एका अवलियाची भेट

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 11:06 am

नमस्कार.

२१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.

म्यानमारमध्ये जंगलातून सायकलिंग करत असताना अचानक समोर येऊन बसलेला वाघ, तैवानमध्ये तुफानी चक्रीवादळात दोन दिवस व दोन रात्री झाडाला पाय व सायकल बांधून सर्व्हायव्हल करण्याचा अनुभव, अपरिचित थायलंड देशामधील माऊलीने युट्युबवर बघून भारतीय पद्धतीची खिचडी केली तो अनुभव आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला देश- परका देश किंवा आपली भाषा- परकीय भाषा हे फक्त औपचारिक राहतात आणि हृदयाची भाषा सगळीकडे चालते ह्याचे प्रत्यंतर घडवणारे अनुभव!!!

... २१ मार्च सायंकाळच्या कार्यक्रमाला अर्थातच सायकलवर गेलो. संध्याकाळी ७.३० ला अनुभव कथन सुरू होणार होतं. उपस्थितांना कोकम सरबत देत होते तेव्हाच वाटलं की, हा कार्यक्रम वेगळाच असणार आहे. हळु हळु ज्ञानेश्वरजी हे कोण आहेत, हे उलगडत गेलं. आज २६ वर्षांच्या असलेल्या ज्ञानेश्वरजींनी २००८- १० मध्ये दोन वर्ष भारताची पायी भ्रमंती केली होती! तीसुद्धा एकही रूपया खर्च न करता. दोन वर्षं भारत भ्रमण करून खरा भारत समजतो, असं ते म्हणतात. बुद्धी व हृदय खुलं ठेवलं तर कोणतीच अडचण येत नाही. शिक्षणाने एमबीए असलेल्या ज्ञानेश्वरजींनी आपलं करिअर सोडून सेवाग्रामच्या आश्रमासोबत काम सुरू केलं. आज अनेक मुलांसाठी त्यांचं काम तिथे सुरू आहे.

परिचयानंतर सुरू झाली एका विलक्षण भ्रमंतीची कहाणी. गांधीजींचे विचार व शांतता अभियान (peace mission) घेऊन जग प्रवास करण्याची त्यांची मोहीम सुरू आहे. जपानमधून त्यांनी अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीच्या टप्प्यातच पैसे संपल्यामुळे खात्यात शून्य शिल्लक होती. त्यामुळे अमेरिकेने व्हिसा दिला नाही. अनेक देशांच्या व्हिसासाठी प्रयत्न केल्यानंतर मेक्सिकोचा व्हिसा मिळाला. तोसुद्धा तिथल्या राजदुतांची भेट घेतल्यानंतर. सुरुवातीला अर्थातच दुतावासातले अधिकारी टाळाटाळ करत होते. पण शेवटी राजदुतांची पाच मिनिटांची भेट मिळाली. आणि बोलता बोलता एक तास गेला. नंतर राजदुतांनी सांगितलं की, तुम्हांला आम्ही २ महिन्यांचा टूरीस्ट व्हिसा देऊ शकत नाही, कारण आम्ही तुम्हांला १० वर्षांचा व्हिसा देतोय, कारण तुम्ही महत्त्वाचं काम करत आहात! पण तरी मेक्सिकोला जात आलं नाही, कारण जाताना विमान अमेरिकेतून जातं व तिथला ट्रान्झिट व्हिसा लागतो व तो मिळत नव्हता, असं ज्ञानेश्वरजी सांगतात. जपानचा व्हिसा एक्स्पायर होत असल्यामुळे ते सध्या भारतात आले आहेत आणि पुढची तयारी करत आहेत.

वाघाशी सामना!

ज्ञानेश्वरजींनी त्यांचा प्रवास मरीन सायकलवर केला. ते म्हणतात, मी नेहमी पाच- सहा प्लॅन्स तयार ठेवतो. एक झाला नाही तर दुसरा, नाही तर तिसरा असं. २००८ मध्ये भारत भ्रमंती केल्यामुळे खूप अनुभव होतेच गाठीशी. त्यावर चित्रलेखा पाक्षिकामध्ये २०१४ मध्ये एक सविस्तर लेखमालाही आली होती. ह्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर २०१६ ला त्यांनी त्यांच्या जगप्रवासाची सुरुवात केली. भारतातून निघाल्यावर पहिला देश म्यानमार होता. दोन वर्षं भारत भ्रमणात त्यांनी अनुभवलं होतं की, भाषेची अजिबात अडचण येत नाही. पहिल्याच देशामध्ये अतिशय अविस्मरणीय असे अनुभव आले. अपरिचित देश असला तरी लोकांचं अगत्य मिळालं. वाटेत एका छोट्या रस्त्यावरून जात असताना त्यांना आदिवासी लोकांनी घेराव घातला आणि पुढे जाऊ नका असं सांगितलं. पण ज्ञानेश्वरजी म्हणतात, तरुण रक्त होतं, जोष होता, त्यामुळे तसंच पुढे निघालो. अचानक एके ठिकाणी पूर्ण ब्रेक्स मारून सायकल थांबवावी लागली, कारण समोर अगदी १०० मीटर्सवर वाघ येऊन थांबला होता! ज्ञानेश्वरजी सांगतात, सुरुवातीला त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. माझे पाय थरथरत होते, ब्रेक्स लावून सायकल थांबवली होती. आणि अचानक त्याची आणि माझी नजरानजर झाली! काय करावं मला काहीच कळत नव्हतं. पण पळण्याचा काहीच चान्स नव्हता. त्यामुळे तसंच उभा राहिलो व हात- पाय थरथरत होते. आणि तो वाघ तिथेच बसला! वीस मिनिटे अशीच गेली. दोघेही एकमेकांकडे बघत होतो. अखेर वीस मिनिटांनी तो झाडीत गेला आणि तिथून मला बघत होता. थोड्या वेळाने रात्र झाली आणि मला तो दिसेनासा झाला. त्यानंतर मग मी हळु हळु सायकल चालवायला सुरुवात केली आणि हळु हळु पुढे निघालो. हे दाट जंगल होतं आणि ४० किलोमीटरपर्यंत कोणतीच वस्ती नव्हती. शेवटी रात्री १० वाजता मला एक आदिवासी गाव लागलं. तिथे लोक रस्त्याजवळच झोपले होते. मी जाऊन त्यांना उठवलं. हळु हळु त्यांना जाग आली. आणि ते आयुष्यात पहिल्यांदाच फॉरेनर बघत होते!! मी त्यांना खुणेने सांगत होतो की, मला भूक लागलीय. त्यांनी मग मला एके ठिकाणी नेलं. माझ्यासाठी त्यांनी दिड तास बसून जेवण बनवलं! सगळा गाव मला बघायला गोळा झाला.

त्यांनी जे जेवण बनवलं त्यामध्ये पॉर्क होतं आणि मी शाकाहारी होतो. पण त्या पोर्कसोबत मला भात दिसला. तो मी घेतला आणि चॉपस्टीकच्या ऐवजी हाताने खायला सुरुवात केली. ते बघून सगळे जण हसायला लागले. मी पोर्क बाजूला ठेवलं होतं, पण काही जणांनी ते माझ्यापुढे केलं. पण मी ते नको असं सांगितलं. नंतर मग चांगला पाहुणचार मिळाला. त्या प्रसंगानंतर मात्र माझा आत्मविश्वास विलक्षण वाढला! मी वाघाचा सामना करू शकतो तर काहीही करू शकतो असं वाटलं!

