नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ
सुमारे ३० वर्षे आधी नाशिक (गांधीनगर) येथून विमानांचे घरगुती (डोमेस्टीक) उड्डाणे होत होती. मी लहान असतांना एनडीसीसी बँकेच्या जुन्या इमारतीत (सीबीएस जवळील) इंडीअन एअरलाईन्स चे बुकींग काउंटर बघीतले होते. गांधीनगर धावपट्टी ही इंडीयन आर्मीच्या ताब्यात होती आणि अजूनही (२०१८) वापरात आहे. मी स्वतः कंपनीच्या कामानिमीत्त तेथे भेटी दिलेल्या आहेत. ही धावपट्टी कमी आसनी विमान उतरण्यायोग्य आहे. गांधीनगर विमानतळ हा नाशिक शहरातच आहे. त्यासाठी फार लांब जावे लागत नाही. अगदी शेअर रिक्षानेदेखील जाता येथे. गांधीनगर हे नाशिक पुणे रस्त्यालगतच आहे.
जुन्या काळी - जेआरडीच्यां काळात - किंवा जेआरडींंनी त्यांनी उडवलेली विमाने कोणतीही धावपट्टी नसतांना त्यांनी लहान विमाने एखाद्या मोकळ्या शेतात तसेच समुद्र किनार्यावर विनासायास आणि नेहमी उतरवलेली आहे किंवा उडवलेली आहेत. (त्यांच्यावरील पुस्तकात असा स्पष्ट उल्लेख आहे.)
ओझर - नाशिक विमानतळाची हवाईपट्टी देखील सैन्याच्याच (किंवा एच ए एल कंपनी - तपशील तपासावा लागेल -) जागेवर आणि ताब्यात आहे. ओझर विमानतळ नाशिकपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे थेट जाण्यासाठी नाशिकमधून स्वतंत्र वाहनाची सोय करावी लागते.
काही कारणामुळे गांधीनगर येथील विमानउड्डाणे बंद झाली. बहूदा कमी प्रवासी किंवा एअर इंडीयाने बंद केल्यामुळे बंद झाली असावी. पण तो काळ तीस वर्षांपुर्वीचा होता. सामान्य माणसाला विमानप्रवास हा मौजेखातर केला गेलेला प्रवास वाटायचा. आता ३० वर्षांनंतर हवाई वाहतूकीत अमुलाग्र बदल झालेत. सामान्यांना विमानप्रवास गरजेचा वाटू लागला आणि तो त्यांच्या आवाक्यातही आला.
वरील पार्श्वभुमी लक्षात घेता कुणीही सामान्य माणूस विचार करेल की असे असतांना विमानसेवेसाठी नाशिकहून ओझर विमानतळावर का जावे?
भारतीय सैन्य, एच ए एल कंपनी, एअरपोर्ट अॅथोरटी ऑफ इंडीया आणि सार्वजनिक बांधकाम खाते या सर्वांमध्ये हवाई धावपट्टीबाबत कोणताही समन्वय करार नसतांना सन २०१२ च्या दरम्यान ओझर येथे विमानतळाची इमारत बांधायला घेतली. नाशकातील एक मोठे मंत्री आणि सार्वजनीक बांधकाम खात्यातर्फे ही विमानतळाची इमारत बांधायला सुरूवात झाली. मोठा विचित्र प्रसंग आहे पहा. म्हणजे तुमच्या घराजवळ येण्यासाठी कोणतीही सुविधा नाही - रस्तादेखील नाही आणि लांबच्या रस्त्यावर देखील येण्याजाण्याची परवानगी नाही अन तुम्ही घर बांधतात असा प्रकार झाला हा. त्यात सार्वजनीक बांधकाम खाते अन मोठे मंत्री. मोठा योग होता. कसेही करून हवाई वाहतूक नाशिकसाठी चालू करायचीच हा अट्टहास चांगलाच होता. अरे पण मग गांधीनगर हवाई धावपट्टी उपलब्ध होतीच की! आणि तसेही ओझर येथून विमानउड्डांनासाठी हवाई धावपट्टी भारतीय सैन्याने लगेच उपलब्ध करून दिली असे नाही. त्यासाठी मोठ्या मिनतवार्या कराव्या लागल्या. मग त्याच मिनतवार्या गांधीनगर धावपट्टीसाठी का नाही केल्या गेल्या? दोन्ही धावपट्या तर सैन्याच्याच ताब्यात आहेत ना? आणि जी काही विमाने उडवायची होती ती कमी आसनीच होती. अगदी जंबो विमानांची गरज नव्हती. तेवढे प्रवासी देखील उपलब्ध नव्हते.
