पूर्वार्ध https://www.misalpav.com/node/42796 इथे आहे
**************
‘ड’चा अभाव आणि आजार :
हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात.
मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात:
डोक्याचा खूप मोठा आकार
बरगड्या व पाठीचा कणा वाकणे
मोठे पोट
पाय धनुष्यकृती आकारात वाकणे
मूल वेळेत चालायला न लागणे
दात योग्य वेळेवर न येणे
वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते. त्यांची हाडे ठिसूळ झाल्याने अस्थिभंग सहज होण्याचा धोका असतो.
‘ड’ ची शरीरातील स्थिती आणि आजार-प्रतिबंध :
‘ड’ आणि हाडांचे आरोग्य याचा थेट संबंध आहे हे निर्विवाद सत्य आहे. या व्यतिरिक्त त्याचा इतर काही आजारांशी संबंध आहे का, हे एक कोडे आहे. गेली २० वर्षे यावर विपुल संशोधन झालेले आहे. त्यामध्ये मुख्यतः दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले होते:
१. हे आजार ‘ड’ च्या अभावाने होऊ शकतात का?, आणि
२.या आजारांमध्ये मुख्य उपचाराबरोबर ‘ड’ चा मोठा डोस देणे उपयुक्त असते का?
या दोन्ही प्रश्नांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. आता या आजारांची यादी सादर करतो:
* मधुमेह (प्रकार-२)
* Metabolic syndrome : यात स्थूलता, उच्च * कोलेस्टेरॉल व इतर मेद इ. चा समावेश आहे.
* हृदयविकार
* श्वसनदाह (respiratory infections) आणि दमा
*काही कर्करोग : यात फुफ्फुस-कर्करोगावर बरेच संशोधन झाले आहे
* नैराश्य
* पुरुष वंध्यत्व आणि
Multiple sclerosis हा मज्जासंस्था-विकार.
वरील सर्व आजार आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. आजपर्यंत या संशोधनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.
वरील आजारांपैकी सर्वात जास्त संशोधन हे मधुमेहावर झालेले आहे. संशोधनाची प्रमुख उद्दिष्ट्ये अशी आहेत:
१. ‘ड’ च्या अभावाने मधुमेह(प्र-२) होण्याचा धोका अधिक असतो का?
२.मधुमेहाच्या पूर्वावस्थेत जर ‘ड’ चे मोठे डोस दिले तर मधुमेह-प्रतिबंध होऊ शकतो का?
३.या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपात (आहार, सूर्यप्रकाश) घेतलेले चांगले की औषध स्वरूपात?
सद्यस्थितीत तरी या प्रश्नांची ठोस उत्तरे आपल्याजवळ नाहीत. जगभरात अनेक वंशांच्या लोकांवर हे संशोधन चालू आहे. त्यातील एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष खूप आशादायक असतो तर अन्य एखाद्याचा निराशाजनक. पुन्हा हे निष्कर्ष बऱ्याचदा वांशिकतेशी निगडीत असल्याचेही दिसते. त्यामुळे ‘ड’ आणि मधुमेह-प्रतिबंध यावर आज तरी सार्वत्रिक विधान करता येत नाही.
दोन मुद्दे मात्र स्वीकारार्ह आहेत.
आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये ‘ड’ मदत करते आणि पेशींमध्ये इन्सुलिनचे कार्य व्यवस्थित होण्यातही त्याचा वाटा असतो.
तसेच आजार प्रतिबंधासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपातूनच मिळालेले अधिक चांगले, असे म्हणता येईल.
‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
अलीकडे ही पातळी मोजण्याचे प्रमाण समाजात वाढलेले दिसते.
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात. त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणी चाचणी म्हणून नको.
समारोप:
आपल्या त्वचेवर पडणाऱ्या पुरेशा सूर्यप्रकाशातून ‘ड’ तयार होते. अर्थात ते अपुरे असल्याने ते काही प्रमाणात आहारातूनही घ्यावे लागते. म्हणूनच ते जीवनसत्व ठरते. ते शरीरात काम करताना एखाद्या हॉर्मोन प्रमाणे वागते. रक्तातील कॅलशियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे त्याचे महत्वाचे काम. लहान मुले आणि वृद्धांमध्ये त्याची कमतरता बऱ्यापैकी आढळते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. त्या व्यतिरिक्त इतर काही आजारांशी ‘ड’ चा संबंध आहे का, यावर बरेच संशोधन होत आहे. अद्याप तरी त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. तेव्हा खरी गरज नसताना उगाचच ‘ड’ ची रक्तपातळी मोजणे अथवा त्याचे मोठे डोस औषधरुपात देणे हे हितावह नाही.
