तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग २

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
6 Mar 2018 - 8:17 am

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

वयोगट ०-१ वर्षे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात !

या भागात आपण एखाद्या मुलाच्या जन्मापासून ते त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत कोणत्या चाचण्या केल्या जातात ते पाहणार आहोत.

नवजात बालकाच्या चाचण्या :
मुलाच्या जन्मानंतर 2-3 दिवसात काही रक्तचाचण्या करतात. त्यासाठी बालकाच्या पायाच्या तळव्यातून एका छोट्या सुईने टोचून काही थेंब रक्त काढले जाते. हा थेंब एका जाड शोषकागदावर टिपून घेतला जातो. त्यावर पुढे प्रयोगशाळेत प्रक्रिया करून काही चाचण्या करतात. (काही चाचण्यांच्या बाबतीत मात्र शिरेतून पुरेसे रक्त घ्यावे लागते.).
या चाचण्यांचा मुख्य उद्देश खालील प्रकारच्या आजारांचा शोध घेणे हा असतो:

१. चयापचयाचे आजार: यात जन्मतःच पेशींमध्ये एखादे प्रथिन वा एनझाईम नसते. त्यामुळे चयापचयात अडथळा होतो आणि अर्थवट चयापचयातून काही घातक रसायने साठू लागतात. अशी बरीच रसायने ही मेंदूवर वाईट परिणाम करतात. त्यातून मतिमंदत्व आणि तत्सम आजार भविष्यात होतात. पुढे अशा मुलांचे संगोपन हा पालकांसाठी दुखःद प्रसंग आणि समाजावरचा आर्थिक बोजा असतो.

या प्रकारातील एक महत्वाचा आजार आहे Phenylketonuria (PKU). यात एका एन्झाईमचा अभाव असतो. त्यातून पुढे तीव्र मतिमंदत्व येते. जर आपण चाचणीने याचे निदान लवकर केले तर या बालकांना खाण्याची काही बंधने घालून आणि विशिष्ट प्रकारचा आहार देऊन त्यांचे मतिमंदत्व रोखता येते.

२. हॉर्मोन्सचे आजार: जन्मानंतरच्या सुरवातीच्या काळात थायरॉइड हॉर्मोन्सचे महत्व मेंदू व शरीराच्या वाढीसाठी अनन्यसाधारण आहे.. त्यामुळे त्यांची कमतरता नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. जन्मजात थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता (Congenital Hypothyroidism) हा गंभीर आजार आहे. जन्मतःच त्याची लक्षणे दिसत नाहीत. पण जर का त्याची चाचणी केली नाही आणि पुढे तो उद्भवला तर त्यातून कायमचे मतिमंदत्व येते. त्यामुळे प्रत्येक नवजाताची TSH-रक्तचाचणी करणे अत्यावश्यक आहे.

३. हिमोग्लोबिन संबंधी जनुकीय आजार: यांत सिकल-सेलचा आजार आणि थॅलसीमिया यांचा समावेश आहे. हे जन्मजात विकार जगभरात कमीअधिक प्रमाणात आढळून येतात. . भारतात आदिवासीबहुल भागांमध्ये त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे
अशा रुग्णांना रक्तक्षय होतो आणि त्यांची वाढ खुंटते.
सिकल-सेलचा आजार हा जर दोन्ही पालकांकडून अनुवंशिकतेने आला असेल तर तो गंभीर असतो. यात लालपेशी या कोयत्याच्या (sickle) आकाराच्या असतात. त्याच्या पुढच्या अवस्थांमध्ये या सिकल पेशी विविध अवयवांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या ‘ब्लॉक’ करतात. त्याने रुग्ण ‘क्रायसिस’ मध्ये जातो . तेव्हा तो असह्य वेदनेने तळमळतो. म्हणूनच या वयातच निदान झाल्यास काही खबरदारी घेता येते आणि लवकर उपचार देता येतात.
याच्या चाचण्यांमध्ये रक्तावरील काही विशिष्ट चाचण्या आणि DNA चा अभ्यास यांचा समावेश आहे.

