत आले की उरलेले तेल एका बुटल्यात काढून ठेवत असे आणि मग धुवून वाळवलेली किटली माझ्या हाती येत असे.
सगळी यादी एकदा वदवून सुचना पाठ झाल्या आहे की नाहीत हे पाहून मग आमची स्वारी बाहेर पडे. पैसे वगैरे मिळत नसत. आई ते परस्पर सुरेशला देत असे.
घराबाहेर दादांची त्यांनी त्यांच्या तरुणपणात वापरलेली एक हिरव्या रंगाची सायकल उभीच असे. ही सायकल आजच्या दिवशी मला मिळे.
मग हँडला पांढर्या तिन-चार पिशव्या एकाबाजूला आणि चकचक करणारी धुतलेली किटली दुसर्या बाजूला अडकवून मी सायकल घेऊन निघे. शाहू पथावरून पुढे गेले की साठीबाईंचे घर. त्यासमोर डॉ बर्जेंचा सुरेख टुमदार बंगला. मग भंडारी भवन लागे. पुढे डाव्या बाजूला वळून गेले वास्को हॉटेल लागत असे. त्या चौकात एक खुप छान छोटीशी बाग होती. त्या बागेला उगाच एक फेरी मी मारत असे.
मग एक छोटा रस्ता घेऊन मी सुरेशकडे पोहोचत असे. एका बाजुला सायकल लावून किटली आणि पिशव्या घेऊन दुकानाबाहेर मी उभा रहात असे. दुकानात बहुदा अजुनही गर्दी असेच. पण मला पाहिले की तो हात लांब करून यादी हातातून घेत असे. मी आई ने दिलेल्या सगळ्या सुचना घडाघडा म्हणून दाखवे. त्याकडे त्याचे बहुदा लक्ष नसेच. कारण तो पटापट वर्तमानपत्राचे कागद फाडून मोहोरी बांघण्यात गढलेला असे.
या पुड्या कागदात बांधल्यावर त्यावर तो ज्यावेगाने दोरा गुंडाळून गाठ मारत असे ते अगदी मी पाहात अबसे.
एक मोठा दोर्याचा बिंडा छताला अडकवलेला असे आणि त्यातून दणादण दोरा काढून भराभर पुड्या बांधल्या जात. जर दोन किलो पेक्षा मोठी मागणी असेल तर धान्य सरळ पिशवीमध्येच ओतले जायचे. महिन्याचे दोन किलो तेल किटली मध्ये ओतले जायचे. हे तेल पण एका मोठ्या पिंपातून काढून किटलीत यायचे.
गुळाच्या भेल्या असत. त्या फोडायला एक पहार आणि पाच किलोचे माप असे. योग्य तेव्हढा गुळ फोडून कागदात बांधला जायचा.
दोरा बांधलेल्या या पुड्या पिशव्यात भरून मी त्या सायकल च्या हँडल अडकवायचो. एका बाजूला तेल भरलेली किटली. आणि हळूहळू चालत घरी याचो. पिशवी मध्ये मेणकागदाच्या पॅकेजिंग मधला बिस्किटाचा पुडा अगदी अलगदपणे वर ठेवलेला असायचा.
घरी आल्यावर सगळे किराणामालाचे सामान डब्यात भरले जायचे. काही पितळी डबे होते, काही पारले बिस्किटांचे होते. सगळे जिन्नस जागच्या जागी जात. मग कागदांचा एक छोटा ढीग त्यावरच्या बातम्या वाचून झाल्या की परत रद्दीमध्ये जायचा. दोर्यांचा एक मोठा गुंडाळा असे त्याला सगळे दोरे बांधून ठेऊन दिले जायचे. हेच दोरे मला पतंग उडवताना मिळायचे.
आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की
यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?
