तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग २
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
वयोगट ०-१ वर्षे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात !
या भागात आपण एखाद्या मुलाच्या जन्मापासून ते त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत कोणत्या चाचण्या केल्या जातात ते पाहणार आहोत. नवजात बालकाच्या चाचण्या : मुलाच्या जन्मानंतर 2-3 दिवसात काही रक्तचाचण्या करतात. त्यासाठी बालकाच्या पायाच्या तळव्यातून एका छोट्या सुईने टोचून काही थेंब रक्त काढले जाते. हा थेंब एका जाड शोषकागदावर टिपून घेतला जातो. त्यावर पुढे प्रयोगशाळेत प्रक्रिया करून काही चाचण्या करतात. (काही चाचण्यांच्या बाबतीत मात्र शिरेतून पुरेसे रक्त घ्यावे लागते.). या चाचण्यांचा मुख्य उद्देश खालील प्रकारच्या आजारांचा शोध घेणे हा असतो: १. चयापचयाचे आजार: यात जन्मतःच पेशींमध्ये एखादे प्रथिन वा एनझाईम नसते. त्यामुळे चयापचयात अडथळा होतो आणि अर्थवट चयापचयातून काही घातक रसायने साठू लागतात. अशी बरीच रसायने ही मेंदूवर वाईट परिणाम करतात. त्यातून मतिमंदत्व आणि तत्सम आजार भविष्यात होतात. पुढे अशा मुलांचे संगोपन हा पालकांसाठी दुखःद प्रसंग आणि समाजावरचा आर्थिक बोजा असतो. या प्रकारातील एक महत्वाचा आजार आहे Phenylketonuria (PKU). यात एका एन्झाईमचा अभाव असतो. त्यातून पुढे तीव्र मतिमंदत्व येते. जर आपण चाचणीने याचे निदान लवकर केले तर या बालकांना खाण्याची काही बंधने घालून आणि विशिष्ट प्रकारचा आहार देऊन त्यांचे मतिमंदत्व रोखता येते. २. हॉर्मोन्सचे आजार: जन्मानंतरच्या सुरवातीच्या काळात थायरॉइड हॉर्मोन्सचे महत्व मेंदू व शरीराच्या वाढीसाठी अनन्यसाधारण आहे.. त्यामुळे त्यांची कमतरता नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. जन्मजात थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता (Congenital Hypothyroidism) हा गंभीर आजार आहे. जन्मतःच त्याची लक्षणे दिसत नाहीत. पण जर का त्याची चाचणी केली नाही आणि पुढे तो उद्भवला तर त्यातून कायमचे मतिमंदत्व येते. त्यामुळे प्रत्येक नवजाताची TSH-रक्तचाचणी करणे अत्यावश्यक आहे. ३. हिमोग्लोबिन संबंधी जनुकीय आजार: यांत सिकल-सेलचा आजार आणि थॅलसीमिया यांचा समावेश आहे. हे जन्मजात विकार जगभरात कमीअधिक प्रमाणात आढळून येतात. . भारतात आदिवासीबहुल भागांमध्ये त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे अशा रुग्णांना रक्तक्षय होतो आणि त्यांची वाढ खुंटते. सिकल-सेलचा आजार हा जर दोन्ही पालकांकडून अनुवंशिकतेने आला असेल तर तो गंभीर असतो. यात लालपेशी या कोयत्याच्या (sickle) आकाराच्या असतात. त्याच्या पुढच्या अवस्थांमध्ये या सिकल पेशी विविध अवयवांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या ‘ब्लॉक’ करतात. त्याने रुग्ण ‘क्रायसिस’ मध्ये जातो . तेव्हा तो असह्य वेदनेने तळमळतो. म्हणूनच या वयातच निदान झाल्यास काही खबरदारी घेता येते आणि लवकर उपचार देता येतात. याच्या चाचण्यांमध्ये रक्तावरील काही विशिष्ट चाचण्या आणि DNA चा अभ्यास यांचा समावेश आहे. ४. जंतू-संसर्गाचे आजार : यात HIV व Hepatitis B यांचा समावेश आहे. अर्थात हे सर्व बालकांसाठी करायची गरज नाही. जर बाळाच्या आईला ते आजार असतील अथवा तिच्या त्या गरोदरपणात संबंधित चाचण्या झाल्या नसतील तरच त्या बालकावर कराव्यात. तरीसुद्धा काही प्रगत देशांत त्या सक्तीच्या आहेत. वरील चाचण्यांव्यतिरिक्त अन्य काही चाचण्या या फक्त ठराविक बालकांसाठी केल्या जातात. संबंधित आजार हे अनुवंशिक असतात. त्याचे दोन गट असे पडतील: १. एखाद्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल तरच : यात काही गुणसूत्रांचे आजार आणि स्नायूंची झीज होणाऱ्या आजारांचा समावेश आहे. २. विशिष्ट वंशात (ethnic) आढळणारे आजार: यात काही मेदसाठ्यांचे आजार