वैज्ञानिकांनी 'Sunshine Vitamin’ असे गौरवलेले हे ‘ड’ आज एक कुतूहलाचा विषय झाले आहे खरे.
**********************************************
प्रतिक्रिया
16 Jun 2018 - 12:08 pm | कुमार१
टीप :
पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे.
(काही भर घालून येथे प्रकाशित)
16 Jun 2018 - 3:39 pm | कालिंदी
<<<<<वरील सर्व आजार आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. आजपर्यंत या संशोधनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.>>>>
स्थुलता, मेटॅबॉलिक सिंड्रोम आणि कोलेस्टेरॉल अधिक्य ह्यामध्ये ड जीवनसत्वाचा कार्यकारणभाव पुरेसा लॉजीकल आहे (कार्यकारण्भाव सिद्ध झालेला आहे). ७ डिहायड्रो कोलेस्टेरॉल हे ड जीवनसत्व बनवण्याचा कच्चा माल म्हणुन वापरले जाते. कोलेस्टेरॉलची पातळी अधिक असणार्या व्यक्तीला जर ड ची कमतरता असेल आणि अश्या व्यक्तीने ११ ते ३ मध्ये उन्हात एक तासभर योग्य पोशाखात घालवला तर अनावश्यक कोलेस्टेरॉल ड जीवनसत्वाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येउन दोन्ही आघाड्यांवर फायदा होतो. मात्र अर्थातच बाहेरुन तयार ड जीवनसत्व देउन (गोळ्या/इंजेक्शन च्या स्वरुपात) हा बदल (कोलेस्टेरॉल च्या पातळीत घट) दिसणार नाही.
मधुमेहाच्या अनुषंगाने तुम्ही <<आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये ‘ड’ मदत करते आणि पेशींमध्ये इन्सुलिनचे कार्य व्यवस्थित होण्यातही त्याचा वाटा असतो.>> हे सांगितलच आहे त्याव्यतिरिक्त स्वादुपिंडाच्या पेशिंचे संरक्षक म्हनुनही डी काम करते ( इथे अधिक माहिती मिळेल)
<<<या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात. त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. >>>
ड२ जो प्रामुख्याने आहारातुन मिळतो आणि ड३ जो आहारातुन तसेच त्वचेत निर्माण झाल्याने मिळतो असे हे दोन फॉर्म्स आहेत. परदेशात डेफिशिअंसी साठी औषध म्हणुन मोठ्या डोस मध्ये जेन्व्हा ड दिले जायचे तेन्व्हा ते ड२ स्वरुपात दिले जायचे. ड मोजण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत (सेल बेस्ड एसे आणि मास स्प्रेक्ट्रोमेट्री एसे) त्यापैकी सेल बेस्ड एसे हे खर्चाच्या दॄष्टीने स्वस्त असतात पण ते ड२ मोजु शकत नाही. त्यामुळे डिफिशिअंसी खरोखर्च आहे की मोजणीच्या मार्यादेमुळे वाटतेय तसेच दिलेल्या औषधांचा परिणाम किती होतोय हे कळु शकत नसे). मासस्पेक्ट्रोस्कोपी मात्र त्यादृष्टिने विश्वासार्ह पध्दत आहे. जी खर्चाच्या दृष्टिने सामान्य माणसाला कशी परवडु शकेल ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
भारतीयांच्या खाद्यसवयींचा विचार केला तर भारतीयांना आहारातुन मिळणार्या ड२ चे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच भारतात औषधांच्या स्वरुपात प्रामुख्याने ड३ च दिले जाते. त्यामुळे सेल बेस्ड एसे पद्धत (जी सध्या बहुतांश प्रयोगशाळांमध्ये वापरली जाते) भारतीयांच्या शरीरातल्या ड पातळीचे अचुक तपशिल पुरवु शकते. त्यामुळे कमतरतेची शक्यता वाटल्यास ड ची चाचणी जरुर करा असे सुचवीन ज्यायोगे योग्य उपचार त्वरित सुरु करता येतील.
16 Jun 2018 - 3:44 pm | कालिंदी
<<अलीकडे ही पातळी मोजण्याचे प्रमाण समाजात वाढलेले दिसते.
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात. त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. >>
ह्यासाठी हा खालील प्रतीसाद आहे.