प्रतिक्रिया
1 Jul 2018 - 12:46 pm | सोमनाथ खांदवे
खूप छान , बऱ्याच जणांच्या लहानपणातील आठवणी जाग्या झाली असतील . सध्या भोळ्या माणसांना साध जीवन जगताना प्लास्टिक ची गरज नव्हती हे ही खरंच .प्रगती बरोबर प्लास्टिक चा भस्मासुर आपण डोक्यावर बसवून घेतला आहे .
2 Jul 2018 - 7:52 am | निनाद
काही गरज नाहीये.
1 Jul 2018 - 1:39 pm | कंजूस
"तू फारच शाणा आणि आज्ञाधारक होतास शाळेपासून असे आमचे हे म्हणायचे. तुझी पावकीसुद्धा पाठ होती." - माइसाहेब.
1 Jul 2018 - 3:53 pm | जव्हेरगंज
वाह.
मस्त लिहीलंय.
2 Jul 2018 - 7:53 am | निनाद
तुमचा प्रतिसाद आला म्हणजे नक्कीच बरे झाले आहे लिखाण.
1 Jul 2018 - 4:42 pm | शाली
प्लॅस्टीक राहूद्या हो. लिहिलय फार सुंदर. मला वाटलं तुम्ही माझ्याच आठवणी लिहाता आहात की काय! आवरते घेतले :(
2 Jul 2018 - 7:54 am | निनाद
तो काळ असावं होता..
1 Jul 2018 - 4:43 pm | मराठी_माणूस
छान आठवणी.
एव्हढे साहीत्य घेउन येताना पाउस आला तर काय करायचात ?
2 Jul 2018 - 7:55 am | निनाद
पाऊस नाहीये असे पाहूनच 'सोडले' जायचं.
आलाच तर एक कापड असे झाकायला. अंतरही फार नसे...
4 Jul 2018 - 12:17 am | टिवटिव
आम्हि कोणच्याही घरात किंवा दुकानात घुसत असु व पाउस थांबण्याची वाट पहात असु.
1 Jul 2018 - 6:31 pm | माहितगार
छान लिहिलतं
2 Jul 2018 - 7:56 am | निनाद
धन्यवाद साहेब
1 Jul 2018 - 7:05 pm | मराठी कथालेखक
छान वर्णन केलंयत.. जुन्या आठवणींत रमणं पण कधी कधी खूप मजेदार असतं. कोणतं शहर हे ?
पुर्वीचं मध्यमवर्गीय आखीव रेखीव आणि शिस्तबध्द जीवन !! आता काय मॉलमध्ये जाताना यादी घेवून जातो पण यादीत नसलेल्याही अनेक जिन्नस उचलून आणतो.
मी आजोळी गेल्यावर आजोबांच्या किराणा दुकानात तास न तास बसायचो. (म्हणजे फक्त बसायचो .. दुकानदारी करत नसे) छोट्या शहरातील मध्यवर्ती भागातले दुकान .. अगदी जुन्या धाटणीचे होते तेव्हा ते. फळ्या फळ्यांचे दरवाजे, बैठे काउंटर, कायंटरवर मध्यभागी लटकणारा लहान तराजू तर बाजूला एक मोठा तराजू (तो आवरुन ठेवलेला असायचा..म्हणजे ५किलो वा त्याच्यावरच्या साठीच तो वापरात यायचा ). आम्ही (म्हणजे माझा भाऊ, मी ) काउंटरच्या बाहेर एखाद्या पत्र्याच्या डब्यावर बसून रहायचो. अनेक आठवणी आहेत...आठवायला लागल्यावर वेगळ्याच विश्वात नेतात.
बाकी प्लॅस्टिकबाबत तुमचं म्हणणं खरं आहे. पण एखद्या गोष्टीची खूप सवय लागल्यावर त्या सवयी बदलणं कठीण असतं. आता अनेक दुकानदारांना पुर्वीच्या दुकानदारांप्रमाणे कागदी पुड्यातरी सहज बांधता येतील का हा प्रश्न आहे.
मोबाईल , टीव्ही , इंटरनेट या गोष्टींनाही आयुष्यात किती जास्त स्थान मिळालंय..
