भेंड्या खेळाव्यात. मुळातच हरकत किंवा वैर नाही. छान बैठा खेळ आहे. उगीच पळापळ नको. जरा मधेमधे चारेक टाळ्या वाजवल्या की झालं.
आणि बसने वगैरे दूर दूर जाताना, ऍज अ टुरिस्ट ग्रुप हक्काचं आपलं मराठी माणूस आपल्याला मुंबई ते मुंबई हाकलून हाकलून परत आणताना... किंवा नातेवाईक मिळून टेम्पो ट्रॅव्हलरने तीन दिवसांत अष्टविनायक "करत" असताना .. उपयोगी पडतो वाटेत हा खेळ.
जनरली एक पन्नाशीतले तरुण काका बसमध्ये हे सुरु करतात. त्यांना गायची आवड असते. सगळी गाणी तेच काका म्हणतात. इतरजण पहिला अर्धा तास जोरात आणि मग क्षीण टाळ्या वाजवतात. खर्ज आवाजात पुटपुट करत ओठ गाण्यानुसार हलवतात.
डिपेंडिंग ऑन व्हेदर केसरीवीणा, चौधरी यात्रा कंपनी किंवा घरचाच प्रासंगिक करार.. बाहेर शेतं, हिमशिखरं किंवा डुकरं वगैरे दिसत असतात. ती तन्मय होऊन बघता बघता मधेच काका "गा की रे" ओरडले की पुटपुट जरा वाढवायची असं तंत्र जमवून सेटल झालं की.. ती वेळ येते.
म्हणजे भेंडयांमधे अनिवार्य असलेला एक लूप कम भोवरा कम चकवा येतो.
किती काळ गेला, सहस्रक बदललं. पन्नाशीच्या काकांची जागा आम्ही तरुणांनी घ्यायची वेळ येऊ घातली. अन्नू, जतिन ललित, ए आर रेहमान, प्रीतम, रेशमिया आणि व्हॉट नॉट येऊन गेले. पण ही दिग्गज गाणी या लूपमधून सुटली नाहीत आणि तो लूप भेंडयांतून सुटला नाही.
या गाण्यांची एक खास मजा आहे. युनिक गुण.
एक म्हणजे ही गाणी अंताक्षरीखेरीज अन्यत्र कोणीही गात किंवा ऐकत नाही, संग्रही ठेवणं तर लै कोसांवर. चुभूदेघे.
दुसरं म्हणजे कोणालाही यातल्या ९९% गाण्यांतल्या दोन ओळींपलीकडे एक शब्दही माहीत नसतो.
सुरुवात यांपैकी कशानेही होऊ शकते. पण एका गाण्याने सुरुवात झाली की एकमेकांची शेपटी तोंडात धरलेल्या सापांप्रमाणे ती सगळी एका लायनीत झुकझुकगाडी बनवून येतात.
उदा. इथे एका भयाण "ड"ने मी या दैवदुर्विलासाची सुरुवात करतो.
"डम डम डिगा डिगा.. मौसम भिगा भिगा" (इथे लोक्स बिगा बिगा म्हणतात)... "बिनपिये मैं तो गिरा मैं तो गिरा हाय अल्ला. सूरत आपकी सुभानल्ला" .. शेवटच्या ओळीला तरुण काका स्वतःच्या "हिच्या"कडे हाताने निर्देश करतात. टाळ्या, हास्यकल्लोळ..
हे उत्तम झालं. रंगत भरताहेत काका.
मग काका जोरात "ल" असं ओरडतात.
आता ल वरून तशी कितीही उत्तम गाणी असली तरी आपली लूपिष्ट गाणी संपल्याशिवाय पुढे विचारच करणे कर्तव्य नसल्याने लूप सुरु होतो.
"लल्ला लल्ला लोरी. दूध की कटोरी. दूधमें बताशा, मुन्नी करे तमाशा".. "श".... काय आलं ? "श" "श"..
एक उत्फुल्ल आनंदी तरुण मुलगी :
"शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है.. इसिलिये मम्मी ने मेरे तुम्हे चायपे बुलाया है.. "
अय्या, हो का? हशा, टाळ्या चेष्टा, तरुण मुलीचं काही स्मार्ट प्रत्युत्तर आणि मग "बुलाया है.. ह ह ह" चा ओरडा.