ड२ जो प्रामुख्याने आहारातुन मिळतो आणि ड३ जो आहारातुन तसेच त्वचेत निर्माण झाल्याने मिळतो असे हे दोन फॉर्म्स आहेत. परदेशात डेफिशिअंसी साठी औषध म्हणुन मोठ्या डोस मध्ये जेन्व्हा ड दिले जायचे तेन्व्हा ते ड२ स्वरुपात दिले जायचे. ड मोजण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत (सेल बेस्ड एसे आणि मास स्प्रेक्ट्रोमेट्री एसे) त्यापैकी सेल बेस्ड एसे हे खर्चाच्या दॄष्टीने स्वस्त असतात पण ते ड२ मोजु शकत नाही. त्यामुळे डिफिशिअंसी खरोखर्च आहे की मोजणीच्या मार्यादेमुळे वाटतेय तसेच दिलेल्या औषधांचा परिणाम किती होतोय हे कळु शकत नसे). मासस्पेक्ट्रोस्कोपी मात्र त्यादृष्टिने विश्वासार्ह पध्दत आहे. जी खर्चाच्या दृष्टिने सामान्य माणसाला कशी परवडु शकेल ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
भारतीयांच्या खाद्यसवयींचा विचार केला तर भारतीयांना आहारातुन मिळणार्या ड२ चे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच भारतात औषधांच्या स्वरुपात प्रामुख्याने ड३ च दिले जाते. त्यामुळे सेल बेस्ड एसे पद्धत (जी सध्या बहुतांश प्रयोगशाळांमध्ये वापरली जाते) भारतीयांच्या शरीरातल्या ड पातळीचे अचुक तपशिल पुरवु शकते. त्यामुळे कमतरतेची शक्यता वाटल्यास ड ची चाचणी जरुर करा असे सुचवीन ज्यायोगे योग्य उपचार त्वरित सुरु करता येतील.
16 Jun 2018 - 4:29 pm | कुमार१
ड२ जो प्रामुख्याने आहारातुन मिळतो आणि ड३ जो आहारातुन तसेच त्वचेत निर्माण झाल्याने मिळतो असे हे दोन फॉर्म्स आहेत>>>>
नाही, मला वेगळे म्हणायचे होते. 2 forms म्हणजे:
१. यकृतात साठवलेला ( 25 HCC)
२. परिपक्व ड। ( 1,25 DHCC)
16 Jun 2018 - 7:05 pm | कालिंदी
२५ हायद्रॉक्सी ड हा साठवणुक फॉर्म ज्याच हाफ लाइफ ज्यास्त असल्याने हा साधारण ६ आठवडे स्तेबल असतो. १,२५ डायहायड्रॉक्सी ड हा बायोलॉजिकली अॅक्टिव फॉर्म ज्याच हाफ लाइफ काहि तासांच असत. कार्यभाग साध्य झाला कि किडनित तयार झालेल्या २४ ह्यायडृओक्झायलेज ह्या एन्झाईम द्वारे तो २४,२५ डायहायड्रॉक्सी ड बनतो आणि उत्सर्जित केला जातो. त्याच हाफ लाइफ इतक कमी असल्याने तो मोजण प्रॅक्टिकल नाहि. मोजताना नेहमि २५ हायड्रॉक्सी ड च मोजला जातो.
16 Jun 2018 - 7:49 pm | कुमार१
@ कालिंदी :
साधारणपणे 25 HCC मोजला जातो, हे बरोबर. पण, खालील विशिष्ट परिस्थितीत १,२५ HCC मोजण्याचे महत्व आहे:
१. दीर्घकालीन मूत्रपिंड आजार (CKD)
२. खूप लवकरच्या वयातील मुडदूस (early onset) वा मुडदूसाचा कुटुंब-इतिहास असल्यास
३. रुग्ण जर दीर्घकाल steroids किंवा anticonvulsants घेत असल्यास
४. जेव्हा रक्तातील calcium पातळीचे बारकाईने निरीक्षण करायचे असते तेव्हा वरील दोन्ही forms मोजणे हितावह असते.
(१,२५ चे half-life ४ तास असल्याने ते मोजणे आव्हानात्मक आहे, हे बरोबर. )
16 Jun 2018 - 7:39 pm | सुबोध खरे
purist (शुद्धता वादी) आणि pragmatist (व्यवहारी शहाणपण असणारा)
मी दुसऱ्या गटातील आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्वाची चाचणी करण्यापेक्षा (ज्याची किंमत १२०० ते १५०० रुपये आहे) ५० च्या पुढच्या रुग्णांना मी सरळ ६०००० आंतरराष्ट्रीय युनिट ड जीवनसत्वाचे सॅचेट जे साधारण फक्त २५ रुपयांचे आहे.