सापाची सोबत

ज्ञानेश्वरजी सांगतात, त्यांचा प्रवास पुढे सुरू राहिला. उत्तर थायलंडमधून लाओसला गेले. ते शक्यतो छोट्या रस्त्यांवर जातात आणि दिवसाला ७० किलोमीटर सायकल चालवतात. वाटेत येणा-या शाळा- कॉलेजेसमध्ये मुलांशी बोलतात. सगळ्यांना भेटतात. भारताबद्दल माहिती सांगतात. अशा तथा कथित परक्या देशातील लोकांना भारताबद्दल किती‌ आस्था आहे, हे कळतं. कधी कधी त्यांना रात्रीही सायकल चालवावी लागते. त्यांच्याकडे टेंटही आहे. कधी रात्री रस्त्याच्या बाजूला, मंदीराजवळ टेंटमध्ये मुक्काम करतात तर कधी शाळेत, कोणाच्या घरी किंवा हॉस्टेलमध्ये. सायकलीसोबत असलेला बोर्ड, गांधीजींचा फोटो व तिरंगा बघून कधी कधी लोक मदत करतात. कधी कधी करतही नाहीत. मग आणखी पुढे जावं लागतं. एकदा लाओसमध्ये असताना सायकलीवर पंक्चरचं सामान असलेली बॅग कोणीतरी काढून नेली. आणि ते सामान कुठे मिळूही शकत नव्हतं. आता प्रश्न आला की, पुढे कसं‌ जायचं. कारण लाओसमध्ये अतिशय पर्वतीय भाग आहे व रस्ते फार खराब आहेत. त्यामुळे पंक्चर होण्याची भिती होती. आणि तसंच झालं. मग खूप अंतर सायकल हातात धरून न्यावी लागली. त्यातच रात्र झाली आणि डोंगराळ भागामधला पाऊस सुरू झाला. पाण्यामुळे माझं व सायकलीचं वजन वाढलं. पण थकलेलो असूनही मी पुढे जात राहिलो. रात्री एक वाजता मला डोंगरामध्ये टेंट टाकण्यासारखी जागा मिळाली! तिथे टेंट लावला व झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा टेंट फाटला होता व फटीतून दोन साप येऊन माझ्या पायाजवळ झोपले होते! त्यांना धक्का न लावता मी‌ बाजूला झालो व आधी कुठे चावलंय का बघितलं. रात्रभर मी अनेकदा कूस बदलली होती, पण ते दोन्ही‌ साप मला चावले नव्हते. मग त्यांना बाजूला सारून मी टेंट बांधला व निघालो!

कँसर रुग्णांना हसवलं

पुढे व्हिएतनाममध्ये असताना माझ्याकडचे पैसे संपले व कठीण वेळ आली. अनेक वेळेस उपाशी पोटी सायकल चालवावी लागली. तीन तीन दिवस जेवण मिळायचं नाही. हळु हळु त्याची‌ सवयही झाली. भुकेला आहे, हे कळायचंही नाही. माझे केसही खूप वाढले होते. पण दोन वर्षांच्या भारत भ्रमणामध्ये मला माहिती होतं की, स्वत:हून कटिंग कशी करायची. मी आरसा समोर धरून कात्रीने स्वत:च कटिंग करायचो. लोक बघायचे. काही वेळेस मी लोकांकडून धान्य घेऊन सायकलवर ठेवायचो. पाच किलो तांदुळ घेऊन मुक्काम करेन तिथे भात करायचो. सकाळी करून तोच संध्याकाळी खायचो. वाटेत शेतक-यांना भेटायचो. कधी काही ठिकाणी लोक इतकं‌ आतिथ्य करायचे, भाज्या- फळं द्यायचे की सायकलवरचं सामान अजून जड व्हायचं.

नंतर थायलंडमध्ये बँकॉकला गेलो होतो तेव्हा एका मोठ्या कँसर हॉस्पिटलला भेट दिली. मला तिथल्या लास्ट स्टेज कँसर रुग्णांसोबत काही एक्टिव्हिटी घ्यायची होती. पण कोणीच मला परमिशन देत नव्हते. तीन दिवस जाऊन भेटत होतो, पण कोणी ऐकत नव्हतं. तेव्हा मला तिथला एक नेपाळी कामगार भेटला. त्याने सांगितलं की, इथले डायरेक्टर उद्या ९ वाजता येतील. त्यांना भेटून पाहा. त्यानुसार मी परत सकाळी आलो, ते वेळेवर आले व त्यांना भेटलो. माझा बोर्ड बघून व माझी माहिती‌ घेऊन त्यांनी मला आत बोलवलं. आम्ही दीड तास बोलत होतो. नंतर त्यांनी मला दुस-या दिवशी रविवारची‌ वेळ दिली. सगळे कँसर रुग्ण एका हॉलमध्ये एकत्र जमले. मी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तिथले डॉक्टर्स ट्रान्सलेट करायचे. नंतर मी त्यांना संगीत खुर्ची शिकवली. नंतर कोणी गाणं म्हंटलं, कोणी डान्स केला तर कोणी अजून. आमचा कट्टा मस्त जमला! सगळ्यांना खूपच मजा आली. नंतर ते डायरेक्टर मला स्वत: म्हणाले की, गेल्या तेरा वर्षांमध्ये त्यांनी ह्या कँसर रुग्णांना इतकं हसताना कधीच बघितलं नव्हतं! त्यांना ही एक्टिव्हिटी इतकी‌ आवडली की, ती त्यांनी पुढेही सुरू ठेवली. अजूनही महिन्यातल्या दोन रविवारी ती एक्टिव्हिटी होते व ते मला फोटोज मेल करतात! मला ही‌ माझ्या प्रवासाची‌ सर्वांत मोठी उपलब्धी वाटते! सार्थक होतो तो प्रवास! मला आठवतं, मी शाळेत असताना शाळेत नेहमी कोणी ना कोणी यायचे, काही करून जायचे. लोक यायचे, बी पेरून जायचे. त्यातून आम्ही घडलो. मला वाटतं मीसुद्धा बी पेरतोय. त्यातून काही घडेल. अशा देशांमधल्या ग्रामीण भागातल्यांनी कधीच भारतीय बघितलेला नव्हता. मी त्यांना भारताची ओळख करून दिली. पूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्म आहे, पण बुद्धांच्या देशातून आलेला तरूण ते पहिल्यांदाच बघतात.