दोन एक वर्षात विमानतळाची इमारत उभी राहीली. तिचा वापर सुरू झाला नव्हता. कारण धावपट्टी सैन्य वापरू देत नव्हते. देखणी इमारत धुळ खात राहीली. HAL ही इमारत ताब्यात घेत नव्हते. का घ्यावी? त्या इमारतीपासून काही उत्पन्न नसेल तर कुणी ताब्यात का घ्यावी? सर्वसामान्य माणूस इतका विचार करू शकतो तर ज्यांनी विमानतळाची इमारत बांधली ते असा विचार का करू शकले नाही? तुम्ही जर इंटरनेटवर "खराब विमानतळे worst airport terminal" असे शोधल्यास अनेक विमानतळे अशी सापडतील की तेथे इमारत नाही किंवा आहे ती इमारत बस स्थानकापेक्षा जास्त चांगली नाही. म्हणजेच सार्वजनीक बांधकाम खात्याला आणि शासनाला विमानतळ म्हणजेच विमानसेवा असे वाटू लागले होते. प्रवासी विमानसेवेचा लाभ घेतो. ते त्याला महत्वाचे असते. इमारतीत तो काही मुक्कामाला थांबलेला नसतो. म्हणजेच विमानसेवा महत्वाची विमानतळाची इमारत नव्हे.
याच दरम्यान सार्वजनीक बांधकाम खात्याचा मोठा इंजिनिअर हुद्याचा अधिकारी निवृत्त झाला. अन त्याच्या निरोपसमारंभाची पार्टी या इमारतीत झाली. मोठे डीजे वैगेरे लावले गेले. शेजारच्या गावातल्या लोकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. अजूनही धावपट्टी उपलब्ध झाली नव्हती. मग HAL ने ही इमारत वार्षीक रू. १/- भाड्याने त्याब्यात घेण्याचा सोपस्कार पार पडला. धावपट्टी उपलब्ध झाली. पण विमानांचे काय? कारण कोणतीही विमाने उड्डाण कंपनी ओझरला विमानसेवा द्यायला उत्सूक नव्हती. पुरेशी प्रवासी उपलब्ध नव्हते. ओझर विमानतळ अडचणीचे होते. तेथे जाण्यासाठी नाशिकहून अर्धा ते पाऊण तास लागतो. कारण हायवेपासून आत आहे. तेथे जाण्यासाठी सार्वजनीक प्रवास सेवा उपलब्ध नाही. त्यानंतर मग मुंबई पुणे येथे उड्डान. मुंबईला गेल्यास डोमेस्टीक एअरपोर्ट मुख्य कामाच्या ठिकाणापासून दुर आहे. सामान्यतः मुंबईला काम हे सचिवालय, फोर्ट चर्चगेट, विधानभवन आदी ठिकाणी असते. म्हणजे मुंबईला पोहोचल्यावरही पुन्हा खाजगी प्रवास आहेच. मग नाशिकहून मुंबईचा विमानप्रवास हा अडचणीचा ठरू लागला. रस्तेवाहतूकीने उलट लवकर पोहोचू अशी परिस्थिती आहे.
त्यात परत शासनाचा उडान योजनेने ओझर विमानतळ जोडले गेले. पण उड्डाणे काही निट सुरू झाली नाही. ओझरहून मुंबई, पुणे उड्डाणे झाली पण ती काही टिकली नाही. सातत्य राहीले नाही. ओझरहून पुणे, मुंबई सोडले तर इतर ठिकाणी जास्त प्रवासी उपलब्ध होणार नाही. आणि ओझर विमानतळावर जाणे अडचणीचे आहे.
