आठवणी

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
26 Jun 2018 - 10:28 pm

‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष.

आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे. स्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आस्थेचा ओलावा शोधत उभे असते. बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. त्यांच्या सोबतीने आयुष्य सरकत राहतं एकेक पावलांनी पुढे. उत्क्रांतीच्या वाटेने चालत माणूस कुठवर पोहचला, याचं उत्तर भौतिक साधनांच्या साह्याने शोधता येईलही. त्याच्या प्रगतीच्या परिभाषा अन् प्रवासाच्या पाऊलखुणा कळतील. पण मनात निनादणारी भावनांची स्पंदनं आकळतीलच असे नाही. सीमांकित चौकटींना बाजूला सारून मन आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं समृद्ध करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. या परगण्याचे सारेच सावकार. येथे राव-रंक भेद नाहीच.

सोबत करणाऱ्या आठवणी कोणत्या, कशा असतील, हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या असतील, तशा स्वीकारून जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत राहतात. आठवणींनी जगणं श्रीमंत केलेलं असतं.

आयुष्याच्या प्रवासाची वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणीं आपलेपण घेऊन अंकुरतात. आस्थेची रोपटी वाढत जातात. दिसामासाचे हात धरून चालत राहतात.

काळाने जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवत आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मनःपटलावर आठवणींची गोंदणनक्षी साकारत राहतात.

दिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते.

कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात. मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात. वाऱ्यासोबत वाहत राहतात. ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण-दोनक्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात... अन् आयुष्य आपले किनारे शोधत वाहत राहतं, कुठल्यातरी आठवणींना सोबत घेऊन.
●●

साहित्यिकसमाजलेख