४. जंतू-संसर्गाचे आजार : यात HIV व Hepatitis B यांचा समावेश आहे. अर्थात हे सर्व बालकांसाठी करायची गरज नाही. जर बाळाच्या आईला ते आजार असतील अथवा तिच्या त्या गरोदरपणात संबंधित चाचण्या झाल्या नसतील तरच त्या बालकावर कराव्यात. तरीसुद्धा काही प्रगत देशांत त्या सक्तीच्या आहेत.

वरील चाचण्यांव्यतिरिक्त अन्य काही चाचण्या या फक्त ठराविक बालकांसाठी केल्या जातात. संबंधित आजार हे अनुवंशिक असतात. त्याचे दोन गट असे पडतील:
१. एखाद्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असेल तरच : यात काही गुणसूत्रांचे आजार आणि स्नायूंची झीज होणाऱ्या आजारांचा समावेश आहे.
२. विशिष्ट वंशात (ethnic) आढळणारे आजार: यात काही मेदसाठ्यांचे आजार आणि adrenal ग्रंथिंचा एक आजार (CAH) हे येतात.

वयाची वर्षपूर्ती आणि चाचण्या
:
जर जन्मानंतर व्यवस्थित चाळणी चाचण्या झाल्या असतील तर आता काही करायची गरज नसते. फक्त एक सोपी आणि महत्वाची चाचणी जरूर करावी. ती म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजणे. या वयोगटात बालकाचे शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी पुरेसे हिमोग्लोबिन अत्यावश्यक असते. गरीब देशांत आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाजांत लोहाच्या कमतरतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो. त्यामुळे ही चाचणी दुर्लक्षिली जाऊ नये.

नवजाताच्या चाचण्या आणि जागतिक परिस्थिती

आंतरराष्ट्रीय शिफारसीनुसार प्रत्येक नवजात बालकाच्या ३४ चाचण्या केल्या पाहिजेत. हा आकडा ऐकून आपण तर दचकतोच. त्यातील बऱ्याच चाचण्या या चयापचयाच्या आजारांशी संबंधित आहेत. मुळात हे आजार दुर्मिळ असतात. तेव्हा एवढा खटाटोप कशासाठी करायचा असा प्रश्न सामान्यांच्या मनात येतो.
तेव्हा याबाबतीत वास्तव काय आहे हे जाणण्यासाठी मी विविध रुग्णालयांचा कानोसा घेतला आणि संबंधित तज्ञांशी चर्चा केली. त्यातून मिळालेली माहिती अशी:

१. अमेरिकेतील बहुतेक राज्यांत या सर्व ३४ चाचण्या सक्तीने करतात.
२. भारतात अद्याप अशी कुठलीही सक्ती नाही. बाळ कुठे जन्मले आहे त्यानुसार कृती घडते. शासकीय रुग्णालयांत त्या सरसकट सर्वांच्या होत नाहीत; फक्त जिथे आजाराच्या धोक्याची शक्यता जास्त आहे तिथे विचार केला जातो.

३. आपल्या महानगरातील ‘तारांकित’ रुग्णालयांमध्ये ७ चाचण्या करण्याचा पर्याय बाळाच्या पालकांपुढे ठेवला जातो. शेवटी हा मामला खर्चाचा आहे. चाचण्यांचा आकडा हा रुग्णालयाच्या दर्ज्यानुसार कमी अधिक असू शकेल.

४. छोट्या रुग्णालयांमध्ये फक्त TSH ही चाचणी केलेली दिसते.
५. ग्रामीण भागात घरी होणाऱ्या बाळंतपणाच्या बाबतीत काय बोलणार? अज्ञानात आनंद.