ते दर महिन्यात एकदा असे सहा महिने देणे पसंत करतो. (अर्थात माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांचा गेल्या एक वर्षातील कोणताही एक्स रे पाहिल्यावर मला साधारण अंदाज येतो कि याला जीवन सत्त्वाचा किती अभाव आहे.)
या जीवनसत्त्वाचे अति प्रमाण झाले तर त्याने नुकसान होऊ शकते. परंतु हि स्थिती जर रोज ४००० युनिट( किंवा महिन्याला १,२०,०००) घेतले तरच होते.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे कि असा डोस देणे म्हणजे सरकारने बँकेला वित्तपुरवठा करण्यासारखे आहे. हा पुरवठा तातडीची मदत म्हणून केलेला असतो.
बँकेला आपली वित्तीय प्रकृती सुधारणे जसे गरजेचे आहे. ती न केल्यास बँक जशी डबघाईला येते तशीच कुपथ्याने आपली प्रकृती डबघाईला येऊ शकते.
आहारात मिळणारी जीवनसत्वे हि जास्त महत्त्वाची आहेत. कारण जीवनसत्त्वाबरोबर मिळ्णारी सूक्ष्म द्रव्ये आपण औषध म्हणून घेत असलेल्या गोळीत/ द्रवात मिळत नाहीत ही गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे.
वि सू.-- अजूनही काही सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे असू शकतील ज्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे अन्नात मिळणारी काही / अनेक सूक्ष्म द्रव्ये औषधात अंतर्भूत झालेली नाहीत/नसतील. त्यामुळे औषध हा अन्नाचा पर्याय नाही.
16 Jun 2018 - 7:50 pm | कालिंदी
मी प्युरीस्ट किंवा प्राग्मअॅटिस्ट प्रॅक्टिशनर नाही. आहारशास्त्राची संशोधक आहे. तुमच्या लेखनात जे मुद्दे मला जुन्या किंवा अशास्त्रीय माहितवर आधारीत वाटले तिथे दुरुस्ती सुचवली. तुम्ही कसे चुकताय हे दाखवण्याचा उद्देश नसुन विषयाचा आवाका मोठा असल्याने राहुन गेलेल्या गोष्टी निदर्शनास आणुन देउन लेख परिपुर्ण करण्यास मदत करणे हा उद्देश होता. कारण ह्या विषयावर शास्त्रीय माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाहि. तुमच्या शेवटच्या प्रतिक्रियेवरुन तुम्हाला माझा हा प्रयत्न मान्य नसावा असे वाटले. त्यामुळे माझे इथले लिखाण थांबवते.
18 Jun 2018 - 2:33 pm | माहितगार
वाद विवादातूनच सत्य उघड होते अशा अर्थाचे सुभाषित आहे. समर्थ रामदासांनी जसे रोज लिहिणे सुचवले आहे तसे सत्य समोर आणण्यासाठी वादही सुचवला आहे, रणांगण विचार विमर्शाचे रणांगण एवढ्या सहज सोडण्याचे कारण नसावे. तुमचे मत दुजोरा देण्यासाठी असो वा वेगळे असो ते अवश्य लिहावे,
कोणी चुकत असेल किंवा काही लिहावयाचे सुटत असेल तर जरुर निदर्शनास आणावे. मिसळपाव सारख्या संवादी माध्यमांचा उद्देश्यच तो आहे असे वाटते. मला वाटते इतर चर्चा सहभागी सुद्धा या मताम्शी बर्यापैकी सहमत होतील.
16 Jun 2018 - 8:14 pm | कुमार१
तुमच्या "व्यवहारी शहाणपण" य मुद्द्याशी पूर्ण सहमत.
आणि...
औषध हा अन्नाचा पर्याय नाही.>>>>> ला जोरदार अनुमोदन.
17 Jun 2018 - 6:07 pm | शाली
छान माहिती आहे ही सगळी.
18 Jun 2018 - 10:07 am | कुमार१
ही चर्चा चालू असतानाच ‘ड’ आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगासंबंधीचे ताजे संशोधन जाहीर झाले आहे.
‘ड’ ची पातळी सातत्याने कमी राहिल्यास या कर्करोगाचा धोका वाढतो असा त्याचा निष्कर्ष आहे.
भविष्यात यावरील संशोधन गती घेईल असे वाटते.
18 Jun 2018 - 1:13 pm | सस्नेह
ड जीवनसत्वाचा डोस किती असावा आणि दोन डोसमधले अंतर किती असावे याबद्दल काही सांगू शकाल काय ?