2 Jul 2018 - 7:57 am | निनाद
तुमक्सचे ही वर्णन छान आहे. तो छोटा आणि मोठा काटा तर असायचाच!
2 Jul 2018 - 8:01 am | निनाद
तुमक्सचे ही वर्णन छान आहे. तो छोटा आणि मोठा काटा तर असायचाच!
1 Jul 2018 - 7:14 pm | कानडाऊ योगेशु
८० च्या उत्तरार्धात दूरदर्शन वर स्वच्छता अभियानाच्या जाहीराती लागत त्यात घरातील कचरा पॉलिथीन मध्ये टाकुन तो कचराकुंडीमध्ये टाकावा अश्या सूचना असत.
थोडक्यात सरकारी पातळीवरुन प्लास्टीकचा वापर प्रमोट केला जात होता.
सरकारी पातळीवरही प्लास्टीकचा हा भस्मासूर असा उलटेल ह्याची कल्पना आली नसावी.
1 Jul 2018 - 7:30 pm | मराठी कथालेखक
शक्य आहे ...
आपण काय जन्माला घालतोय याचे भान नसल्याने सरकारी कार्यक्रमाचे १८० अंशातून फिरणे शक्य आहे..
प्लॅस्टिक तर खूप छोटा विषय ठरेल असा एक खूप मोठा भस्मासूर सरकारनेच निर्माण केल्याचं मी वाचलंय (आता दुवा नाही देवू शकत, पण जुने जाणकार , खासकरुन वैद्यकीय क्षेत्रातील लोक याबद्दल सांगू शकतील) .. ते म्हणजे गर्भलिंगनिदान.. हे प्रकरण फार पुर्वी सरकारी धोरणातूनच निपंजलय !!
1 Jul 2018 - 8:19 pm | Nitin Palkar
खूपच सुंदर वर्णन. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....
2 Jul 2018 - 5:05 am | चित्रगुप्त
खूप छान लिहिले आहे. हुबेहुब असेच माझ्या बाबतीत घडायचे, साधारणतः १९६६ - ७० च्या काळात. शिवाय चक्कीवरून आटा दळवून आणायला एका मोठ्या डब्यात घरून गहू घेऊन जायचो ( ही प्रथा मात्र मी अजूनही पाळलेली आहे).
2 Jul 2018 - 8:16 am | डॉ श्रीहास
एक आठवण माझीही..... ह्या किराणा मालाच्या दुकानाचा गंध हळद,डाळी, सुटा चहा आणि निरनिराळी साबणं.... अजूनही मनात घर करून आहे .
2 Jul 2018 - 9:47 am | एस
वा! जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
माझ्या बाबतीत किंचीतशी मन खट्टू करणारी आठवण या महिन्यातून एकदाच होणाऱ्या कार्यक्रमाशी संबंधित असायची. आमची आर्थिक परिस्थिती जरा नाजूक असायची. आणि उधार-उसनवारीवरच आमच्या आईबाबांचा संसार चालू असे. वाण्याचं बिल तीन-तीन महिने थकलेलं असायचं. दर वेळी दुकानात गेलो की वाण्याची बोलणी खावी लागत. थोडा मोठा झालो तेव्हापासून आमच्या अशा देणेकऱ्यांपासून मी दूरच रहायचा प्रयत्न करत असे. लाचारीची लाज. गरिबी लहान मुलांना उगाचच शहाणे, समजूतदार बनवते. असो.
3 Jul 2018 - 11:23 am | एमी
हा प्रतिसाद सगळ्यात जास्त चांगला (म्हणजे वास्तवाच्या जवळ जाणारा) वाटतोय.
त्याकाळी बऱ्याच घरांत हीच परिस्थिती असणार. मुलांपर्यंत त्याची झळ पोचली कि नाही हाच काय तो फरक.