६. मात्र भारतीय वैद्यक संघटनांनी शासनापुढे प्रस्ताव ठेवला आहे की आज न उद्या या चाचण्या आपल्याकडेही सरसकट झाल्या पाहिजेत. अडथळा अर्थात आर्थिक आहे. तेव्हा ३ टप्प्यांत चाचण्यांचा विचार व्हावा असे सुचवले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात प्रत्येक बाळाची TSH चाचणी केली जावी असा आग्रह आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये अधिक चाचण्यांचा विचार केला जावा.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जरी एखादा जन्मजात आजार हा दुर्मिळ असला तरी ज्याच्या वाट्याला तो येतो त्याच्या आयुष्याची शोकांतिका होते. मतिमंदत्व येणाऱ्या अशा आजारांमुळे समाजावर बोजा पडतो ते वेगळेच. तेव्हा संबंधित चाळणी चाचण्यांचे महत्व दुर्लक्षून चालणार नाही.
रोगप्रतिबंध हाच रोगावरील सर्वोत्तम उपचार असतो. जन्मजात आजारांच्या बाबतीत प्रतिबंध हा पूर्णपणे शक्य नाही. पण, चाचण्यांच्या मदतीने आजाराचे लवकरात लवकर निदान करणे हे रुग्णासाठी वरदान आहे.

*************************************************************************
(क्रमशः)

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

6 Mar 2018 - 11:29 am | अनिंद्य

उत्तम माहिती.
चाचण्यांमुळे जलद रोगनिदान आणि वेळेत उपचार हे तान्ह्या मुलांसाठी वरदानच.

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 1:33 pm | कुमार१

तत्पर आणि उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार

खूप महत्वाची माहिती आहे. वाचत आहे. धन्यवाद.

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 2:27 pm | कुमार१

आभार ! तुमच्या शंकांचे स्वागत आहे

विअर्ड विक्स's picture

6 Mar 2018 - 2:33 pm | विअर्ड विक्स

उत्तम माहिती . या सर्व चाचण्या मी माझ्या बालकाच्या केल्या. ५ हजारापर्यंत खर्च येतो. प्रसूतीच्या एकूण खर्चापुढे ५ हजार जास्त मला तरी वाटले नाही.
भाग १ वाचलेला नाही. त्याची लिंक मिळेल का ?

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 3:14 pm | कुमार१

http://www.misalpav.com/node/42123
५ हजार जास्त मला तरी वाटले नाही.>>>>>
बरोबर, प्रश्न सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसूती होणाऱ्यांचा आहे. त्यात अज्ञानाची भर.

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 3:14 pm | कुमार१

http://www.misalpav.com/node/42123
५ हजार जास्त मला तरी वाटले नाही.>>>>>
बरोबर, प्रश्न सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसूती होणाऱ्यांचा आहे. त्यात अज्ञानाची भर.

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 4:38 pm | कुमार१

तुमच्या बालकाचे रक्त जन्मानंतर कितव्या दिवशी घेतले आणि चाचण्या कुठल्या देशात ते सांगता का जरा?
रक्त घ्यायचा दिवस २/३/६/७ अशी मतभिन्नता दिसते, म्हणून विचारतो

विअर्ड विक्स's picture

6 Mar 2018 - 5:11 pm | विअर्ड विक्स

मी चाचणी डोंबिवलीत केली. भारत vaccine अँड serum pvt ltd - कुर्ला बेस्ड कंपनी .

लहान बाळाचे का रक्त घ्यायचे ? कशाला हव्यात टेस्ट ? असा सासुरवाडीचा विरोध होता , पण मी स्वतः सूक्ष्मजीव शास्त्र पदवीधर असल्यामुळे चाचणीचे महत्त्व जाणून टेस्ट करून घेतल्या. बाळाची पचनशक्ती जागृत झाल्या नंतर हि टेस्ट कधीही करू शकता. साधारण ४८ तासानंतर पचन सुरु होते, नवजात बाळांत

कुमार१'s picture

6 Mar 2018 - 5:19 pm | कुमार१

धन्यवाद.
तुम्ही योग्यच केले.