आणि adrenal ग्रंथिंचा एक आजार (CAH) हे येतात. वयाची वर्षपूर्ती आणि चाचण्या : जर जन्मानंतर व्यवस्थित चाळणी चाचण्या झाल्या असतील तर आता काही करायची गरज नसते. फक्त एक सोपी आणि महत्वाची चाचणी जरूर करावी. ती म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजणे. या वयोगटात बालकाचे शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी पुरेसे हिमोग्लोबिन अत्यावश्यक असते. गरीब देशांत आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाजांत लोहाच्या कमतरतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. त्यामुळे ही चाचणी दुर्लक्षिली जाऊ नये. नवजाताच्या चाचण्या आणि जागतिक परिस्थिती आंतरराष्ट्रीय शिफारसीनुसार प्रत्येक नवजात बालकाच्या ३४ चाचण्या केल्या पाहिजेत. हा आकडा ऐकून आपण तर दचकतोच. त्यातील बऱ्याच चाचण्या या चयापचयाच्या आजारांशी संबंधित आहेत. मुळात हे आजार दुर्मिळ असतात. तेव्हा एवढा खटाटोप कशासाठी करायचा असा प्रश्न सामान्यांच्या मनात येतो. तेव्हा याबाबतीत वास्तव काय आहे हे जाणण्यासाठी मी विविध रुग्णालयांचा कानोसा घेतला आणि संबंधित तज्ञांशी चर्चा केली. त्यातून मिळालेली माहिती अशी: १. अमेरिकेतील बहुतेक राज्यांत या सर्व ३४ चाचण्या सक्तीने करतात. २. भारतात अद्याप अशी कुठलीही सक्ती नाही. बाळ कुठे जन्मले आहे त्यानुसार कृती घडते. शासकीय रुग्णालयांत त्या सरसकट सर्वांच्या होत नाहीत; फक्त जिथे आजाराच्या धोक्याची शक्यता जास्त आहे तिथे विचार केला जातो. ३. आपल्या महानगरातील ‘तारांकित’ रुग्णालयांमध्ये ७ चाचण्या करण्याचा पर्याय बाळाच्या पालकांपुढे ठेवला जातो. शेवटी हा मामला खर्चाचा आहे. चाचण्यांचा आकडा हा रुग्णालयाच्या दर्ज्यानुसार कमी अधिक असू शकेल. ४. छोट्या रुग्णालयांमध्ये फक्त TSH ही चाचणी केलेली दिसते. ५. ग्रामीण भागात घरी होणाऱ्या बाळंतपणाच्या बाबतीत काय बोलणार? अज्ञानात आनंद. ६. मात्र भारतीय वैद्यक संघटनांनी शासनापुढे प्रस्ताव ठेवला आहे की आज न उद्या या चाचण्या आपल्याकडेही सरसकट झाल्या पाहिजेत. अडथळा अर्थात आर्थिक आहे. तेव्हा ३ टप्प्यांत चाचण्यांचा विचार व्हावा असे सुचवले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात प्रत्येक बाळाची TSH चाचणी केली जावी असा आग्रह आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये अधिक चाचण्यांचा विचार केला जावा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जरी एखादा जन्मजात आजार हा दुर्मिळ असला तरी ज्याच्या वाट्याला तो येतो त्याच्या आयुष्याची शोकांतिका होते. मतिमंदत्व येणाऱ्या अशा आजारांमुळे समाजावर बोजा पडतो ते वेगळेच. तेव्हा संबंधित चाळणी चाचण्यांचे महत्व दुर्लक्षून चालणार नाही. रोगप्रतिबंध हाच रोगावरील सर्वोत्तम उपचार असतो. जन्मजात आजारांच्या बाबतीत प्रतिबंध हा पूर्णपणे शक्य नाही. पण, चाचण्यांच्या मदतीने आजाराचे लवकरात लवकर निदान करणे हे रुग्णासाठी वरदान आहे. ************************************************************************* (क्रमशः)Book traversal links for तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम माहिती.
अनिंद्य ,
खूप महत्वाची माहिती आहे. वाचत
शलभ,
उत्तम माहिती . या सर्व
भाग १ चा दुवा
भाग १ चा दुवा
@ वि. विक्स
मी चाचणी डोंबिवलीत केली.
वि वि,
लहान बाळाचे का रक्त घ्यायचे ?
नवजात बालकाच्या ३४ चाचण्या
आंतरराष्ट्रीय शिफारशी हा
लेखात लिहीलेली कारणे सोडून
@ अभिजित अ
genetic diseases are detected
@ अभिजित अ
agadi barobar.
उत्कृष्ट लेखमाला. आभार आणि
गवि,
असाध्य स्नायूंचा आजार आणि नैतिकता
सध्या इतकंच म्हणतो की माझ्या
चाचण्या : जन्मतः की जन्मापूर्वी?
जो रोगी जन्मानंतर दोन दशके
गर्भपात की जिते जागते मरण ?
सर्वांचे आभार !
लेख आणि काही प्रतिसादही
धन्यवाद!
लई भारी, आभार !
कुमारजी, अतीशय उत्तम
पुंबा,
प्रगती ...