काही जण ६०००० युनिट्स ची गोळी आठवड्याला एक घ्या असे सांगतात तर काही १००००० युनिट्सचे इंजेक्शन महिन्यातून एकदा घ्या म्हणतात.
18 Jun 2018 - 2:31 pm | कुमार१
याचे एक् असे उत्तर देता यणारनाही ; आजारानुसार ते बदलेल.
५० नन्तरच्या Osteoporosis साठी १००० U दररोज कॅल्शियम बरोबर, इतपत सांगतो.
प्रत्येक रुग्णाच्या तपासणी प्रमाणे सल्ला असेल.
18 Jun 2018 - 1:40 pm | अनिंद्य
@ कुमार१,
नेहेमीप्रमाणे माहितीपूर्ण लेखन.
त्वचेवर पडणाऱ्या पुरेशा सूर्यप्रकाशातून ‘ड’ तयार होते. ते अपुरे असल्याने ते काही प्रमाणात आहारातूनही घ्यावे लागते.
म्हणजे घरटे उन्हात बांधणे हा शाप नाही :-)
18 Jun 2018 - 2:32 pm | कुमार१
अनिन्द्य, आभार !
शाप बिलकूल नाही, वरदानच !
18 Jun 2018 - 2:49 pm | माहितगार
कणकेतून अमूक एक प्रमाणात बाजारात मिळणारी डि व्हिटॅमीन पावडर अमुक एक प्रमाणात मिसळता येईल वगैरे असा रिसर्च पेपर मी दोन एक वर्षापुर्वी ऑनलाईन वाचल्याचे आठवते पण तसा कोणताही प्रयोग केला नाही. पण घरी खाण्याचे तेल पाकीट जे विकत घेतो ते डि व्हिट्मीन असल्याचे लिहिलेले घेतो. घरच्या तेलाच्या वापराच्या प्रमाणावरुन ते प्रमाण अती नाही होणार हे सुरवातीस तपासले होते.
पण या विषयावर या निमीत्ताने तज्ञांकडून अधिक माहिती घेणे आवडेल .
( डिस क्लेमर: मी आरोग्य क्षेत्रातील जाणकार नाही )
18 Jun 2018 - 3:07 pm | कुमार१
प्रौढांसाठी : १० मायक्रो ग्रॅम ( ४०० IU) आहे.
आता हे त्या तेलातील प्रमाणाशी कसे जुळवायचे ते आहार तज्ज्ञ सांगू शकतील
18 Jun 2018 - 7:38 pm | सुबोध खरे
जनतेच्या खाद्यतेलात "अ" आणि "ड" जीवनसत्त्व घालून त्याची पोषक मूल्य वाढवणारा प्रयोग मध्य प्रदेशात मुख्यमंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी उदघाटन करून २०१३ चालू केला. गरीब लोक जास्त करून सोयाबीन तेल वापरतात. ( कारण ते स्वस्त आहे). भारतात मध्य प्रदेशात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते. यामुळे तेथे सोयाबीनच्या तेलात "अ" आणि "ड" जीवनसत्त्व घालून जनतेला त्याच किमतीत हे तेल विकण्याचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. एक लिटर तेलात हि जीवन सत्त्वे घालण्यासाठी फक्त ७ पैसे खर्च होतो त्यामुळे तेलाची किंमत न वाढवता खाजगी उद्योजकांना हे परवडते. https://www.thebetterindia.com/21627/vitamins-fortified-cooking-oil-in-m...
गुजरात आणि राजस्थान या राज्यात आता फक्त असे "संपन्न" तेलच विकले जाते.
आणि हा प्रयोग भारतात सर्वत्र राबवला जाणार आहे. शिवाय आता तेल ५० मिली आणि १०० मिली च्या पाकिटातसुद्धा विकले जाणार आहे. त्यामुळे गरीब लोकांना सुद्धा सुटे तेल घेण्याऐवजी असे संपन्न तेल मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे
जिज्ञासूंनी खालील दुवे पाहावेत हि विनंती.
https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/food/manufac...
18 Jun 2018 - 7:49 pm | कुमार१
तसेही शाकाहारातून ‘ड’ फारसे मिळत नाही.
सर्वांनाच मासे खाणे जमत नाही.
म्हणून हा प्रयोग महत्वाचा ठरतो.
18 Jun 2018 - 8:28 pm | सुधीर कांदळकर
प्रामाणिकपणे मांडली आहे आणि उगीच फक्त पांढर्या गोष्टी रंगवून धूसर बाजूला चकाकीचा मुलामा दिला नाही. हीच तर आधुनिक वैद्यकाची कमाल आहे. धन्यवाद.