पण आता त्यातून बाहेर पडलेला नवश्रीमंत/मध्यमवर्ग नॉस्टॅल्जियाचे उसासे टाकत त्या काळाला/ परिस्थितीला रोमँटसाईझ करत असतो....
3 Jul 2018 - 1:20 pm | गवि
+१… पटतंय.
पण जस्ट टु मेक अ पॉईंट.. नॉस्टॅल्जीया नेहमी उसासे, उमाळे किंवा खोट्या रुपातलाच असतो असं नव्हे. नवीन पद्धतीची सामानखरेदीही खूप आवडते. स्वतः हात लावून, फील करून पदार्थ उचलायचे, जडशीळ होईल अशी फुल कार्ट भरायची. रिटेल थेरपीची ऊब घ्यायची, हेही आवडतं. ते दिवस गेले म्हणून हळहळ वाटत नाही. पण एक स्मृती म्हणून जपणं आणि आठवण काढताना गोड बोलणं इतकं म्हणजे उसासे असं असेलच असं नाही.
3 Jul 2018 - 3:58 pm | एमी
<<< नॉस्टॅल्जीया नेहमी उसासे, उमाळे किंवा खोट्या रुपातलाच असतो असं नव्हे. >>>
हा खालचा प्रवचन भाग टाकला नसता तर चाललं असत मग:
आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की
यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?
2 Jul 2018 - 10:07 am | चांदणे संदीप
माझ्याही वाण्याच्या दुकानाच्या अशाच आठवणी आहेत.
सहजच:
माझा एकदा लहानपणी खोबरेल तेल आणि गोडेतेल यावरून खूपच गोंधळ उडालेला आणि घरी आल्यावर रात्रीचा स्वयंपाक होईपर्यंत घाबरायला झालं होतं की मी बरोबर तेल आणलंय का नाही ते. सर्वांनी जेवून निवांत झोपल्यावरच मला बरे बाटले, पण त्या संध्याकाळची बेचैनी अजूनही आठवते.
Sandy
2 Jul 2018 - 10:12 am | गवि
छान नॉस्टॅलजीक वास नाकात दरवळला. काही दुकानाबाहेर रॉकेलचा बॅरल आणि हातपंप असायचा. एकूण फळ्यांना, लाकडाला, फरशी / कोबा यांना एक तेलकट वास आणि चिकट फील असायचा.
गूळ, खडीसाखर, चिंच हे थेट खाण्यासारखे पदार्थ असायचे. गूळ नेहमीच वेड्यावाकड्या प्रचंड तुकड्यात तोडलेला असल्याने पुड्याबाहेर डोकावत असायचा, तेल म्हणजे फक्त पोस्टमन असं वाटायचं, पत्र्याच्या डब्यात तेल यायचं, ते किटलीत भरून घरी यायचं. मीठही वजनावर बांधून यायचं. चावी आगपेटी आवश्यक असायची, बिस्किटे वगैरे यात अजिबात नसत. ती आणलीच तर खास जाऊन वेगळी आणली जात.
मात्र, हे सर्व भरलेली भली मोठी पिशवी घेऊन दुकानाचा गडी घरी येण्याची सोय होती. तो पुडे मोजून उतरवून जमिनीवर ठेवत असे. या सर्वांना "जिन्नस" म्हणत (किमान कोंकणात). कांदे बटाटे त्याच पिशवीत सुटे असून सर्व सामान उतरवून संपलं की ते थेट जमिनीवर बदाबदा ओतले जात.
2 Jul 2018 - 10:15 am | गवि
आणि महत्वाचं.. हे सामान घेऊन गडी येणं आणि ते एकेक करून उतरवताना पाहणं, मोजणं हा खरोखर बऱ्यापैकी मनोरंजक टाईमपास वाटायचा. कारण त्याखेरीज फार हाय फाय इव्हेंट्स नसायचे (कोंकणात तरी ;-) )
2 Jul 2018 - 10:39 am | संजय पाटिल
अगदी.. अगदी...
