प्रिय वेगवान गोलंदाजास -

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जे न देखे रवी...
23 Dec 2017 - 11:55 pm

प्रिय वेगवान गोलंदाजास -

हॉल लिलीचा वंश सांगसि, मुखी मार्शलची गाथा
होल्डिंग गार्नरच्या पाईका तुजला काय जाहले आता?
आठव वकार, आठव डोनाल्ड पुनःश्च अक्रम आठवूदे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

कोण कोठला फलंदाज, अंगभर चिलखतसे लावितो
शिरस्त्राण घालून उन्मादे पाय पुढे टाकितो |
सुसाटणारा चेंडू तुझा पाय तयाचे जखडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

बॅटीच्या सोट्याच्या जीवे करतो बॅट्समन माज
पण हत्तीवरही हल्ला चढवी तोच खरा वनराज |
बाऊन्सरच्या मार्‍याने बॅट्समन पुन्हा एकदा विव्हळू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

प्रेक्षक असतिल त्यां बाजूनी - षटकार त्यांना हवे
पण तू आहेस तो वीर जयाचे विजयगान व्हावे |
क्षेत्र रक्षिती मित्र तयांनी झेल अलगद पकडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

नजर देऊनी तुजला जो करू धजे दुरुत्तर
वेगच तुझा करेल त्याचे मुजोर प्रश्न निरुत्तर |
फुटोत डोकी, तुटोत बोटे पाठ तयांची आखडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

- जे.पी.मॉर्गन

काहीच्या काही कविताहास्यवीररसविनोदक्रीडामौजमजा

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

24 Dec 2017 - 4:48 am | फारएन्ड

मस्त! मिसिंग द वेगवान गोलंदाज :)

आयपीएल मधे एकदाच कोणत्यातरी विकेट वर जरा बाउन्स मिळाला होता तेव्हा डेल स्टेन ने ख्रिस गेल ला अक्षरशः नाचवले होते. ते लक्षात आहे. गब्बर चा "निकल गयी सब हेकडी इनकी" डॉयलॉग आठवण्याइतके :)

नाखु's picture

24 Dec 2017 - 10:38 am | नाखु

आहे पण सध्या चौकार षटकार यांनाच चित्कार, शिट्ट्या हमखास मिळणार
गोलंदाज हा सर्वात दुर्लक्षित करून ठेवलाय आयपीएल आणि कडक नियम घालून.

गावसकर निग्रह, निडर पाहीलेला नाखु

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

पैलवान's picture

24 Dec 2017 - 1:29 pm | पैलवान

अहो, पहिल्या सामन्यात जिथे आपल्या 'द' सचिनचं नाक फुटलं होतं तिथे वेगवान गोलंदाजीच्या ठिणग्या आता केवळ कसोटीत पाहायला मिळतात.

सुदैवाने भारताचे पुढचे दोन परदेश दौरे जानेवारी मध्ये द अफ्रिका व जून मध्ये इंग्लंड अशा वेगवान गोलंदाजांच्या माहेरात होणार आहेत. मजा येणार आहे.

- पांढर्‍या कपड्यातील सामने आवडणारा पैलवान

sagarpdy's picture

24 Dec 2017 - 7:27 pm | sagarpdy

हेच म्हणतो.
फेअर कॉम्पिटिशन लॉ क्रिकेट मध्ये आला पाहिजे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Dec 2017 - 9:36 am | ज्ञानोबाचे पैजार

आजकाल वनडे किंवा टी२० मधे गोलंदाजी करणारे गोलंदाज हे पिंजर्‍यात डांबलेल्या सिंहा सारखे वाटतात. जाता येता बारकी पोरे पण त्यांना खडे मारत असतात आणि ते निमुट पणे सहन करत ते पुढचा चेंडू टाकायला जात असतात.

कधी काळी जेव्हा मी कसोटी सामने पहात असे तेव्हा (बहुतेक भारत द अफ्रिकेच्या दौर्‍यावर गेला होता तेव्हा) एकदा अ‍ॅलन डोनाल्डचा एका ओव्हरचा ग्राफ दाखवला होता. त्याच्या सहाच्या सहा बॉलचा टप्पा एकाच जागेवर पडला होता (एखाद दोन सेंटीमीटरच्या फरकाने त्याच जागेवर) आणि समोर बहुतेक रवी शास्त्री होता. त्याला ते साही बॉल सोडून द्यावे लागले होते. ओव्हर मेडन होती हे वेगळे संगायची गरज नाही.

पैजारबुवा,

पैसा's picture

26 Dec 2017 - 10:21 am | पैसा

द ग्रेट वॉल्श ला विसरलात काय!

२०/२० आणि ५० ओव्हर्स च्या matches म्हणजे wwe. वेगवान गोलंदाजांची स्मशानभूमी भारतात.

अजून थोडे दिवस थांबा. सचिन तेंडुलकर चा मुलगा फास्ट bowler होतोय म्हणे. तो टीम मध्ये आला की फास्ट bowlers ना ग्लॅमर आणतील परत क्रिकेटचे ठेकेदार.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Dec 2017 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा

हा हा हा! वेगवान काव्य.