सुबोध खरे's picture

6 Mar 2018 - 7:34 pm | सुबोध खरे

लहान बाळाचे का रक्त घ्यायचे ? कशाला हव्यात टेस्ट ? असा सासुरवाडीचा विरोध होता
चाचण्या केल्यात ते उत्तम केलेत.
थायरॉईडची जन्मजात कमतरता हा आजार साधारण हजार ते बाराशे मध्ये एका बाळाला आढळतो. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4366791/
परंतु वेळेत इलाज केला नाही तर बाळ मतिमंद होऊन आयुष्यभरासाठी परावलंबी होते. आणि वेळेत इलाज केला तर बाळा संपूर्णपणे व्यवस्थित आणि निरोगी होते.
आपण आयुर्विमा करतो तेंव्हा आपली मरण्याची शक्यता हजारात एक इतकीच कमी ( खरं तर त्याहूनही कमी) असते. तेंव्हा आयुर्विम्याची काय गरज आहे असेच म्हणण्यासारखे आहे.हि तशीच परिस्थिती आहे.
आपले अभिनंदन.

खूपच नवीन माहिती. खरोखरीच ३४ चाचण्या हा आकडा ऐकून दचकलोच...किंबहुना माझ्या पिढीतील (साठीतील नवतरुण) अनेकजण दचकतील. देवी (small pox), क्षय(BCG), पोलिओ, त्रिगुणी (धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प Triple Vaccin), MMR (या लसीला मराठी प्रतिशब्द माहित नाही) साधारणपणे या एवढ्याच लसी तीस वर्षांपूर्वी माहित होत्या. थोड्या नंतरच्या काळात विषमज्वराची आणि काविळीची लस बाजारात आली. आंतरराष्ट्रीय शिफारशी हा थोडासा मतभेदाचा मुद्दा असू शकतो तरीदेखील जर त्या चाचण्या आपल्याकडेही आवश्यक असतील तर त्या खरं तर मोफत उपलब्ध असायला हव्यात, त्या बद्दल जन जागृती व्हायला हवी...

आंतरराष्ट्रीय शिफारशी हा थोडासा मतभेदाचा मुद्दा असू शकतो >>>>>>
बरोबर. म्हणूनच भारतात आधी १, मग ७ आणि टप्प्याने इतर चाचण्यांचा विचार योग्य आहे.

अभिजीत अवलिया's picture

7 Mar 2018 - 11:36 am | अभिजीत अवलिया

लेखात लिहीलेली कारणे सोडून अन्य कोणती कारणे आहेत का ज्याने बाळ मतिमंद होईल?
जन्मत: मतिमंदत्व असू शकते का? जर उत्तर हो असेल तर ते कसे टाळता येईल?

कुमार१'s picture

7 Mar 2018 - 12:22 pm | कुमार१

लेखात लिहीलेली कारणे सोडून अन्य कोणती कारणे आहेत का ज्याने बाळ मतिमंद होईल? >>>

कारणे खंडीभर आहेत. सगळी इथे लिहायची म्हटली तर MD च्या परीक्षेतील निबंध होईल ! थोडक्यात ५ गट असे:

१. गुणसूत्रांचे आजार : यात Down Syndrome सगळ्यात महत्वाचा.
२. चयापचयाचे अनेक आजार
३. स्वमग्नता
४. गर्भवतीस झालेला जंतूसंसर्ग : Rubella, CM Virus
५. गर्भवतीने केलेले खूप मद्यपान
६. माहित नसणारी कारणे : तब्बल ३०% आहेत .

विअर्ड विक्स's picture

7 Mar 2018 - 3:49 pm | विअर्ड विक्स

genetic diseases are detected in 3-4 month of pregnancy. mainly down syndrome.

कुमार१'s picture

7 Mar 2018 - 12:33 pm | कुमार१

जन्मत: मतिमंदत्व असू शकते का? >>>.

असू शकते पण पालकांना ते समजून यायला वेळ लागतोच. म्हणूनच चाळणी चाचण्यांचे महत्व आहे.

तर ते कसे टाळता येईल? >>>

यासाठी गर्भावस्थेतच काही चाचण्या करतात. याचे विवेचन या लेखमालेच्या सहाव्या भागात येईल.
असे निदान केल्यावर पालकांना २ पर्याय सुचवले जातात:
१. गर्भपात
२. मतिमंद मूल वाढवण्याची मानसिक तयारी करणे.