2 Jul 2018 - 11:10 am | निनाद
अगदी सहमत! गुळाचे खडक अजूनही आठवतात... :)
2 Jul 2018 - 9:23 pm | यशोधरा
आमच्याकडे अजून असेच आणले जाते सामान.
2 Jul 2018 - 11:02 am | सोन्या बागलाणकर
सुंदर वर्णन... बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या.
मला खास करून पिठाच्या गिरणीला जायला आवडायचं. तो चक्कीवाला गिरणीवर हातोड्याने आवाज करायचा ते तर खासच आवडीचं .
जाता जाता...
त्याला बुधला म्हणतात बहुतेक
आणि वर्तमानपत्रात ठेवलेल्या वस्तू देखील आरोग्याला हानिकारक ठरू शकतात कारण त्यात शाईमधील रसायने मिसळतात
प्लास्टिकचा वापर चुकीचा आहेच पण त्याचे पर्याय पण नीट विचार करून निवडणे चांगले.
2 Jul 2018 - 11:08 am | निनाद
जुने ते सर्व सोने वगैरे नाहीच, चांगल्या पर्यायाचा विचार केलाच पाहिजे यावर सहमत.
---
बुधला म्हणजे तेल किंवा मद्य ठेवण्याचे मोठे भांडे.
बुटले हे अगदी जेमतेम दोन डाव तेल मावेल इतकेच असते.
2 Jul 2018 - 11:15 am | सोन्या बागलाणकर
एका नवीन शब्दाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !
लिहीत राहा.
2 Jul 2018 - 2:02 pm | वाघमारेरोहिनी
tumhi nashik road che ahat ka ho? Press .. 6 Tarikh... pagar ani gardi….
Vasco hotel wachale ani lagech samajale. shahu path kuthe ahe? tumhi sagtay te kirana dukaan quality kirana bhutada bhuwan tar nahi na? purvi te ekach dukan hote tithe vasco javal…
by the way maze pan baal pan tithech geley. Wachun khup chhan watle
2 Jul 2018 - 2:26 pm | श्वेता२४
माझ्याही घरातील वाणसामान आणायचे काम माझ्याकडेच असायचे. ते काम मी करण्याचा आग्रह माझ्या आजोबांचा असायचा. या बदल्यात पैसे देऊन जी काही उरलेली मोड आहे ती मी माझ्याजवळ ठेवेन असा करार केला होता. मग मी त्या जड पिशव्या तसेच तेलाची किटली सांभाळत घरापर्यंत आणण्याची कसरत आनंदाने करीत असे. या सामान आणण्याच्या सवयीमुळे गणित सुधारले तसेच व्यवहारज्ञानही आले. काम केल्यावर मिळालेली मोड मी जपून ठेवत असे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे चॉकलेट वगैरे घेण्याचा विचारही मनात आला नाही, उलट याच साठलेल्या पैशातून एकदा शाळेची वार्षिक फी परस्पर भरली. वर्गशिक्षकांना एवढी मोड कुठुन आणली याची शंका आली. मी खरे ते सांगितले. पण कदाचित त्यांना पटले नसावे. माझ्या शाळेत माझा मामाही शिक्षक होता. त्याच्या कानावर वर्गशिक्षकांनी ही गोष्ट घालताच माझे आजोबा मला वाणसामान आणण्याचे पैसै देतात हि गोष्ट त्याने पटवून दिली व घरी येऊन आजोबांना माझा हा पराक्रम सांगितला. त्यावेळी आजोबांच्या डोळ्यात माझ्याबद्दल दिसलेले कौतुक अजुनही विसरु शकत नाही... असो.
निनाद यांच्या सुंदर लेखाने बालपणीचा तो सुखाचा काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर अवतरला....... आणि खरंच तेव्हा प्लास्टीकशिवाय काही फार अडत नव्हतं मग आताच का एवढा अट्टाहास असा प्रश्न पडतो
2 Jul 2018 - 2:47 pm | सोमनाथ खांदवे
खुपच छान !!!