विमानप्रवास आता चैनीची बाब न राहता गरज बनली आहे. एखाद्या राजधानी रेल्वेच्या भाड्यापेक्षा कमी भाड्यात विमानप्रवास होवू शकतो. नाशिक- मुंबई, पुणे, शिर्डी, सुरत, इंदूर या कमी अंतर विमानसेवेच्या दरम्यान खाणे पिणे शक्य नाही - गरजही नाही. विमानाला लागणारे इंधन हे रॉकेलच्या दरात भेटते. छोटी विमाने, आवश्यक सेवा असणारी विमानतळे भले मग ती ए.सी. नसेना का किंवा एखाद्या बस स्थानकासारखी दिसली तरी चालतील. दक्षिण आफ्रिकेतील अनेक अविकसीत देशांत विमानसेवा चांगली आहे. लोकं अगदी लुंग्या घालून प्रवास करतात, बाजारहाटातल्या पिशव्या घेवून डोमेस्टीक विमानात प्रवास करतात. थोडक्यात आपल्याकडे प्रवाशांना कमी पैशात विमानसेवा देवून विमानसेवेची सवय लावायला हवी. वरील ओव्हरहेड टाळता येवून कमी पैशात विमानप्रवास शक्य आहे.
प्रवाश्यांना प्रवास महत्वाचा असतो. इमारती, सेवा, सुविधा त्यांचा दर्जा ही बाब दुय्यम आहे हे सत्य आहे. प्रवासी सेवेबाबत एकदा तक्रार करतील अन उडून निघून जातील. पण विमान उड्डाणे महत्वाची आहेत. शेवटच्या परिच्छेदातील मागण्या आणि पुन्हा गांधीनगर - नाशिक येथील धावपट्टी वापरात आणणे जोपर्यंत पुर्ण होत नाही तो पर्यंत नाशिकहून विमानउड्डाणे शक्य नाही असे माझे ठाम मत आहे. शासकीय व्यक्ती, पुढारी यांनी प्रत्येक कामात - केवळ विमानतळ-विमानसेवा नव्हे - थोडी कल्पकता, सामान्यांचा विचार आदी गोष्टी केल्यास कोणतेही काम कठीण नाही.
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
7 Apr 2018 - 10:59 am | कंजूस
चांगला लेख.
7 Apr 2018 - 12:39 pm | वरुण मोहिते
कमी पैशात विमानप्रवासाची सवय झाली पाहिजे.
7 Apr 2018 - 1:22 pm | उगा काहितरीच
पटलं ! एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास कमीत कमी वेळेत झाला पाहिजे . चांगल्या सोयी-सुविधा त्या नंतरची पायरी .
7 Apr 2018 - 5:28 pm | अभिजीत अवलिया
लेखाशी बऱ्याच अंशी सहमत आहे.
मेट्रो, विमानतळ किंवा अन्य कोणत्याही भांडवली खर्चाच्या गोष्टी बांधताना फिजिबिलिटी सर्व्हे नावाचा प्रकार केला जातो. म्हणजे जी सुविधा निर्माण करणार आहोत ती खरंच गरजेची आहे का आणि त्या प्रकल्पाचा खर्च कसा वसूल होईल का निव्वळ पांढरा हत्ती पोसल्यासारखे होईल ते तपासले जाते. तुम्ही लिहिलेल्या लेखाचा विचार करता ह्या सर्व गोष्टी धाब्यावर बसवून हा विमानतळ जनतेला केवळ 'करून दाखवले' टाईप दिखाव्यासाठी बांधल्याचे दिसतेय. जरी तुम्ही मंत्र्यांचे नाव घेतले नसले तरी ते कोण हे समजले आहेच.
नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदीकरण आणि बरीच वर्षे लालफितीत अडकलेला नाशिक पुणे थेट रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यावर (जो होईल अशी मला आशा आहे) नाशिकवरून ओझरला जाऊन विमानाने पुणे गाठण्यापेक्षा रस्ता आणि रेल्वे मार्गाने पुणे गाठणे जास्त सोईचे होईल. नाशिक-मुंबई रस्ता आणि रेल्वे सेवा बरीच चांगली आहे. सध्याचा मुंबई/पुण्याचा विमानतळ, तसेच ह्या दोन्ही शहरात येत्या ४-५ वर्षात तयार होणारे नवे जास्त प्रवासी वाहतूक क्षमतेचे विमानतळ पाहता नाशिकला वेगळ्या मोठ्या विमानतळाची गरज होती असे किमान मला तरी वाटत नाही.
