मराठी दिन २०१८: मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

सूड's picture
सूड in जनातलं, मनातलं
5 Mar 2018 - 11:26 am

मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू!!

इथे मिपावर मराठी भाषादिनानिमित्त लिहायचं निघालं आणि कधी नव्हे तो माझ्या मेंदूने बंद पुकारला. का विचारावं तर कारणं सतराशे साठ आहेत. पण याआधी असं कधी झालेलं आठवत नाही. आता पण लिहायला बसलोय खरा पण शेवट कसा होणाराय माहित नाही. त्यात इथे पुण्यात राहणं म्हणजे सगळीकडे एकतर साजूक तुपातलं शुद्ध पुणेरी मराठी किंवा मावळी बोली! अध्ये मध्ये काहीच नाही. इथे प्रत्यक्ष विचारल्याशिवाय फक्त लग्नपत्रिकेतल्या मुक्काम पोस्टावरून कळतं माणूस कुठल्या गावचा आहे. एरवी भाषा वर म्हटल्यासारखी दोन टोकाची. मुंबईतल्या चाळीत वाढलेल्या माझ्या मेंदूला एरवी भाषेवरून माणसं कोणत्या गावची असतील हे ओळखायची सवय झालेली, त्यामुळे इथे अंमळ गंडायला होतं.

तिकडे सकाळच सुरु व्हायची आमची ती "शाळेक जातंस मरे?" ह्या पाठीवर दप्तर बघून सुद्धा आलेल्या आईस ब्रेकरने किंवा "कुटं हाव? कालपासना कुटं पायरव नाय ता तुमचा" ह्या आमच्या आयशीला आलेल्या बाणकोटी प्रश्नाने. कारण आमच्या समोरची घरं म्हणजे एक रायगड आणि एक खास कुडाळ में पैदा हुवा यापैकी. त्यामुळे या दोन बोली इतरांच्या तुलनेत सतत कानावर येणार्‍या. दुपारी जेवणं आटपून लोक आडवे झाले की सुट्ट्यांमध्ये आम्ही पोरं दारात दंगा घालत असू. असा दंगा अगदी तास दीड तास चालूच राहीला की हमखास येणारा प्रश्न म्हणजे, "काय रं पोरानु? काय कंदालताईव? घरा नायत काय तुमाना? सकालपासना कामा करुन आमी वायच लकाटलव तं निस्ती कंदाल चालूच. आपल्या घराशी जावा. संद्याकाली या, झोपू दे वायच आमान्ला." एव्हाना मालवणी घर री ओढायला येइ. "व्हय गे मामी. नुसता रोंबाट घातल्यानी गे. झोपच नाय माका, ही सगळी निस्ती ताप आसत डोक्याक. शाळा सुरु झाली मगे थांबतला, तवसर उडीये मारत रवतली ही सगळी" असा हा दोन बोलींमधला ओरडा खाऊन आमचा उत्साह थोडा निवळत असे. बोली दोन वेगळ्या जिल्ह्यातल्या पण कोणाला काय म्हणायचंय ते नीट कळायचं आणि ओरडणार्‍या दोन्ही व्यक्ती घरात गेल्या की आमची हरदासाची कथा मूळपदावर.

धुळवड वैगरे खेळताना ओरडा खाण्याचे असे प्रसंग कित्येक येत. तेव्हा बादल्या भरभरुन रंगाचं पाणी तयार असायचं. नुसते रंग लावण्यापेक्षा पाण्याच्या बादल्या एखाद्याच्या डोक्यावर रिकाम्या करणं हा महत्वाचा उद्योग. अशाच एका धुळवडीच्या वेळी कोणीतरी रंगाचं पाणी भरुन भिरकावलेला फुगा एका घरात गेला आणि वाळत घातलेली चादर रंगली. त्यानंतरचा संवाद काहीसा असा, "कंचं बेनं हाय ते? दिसंना झालं व्हय रं घरात फुगं मारताय ते? सकाळधरनं खेळताय तरी मन भरलं न्हाइ? चला निगा गप गुमान. आता, येक जरी हितं दिसला तर तंगडं तोडूनशान हातात दिन." असा खरपूस समाचार झाला की मग ती धुळवड संपत असे.