थायी माऊलीने केलेली शुश्रुषा

दक्षिण थायलंडमध्ये असताना एकदा रात्री सायकल चालवत होतो. मला हा प्रवास तीन वर्षांमध्ये पूर्ण करायचा असल्यामुळे रात्रभरही कधी कधी प्रवास करतो. एकदा रात्री एक वाजता तीन कुत्रे माझ्या पायाला चावले. मी पायाला रुमाल बांधला व एका पायाने सायकल चालवत पुढे निघालो. एका पायाने रात्रभर सायकल चालवून सकाळी आठ वाजता एका हॉस्पिटलपाशी पोहचलो. पण तिथे मला ट्रॅव्हल इन्शुरन्स मागितला जो माझ्याकडे नव्हता. माझ्याकडे पैसेही नव्हते. त्यांनी उपचार करायला नकार दिला. मी नाइलाजाने पुढे निघालो. मी डेटॉलने पाय धुवून रोज चाळीस किलोमीटर सायकल एका पायाने चालवत पुढे निघालो. असं एक आठवडा केलं. शाळेत किंवा बाहेर राहायचो. नंतर माझा पाय सुजला व विषामुळे फुगला. मी जागा बघत होतो जिथे मला चार- पाच दिवस आराम करता येईल. मला तापही आला होता. पण माझा फुगलेला पाय बघून कोणी मला मदत करत नव्हते. आठव्या दिवशी मला ताप आला होता, अवस्था वाईट होती. एका शाळेत मी गेलो आणि बोलता बोलता चक्कर येऊन पडलो. शाळेतल्या शिक्षिकेने मला बाजूच्या मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं. तीन दिवस मला इंजेक्शन्स व सलाईन दिले. कारण पूर्ण पायात विष पसरलं होतं. डॉक्टर म्हणाले की, आठ- दहा दिवस ह्याला आराम करावा लागेल. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्या शिक्षिकेने घरी नेलं. तिथे गेल्यावर त्यांच्या कुटुंबाला माझ्या खाण्याचा प्रश्न पडला. त्यातच मी शाकाहारी. म्हणून त्या शिक्षिकेने चक्क युट्युबवर चार तास बघून मुगाची डाळ व फ्राईड राईस बनवला! मला अतिशय आनंद वाटला. नंतर तिने मला दहा दिवस रोज भारतीय जेवण बनवून खाऊ घातलं. दहा दिवसांनी जेव्हा मी निघालो, तेव्हा ते सगळे रडले.

सिंगापूर- इंडोनेशिया

नंतर मी मलेशिया क्रॉस करून सिंगापूरला आलो. सिंगापूरमधले भारतीय हाय कमिशनर बिहारचे होते. त्यांनी खूप मदत केली व सिंगापूरच्या विदेश मंत्र्यांसोबत भेट करून दिली. तिथल्या सरकारचे विविध उपक्रम मला दाखवले. नंतर विद्यापीठामध्ये माझे अनेक कार्यक्रम ठेवले. तिथे इंटरनॅशनल मीडिया कॉन्फरन्स होती त्यामुळे माझ्या सायकल प्रवासाची व मिशनची बातमी जगातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आली. नंतर त्यांनीच मला इंडोनेशियाचं तिकिट काढून दिलं.

मी जेव्हा जकार्तामध्ये एअरपोर्टवर पोहचलो, तेव्हा कुठे थांबायचं विचार करत होतो. मी तिथे सायकल व बोर्डसोबत बसलो असताना एक इंडोनेशियन माणूस आला, त्याने माझा बोर्ड व गांधीजींचा फोटो बघितला. त्याने मला विचारलं कुठे जाणार? मी त्याला म्हणालो तुमच्या घरी जाणार! मग आमचं बोलणं झालं व ते मला न्यायला तयार झाले. तिथून पंधरा किलोमीटरवर मी त्यांच्या गाडीला फॉलो करत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी घरी सांगून ठेवलं होतं. मी शाकाहारी आहे, हेही त्यांना सांगितलं होतं. घरी सगळे वाट बघत होते. तिथे माझं खूप मोठं‌ स्वागत झालं. मी इतके देश फिरलो पण इंडोनेशियामध्ये भारतीयांबद्दल सर्वाधिक प्रेम आहे असं मला वाटलं. इंडोनेशियामध्ये मुस्लीम होते पण त्यांनी फार आपुलकी दिली. इंडोनेशियात भारतीय चित्रपट संगीतही प्रसिद्ध आहे. मी त्या कुटुंबासोबत तीन दिवस राहिलो आणि निघालो तेव्हा त्यांनी आमचे फोटो काढलेले टी- शर्ट बनवून मला दिले. काही त्यांच्याकडेही ठेवले. इथे लोक वाटेत थांबवून घरी बोलवायचे. शाळेतली मुलंही जाताना बाय बाय करायची.

नंतर पुढे बालीला जात असताना मी रात्रभर सायकल चालवून सकाळी आठ वाजता पेट्रोलपंपावर आंघोळ केली. तेव्हा माझ्या सायकलवर लावलेलं सगळं सामान कोणी तरी चोरून नेलं. फक्त सायकल राहिली व माझ्यासोबत दोन कपडे होते ते राहिले. खाण्याचं सामान, इतक्या दिवसांची डायरी, फोटोज असलेली हार्ड डिस्क सगळं गेलं. सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर वाटलं हरकत नाही. फकिराकडचं सामान गेलं तर काय झालं! नंतर मी एक महिना तसंच फिरलो. पुढे बाली बेटावरच्या लोकांनीपण मला प्रेम दिलं, माझ्यासाठी कपडे व बॅग घेऊन दिल्या. माझा अनुभव आहे की, बुद्धी व हृदय खुलं असेल तर कोणतीच अडचण येत नाही आणि सगळी सोबत मिळत जाते. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं प्रेम मिळतं. भाषेची अडचण अजिबात येत नाही. आणि मी नेहमी बघितलं की, मला जे गरजेचं असायचं ते कुठे तरी तयार असायचं. मला भूक लागली असेल की कोणी तरी म्हणणार जेवून जा. तेही व्हेज बनवलेलं असणार. मला बरोबर फळं मिळायचे. तेही न सांगता.

इंडोनेशियामध्ये असताना माझे पैसे संपून गेले होते. भारतीयांना इंडोनेशियाचा व्हिसा फ्री मिळतो, त्यामुळे ती‌ अडचण नव्हती. पण मला पुढे कसं जायचं हा प्रश्न होता. भारतीय एंबसी मला मदत करत नव्हती. भारतीय नागरिकांसाठी असलेल्या एंबसीला भारतीय नागरिकाची किंमत नव्हती. ते झिडकारायचे. मी जर तिथे शिकणारा विद्यार्थी असतो तर त्यांनी मदत केली असती. काही ठिकाणी चांगलेही अनुभव आले. नंतर बालीच्या लोकांनीच मला तैवानचं तिकीट काढून दिलं व मी तैवानला पोहचलो.

तैवानमधल्या समुद्री वादळाशी सामना

तैवानमध्ये माझ्याविषयी व माझ्या पीस मिशनविषयी पेपर्समध्ये आधीच बातम्या आल्या होत्या. मी तैपेईला पोहचलो. तैवान तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा शंभर वर्षं पुढे असलेला देश! तैवानमध्येही लोकांनी खूप प्रेम दिलं. चीनमध्ये तर अजिबात नाही आणि जपानमध्येही बौद्ध धर्म कमी आहे, पण तैवानमध्ये तो खूप टिकून आहे. बुद्धांच्या देशातून आलेला म्हणून खूप प्रेम मिळालं. तैवानमध्ये मी जाईन तिथे लोकांना माहिती असायचं मी येतोय. तिथे माझ्या अनेक आई झाल्या!