प्रवासी विमानतळ म्हणून गांधीनगरची तुम्ही उल्लेख केलेली धावपट्टी वापरावी आणि ओझर विमानतळ हा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या भागातला शेतमाल परदेशात जलद निर्यात करता यावा ह्यासाठी शक्य असल्यास कार्गो हब मध्ये रुपांतरीत केला तर फायदा होईल असे वाटते.
7 Apr 2018 - 6:54 pm | Ram ram
माला वाटतं हज यात्रेसारखी सबसडी (जी हल्ली बंद केलीय) मुंबै प्रवासासाठी द्यावी. ह्ये नाशिककर यांची ऐपत नाहीय न् उगीच टुमणं लावतात.
8 Apr 2018 - 7:45 am | गवि
नवीन facility उभारताना अगदी आत्ताची मागणी / परिस्थिती गृहीत धरली जात नाही. वीस तीस वर्षे भविष्यात मोठी विमानेही उतरवण्याची तयारी आधीच डेव्हलप करुन ठेवणं हे पुढे मोठा खर्च किंवा उलथापालथ टाळण्यासाठी केलं जातं.
पण ते अनेकपट लागते.
बाकी आपापल्या गावी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न , मग एअरलाइनने उदघाटन आणि बातमीसोहळा झाल्यावर थोडे दिवस उड्डाण करुन रूट बंद करणे हे प्रकार होत आलेले आहेतच अनेक गावांत हे खरं आहेच.
8 Apr 2018 - 9:49 am | manguu@mail.com
शहराचा आकार मोठा असल्याने कुठेही विमानतळ नेले तर कुणाला तरी ते लांब वाटणारच. कर्जतचा मनुष्य मुंबई विमानतळ अगदी गैरसोयीचे आहे व पुण्याला ट्रेनने पोचणे कसे गैरसोयीचे आहे हे सांगू शकेल. तसेच पनवेलचा मनुष्य पुण्याला जायला विमानापेक्षा बस कशी सोयीची हे सप्रमाण सिद्ध करेल.
पण म्हणून मुंबै विमानतळाचे महत्व कमी होत नाही.
मुंबईतही पूर्वी ब्रिटिशानी कल्याणला एक धावपट्टी केली होती. ती आजही आहे म्हणे. पण नंतरच्या काळात गरजेनुसार जी विमानतळे बांधली तीच आज वापरात आहेत.
8 Apr 2018 - 4:50 pm | मराठी_माणूस
रोडावलेली MIDC त्या मुळे corporate sector, जो फार मोठा ग्राहक वर्ग असतो तो नाही.
8 Apr 2018 - 5:25 pm | अभ्या..
सेम सोलापूर एअरपोर्टाची स्टोरी आहे. आतापर्यंत दोनदा इथल्या बिझ्नेसमनानी विनंती करुन लहान विमानाची सेवा सुरु करायला लावली. कंपनीने वाजत गाजत केली. नंतर थोड्ञाच दिवसात प्रतिसाद नसलेने पुणे/मुंबई फ्लाईट कॅन्सल झाली कायमची. आता फक्त मंत्र्यांची विमाने उतरण्यासाठी उपयोग राहिला आहे.
पुण्यापर्यंत शिवशाहीला ४००, शताब्दीला ५५० देणारे तासाभराच्या विमानसेवेला १५०० वगैरे देऊ शकतात असे वाट्ते.
२५० कीमी एवढ्या अंतराला किती रुपये आकारले जाऊ शकतात?
9 Apr 2018 - 11:50 am | मुक्त विहारि
अशी काहीतरी बातमी वाचलेली आठवते.
असो,
व्यक्तीपूजा हीच खरी इश्वरसेवा आणि जपमाळ ओढणे हीच खरी समाजसेवा, अशी धारणा असलेल्या समाजाकडून भरीव कामगिरीची अपेक्षा करणेच चूक...
9 Apr 2018 - 12:03 pm | गवि
यात समाज काय भरीव करणार? काय अपेक्षित आहे?