19 Jun 2018 - 7:40 am | लई भारी
रोचक माहिती आणि चर्चा.
इतर आजारांशी संबंध असण्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. डी२ बद्दल तर बिलकुल माहिती नव्हती.
एकंदरीत 'ड' म्हणजे 'कोवळे' ऊन त्यामुळे, सकाळी ९ नंतरच्या उन्हाचा काही उपयोग नाही असे ऐकत आलेलो आहे, ते तितकेसे खरे दिसत नाही.
19 Jun 2018 - 9:11 am | कुमार१
एकंदरीत 'ड' म्हणजे 'कोवळे' ऊन त्यामुळे, >>>>>
समाजातला हा मोठा गैरसमज आहे. १० ते ३ दरम्यान जमेल तितके थेट ऊन उघड्या त्वचेवर घेतले पाहिजे . याचा अर्थ अति भाजून घेणे असा नाही!
19 Jun 2018 - 5:45 pm | सप्तरंगी
D जीवनसत्व आणि त्वचारोग याचा काय संबंध आहे? पाशात्य देशातील ऊन कमी असलेल्या प्रांतात लहान मुलांना आणि मोठ्यांनाही त्वचेचे रोग जास्त प्रमाणात होताना दिसतात, अगदी आपल्या मुलांनाही. even तिथे स्किन कॅन्सरचे प्रमाणही जास्त आहे ना ?
स्किन कॅन्सरची शक्यता कॉस्मॅटिक्सच्या अवाजवी वापरामुळेही वाढते पण पाशात्य देशातील लोकातील स्किनच्या दोषांचे कारण lack ऑफ व्हिटॅमिन डी हेच समजले जाते ना कि नाही ? पण मग ते तर त्यांच्या स्किनमुळे फार पटकन व्हिटॅमिन D absorb करू शकतात . त्या दृष्टीने विचार केला तर sun बाथसाठी त्यांच्यापेक्षा आपणच उन्हात जास्त बसायला हवे, जे आपण टाळतो, टॅन न होण्यासाठी:)
19 Jun 2018 - 6:13 pm | कुमार१
D जीवनसत्व आणि त्वचारोग याचा काय संबंध आहे? >>
नाही, ‘ड’च्या अभावाने त्वचेचा कर्करोग नाही होत.
या रोगाची कारणमीमांसा अशी:
१. मुळात त्या व्यक्तीत जनुकीय बिघाड असतो, त्याने रोगाची अनुकुलता वाढते.
२. सौर किरणोत्सर्ग हे मुख्य कारण आहे. त्यात नीलातीत किरणांचे अति exoposure हे कारण.
३. म्हणून sunburn होणे टाळले पाहिजे.
19 Jun 2018 - 6:37 pm | सप्तरंगी
मी ""‘ड’च्या अभावाने त्वचेचा कर्करोग होऊ शकतात का "" असं नाही तर ''D च्या अभावाने त्वचारोग'' (ex. acne, aczema, fungal infections ) होऊ शकतात किंवा वाढतात का विचारलं.
काही अंशी उत्तर कळाले, त्यासाठी आभार
19 Jun 2018 - 6:39 pm | सप्तरंगी
Acne, Eczema
19 Jun 2018 - 6:42 pm | कुमार१
त्यांची कारणे वेगळी आहेत.
जरा प्रश्न वाचताना मीच गंडलो , क्षमस्व
19 Jun 2018 - 7:00 pm | कुमार१
त्वचेच्या आरोग्याशी आहे.
20 Jun 2018 - 12:21 am | सुबोध खरे
Vitamin D and skin diseases
http://www.ijdvl.com/article.asp?issn=0378-6323;year=2015;volume=81;issu...
यात ड जीवन सत्त्व आणि त्वचेचे आजार याबाबत उत्तम अहिती आहे. ,नवीन संशोधनाप्रमाणे ड जीवन सत्त्व हे काही त्वचेच्या आजारात उपयोगी पडू शकेल.
20 Jun 2018 - 12:22 am | सुबोध खरे
Vitamin D and skin diseases
http://www.ijdvl.com/article.asp?issn=0378-6323;year=2015;volume=81;issu...
यात ड जीवन सत्त्व आणि त्वचेचे आजार याबाबत उत्तम अहिती आहे. ,नवीन संशोधनाप्रमाणे ड जीवन सत्त्व हे काही त्वचेच्या आजारात उपयोगी पडू शकेल.