दक्षिण तैवानमध्ये फिरत असताना समुद्र जवळच होता. मला आजवर समुद्र वादळाची काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी माझा मोबाईल बंद होता व मला न्यूज काहीच माहित नव्हत्या. इथे समुद्री तुफानामुळे नेहमी मोठी हानी होते. मला पूर्वेकडून डोंगर ओलांडून पश्चिमेला जायचं होतं. तैवानमध्ये तरुण लोक फार कमी आहेत. जपानमध्येही तीच समस्या आहे. कारण लोक विवाह न करता एक एकटे राहतात. तिथल्या सरकारांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे तिथली खेडी खूप उजाड आहेत. फक्त म्हातारे राहतात. ऐंशी‌ वर्षांचे असले तरी ते काम करताना दिसतात. सतत उद्योगी असतात. तिथे एकदा मी दुपारी साडेचारला जात असताना मोठं आभाळ आलं आणि पाऊस सुरू झाला. मला कुशान शहराकडे जायचं होतं. नंतर मोठा पाऊस व तीव्र वारा आला व मी सायकल थांबवली. वारा इतका तीव्र होता की, मी स्वत:ला व सायकलला कंट्रोल करू शकत नव्हतो, म्हणून एका ठिकाणी झाडाला सायकल बांधली. इतका मोठा पाऊस व वादळ मी कधीच बघितलं नव्हतं. माझ्याकडे चांगला दोरखंड होता. माझा पाय व सायकल मी झाडाला बांधली. नंतर वारा इतका तुफान झाला की, माझा फक्त बांधलेला पाय झाडाजवळ होता. मी व सायकल हवेत ओढलो जात होतो. मी एका हाताने सायकलचं हँडल धरलं होतं. असे मी दोन दिवस व दोन रात्री काढल्या. ढगांचा आवाज इतका भयानक होता की, माझ्या कानांनी ऐकणंच बंद केलं. नंतर डोळेही बंद केले. त्या दोन रात्री माझ्या जीवनातल्या अतिशय भयंकर होत्या. सतत वीजा चमकत असायच्या. जर दोरखंड तुटला असता तर मी‌ तीस किलोमीटरवरच्या सेंट्रल चायना सीमध्ये फेकला गेलो असतो.

दुस-या रात्रीनंतर वारा जरा कमी झाला. अजून एका रात्रीनंतर पाऊस कमी झाला. मग मी सावरलो व हळु हळु सायकल हातात धरून न्यायला सुरुवात केली. तीन रात्री व चार दिवस गेले असे. नंतर मी तायचुंगला पोहचलो.

मिस्टर इंडियन

माझा तैवानमधला व्हिसा चार दिवसांनी एक्स्पायर होणार होता व जर मी देश सोडला नसता तर मला अटक झाली असती. माझ्या संपूर्ण प्रवासात मला राहण्याची- खाण्याची जितकी अडचण आली नाही, तितकी व्हिसाची आली. तायचुंगमध्ये मी भारतीय हॉटेल शोधत होतो. पूर्ण गाव फिरल्यावर मला एक मिस्टर इंडियन हॉटेल दिसलं. पण आत गेलो असतो तर ऑर्डर करावी लागली असती. म्हणून भुकेला असूनही मी दोन तास बाहेरच थांबलो. दोन तासांनी एक माणूस बाहेर आला. मी त्याला बोललो की, मी भारतीय आहे. बोलणं झाल्यावर त्याने मला आत नेऊन बसवलं. खाऊ घातलं. मी सांगितलं की, मी चार दिवसांचा भुकेला आहे, जरा जास्त खाईन. नंतर त्या हॉटेलचे मालक आले, त्यांनीही माझी विचारपूस केली, काही अडचण आहे का विचारलं. मला अडचण तर होतीच, पण मदतही एकदम मागाविशी वाटली नाही. मी त्यांना फक्त माझी अडचण सांगितली. मग ते म्हणाले की, काळजी करू नको. आणि त्यांनी नंतर मला चीनचं तिकिट काढून दिलं!

नंतर त्यांनी मला विचारलं, और कहीं पाकिस्तान में भी जाओगे क्या? मग मी सांगितलं की, माझा प्रवास पाकिस्तानातच संपणार आहे. मग ते म्हणाले की, मी असाच रेस्टॉरंट पाकिस्तानातही चालवतो. आणि जेव्हा तू पाकिस्तानात जाशील तेव्हा असा विचार नको करूस की हा कोणता वेगळा देश आहे. असं समजू नको की हा वेगळा देश आहे किंवा लोक वेगळे आहेत. आपण फक्त साठ वर्षांपूर्वी वेगळे देश झालो, पण आपली राहणी- भाषा एकच तर आहे. तेव्हा हा माझा देश आहे, माझे लोक आहे, असं मानूनच तू जा. तिथेही लोक तुला प्रेम करतील. शत्रू देश आहे असा विचारही आणू नकोस. मी तुला सांगतो, कारण मी पाकिस्तानी आहे. त्यानेच मला चीनचं तिकीट काढून दिलं.

“माओ के देश में गांधी!”

चीनला जायला निघालो तेव्हा डोकलामचा वाद सुरू होता. मीडियामध्ये अनेक चर्चा होत्या. शिवाय वाटायचं की, मी पीस मिशनवर आहे; पण तिथे कम्युनिस्ट राजवट आहे जे इतर काही मान्य करत नाही. मी शांघायला विमानाने पोहचलो. तिथल्या कॉन्सुलेटला मी आधीच मेल केली होती व अपॉईंटमेंट मागितली होती. मला दुपारी तीन वाजताची अपॉईंटमेंट मिळाली होती. मी नऊ वाजता पोहचलो. पण सायकलचा पंप विमानतळावरच तुटला. तिथून मी सायकल ढकलत ३५ किलोमीटरवर शांघायला नेली. रात्री आठ वाजता शांघायला पोहचलो. अपॉईंटमेंट तर गेलीच, मी राजदुतावासाकडे गेलो पण तीही बंद झाली होती. नंतर मी बाजूच्याच गार्डनजवळ माझा टेंट लावला. पण तिथे पोलिस आले आणि त्यांनी टेंट काढायला लावला. तिथे चेअर्स होत्या, तिथे मी बसलो. थोड्या वेळाने मला एक भारतीय कानात हेडफोन लावून जाताना दिसला. मी सायकलवर त्याच्या मागे गेलो. त्याला मी भारतीय रेस्टॉरंटबद्दल विचारलं. त्याने सांगितलं की, जवळच आहे. मग तिथे गेलो. मग रेस्टॉरंटवाल्याने माझी माहिती घेतली व नंतर त्यानेच एका हॉस्टेलवर राहण्याची व्यवस्था केली. माझ्या एंबसीच्या चकरा सुरू राहिल्या.

चिनी वृत्तपत्रांना माझ्या पीस मिशनची माहिती मिळाली व त्यांनी बातम्या छापल्या. त्यावेळी राजकीय पातळीवर भारत- चीनमध्ये तणाव होता, पण लोकांच्या पातळीवर नव्हता. नंतर एका वृत्तपत्राने राजदुतांना सांगून मला त्यांच्या शांघायच्या कार्यालयात बोलावलं. माझी माहिती व मिशन त्या वृत्तपत्राला इतकी आवडली की, त्यांनी मला काही‌ दिवस रोज दिवसभरासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावलं. तीन चार ट्रान्सलेटर्स असायचे व त्या मॅडम माझी मुलाखत घ्यायच्या. सगळं ऐकून झाल्यानंतर त्या म्हणाल्या की, आमची पानं कमी पडतील इतका हा मोठा विषय आहे! मग त्यांनी शांघाय डेलीमध्ये पहिल्या पानावर बातमी दिली व आतमधल्या पानांवर तपशील दिले. नंतर बाकीच्या न्युजपेपर्सनीपण कव्हरेज दिलं. त्याला त्यांनी मस्त नाव दिलं: माओ के देश में गांधी!