"है ना बोलो बोलो. है ना... मम्मी को पप्पा से.. प्यार है, प्यार है.. "
पुढे कोणालाच येत नसल्याने "है ना... न. न आलं. न."
.."ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे..... ठ."
इथे एक दुःखी तरुणी एकटीच क्षीण किनऱ्या आवाजात "ठाडे रहियो.." रडू लागते. ही तरुणी पूर्ण भेंडयांत एकच गाणं म्हणते.
क्षीण तरुणी उपलब्ध नसल्यास "ठाडे रहियो.."ला फाटा मिळून तरुण काका खुद्द "ठंडे ठंडे पानी से नाहायला" सुरुवात करतात.
"गाना आये या ना आये" काय फरक पडत नाय.
ठाडे असो किंवा ठंडा पानी.. अंती दोन्ही मार्गांनी "य" लाभतो.
"यम्मा यम्मा, यम्मा यम्मा.. ये खुबसुरत समा, बस्साज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा".. याचीही पुढची ओळ कुण्णाला येत नाही. आणि आली तरी इतक्या नीरस गाण्याची तिसरी ओळ कोणाला नकोच असते.
सो.. कल हम कहा तुम कहा.. "ह"...!!
"हाय रे हाय नींद नही आय.. दिलमें तू समाये आया प्यारभरा मौसम सुहाना, दिवाना"... "न" "न"..
"नानी तेरी मोरनी को.." किंवा "नैनो में सपना".... दोन्हीपैकी काही का असेना.. शेवटी "य"...
मग "यम्मा यम्मा.." "ए..ए.. झालंय ऑलरेडी.."
"य" "य"...
"याहू .. चाहे कोई मुझे जंगली कहे...हम क्या करे.." "र"..
"रेम्माम्मा रेम्माम्मा रे... रेम्माम्मा रेम्माम्मा रे...हम तो गये बाजारमें लेनेको आलू...पीछे पडा भालू".. "ल ल"..
किंवा "र"ने "रमया वस्तावया.." नावाचं डिप्रेशन ट्रिगर होऊ शकतं..
रमया वस्तावयामधे असा आणखी एक लूप ट्रिगर करण्याची क्षमता आहे.
बाकी डफलीवाsssले, ए मेरी जोहराजबीं, हसता हुआ नूरानी चेहरा आणि असंख्याना वंदन. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी च्यायला.
जाऊदे. आणखी कशाला लिहायचं.. इतकं लिहून शांतता लाभलीय.
इतर कोणी कावलेत का अशा भेंडीवर्तुळात?
प्रतिक्रिया
3 Jun 2018 - 1:09 pm | नाखु
काही गाणी तर गौरी, श्राद्ध भाज्यांसारखी फक्त भेंड्या मध्ये एकमेकांसोबत नांदतात,जणू ते गाणं सोडुन दुसरं म्हटलं तर वावगं ठरणार हे नक्की.
या ठराविक दळण रेघोट्या मध्ये हम आपके है कौन/मैने प्यार किया चा सिंहांचा वाटा आहे हे नक्की
आडवाटेला असलेला नाखु
3 Jun 2018 - 1:12 pm | जेम्स वांड
भयानक कावलो होतो पण उगाच आमचा सातारी तोंडचा पट्टा मोकळा सोडून कश्याला लोकांनी सहलीला भरलेले पैसे आंबट करावे म्हणून दातओठ खात गप बसलो होतो.