पण मला यक शंका हाये आजोबा च्या डोळ्यात तीनदा कौतुक दिसल व्हत का वो ?
2 Jul 2018 - 3:01 pm | श्वेता२४
वाटलंच अजुन यावर खवचट प्रतिक्रीया कशी आली नाही अजुन. विनंती केल्याप्रमाणे संपादक मंडळाने अतीरीक्त दोन प्रतिक्रीया काढून टाकल्या की मला जसं एकदाच दिसलं तसं तुम्हालाही एकदाच दिसेल हो सोमनाथभाऊ!
2 Jul 2018 - 6:14 pm | टर्मीनेटर
हि क्लायंट साईडची समस्या आहे कि सर्व्हर साईडची? काल परवा पण कोणाचा तरी प्रतिसाद सलग ९ वेळा दिसत होता.
2 Jul 2018 - 10:22 pm | सोमनाथ खांदवे
व्हतय काय की आपण प्रतिक्रिया टाकली की कदी कदी सर्व्हर हँग व्हतो , त्या नतंर परत अंडू क्येल की आपला प्रतिसाद लोड व्हन्या साठी आपली वाट बगत असतो .ह्ये आस दोन चार येळा व्हत .
2 Jul 2018 - 2:34 pm | टर्मीनेटर
मस्त लेख.
2 Jul 2018 - 3:35 pm | सुमित्रा
छान लिहिलंय...तुम्ही नाशिकचे ना? वास्को हॉटेल आणि प्रेस म्हणजे नाशिकच :-)
2 Jul 2018 - 4:05 pm | सोमनाथ खांदवे
स्वतः च्या अंतर्मना च्या आरश्यात डोकावून बघा नक्की आपण सगळे लहानपणी एवढे आदर्श वागत होतो का ? कधी तरी वाणसमान आणताना चाराने आठाणे ढापले असतील ना !!!!
पूर्वी आम्ही खटल्यात म्हणजे तीन चुलते व वडील सगळे एकत्र राहत होतो , घरात लहानमुले जास्त असल्यामुळे लहानपणी शाळेत जाताना खाऊ साठी पैसे भेटत नसत व शाळेत इतर मुलं पिवळी बॉबी , चिक्की , गोळ्या खायचे , मला खूप वाईट वाटायचे .
शेंगदाणा तेल आणायचे काम माझ्याकडे होते व शेवटी मी किटली मध्ये 10 लिटर शेंगदाणा तेल आणायच्या ऐवजी साडेनऊ लिटर तेल आणायला सुरवात केली . काही दिवसानंतर माझी चोरी आईने पकडली व मला वार्निंग दिली , परंतु वाण्याने त्या ' अर्धा लिटर ' बद्दल वडिलांना सांगितले . मग काय संध्याकाळी दोन्ही पोटऱ्या काळ्या निळ्या !!
वडिलांनी मार खाऊ घातला पण खाऊ ला पैसे नाही दिले , ती चैन त्या काळात परवडतच नव्हती तर त्याला वडील तरी काय करणार .
2 Jul 2018 - 4:34 pm | श्वेता२४
स्वतः च्या अंतर्मना च्या आरश्यात डोकावून बघा नक्की आपण सगळे लहानपणी एवढे आदर्श वागत होतो का ? कधी तरी वाणसमान आणताना चाराने आठाणे ढापले असतील ना !!!!
असलं काही करायची आम्हाला गरजच नव्हती कारण केलेल्या कामाचा मोबदला मिळायचा ना. पण ते पैसे अशा वायफल गोष्टींसाठी खर्च करायची हिंमत व्हायची नाही. कदाचित गरजेच्या वेळी हेच पैसे उपयोगी पडतील याची जाणीव असायची. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बाकीची मुलं गारेगार, बॉबी, चिक्की करल्याशा गोळ्या मधल्या सुटीत खायची व त्याचं मलापण खूप वाईट वाटायचं. पण अशा गोष्टी खरेदी करुन पैसे वाया घालवायचे नाहीत हा आजोबांचाच दंडक व आम्ही दोघी बहीणी तो मुकाट पाळत असू. आज ते बरोबर होतं असं नक्की वाटतं. मला असं वाटतं की, तुम्ही काय, मी काय आपले बालपण हे फार खर्चिक नसेल गेले व गोळ्या, चॉकलेट, पैसे यांची आजच्यामुलांप्रमाणे चैनी करता आली नसली तरी बालपण छान गेले.