दोन महिने मी चीनमध्ये राहिलो. तेव्हा डोकलाम तणाव होता. पण त्या लोकांनी कधीच माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितलं नाही. मीच जेव्हा डोकलामबद्दल म्हणायचो, तेव्हा ते म्हणायचे की ते सरकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, आमचे नाहीत. उलट ते म्हणायचे, आपले संबंध काय इतके नवीन- पन्नास साठ वर्षांचे आहेत? ते तर हजारो वर्षांचे आहेत. आमची संस्कृतीही भारतामुळेच बनलेली आहे. इतकं सांस्कृतिक नातं आहे. तेव्हा मला जाणवलं की, आपले चॅनल्स- मीडीया चीन- पाकिस्तानविषयी किती अपरिपक्व प्रचार करतात. जगाला बघायचं असेल तर खुल्या हृदयाने बघायला हवं, मग लोक इतकं प्रेम देतात! नंतर मी‌ चीनच्या कुठल्याही‌ गावातून जाताना लोक मला म्हणायचे- इंडियन, गांधी?

त्यांच्या शाळेतही गांधीजींवर धडा आहे. गांधीजींचं जे स्वप्न होतं की, आपला देश जास्त लोकसंख्येचा आहे व म्हणून आपल्याला नॅनो टेक्नोलॉजीची गरज आहे जे प्रत्येक जण करू शकेल. प्रत्येक तरुणाला काम मिळालं पाहिजे. आणि चिनी सरकारने हेच केलेलं दिसतं. तिथल्या प्रत्येक घरी‌ छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. ते म्हणतात आमच्या देशापेक्षा कोणतीच कंपनी मोठी नाही. चीनमध्ये प्रत्येक कंपनीचं विकेंद्रीकरण आहे. मोबाईलचे सर्किटस घरोघरी बनवले जातात. प्रत्येकाला तिथे संधी आहे. तेव्हा मला जाणवलं की, माझ्या देशामध्ये बुद्धीमत्तेची कमतरता नाहीय, युवांची‌ क्षमताही कमी नाहीय. पण माझ्या भारतात संधींची मात्र कमतरता आहे. शिवाय मॅच्युरिटी नाहीय. जेव्हा मला चिनी पॉलिटिशिअन्स भेटले, तेव्हा ते जगाला काही जरी विकत असले तरी चीनसाठी अतिशय कंस्ट्रक्टिव्ह काम करतात, हे जाणवलं. तिथले रस्ते हे पाच किंवा दहा नाही तर शंभर वर्षांच्या व्हिजनने बनलेले आहेत. आपण विचारही करू शकत नाही. शिवाय ते पर्यावरणाबद्दल जागरूक आहेत. शांघायसारख्या शहरात दुचाकींना बंदी आहे. सगळे सायकलच वापरतात. साध्या व इलेक्ट्रिक सायकली. नंतर शांघाय इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलावलं. खूप कौतुक व प्रेम दिलं. हा माझ्याबरोबर माझ्या देशाचा व माझ्या लोकांचाही सन्मान होता.

थंड वृत्ती व बर्फाचा सामना

चीननंतर जपानला गेलो. माझ्याकडे पैसे परत संपत आले होते. जपानच्या चलनातले फक्त दिड हजार येन होते. मी शुक्रवारी पोहचलो होतो. भारतीय दुतावासाला ईमेल केला होता. कारण रात्रीच्या एका बेडचा रेटच अडीच हजार येन होता. मला शुक्रवार, शनिवार व रविवार उणे तपमानात राहावं लागलं. तीन दिवसांमध्ये अंग आखडून गेलो. नदीजवळ टेंट लावला होता व भात बनवून खायचो. नंतर भारतीय दुतावासात गेलो तर भारतीय असूनही मला आतमध्ये जाऊ देत नव्हते. नंतर कसे तरी सेक्रेटरी भेटल्या. त्यांना माझे डॉक्युमेंटस पाहायचे होते. त्यांनी मला विचारलं, हे तुमचे डॉक्युमेंटस डुप्लिकेट तर नाहीत? त्यांना कसबसं माझ्या मिशनबद्दल समजावलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळ्या एंबसीजना फोन करतो व तुमच्याबद्दल माहिती घेतो व त्यानंतर वीस दिवसांनी तुम्हांला कळवतो. मी त्यांना राहण्याच्या व्यवस्थेविषयी विनंती केली, विनवणी केली. तीन दिवस मी तसेच काढले व चौथ्या दिवशी परत गेलो. तेव्हा मला सांगितलं एक राजीव सर आहेत, त्यांना भेटा. ते मीटिंगमध्ये होते. मी बाहेर थांबलो. नंतर बराच वेळाने आत जाऊन विचारलं तर कळालं की, ते कधीच गेले आहेत. नंतर परत गेलो तेव्हा म्हणाले की ते सुट्टीवर आहेत. त्यात पंधरा दिवस गेले. नंतर मी त्यांना म्हंटलं की, राहण्याची व्यवस्था नाही होत तर कमीत कमी काही युनिव्हर्सिटीजसोबत जोडून द्या. पण त्यांनी नाही केलं. म्हणून मीच जाऊन काही युनिव्हर्सिटीजना भेटलो.

जपान हा अतिशय सुंदर आणि प्रामाणिक देश आहे. तुमचं पाकिट कुठे पडलं तरी तीन दिवसांनंतरही ते तिथेच सापडेल. कोणीही हात लावणार नाही. टेक्नोलॉजीने देश आपल्यापेक्षा दोनशे वर्षं पुढे आहे. लोकही प्रेमळ आहेत. एका दिवसाचं काम त्या देशातला कामगार किती दिवसांत करतो, ह्यावरून देशाची तुलना करता येते. तो एकच दिवसात करतो का त्यासाठी दहा दिवस लावतो, ह्यावरून देश कळतो. त्या देशातून काय घेता येईल, काय शिकता येईल, हे मी बघण्याचा प्रयत्न करतो व ते लिहितो. जपानमध्ये समस्याही आहेत. इथली लोकसंख्या वाढत नाही. जगात आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे. कारण लोक रोबोटसारखे झाले आहेत. कोणाकडेही वेळ नसतो. व्हॅल्यूज संपल्या. त्यामानाने आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत, शेअरिंग आहे. तिथे शेअरिंग नाही. घरी बोलावणार नाहीत, हॉटेललाच भेटतील. फक्त आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, ह्याची काळजी ते घेतात. जपानमध्ये पेंशन नाही, त्यामुळे सगळ्यांना अगदी ऐंशी नव्वदाव्या वर्षीही काम करावंच लागतं.

जपानमध्ये एकदा मी नगोया गावाच्या पुढे जात होतो. बर्फ पडत होता व त्यामध्ये सायकल चालवण्याचा आनंद मी घेत होतो. पण नंतर जास्त बर्फ पडल्यावर माझी सायकल तीनशे मीटर घसरत गेली. मी रक्तबंबाळ झालो. सायकलची मोडतोड झाली. कशीबशी सायकल हातात धरून मी चालत समोरच्या गावाच्या दिशेने निघालो. रात्री दहा वाजता एका गावात पोहचलो. गाव म्हणजे उजाड घरं. जपानमध्ये मुख्य शहरं सोडली तर इतर शहरं व गावांमध्ये तरुण दिसतच नाहीत. तेव्हा ते गावही उजाड होतं. त्यातच इथले लोक सोशल- शेअरिंग करणारे नाहीत. बोलावतात, पण हॉटेलात. त्यामुळे मी जपानमध्ये घरी फार राहिलो नाही, शाळा- हॉस्टेल्समध्येच राहिलो. ह्यावेळी त्यामुळे मला प्रश्न होता. पण तरी दहा वाजता मी एक घराचं दार ठोठावलं. कोणाला त्रास होऊ नये, म्हणून जागा बघून टेंट टाकणार होतो. पण थंडी भयावह होती, त्यामुळे दार वाजवलं. ८० वर्षांच्या पती- पत्नींनी दार उघडलं. ते बाहेर आले. मला बघितलं.