विअर्ड विक्स's picture

7 Mar 2018 - 3:57 pm | विअर्ड विक्स

agadi barobar.

उत्कृष्ट लेखमाला. आभार आणि उत्सुकता..

एक प्रश्न, काही आजार जे आज १००% असाध्य आहेत पण जे जन्मत: टेस्टने सिध्द होऊ शकतात.. तर अशा आजारांचीही चाळणी परीक्षा जन्मत:च करावी का?

त्याची लक्षणं नेमकी कधी दिसायला लागतील ते सांगता येत नसेल तर तेवढा काळ तरी अज्ञानातलं सुख त्यांना घेऊ द्यावं का?

उदा. DMD किंवा अन्य असाध्य डिस्ट्रॉफी किंवा टीन एज मधे उद्भावू शकणारे काही आजार.

यात टाळता न येणाऱ्या आणि उपचार (क्यूअर किंवा कंट्रोल) नसलेल्या आजारांविषयीच उत्तर अपेक्षित आहे.

कुमार१'s picture

7 Mar 2018 - 4:27 pm | कुमार१

अभिप्रायाबद्दल आभार ! अशानेच लेखनाचा हुरूप येतो.
सवडीने उत्तर देतो

गवि, तुमचा प्रश्न चांगला आहे. DMD हा स्नायूंचा आजार संदर्भास घेऊन बघूया:

१. हा एक स्नायूंचा नाश करणारा अनुवांशिक आजार
२. जन्मतःच लक्षणे नसतात
३. मूल जेव्हा चालायला लागणार त्या दरम्यान अंदाज येतो.
४. उपचार असाध्य असल्याने २०-३० वयांत मृत्यू
५. निदान चाचणी : DMD जनुकातला बिघाड PCR तंत्राने शोधणे
६. आता गर्भावस्थेतच विशिष्ट तंत्राने चाचणी करून निदान शक्य
७. आता जर खात्री झाली तर गर्भपात-सल्ला योग्य वाटतो पण,

..... आता नैतिक प्रश्न असा येतो की.......

जो रोगी जन्मानंतर दोन दशके तरी जगू शकेल त्याचा गर्भावस्थेतच खातमा करायचा का?
माझ्या मते याचे उत्तर वैयक्तिक पातळीवर ठरेल.
..
उत्तर पटले का ते जरूर लिहा . तुमचेही विचार जाणण्यास उत्सुक.

सध्या इतकंच म्हणतो की माझ्या प्रश्नाचा रोख गर्भातील चाचणी किंवा त्यानुसार गर्भपात याबद्दल नसून मूल ऑलरेडी जन्माला आल्यानंतर करण्याच्या चाचणीविषयी आहे. (उपरोक्त प्रकारच्या रोगांबाबत)

एक आर्ग्युमेंट असंही होऊ शकतं की आजार नाही हे कळल्यामुळे मिळणारा आनंद / निश्चिंतपणा हाही हवासा असू शकतो.

मूल ऑलरेडी जन्माला आल्यानंतर करण्याच्या चाचणीविषयी आहे>>>>
जर आजार दुर्धर असेल तर त्याचे निदान लवकरात लवकर करावे. त्या दृष्टीने 'जन्म' ही थोडी उशीराची पायरी ठरते. म्हणून अलीकडे गर्भचाचण्यांचे महत्व वाढत आहे

सुबोध खरे's picture

7 Mar 2018 - 7:12 pm | सुबोध खरे

जो रोगी जन्मानंतर दोन दशके तरी जगू शकेल त्याचा गर्भावस्थेतच खातमा करायचा का?
माझ्या मते याचे उत्तर वैयक्तिक पातळीवर ठरेल.