Vitamin D and the Pathophysiology of Inflammatory Skin Diseases.
https://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/29306952/
20 Jun 2018 - 4:37 am | सप्तरंगी
थँक्स डॉक्टर, उद्या वाचतेच.
20 Jun 2018 - 8:04 am | कुमार१
सुबोध, संदर्भाबद्दल आभार.
त्या वाचनातून काही मुद्दे लक्षात आले:
१. ड आणि त्वचाविकार यावरील संशोधन अद्याप अपुरे आहे
२. त्यातल्या त्यात Psoriasis साठी निष्कर्ष सकारात्मक आहेत
३. अन्य त्वचाविकारांसंबंधीचा विदा उलटसुलट व अपुरा आहे. त्यामुळे सध्या तरी ड ची ‘उपचार’ म्हणून शिफारस करता येत नाही.
४. भविष्यात अधिक संशोधनाची गरज आहे.
असो, अधिक वाचनास उद्युक्त केल्याबद्दल आभार.
20 Jun 2018 - 12:30 pm | कुमार१
ड ची त्वचानिर्मिती व सूर्यप्रकाश हा तसा रोचक विषय आहे. निर्मितीच्या मर्यादा लेखात स्पष्ट केल्या आहेत. त्यात अजून एका मुद्द्याची भर घालतो.
नीलातीत किरण त्वचेवर पडणे ही झाली थिअरी. पण यातील वास्तव काय ते बघा.
१९५० नंतर जागतिक हवेचे प्रदूषण वाढत गेले. जेवढे हे प्रदूषण जास्त तेवढ्या प्रमाणात नीलातीत किरणांना पृथ्वीवर पोचायला अडथळा होतो !
१९७० - ८० च्या दशकातच यावर जोरदार चर्चा चालू झाली. ‘ड’ चा अभाव हा हवा प्रदूषणातून उदभवलेला पहिला कुपोषण-आजार ,अशी नोंद तेव्हाच्या वैद्यकीय पुस्तकांत झाली होती.
……
आज २०१८ मध्ये ही परिस्थिती किती ढासळली असेल याची कल्पनाच केलेली बरी !
म्हणूनच..…
ड चे आहारातील महत्व वाढलेले आहे.
20 Jun 2018 - 4:05 pm | एस
कोणत्या भारतीय आहारातून 'ड' जीवनसत्त्व (सर्व प्रकार) पुरेसे उपलब्ध होऊ शकेल?
20 Jun 2018 - 4:40 pm | कुमार१
tuna, mackerel, and salmon हे मासे. यांची मराठी नावे कोणी सांगेल का ? एखादा मत्स्यप्रेमी?
“संपन्न” खाद्यतेले
चीज
अंड्याचा बलक
20 Jun 2018 - 4:49 pm | मार्मिक गोडसे
mackerel म्हणजे बांगडा.
21 Jun 2018 - 11:08 am | कुमार१
सर्व सहभागींचे चांगल्या व उपयुक्त चर्चेबद्दल मनापासून आभार.
26 Jun 2018 - 11:56 am | कुमार१
शालेय पोषण आहार योजनेखाली देण्यात येणाऱ्या आहारात ‘अ’ व ‘ड’ ने संपन्न तेल व मीठ देण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नागरी भागातील मुलांना हा लाभ मिळणार आहे.
संबंधित बातमी इथे:
http://124.30.219.86/EpaperData/Sakal/Pune/2018/06/26/Main/Sakal_Pune_20...
अभिनंदनीय निर्णय !
26 Jun 2018 - 12:07 pm | कुमार१
२०/६/२०१८ च्या ताज्या संशोधनानुसार या रुग्णांना ‘ड’ किंवा ‘ब-१२’ ही जीवनसत्वे देण्याची शिफारस अजिबात केलेली नाही.
संदर्भ:
https://jamanetwork.com/journals/jamadermatology/fullarticle/2684587
एकंदरीत, हाडांचे आजार सोडल्यास ‘ड’ चे इतर उपयोग हा विषय अजून वादग्रस्त आहे.
26 Jun 2018 - 12:23 pm | माहितगार
हम्म लिंक बघितली बरीचशी डोक्यावरुन गेली :( तो शोध निबंध काय म्हणतोय ते अधिक डिटेल मध्ये कळाल्यास बरे पडेल.
26 Jun 2018 - 1:14 pm | कुमार१
शोधनिबंधाचा सारांश:
१. सोरायसिसच्या रुग्णांना मुख्य उपचाराबरोबर आहारातील काही बदल उपयुक्त ठरतील.
२. कमी उष्मांकाच्या आहाराची जोरदार शिफारस.