प्रसंग टेम्पररी हनिमून (मुख्य हनिमूनचं बुकिंग पंधरा दिवसानंतरचे असल्यामुळे जवळपासची एक ट्रिप) , स्वतः ड्राइव्ह करून शीण येईल म्हणून चांगल्या नावाजलेल्या कंपनीतून बुकिंग केलेलं, दोघं अजून एकमेकांना न सारवलेलो. छान समुद्र किनाऱ्यावर एका कोपऱ्यात दोघं सूर्यास्त पाहत बसलं की पूर्ण ग्रुप हलवून तिथं आणायला एक काका लैच तत्पर (आम्ही त्यांचं नाव चॅस्टीटी काका ठेऊन दिलं होतं ;) ). बरं आणून परत ह्या शेंडा न बुडूख अंताक्षरी सुरू, भसाड्या आवाजात 'धिस इज फॉर लव्हबर्ड' म्हणून सुरू होत. आमचं बर्ड अँग्री होतंय का हे मधूनच चोरून पाहावं लागत असे, बरं 'एक चतुर नार' हे गाणं काकांना 'रोमँटिक' वाटे, आता काय बोंबलायचं का चुना घालून!
3 Jun 2018 - 1:24 pm | पद्मावति
आहा मस्तं लिहिलंय. भेंड्या म्हणजे आवडता प्रकार. लुपिष्ट गाणी =))) लेके प्रभू का नाम.. म म्हंटलं कि मी 'मै तुलसी तेरे आंगन की' हे नाही तर माई ना माई ने सुरुवात करते. ठ म्हंटलं की ठन्डे ठन्डे पानी से हे बहुतेकांचं हॉट फेव्हरेट. मैने प्यार किया च्या भेंड्यांचं गाणं माझ्या डोक्यात इतकं फिट बसलंय की चाहे तू माने चाहे ना माने नंतर नैनो मे सपना, ये पब्लिक हैं, होटो पे ऐसी बात अशी गाणी एकामागोमाग आठवतात :) आजकाल तरुण मुलं मुली काय गाणी म्हणतात ते माहित नाही खूप वर्षे झाली भेंड्या खेळून.
मागे मिपावर कुणी तरी भेंड्यांचा धागा काढला होता. काय मस्तं होता :)
3 Jun 2018 - 2:25 pm | स्पा
@ठ म्हंटलं की ठन्डे ठन्डे पानी से हे
>>> हो ह्या गाण्याची ही एकच ओळ,चक्क गद्यात म्हटली जाते, आणी ठ ला बायपास केले जाते, no one even bother to think diff
3 Jun 2018 - 2:50 pm | गवि
वास्तविक "ठंडा"वरूनसुद्धा,
ठंडी हवा ये चांदनी सुहानी.
ठंडी हवाए लहेराके आये
अशी दोन तरी आठवावीत.
तरीही नतद्रष्ट भेंडाळू न वरून ना ना करते आणि य वरून यम्मा यम्माला आणून पोचवतीलच.
3 Jun 2018 - 1:53 pm | कुमार१
मस्त स्मरणरंजन
3 Jun 2018 - 2:23 pm | स्पा
=))
बेकार हसलो बर्याच दिवसांनी, भेंड्या नावाचा बोर पण गेट टुगेदरच्या वेळी तितकाच कंपलसरी असणारा प्रकार, आणि हीच ती साच्यातली गाणी, लगेच कनेक्ट झालं
3 Jun 2018 - 3:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कैक वर्ष आपण अंताक्षरी हा कंटाळवाणा खेळ खेळलो. अंताक्षरी अर्धा तास, एक तासापेक्षा जास्त काळ दम धरत नाही पण, अंताक्षरीची मजा येतेच येते. बाकी, काहीही सुचतं तुम्हाला. बाहेर आभाळ आणि तुमच्या अशा आठवणींचा धागा. भूतकाळात रमवायला काही गाणी मदत नक्कीच करतात. गाणी खरंच देहभान हरवून टाकतात. खिडकीच्या बाहेर डोळे असतात आणि ओठी गाणी. मी अंताक्षरीत ज्या गाण्यांवर दबा धरुन बसायचो ती माझी काही गाणी.
' तुम जो मिल गये हो, तो ये लगता है, की जहा मिल गया है, एक भटके हुये राही को, कारवा मिल गया है, तुम जो.... मिल गये हो.
' दिल ढूँढता है फिर वही, फ़ुरसत के रात दिन बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए दिल ढूँढता है...
' दिल मे तुझे बिठाके कर लुंगी बंद आखे पुजा करुंगी तेरी.