2 Jul 2018 - 5:07 pm | कपिलमुनी
ढापणे या कन्सेप्टबद्दल पुरेसे प्रबोधन झाले होते आणि हग्या मार बसेल अशी भिती असायची . मोठे झाले की कधी कधी मोह असायचा , पण अप्ल्यपेक्षा घरच्याचा हिशोब पक्का असनार हे ठाउक होतेच.
त्यापेक्षा जे आवडते ते सांगून खावे असे होते.
2 Jul 2018 - 5:48 pm | एकनाथ जाधव
हा लेख कायाप्पा वर व्हायरल झालाय
आपल्या नावा शिवाय.
3 Jul 2018 - 7:16 pm | टवाळ कार्टा
हेच लिहायला आलेलो
3 Jul 2018 - 8:30 am | सिरुसेरि
मस्त आठवणी . सामान आणण्याची आणणावळ / कमिशन म्हणजे बिस्कीटपुडा . पुर्वी या किराणा दुकानांमधे "छटाक" असे काहितरी मोजमाप असे . पण आता ते बंद झाले असावे .
3 Jul 2018 - 1:42 pm | मराठी कथालेखक
५० ग्रॅम म्हणजे छटाक. सहसा पितळी वजन असतं ते. त्यापेक्षा कमी वजनाकरिता (अर्धा छटाक) माझ्या आजोळी एक गुळगुळीत गोटा होता.
छटाक बंद झाले असेल असं वाटंत नाही... कारण इलेक्ट्रॉनिक तराजू जिथे अजून फारसा वापरात नाही तिथे वेलची किंवा तत्सम महागडा पदार्थ देण्यासाठी छटाक वापरात असेलच.
6 Jul 2018 - 10:45 pm | प्रभू-प्रसाद
पंढरपूरला आजोबा व मामांच्या किराणा दुकानात अर्धा छटाक साठी 20 ग्रॅम चे पितळी वजन व जुने कमळ छाप 20 पैशाचे नाणे वापरून अर्धा छटाक --२५ ग्रॅम वान सामान दिले जाई.
.
.
बाकी किराणा सामान खरेदी करण्याचा रतीब वयाच्या 12 व्या वर्षांपासून चालू आहे.
3 Jul 2018 - 1:31 pm | जेम्स वांड
शेवटला ज्ञानामृत असलेला भाग थोडा उत्तम इंद्रायणी भातात खडा असावा तसं वाटलं पण एकंदरीत स्मरणरंजन लैच जोरदार आहे. प्रचंड आवडले.
3 Jul 2018 - 10:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान लिहिले आहे. लहानपण आठवलं ! :)
4 Jul 2018 - 11:55 am | रातराणी
भारी लिहिलंय! आवडले!
7 Jul 2018 - 8:38 am | मदनबाण
जुन्या आठवणींची उजळणी आवडली ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...
7 Jul 2018 - 10:05 am | प्रकाश घाटपांडे
गुळावर अक्षरश: गांधीलमाशांचे मोहोळ असायचे. आमच्या शेजारी झुंबरशेटचे किराणामालाचे दुकान होते. गावचा मॉलच तो. गांधील माशा हा आमच्या भावविश्वाचा एक भागच होत्या. चावल्या की तुळशीची माती लावायची.
13 Jan 2020 - 8:19 pm | मुक्त विहारि
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
किराणा मालाचे दुकान आणि रेशनचे दुकान, हे अविभाज्य भाग होते आणि आहेत.