हे संपूर्णपणे मान्य करूनही असे वाटते कि जर मूल नीटपणे धावणार नसेल ( स्नायूंच्या अशक्तपणाची सुरुवात ३-४ वर्षाला सुरु होते) आणि ते मूल जाणते होण्याच्या वयाच्या अगोदरच पूर्णपणे परावलंबी होणार असेल तर त्याला जन्माला घालून आयुष्यभर( साधारण २०-३० वर्षांचे आयुष्य) दुःखात ठेवायचे आणि शेवटी श्वसन करणे सुद्धा कठीण होते तेंव्हा व्हेंटिलेटर वर ठेवून तीळतीळ मरत असलेल्या आपल्या मुलाला असहाय्य्य पणे पाहत राहणे अशा परिस्थितीत मातापित्यांची अतिशय वाईट अवस्था होते.
हे जर होणार असेल तर जन्म देण्यापेक्षा वेळेत गर्भपात करणे हे श्रेयस्कर आहे असेच वाटते.
माझ्या डॉक्टर वर्गमित्राची अशी स्थिती पाहिल्यावर गर्भपात करणे हेच उत्तम ठरेल अशी माझी तरी मनोवृत्ती झाली आहे.
गर्भपात केल्यावर एकदाच रडून मोकळे होता येते.
सोनोग्राफीमध्ये जन्मजात व्यंग असलेल्या मुलाचे रोगनिदान झाल्यावर आईवडिलांची होणारी परिस्थिती मी पाहत आलो आहे. आणि धार्मिक कारणासाठी काहीही झाले तरी गर्भपात न करणारे कॅथॉलिक लोक आयुष्यभर कष्ट काढताना पाहत आलो आहे.

गर्भपात करणे हेच उत्तम ठरेल अशी माझी तरी मनोवृत्ती झाली आहे. >≥>
मी अगदी सहमत आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणून ठाम विधान केले नाही

कुमार१'s picture

12 Mar 2018 - 7:53 pm | कुमार१

भाग ३ इथे आहे:

https://www.misalpav.com/node/42211

निशाचर's picture

13 Mar 2018 - 6:52 am | निशाचर

लेख आणि काही प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत.

लई भारी's picture

3 Apr 2018 - 3:30 pm | लई भारी

अजून एक उत्तम लेखमालिका.
मुलींच्या जन्मावेळी त्यांनी रक्त शर्करा आणि थायरॉईड ची चाचणी केल्याचं आठवतंय. मला वाटलं की आईला थायरॉईड चा त्रास आहे म्हणून टेस्ट केली की काय.

कुमार१'s picture

3 Apr 2018 - 5:12 pm | कुमार१

तुमच्या मुलींच्या चाचण्या केल्या हे चांगलेच झाले.अशीच जागरूकता सर्व स्तरातील रुग्णालयांत येवो ही इच्छा.

पुंबा's picture

5 Apr 2018 - 5:34 pm | पुंबा

कुमारजी, अतीशय उत्तम लेखमालिका.
आता, लगोलग बाकीचे भागही वाचून टाकतो. वैद्यकिय बाबींविषयी आपण जितक्या जिव्हाळ्याने व सोप्या भाषेत लिहिता तितके माहितीपूर्ण लिखाण वाचनात आले नव्हते.

कुमार१'s picture

5 Apr 2018 - 5:52 pm | कुमार१

आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो. तुमचे प्रोत्साहन महत्वाचे आहे.

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 10:03 am | कुमार१

लेखात खालील उल्लेख आहे:

आंतरराष्ट्रीय शिफारसीनुसार प्रत्येक नवजात बालकाच्या ३४ चाचण्य>>

>

आता या संदर्भात भारतातही चांगली प्रगती होत आहे. महाराष्ट्रातील महानगरांमध्ये काही जनुकसंशोधन केंद्रे कार्यरत झालेली आहेत. त्यामुळे नवजात बालकाच्या सुमारे 35 प्रकारच्या चाळणी चाचण्या आता केल्या जातात. त्यासाठी NGS हे अत्याधुनिक जनुक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
या चाचण्यात मुख्यत्वे:

*हिमोग्लोबिन संदर्भातील आजार
*जन्मजात श्रवणदोष
*चयापचय आणि हार्मोन्सचे आजार

यांचा समावेश आहे