' खिलते हैं गुल यहाँ, खिलके बिखरने को मिलते हैं दिल यहाँ, मिलके बिछड़ने को खिलते हैं गुल यहाँ
' चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हाँ तुम बिलकुल वैसी हो, जैसा मैंने सोचा था ना कस्मे हैं ना रस्में हैं, ना शिकवे हैं ना वादे हैं
आणि तिचं खास आवडतं.
’तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे, पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे, शरद चांदण्यातली भेट आठवे मला. ”
’हे बंध रेशमांचे हृदयात जागणार्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे.
अशी कितीतरी गाणी अंताक्षरीत आठवतात, ड, ठ, ट, च, अशी अडणारी अंताक्षरी रेंगाळायला लागते. आपला एक कट्टा ठेवा. आपण आपली गाणी म्हणून घेऊ. कसं करता ? बाय द वे, आठवणींची कवाडं किलकिली करायला लावल्याबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
3 Jun 2018 - 3:05 pm | गवि
हो हो. ही अक्षर येण्याची वाट पाहत दबा धरायला लावणारी सुंदर गाणी हा एका विरुद्ध मूडच्या लिखाणाचा विषय आहे.
3 Jun 2018 - 3:18 pm | नाखु
हे अक्षर आल्यावर मी अंताक्षरी तर "हे गाव लै न्यारं" हेच गाणे हमखास म्हणत असे आणि एकदाही त्याची सुरुवात कुणीही आक्षेपली नाही.
आडवाटेच्या गाण्यांची सुरुवात कुणीही लक्षात ठेवत नाही
3 Jun 2018 - 4:28 pm | विजुभाऊ
बिरुटे सर
नॉस्टाल्जीक केलंत राव.
औरम्गाबाद ला एक कट्टा करुया
3 Jun 2018 - 3:11 pm | प्रचेतस
गाण्याच्या भेंड्या अतिशय वैतागवाणा आणि रटाळ खेळ आहे. आणि त्यात गाणं गाणं म्हणा गाणं म्हणा असं न गाणाऱ्याला म्हणणारे लोक तर अतिशय डोक्यात जातात.
3 Jun 2018 - 3:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाव खाऊ नये, जसं येतं तसं म्हणावं गाणं. ही भाव खाणारी लोक माझ्या प्रचंड डोक्यात जातात.
-दिलीप बिरुटे
3 Jun 2018 - 3:35 pm | प्रचेतस
हं...
3 Jun 2018 - 3:18 pm | श्वेता२४
3 Jun 2018 - 3:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही तपशीलवार सांगता येईल का ?
-दिलीप बिरुटे
(वयाने मोठा झालेला)
3 Jun 2018 - 3:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि तुमचे लहानपणाचे चार चार प्रतिसाद पाहून परत जातो.
-दिलीप बिरुटे
3 Jun 2018 - 3:32 pm | श्वेता२४
या भेंड्या 12-13 वर्षाचे असेपर्यंत फारच खेळायचो अगदी 3-3 तास त्यात हीच घासून गुळगुळीत झालेली गाणी म्हणायचो जस. सरावले तसा आम्ही झ व य ठ या अक्षरांनी सुरु होणारी 5 गाणी पाठ करून ठेवली होती !पण खरंच आताच्या गाण्यातले शब्दच बऱ्याचदा कळत नाहीत त्यातले निम्मे शब्द इंग्रजी असतात ते अशा पद्धतीने म्हणलेले असतात की काही कळत नाही पण आश्चर्य आताच्या पिढीला ते सहज कळतात त्यामुळे हया पिढीबरोबर अंताक्षरी लावली कि त्यांचं शेवटचं अक्षर येण्याची वाट बघत त्यांचं गाणं ऐकावं लागतं
3 Jun 2018 - 3:34 pm | प्रचेतस
देवा....!
3 Jun 2018 - 4:56 pm | गणामास्तर
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
4 Jun 2018 - 1:29 pm | चांदणे संदीप
जरा ती गाणी लिस्टवा की इकडे!