इथे अजून एक गोष्ट म्हणजे ते जपानीत बोलत होते. जपानमध्ये इंग्रजी चालत नाही. माझ्या प्रवासात मी बघितलं की, आपला देश सोडून इतरांना इंग्रजीचं फार कौतुक नाही. त्यांच्या त्यांच्या भाषांनाच महत्त्व देतात. चीन- जपान सगळं विज्ञान- तंत्रज्ञान त्यांच्या भाषेतून शिकवतात. आणि मातृभाषेतून शिकवल्यामुळे त्यांच्याकडे डॉक्टरचा कोर्स दोन- तीन वर्षांमध्ये होतो. ते लवकर शिकतात. त्यांच्याशी बोलताना मात्र मी गूगल ट्रान्सलेट वापरलं. जपानीमध्ये त्यांना सांगितलं मला इथे एक रात्र थांबायचं आहे. त्यांनी सरळ माझा हात पकडला व मला घरात घेऊन गेले. त्या माउलीने मला बाथरूम दाखवलं आणि दोघांनी माझ्यासाठी सूप बनवलं. मी शाकाहारी आहे, हेही त्यांना बरोबर कळालं. अन्यथा जपान व चीनही ९९% नॉन व्हेज आहेत. पण तरी त्यांनी मला मुळ्याचं सूप केलं. नंतर मी झोपलो.

दुस-या दिवशी मी निघणार होतो, पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही. तीन दिवस मी त्यांच्याकडे राहिलो. मी मराठीत बोलायचो व ते जपानीत अशा गप्पा मारल्या. त्यांनी गावातल्या सगळ्यांना बोलावलं. मग खेळ खेळलो. सगळ्यांना खूप आनंद होत होता. सगळे ७५ पेक्षा अधिक वयाचे. भाषा अजिबात येत नसूनही सगळा संवाद होत होता. तीन दिवस मजेत गेले. चौथ्या दिवशी मात्र गूगल ट्रान्सलेटने मी त्यांना सांगितलं की, मला जायचं आहे. त्या वेळी मात्र त्या माउलीला रडू आलं. त्यांनी मला मग गूगल ट्रान्सलेटने सांगितलं की, आमच्या सत्तर- ऐंशी वर्षांच्या आयुष्यात इतका आनंद आम्हांला कधीच मिळाला नव्हता, आयुष्यात जे मिळालं नाही ते तू दिलंस. सगळा गाव गोळा झाला. मी जाऊ नये म्हणून त्यांनी माझी‌ सायकलही लपवून ठेवली होती. पण नंतर अमेरिका व मेक्सिकोला जाता आलं नाही, म्हणून सुनीलदादांशी बोलून भारतात आलो, ज्ञानेश्वरजी म्हणाले. पण ह्या प्रवासात मला असे अनेक आई- वडील ठिकठिकाणी मिळाले. पण माझ्या प्रवासामुळे मला त्या सगळ्यांना दु:खात टाकून निघावं लागलं. पण मला वाटतं की, प्रवासाचं डेस्टिनेशन महत्त्वाचं नाही तर अनुभव महत्त्वाचं आहे. सायकल हृदयाला जोडणारं माध्यम आहे, हे मी अनुभवलं.

इथून पुढचा त्यांचा प्रवास अजून ठरायचा आहे. पुढच्या देशात ते जाणार आहेत. मध्ये अनेक अडचणी येतात; पण त्या सोडवणारे लोकही मिळतात. आणखी काही देशांना भेट देऊन ह्या प्रवासाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ ला पाकिस्तानमध्ये करायचा, असा त्यांचा विचार आहे. हे सगळं अनुभव कथन ऐकताना वारंवार द अल्केमिस्ट पुस्तकाची आठवण होत होती- अगर तुम तबियत से किसी चीज़ को चाहो, तो उसे हासिल करने में सारी कायनात तुम्हारी मदद करती है! तसंच एका भारतीय मॅन व्हर्सेस वाईल्डला भेटल्याचं‌ समाधान मिळालं. आणि त्याबरोबरच हेही जाणवलं की, आपण जे काही भेदभाव मानतो- प्रादेशिक, राजकीय, देशांचे- सीमांचे, भाषांचे ते किती फुटकळ तर असतात! त्यापलीकडे डायरेक्ट हृदय ते हृदय असाही संवाद होऊ शकतो, असतो!!

कार्यक्रम संपताना आयोजकांनी उपस्थितांना ह्या उपक्रमामध्ये आर्थिक दृष्टीने सहभागी होण्याची विनंती केली. ज्ञानेश्वरजींना पुढच्या टप्प्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. आणि त्यांचे सगळे अनुभव ऐकताना खात्री वाटत गेली की, ही मोहीम निश्चितच पूर्ण होणार. हे विश्वची माझे घर हे पुन: एकदा सिद्ध होणार! कार्यक्रमानंतर परत जाताना एकोणीस किलोमीटर सायकल चालवायची असल्यामुळे लगेच निघालो. रात्री दहा वाजता निर्जन रस्त्यावर सायकल चालवताना आता अजिबात भिती वाटत नव्हती! वाटेत भक्ती शक्ती चौकातला उंच तिरंगा लागला आणि मनात ओळ आली-

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

- निरंजन वेलणकर

ज्ञानेश्वरजींविषयी अधिक माहिती व संपर्कासाठी:

सायकल मित्र श्री. अभिजीत कुपटे, 9923005485

जीवनमानप्रवासबातमी

प्रतिक्रिया

भारी अनुभव . आणि मस्त लेख.

असे लोक भन्नाट असतात. पण अनेकदा काही गोष्टी मनात येतात. त्यातली एक म्हणजे असा अवलिया भटका धर्म अंगिकारला की जिथे जाऊ तिथे सर्व अर्थांनी एकरूप व्हायचा प्रयत्न असावा. पण अशा बाबतीत जवळजवळ सगळीकडेच तिथले तिथले यजमान यांच्या आहाराबाबत अडचणीत किंवा ऑकवर्ड अवस्थेत पडलेले दिसतात. तिथे त्या माऊलींनी कुठून तरी शिकून, खपून भारतीय, शाकाहारी असं बनवायला लागणं.. त्यात आपखुशीनेही बनवलेलं असू शकतं, नाही असं नव्हे, पण.. फकीरी स्वीकारताना आपण आपले खानपानविषयक नियम ठेवू नयेत असं वाटतं.

स्वखुशीने स्वैपाक करण्याविषयी एक उदा. पाहता येईल. उदा. आपला पाहुणा आपण बनवलेलं नेहमीचं पोर्क खात नाही आणि आल्टरनेट बनवला नाही तर नुसता पांढरा सुका भात गिळतो हे पाहून कोणीही यजमान अस्वस्थ होईल आणि काहीतरी शाकाहारी बनवण्याचा खटाटोप करेलच.

अशा गोष्टी खुद्द गांधीजी आणि आहे मनोहर तरी पुस्तकात विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी वाचल्या आहेत. क्ष हे शिळीच भाकरी खातात, य हे बकरीचेच दूध पितात, ब हे चहाच पीत नाहीत (मग झोपडीत वगैरे व्हीजिट करुन त्यांच्याकडे केलेला चहा न पिणं)

असो. हा फार मोठा दोष नव्हे पण जी जीवनशैली / अज्ञात मुलुखात मिसळणयाच्या उद्देशाने जाताना तिथल्यासारखं सर्व करण्याची तयारी असावी असं वैयक्तिक मत.