नॉन फिजिबल जागी विमानसेवा सुरु करण्यात काय योग्य आहे आणि त्यात समाज as such काय करणार?
9 Apr 2018 - 12:27 pm | मराठी_माणूस
नाशिक - मुंबई द्रुत गती मार्ग ही एक आवश्यकता होती. तरीही त्याला खुप वेळ लागला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या वेळेसच नाशिक - मुंबई चा प्रस्ताव होता जो बारगळला नंतर फोर वे चा प्रस्ताव ही बारगळला (दरम्यान मुंबई-पुणे द्रुत गती मार्ग तयार होउन वापर पण सुरु झाला).
अनेक वर्ष, अनेक लोकांनी त्रास भोगल्या नंतर हा रस्ता तयार झाला , तो कसा ? तर त्याची कथा माहीत असेलच.
9 Apr 2018 - 12:29 pm | सर्वसाक्षी
मुंबई पुणे प्रवास - उपनगरात राहणार्या व्यक्तिला वाहतूक समस्या लक्षात घेता सव्वा ते दिड तास आधी घरुन निघावं लागतं. विमानतळावर उड्डाणाच्या एक तास आधी दाखल व्हावं लागतं. मग जर विमान अचूक वेळेवर असेल तर ३० मिनिटे उड्डाण काल. लोहगाव ते डेक्कन जिमखाना/ ओंध/ कोथरुड/ स्वारगेट किमान एकतास. यापेक्षा याच वा कमी वेळात ट्रेन वा शिवनेरी वा ओला करुन जाणं काय वाईट?
मुंबई हून सकाळी सात साडेसात चे उड्डाण असेल तर विमानतळावर सुरक्षा तपासणीत अर्धा पाऊण तास सहज जातो. दिल्ली हिच परिस्थिती. बेंगालुरूची कथा वेगळी नाही.
मग अल्प अंतराच्या विमानप्रवासात सुख काय?
11 Apr 2018 - 4:31 pm | भटक्य आणि उनाड
प्रवासी विमानतळ म्हणून गांधीनगरची तुम्ही उल्लेख केलेली धावपट्टी वापरावी आणि ओझर विमानतळ हा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या भागातला शेतमाल परदेशात जलद निर्यात करता यावा ह्यासाठी शक्य असल्यास कार्गो हब मध्ये रुपांतरीत केला तर फायदा होईल असे वाटते...
हेच म्हणतो....
11 Apr 2018 - 7:36 pm | प्रसाद गोडबोले
ह्या वाक्याला काही सांखिकिय आधार आहे का ? भार्तातले / नाशकातले किति लोक विमान सेवेचा वापर करतात ?
विमानतळ बनवण्याच्या आणि ऑपरेट करण्याचा खर्च किती ? तो वसुल व्हाय्ला किती काळ लागतो ? समजा समस्त नाशिककरांनी विमाना ऐवजी इतर साधने वाप्रायची ठरवली तर त्यांच्या होणार्या वेळेच्या अपव्ययाची किंमत काय ?
काही सांखिकिय डेटा आहे का उपलब्ध्द ?
12 Apr 2018 - 3:17 pm | अनिंद्य
विमानतळ म्हणजे फक्त झकपक यात्री टर्मिनल नाही हे आपल्याला कळेल तो सुदिन :-)
हवाई वाहतुकीतीच्या मोठ्या पसाऱ्यात तो एक छोटासा भाग आहे. अन्यथा म्हैसूर सारखा नवीन टर्मिनल बांधलेला विमानतळ धूळ खात पडला नसता.
सगळ्याच पायाभूत प्रकल्पांसाठी एक वार्षिक 'आउटपुट ऑडिट' असावे असे फार वाटते.
12 Apr 2018 - 3:18 pm | अनिंद्य
हवाई वाहतुकीतीच्या ऐवजी
हवाई वाहतुकीच्या असे वाचावे
13 Apr 2018 - 9:43 pm | मदनबाण
दफोराव भावना अगदी उत्तम रित्या मांडली आहे. आज माझे लक्ष वेधुन घेणारी बातमी :- स्मार्ट सिटी करण्यासाठी अगोदर रस्ते नीट करा : हायकोर्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army BM-21 Grad Artillery Firing