Sandy
4 Jun 2018 - 2:24 pm | श्वेता२४
झ - झिलमिल सितारोंका आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा, झूठ बोले कौआ काटे, झूमका गिरा रे, झंडा उंचा रहे हमारा,
व - वादा रहा सनम, वाह वाह रामजी, वादा करले साजना, वो कोन थी नजर मिलाके जान लेगयी, वंदे मातरम (हो, भेंडी चढू नये म्हणून हेही गाणं म्हणायचो)
य - ये राते ये मोसम, यो जो मोहोब्बत है, ये हसी वादीया, यम्मा यम्मा, यारी हे इमान मेरा
ट - टन टना टन टननटारा, टीप टीप बरसा पानी, टीप टीप टीप बारीश सुरु हो गई,
ठ - ठंडे ठंडे पानीसे, ठंडी हवा सुन काली घटा सुन, ठाडे रहियो, ठा ठा ठा दुनिया का ठा ठा ठा मे चला यारे मे चला (हे गाणं माझा एक भाऊ म्हणायचा त्याचं ऐकून आम्हीही म्हणायचो पण आजतागायत कधी ऐकलेलं नाही.)
श - शायद मेरी शादीका खयाल, शुक्रीया दिल दिया शुक्रीया दिल लिया, शुक्रीया तेरा शुक्रीया आज तुने जो किया जो मांगाथा ख्वाब मे, शुक्रीया(3)मेरे पिया जितने सोये ख्वाब थे सबको जगा दिया
4 Jun 2018 - 6:10 pm | चांदणे संदीप
एकतरी सदाबहार, भूले बिसरे गीत सापडेल अशी आशा होतीच आणि तुम्ही निराश नाही केले.
ठा ठा ठा दुनिया दी ठा ठा ठा... हे अतिशय सुरेख गाणे गीतकार समीर यांनी आणि संगीतकार जोडी आनंद मिलींद या त्रयींनी संगीतसृष्टीला बहाल केल्याबद्दल त्यांचे थोडे व तुम्ही इथे लिस्टून ठेवल्याबद्दल तुमचेही थोडे पण ज्याने ते लक्षात ठेवून अंताक्षरीमध्ये सादर केले (मेबी वर्षानुवर्षे?) अशा तुमच्या भावाचे खूपच कवतुक!
Sandy
4 Jun 2018 - 8:08 pm | श्वेता२४
माझ्या सा. ज्ञा. त भर घातल्याबद्दल नाहीतर हे गाणं नसेल असाच वाटत होतं
10 Jun 2018 - 8:26 am | अर्धवटराव
पुर्वाश्रमीचे श्री श्री राजु चाचा, उर्फ सद्यःकालीन सिंघम तथा अजय देवगण साहेबांनी प्लॅटफॉर्म चित्रपटात अजरामर केलेलं हे गाणं आणि त्यातला त्यांचा अभिनय अजुनही स्मरणात आहे =))
3 Jun 2018 - 3:42 pm | अभ्या..
बिरुटे सरांचा एक आणि तुमचे लहानपणाचे आठ आठ प्रतिसाद पाहून परत जातो.
-फिलिप फिरुदे
(आवाज मोठा झालेला)
3 Jun 2018 - 5:11 pm | जेम्स वांड
अभ्या लहानपणी मर्फी बेबी प्रमाणे दिसत असेल! पण हाय रे कर्मा बिटको मंजनच हुतं मेलं
3 Jun 2018 - 8:13 pm | अभ्या..
व्हय, ल्हानपनी मला चुन्याचं तीट लावित आसंत.
3 Jun 2018 - 4:47 pm | विजुभाऊ
प्रा डॉ डिलीट करुदे.
3 Jun 2018 - 4:50 pm | दशानन
#metoo
3 Jun 2018 - 5:17 pm | जेम्स वांड
कोणी ठोकली होती?
अंताक्षरीत पाचर म्हणे मी!
3 Jun 2018 - 6:23 pm | कंजूस
शिल्पनायिका , नृत्य नायिका, आरसा/पोपटवाल्या नायिकाही भेंड्या लावत असतील का?