आणखी एक, खालील वर्णन अतिरंजित वाटलं.

म्हणून एका ठिकाणी झाडाला सायकल बांधली. इतका मोठा पाऊस व वादळ मी कधीच बघितलं नव्हतं. माझ्याकडे चांगला दोरखंड होता. माझा पाय व सायकल मी झाडाला बांधली. नंतर वारा इतका तुफान झाला की, माझा फक्त बांधलेला पाय झाडाजवळ होता. मी व सायकल हवेत ओढलो जात होतो. मी एका हाताने सायकलचं हँडल धरलं होतं. असे मी दोन दिवस व दोन रात्री काढल्या.

जर दोरखंड तुटला असता तर मी‌ तीस किलोमीटरवरच्या सेंट्रल चायना सीमध्ये फेकला गेलो असतो.

वाचताना खिळवून ठेवणारे अनुभव आहेत. अवलिया माणूस! जबरदस्त.

पुंबा's picture

23 Mar 2018 - 1:38 pm | पुंबा

लेख फार आवडला.
भन्नाट अनुभव असतील त्यांच्याकडे.
असली अफाट साहसे करणारे लोक खरेच जबरदस्त असतात.
गविंचे यजमानाला कोड्यात टाकण्यासंबंधीचे मत पटले.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2018 - 2:27 pm | अत्रन्गि पाउस

हे असे यजमान किंवा इतर ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांना तोशीस पाडून आपली हौस भागवणे अजिबात पटले नाही.
गविंचे म्हणणे तर अजूनच स्पेसिफिकली पटले

लोकांना आपले विमानाचे तिकीट काढायला लावले ह्यात ह्या गृहस्थाला काहीच संकोच वाटला नाही ??

हे म्हणजे चक्क फुकट दुसर्यांच्या जीवावर स्वत:ची हौस भागवणे आणि तेही स्वत:च्या अटींवर ह्या शिर्जोरीव्र

अमेरिकेने व्हिसा दिला नाही ते स्वाभाविकच आहे आणि योग्यही ...

बाकी चालुदे

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2018 - 6:18 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११
एयरपोर्टवर कोणी "कुठे रहाणार" असे विचारल्यावर "तुमच्याकडे" असे उत्तर????
उद्या त्या विचारणार्याचे मत भारतीय लोक "येडे" असतात असे झाले तर?

त्यांच्याकडे ती न करण्याचा किंवा या ज्ञानेश्वरजींना सरळ हाकलून द्यायचा पर्याय होताच की. तो न वापरता त्यांनी स्वखर्चाने तिकिट काढून दिलं किंवा इतर मदत केली. याचा अर्थ ज्ञानेश्वरजींच्या कार्याचा आणि हेतूचा चांगुलपणा त्यांना पटला असेल किंवा मग ज्ञानेश्वरजी हे फार पोचलेले con man असतील. दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट ही life skills मध्ये आणि survival skills मध्ये येते हा विचार करुन लेख वाचला तर मग त्यांना फुकटे वगैरे शब्द वापरले जाणार नाहीत. त्यांच्याजवळ पैसे नव्हते, चोरीमारी करायची इच्छा नव्हती/scope नव्हता. मग काय करतील? ते त्यातून निभावून गेले हे आपण बघितलं पाहिजे. उगाचच त्यांना फुकटे म्हणून हिणवण्याने काय होणार?

मार्गी's picture

23 Mar 2018 - 3:30 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

खूप विविध प्रतिक्रिया येत आहेत! एका बाबीकडे किती विविध दृष्टीकोनासह बघता येतं, हे कळतंय! सहमत होणे न होणे छोटी बाब आहे. पण प्रत्येक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे, कारण ३६० पैकी प्रत्येक अँगलमध्ये अर्थ तर असतोच. त्यातूनच पूर्ण चित्र बनतं. एखाद्या गोष्टीकडे असं पण बघता येतं, हे कळून विशेष वाटतंय. धन्यवाद!

प्रतिक्रिया हँडल करण्यातली आपली समतोल वृत्ती, शब्दनिवड अन समंजस दृष्टी खूप आवडली मार्गीजी, एकंदरीत काही धागे वाचून झालेला 'मिपा म्हणजे आपलेच घोडे दामटायचं व्यासपीठ' हा समज अतिशय सुखदरीत्या गाडला गेला.

बाकी लेख मोठा असल्यामुळे तुकड्यातुकड्यात वाचून पूर्ण झाला की त्यावर प्रतिक्रिया देतो. ही फक्त तुमचं कौतुक अन धागा फारच वेगळा असल्याची पोचपावती.

प्रतिक्रिया हँडल करण्यातली आपली समतोल वृत्ती, शब्दनिवड अन समंजस दृष्टी खूप आवडली मार्गीजी,

एकदम सहमत.

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2018 - 8:53 pm | टवाळ कार्टा

बाडिस

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2018 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसाद विशेष आवडला.

manguu@mail.com's picture

23 Mar 2018 - 6:39 pm | manguu@mail.com

छान

manguu@mail.com's picture

23 Mar 2018 - 11:54 pm | manguu@mail.com

मला ते नवरंगचे गाणे आठवते ..

संत राधा ... नदीकाठी ... डोक्यावर सात मडकी ठेऊन मस्तपणे नाचते .. आधा है चंद्रमा , रात आधी ..

( संसार करणार नवरा , चूल सासूकडे , गुरे सासर्याकडे ... भौतिक जबाबदार्या इतरांच्या खांद्यावर टाकल्या की स्वत:च्या डोक्यावर छंद , फिरती , समाजसेवा , अध्यात्म , त्याग , भक्ती अशी ७-७ मडकी ठेऊन मस्तपैकी नाचता येते . )

मी कितीतरी वेळेला डोक्यावर वाटी ठेऊन ते गाणे लावून नाचतो. आमाला इतकेच जमते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2018 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रत्येकाला आपापल्या मर्यादा कळल्या तरी खूप झाले नाही का ?

सर्वसामान्य माणसांना ज्या मर्यादा वाटतात, त्यांना धुडकारून वेगळे काही करणारेच जगाच्या ध्यानात राहतात. नाहीतर, मुंग्याच्या वारुळातल्या इतर हजारो कामगार मुंग्यांसारखे तेच ते आपले काम जन्मापासून मरेपर्यंत करणार्‍या प्रत्येक कामगार मुंगीची कोण मोजदाद ठेवतो काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2018 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे

अशी भन्नाट सफर करण्यासाठी ह्यु एन संग, इब्न बतुता यांच्यासारख्या अव्वल भटक्याची मानसिकता आवश्यक आहे... हे येरागबाळ्याचे काम नोहे !

बाकी खुद्द सफरीचे आणि त्या प्रवाश्याचे वर्णन करण्यास शब्द नाहीत, यात सर्व काही आले !

तेव्हा मला जाणवलं की, आपले चॅनल्स- मीडीया चीन- पाकिस्तानविषयी किती अपरिपक्व प्रचार करतात. जगाला बघायचं असेल तर खुल्या हृदयाने बघायला हवं, मग लोक इतकं प्रेम देतात!

एखाद्या देशातले सर्वसाधारण लोक आणि तेथिल राज्यकर्ते यांच्या मानसिकतेत आणि करणीत जमीन-अस्मानाचा फरक असू शकतो, हे माझ्या अल्प स्वानुभवावरून सांगू शकतो. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांत तर ही परिस्थिती या संबंधात वस्तूपाठ म्हणून वापरावी अशी आहे.