अशी वेगवेगळ्या प्रांतातली कानउघडणी ऐकून पुढे कधीतरी पुलंचं रविवारची कहाणी पाह्यलं. त्यात "बायकु कुटं गेलं वो तुमचं? गरीबं बघा. नुसतं काम काम आणि काम करतंय. गृहस्थ माणसाचं घरं, पण दिवस नै रात्र नै. आपलं गाणं गाणं गाणं. माझ्यासारखं असतं तर ही पेटी फोडून बंब पेटिवलं असतं" असं कानडी मराठी बोलणार्‍या कडवेकर मामी, "ही पापलेटां कोणाकडे पळोवन हाडली म्हण्टां? नुस्त्याकडे का नुस्त्याकान्नीकडे?" असं अस्सल कोकणीत नवर्‍याला खडसावणार्‍या कामत मामी आणि "शेऽऽट आंगोलीला जातांव ना?" असं बाणकोटी बोलणारा रामा ऐकला. वेगवेगळ्या बोलींबद्दलच्या उत्सुकतेने डोकं वर काढलं. त्या वाचणं, शक्य असेल तेव्हा बोलण्याचा लिहीण्याचा प्रयत्न करणं सुरु झालं.

आता ह्या क्षणाला मात्र मेंदू बंद आहे, कुठल्याही बोलीत शिरकाव करायला अगदीच अटकाव करतोय. मिपाच्या यावर्षीच्या मराठी सप्ताहापुरता तरी हा इतकाच लेख. पुढल्या वर्षी काहीतरी सुचेल असा विचार करुन यावर्षीच्या सप्ताहापुरतं हे इतकंच.
.
.
1

मुक्तकभाषाप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

5 Mar 2018 - 12:08 pm | प्राची अश्विनी

हे म्हणजे नाही नाही म्हणायचं आणि आतून सोनं काढायचं.
"नलेख"आवडला.

पैसा's picture

5 Mar 2018 - 12:16 pm | पैसा

मस्त भेळ मिसळ! इन्शाल्ला!! पुढच्या वर्षी लिही काही तरी जोरदार. मिपा आहे आणि आपणही आहोत.

सस्नेह's picture

5 Mar 2018 - 3:14 pm | सस्नेह

बाकी आम्हा घाटी लोकांना कोकणी काय नि मालवणी काय नि बाणकोटी काय, सारखीच !!

खटपट्या's picture

7 Mar 2018 - 1:03 am | खटपट्या

अरेरे !!!

यशोधरा's picture

21 Mar 2018 - 9:51 am | यशोधरा

अगदीच!

छान लिहिले आहे सूडक्या.

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2018 - 9:44 am | सुधीर कांदळकर

असे म्हणून तुम्ही मस्त दोनचार बोली टाकल्यात की. छान. मजा आली.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

6 Mar 2018 - 9:46 am | सुधीर कांदळकर

आपण बारावीचे पेपर वगैरे तपासायला घेतलेत का? मेंदू नेमक्या वेळी संपावर गेला म्हणून ......

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2018 - 12:40 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

अग अग म्हशी, मला कुठे नेशी ? =)) =)) =))

"ना ना करते...", वगैरे आठवले :)

खटपट्या's picture

7 Mar 2018 - 1:04 am | खटपट्या

लवकर आटपलाव कायता....

मस्तच... खूप आठवणी आहेत अश्या. चाळीत काही शेजारी बाणकोट आणि अलिबागचे होते, पण जास्त मालवणी. त्यातल्या एका घरी मी पडिक असे. कधी रात्री खूप उशिर झाला तर 'गो, तां रवतला हयसर. तेका घर नाय, आवशीक सोडून इला.' ही वाक्यं कानांवर पडत. मग घरी जाण्याशिवाय पर्याय नसे :)

सर्वांचे मनःपूर्वक आभार. डोकं खरंच बंद पडलं होतं, जे सुचलं ते लिहून काढलं.