3 Jun 2018 - 6:52 pm | किसन शिंदे
हं. कुठल्यातरी लेटेस्ट टुरमधून कावलेले दिसताहेत गवि अंकल. बाकी आमच्या हापिसातला ग्रुप ट्रेकला नेतो तेव्हा बऱ्यापैकी नवीन गाणी असतात गाण्यांच्या भेंड्यांमध्ये, मोस्टली केके, अरिजीत, अशा सगळ्या नव्या दमाच्या गायकांची.
3 Jun 2018 - 10:06 pm | विजुभाऊ
ह्या ह्या ह्या
4 Jun 2018 - 12:04 pm | अनिंद्य
लल्ला लल्ला लोरी :-) :-) :-) असली गाणी अंताक्षरी सोडून कधीच ऐकली नाहीत. अंताक्षरी भयाण बोर प्रकार आहे.
BTW अन्ताक्षरीला 'भेंड्या' का म्हणत असावे ?
4 Jun 2018 - 12:09 pm | सुमीत भातखंडे
कसं सुचतं एक-एक :). मस्त धागा.
बाकी "गाण्याच्या भेंड्या अतिशय वैतागवाणा आणि रटाळ खेळ आहे" ह्या श्री. प्रचेतस ह्यांच्या मताशी सहमत.
4 Jun 2018 - 1:33 pm | चांदणे संदीप
अंताक्षरी सारख्या वैश्वीक महाराष्ट्री खेळाची मापे काढल्या बद्दल गविकाकांचा णिशेध!
रच्याकने… इथेच अंताक्षरी चालू करूया का मग…
बैठे बैठे क्या करे करना है कूच काम
सुरू करो अंताक्षरी लेके प्र भू का ना म...
म आलंय म...
Sandy
4 Jun 2018 - 2:08 pm | गवि
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश.
हे मंगेशा, ही अंताक्षरी सुरु होण्याची पाळी माझ्या धाग्यावर येण्याआधी डोळे का नाहीस रे मिटलेस???
4 Jun 2018 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका, श च्या ऐवजी दुसरं अक्षर देता का ?
-दिलीप बिरुटे
4 Jun 2018 - 3:34 pm | यशोधरा
साक्षात मंगेशाचे डोळे मिटवता? भारीच =))
4 Jun 2018 - 6:38 pm | मराठी कथालेखक
लहानपणी वीज खंडित झाली की अंताक्षती खेळायचो.
thanks to inverter :)
4 Jun 2018 - 11:33 pm | प्रसाद गोडबोले
भेंड्या हा एक क्युटीयापा अन त्याहुन नवीन कहर म्हणजे ते दम शेराज की काय ! काय त्याला अर्थ ना बिर्थ. नुसता डोक्याला शॉट ! त्यातनं त्या ऑफिसातल्या पार्टीज असतील तर मग पोरींना अजुनच झिंग चढते ह्या असल्या बाष्कळ खेळांची :-\
खेळायचेच आहे तर पोकर खेळा म्हणावं , स्ट्रिप पोकर खेळा , ड्रिंक ऑर डेअर खेळा, ट्विस्टर खेळा , गेलाबाजार घटकंचुकी खेळा ! पण हा भेंड्यांचा फालतुपणा थांबवा =))))
5 Jun 2018 - 9:30 pm | मदनबाण
अचुक निरिक्षण आणि सुरेख लेखन... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नशा ये प्यार का नशा है ये मेरी बात यारों मानों नशे में यार डूब जाओ रहो ना होश में दीवानों... :- Mann
10 Jun 2018 - 8:58 am | नंदन
खास गविस्पेशल लेख!
अगदी, अगदी. (बाकी या वाक्याची जीवनातल्या रुटीनशी तुलना करून शेवटी उपदेशसमेवर येत बोधामृताचा काजूगर हातावर ठेवावा तसा निष्कर्ष काढलाच कुणी तर, त्याच्या व्हायरलदवणीयतत्त्वज्ञानीव्हॉट्सअॅपफॉरवर्डप्रसवक्षमतेचा आवाका ध्यानी येऊ शकेल ;)
10 Jun 2018 - 9:42 am | यशोधरा
कोकणी माणूस तो कोकणी माणूसच शेवटी!! =))