मीच जेव्हा डोकलामबद्दल म्हणायचो, तेव्हा ते म्हणायचे की ते सरकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, आमचे नाहीत. उलट ते म्हणायचे, आपले संबंध काय इतके नवीन- पन्नास साठ वर्षांचे आहेत? ते तर हजारो वर्षांचे आहेत. आमची संस्कृतीही भारतामुळेच बनलेली आहे.

लेखातल्याच या वाक्यामध्येच, वरील मत अधोरेखित झालेले आहे :)

नंतर भारतीय दुतावासात गेलो तर भारतीय असूनही मला आतमध्ये जाऊ देत नव्हते. नंतर कसे तरी सेक्रेटरी भेटल्या. त्यांना माझे डॉक्युमेंटस पाहायचे होते. त्यांनी मला विचारलं, हे तुमचे डॉक्युमेंटस डुप्लिकेट तर नाहीत? त्यांना कसबसं माझ्या मिशनबद्दल समजावलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळ्या एंबसीजना फोन करतो व तुमच्याबद्दल माहिती घेतो व त्यानंतर वीस दिवसांनी तुम्हांला कळवतो. मी त्यांना राहण्याच्या व्यवस्थेविषयी विनंती केली, विनवणी केली. तीन दिवस मी तसेच काढले व चौथ्या दिवशी परत गेलो. तेव्हा मला सांगितलं एक राजीव सर आहेत, त्यांना भेटा. ते मीटिंगमध्ये होते. मी बाहेर थांबलो. नंतर बराच वेळाने आत जाऊन विचारलं तर कळालं की, ते कधीच गेले आहेत. नंतर परत गेलो तेव्हा म्हणाले की ते सुट्टीवर आहेत. त्यात पंधरा दिवस गेले. नंतर मी त्यांना म्हंटलं की, राहण्याची व्यवस्था नाही होत तर कमीत कमी काही युनिव्हर्सिटीजसोबत जोडून द्या. पण त्यांनी नाही केलं.

याबद्दल, फार आश्चर्य वाटले नाही. हे नेहमीचेच आहे. सुषमा स्वराज यांच्या कार्यकालात अनेक सकारात्मक बदल झालेले ऐकले आहेत आणि माध्यमांत वाचायला मिळत आहेत. पण, वकिलातीकडून अपेक्षित असलेली सामान्य स्तराची सेवा देण्याच्या दृष्टीनेही, भारतिय वकिलातींना अजून खूप मोठी मजल गाठायची आहे, हे नक्की.

मुक्त विहारि's picture

24 Mar 2018 - 2:04 am | मुक्त विहारि

लेख आवडला....

मार्गी's picture

24 Mar 2018 - 12:29 pm | मार्गी

सर्वांना खूप खूप धन्यवाद!!! @ डॉ. सुहास म्हात्रे सर, विशेष धन्यवाद!!

पैसा's picture

24 Mar 2018 - 5:47 pm | पैसा

कोणतेही अचाट काम अगदी एकट्याने करणे कधी शक्य नसते. चर्चा वाचली. लोकांनी मदत का करावी असे प्रश्न वाचले. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांनाही मदत का करावी किंवा एव्हरेस्ट मोहिमा लोकांच्या मदतीवर आणि आपला जीव धोक्यात घालून कराव्या का असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा छत्रपती शिवरायांना मदत करताना हजारोंनी प्राण पणाला का लावले या प्रश्नाचे उत्तर कोणी विचारू शकतो.

मदत घेणाऱ्या बरोबर देणाऱ्याला त्यातून काही मिळत असते. उगीच कोणी सक्तीने मदत करत नसतात.

असले अचाट काम इतक्या लहान वयात करणाऱ्याचे निखळ कौतुक आहे.

मार्गी's picture

26 Mar 2018 - 2:36 pm | मार्गी

धन्यवाद ताई!

पैताई, आक्षेप (माझ्यापुरता) हा लोकांकडून मदत घेण्याविषयी नाही. उलट लोकांकडून मोकळेपणी मदत, साहाय्य मागणं ही व्यक्तिमत्व विकासाची महत्वाची स्टेप आहे. अगदी भिक्षा मागावी लागणं याचीही सवय असावी प्रत्येकाला. सरेंडर होणं हे पूर्ण व्यक्ति बनणे यासाठी आवश्यक आहे.

पण इथे (माझातरी) आक्षेप, किंबहुना इच्छा अशी आहे की अशा सर्वगामी अवलिया किंवा समाजसेवक किंवा पत्रकार किंवा एकूण सर्व प्रकारच्या लोकांत जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या आहाराच्या किंवा राहणीच्या अटी शिथिल करुन मुक्त ठेवाव्यात.

कोणी म्हणेल की गांधीजींचे विचार सर्वत्र नेताना मांसाहार कसा स्वीकारावा? हे या पार्टिक्युलर केसमधे ठीक आहे पण मग ती कदाचित गांधीविचारांची मर्यादा ठरते.

हे वागणं नॉन गांधी विचारांच्या समाजसेवक अन्य सामान्यजनांत मिसळू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांमधेही पाहिलं वाचलं आहे. जिथे जाऊ तिथे आपल्या आहार विहार विषयक रिजिड नियमांचं स्तोम / कंपलशन करणं.

पैसा's picture

26 Mar 2018 - 6:27 pm | पैसा

१००% मांसाहारी लोकांच्या प्रदेशात आपण जात आहोत, तिथे असे प्रसंग येणार याची कल्पना आणि त्यावर कशी मात करावी याबद्दल त्यांनी काहीतरी विचार करून गेले असतील.

त्यांना करून देणाऱ्यांची खुशी. पण adaptive असले पाहिजे हे मान्यच.

मार्गी's picture

3 Apr 2018 - 5:10 pm | मार्गी

गविजी, अगदी सहमत. अशा प्रदेशात फिरताना जुळवता आलं पाहिजे. तितकी फ्लेक्सिबिलिटी असली पाहिजे. पण हा एका लिमिटनंतर एडजस्ट करण्याचा व्यक्तिसापेक्ष मुद्दा होतो. नॉन व्हेज न खाणारे लोक अनेकदा अशा वेळेस कमी पोषणयुक्त/ तुल्यबळ नसलेले पदार्थ खाणे, असं काही काँप्रोमाईज करतात. किंवा एका वेळेस त्याने सोबत तांदुळ ठेवला होता. हा तसा व्यक्तीसापेक्ष मुद्दा आहे, पण तुम्ही म्हणता ते खरं आहे. ती लवचिकता असली पाहिजे. असो. धन्यवाद!

mayu4u's picture

27 Mar 2018 - 1:26 pm | mayu4u

शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

मार्गी's picture

30 Jul 2018 - 10:30 am | मार्गी

ज्ञानेश्वरजी नुकतेच जपान- द. कोरीया असे टप्पे पूर्ण करून अमेरिकेला पोहचले आहेत. त्यांना अमेरिकन व्हिसा मिळाला आणि त्यांनी कोरीया सोडला तेव्हा त्यांच्याविषयी तिथल्या व जपानमधल्या वृत्तपत्रांमध्येही बातम्या आल्या आहेत.

अनन्त अवधुत's picture

11 Sep 2018 - 12:13 am | अनन्त अवधुत

ज्ञानेश्वर सध्या सॅन फ्रान्सिस्को वरून Seattle ला आले आहेत.