३. काही रुग्णांसाठी ‘ग्लुटेन-मुक्त’ आहाराची चाचणी (३ महिने) शिफारस
४. माशांचे तेल खाणे उपयोगी नाही.
५. या रुग्णांना ‘ड’ किंवा ‘ब-१२’ ही जीवनसत्वे देण्याची शिफारस अजिबात केलेली नाही.
13 May 2020 - 12:39 pm | कुमार१
ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे. त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:
१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.
४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.
६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
13 May 2020 - 3:54 pm | माहितगार
रोचक माहिती. (आपला प्रतिसाद वाचल्या नंतर बातम्यांचा शोध घेतला तर इंडियन एक्सप्रेस मध्ये १, २ वृत्ते मिळाली)
कोविड- १९ च्या परिपेक्ष्यात मला २ मुद्द्यांकडे लक्ष्य वेधावेसे वाटते
१) नव्या वीषाणूंच्या प्रसाराचा संबंध प्राणी सहवासाशी आहे की आहाराशी आहे यात जनमानसात बर्यापैकी संभ्रम आहे एकुण नवीन वीषाणू साथीच्या बातम्या येतात तेव्हा बराच मोठा भारतीय वर्ग मांसाहारच नव्हे अंड्यांचाही त्याग करतो आणि संशोधन सुचवते आहे तसे ड जीवन्सत्वाची नेमकी याच काळात गरज असते.
२) लॉक्डाऊनचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने घराच्या बाहेरही पडता येत नाही. म्हणजे सूर्य प्रकाशातून व्हीटॅमीन ड मिळण्याची शक्यता अजूनच रोडावते (माझे धाकटे पाल्य गेल्या चार-सहा आठवड्यात तरी उन्हात बाहेर पडलेले नाही)
३) डॉ. खरेंनी वरील काही प्रतिसादात व्हीटॅमीन ड सॅचेट कसे घेता येईल या बद्द्ल चर्चा केली आहे. प्रत्येकाचा फॅमिली फिजीशिअन व्हिटॅमिन डी लिहून देईलच -खास करुन टेस्ट केलेल्या नसताना -आणि फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला त्यासाठी डॉक्टरकडे नेणे होईलच असे नाही. (मी माझ्या घरातील अंथरुणास खिळून असलेल्या आईला वर्षातून एकदा एक सॅचेट काही आठवड्यात चिमुट चिमुट भर फळाच्या मिल्कशेकमध्ये घालून देतो कारण स्वतः डॉक्टर नसताना एकदम देण्याची हिम्मत होत नाही)
४) मुख्यत्वे शाकाहारी असलेल्यांसाठी किंवा धास्तीने मांसाहार टाळत असलेल्यांसाठी व्हिटॅमिन ड संपन्न (फोर्टीफाईड ) आहार सेफ पद्धतीने अगदी डॉक्टरकडे जावयास न लागता कसा वाढवावा या बद्दल अधिक चर्चा व्हावी असे वाटते. ( सर्व सामान्य बाहेर पडतानाचा काळ आणि लॉकडाऊन अथवा पावसाळ्याचा काळ अशी काळासाठी व्हीअटॅमीन ड युक्त फोर्टीफाईड आहाराची चर्चा व्हावी असे वाटते.
(आपल्या कडे दोन पर्याय सहज उपलब्ध आहेत एक काही रेडीमेड तेले जसे की माझ्याकडे जेमिनी का काय ब्रँड घेतो दुसरे ग्लुकॉन डी )
13 May 2020 - 4:14 pm | माहितगार
ता. क. : मी व्हीटॅमीन ड आणि कोविड १९ संबंधा बद्दल अधिक संशोधन बाकी असल्याची ही दोन वृत्ते १, २ सुद्धा वाचली आहेत तरी सुद्धा सेफ लेव्हल पर्यंत व्हीटॅमीन ड तसेही इतर कारणासाठी गरजेचे असणार तेव्हा सेफ लेव्हल चे महत्व लक्षात घेऊन चर्चा करण्यास हरकत नसावी असे वाटते.
13 May 2020 - 5:24 pm | कुमार१
मागा,
प्र आवडला.
कोविडसाठी ड हे प्रतिबंधात्मक म्हणून द्यवे की नाही यावर वैद्यकविश्वात दोन तुल्यबल गट पडलेले आहेत.
तूर्त अधिक संशोधनाची वाट पहावी. घाईने निष्कर्ष नको असे वाटते.
जे डॉ ड च्या बाजूने आहेत त्यातील काहींनी ड + मॅग्नेशियम असे एकत्र घ्यावे असे सुचवले आहे.