जानराव : येका संडासाची कथा

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
21 Dec 2017 - 8:30 am

अमदा आमच्या सल्लू भाईची ट्यूबलाइट काही पेटली नाही, पार फ्युज उडाला. लइ बेक्कार वाटल जी. सालभर भाइच्या पिक्चरची वाट पायलीआन असा पचका झाला. सल्लू भाइनच असा पचका केल्यावर आम्ही कोणाचे पिक्चर पाहाचे? आता टायगर येउन रायला हाय. तसा खिला़डी भारी हाय, मस्त फाइटा मारते पण तो बी फायटा गियटा माराच्या सोडून संडासवाला पिक्चर घेउन आलता. ज्यान हवेत उडी मारुन कोणाले हवेतच उचालाच तो संडासात बसाच्या गोष्टी सांगत होता. हे का टाकीजमंधी जाउन पाहाची गोष्ट हाय? आपण तर तवाच ठरवल हे अस पिक्चर पाहाचच नाही. नाही पायल म्या, तिकड भटकलो बी नाही. पण म्हणते ना नशीबात जे असन ते चुकत नाही. टाकीजमंधी नाही पण टिव्हीवर हा पिक्चर पाहाच लागला ना बाप्पा. दूरदर्शनवरच आलता तवा का करता पायला पिक्चर.

या पिक्चरमंधी येकच विलन हाय तो हाय संडास. बंद्या पिक्चरमंधी जो तो येकच गोष्ट बोलत रायते संडास, संडास आन संडास. माणसाले हागवण लागली तर तवा तो बी येवढ संडास, संडास करत नसन जेवढ या पिक्चरमंधी संडास संडास हाय. हिरो हिरोयीन भेटते तेबी संडासात म्हणजे रेल्वेच्या संडासाच्या भायेर. हे तर गणित मले काही समजलच नाही. नाही तवा ते हिरोइन रात्री अपरात्री हिरोले भेटाले जाते, मंग ये दोघबी रेल्वेत कायले जाते. संडासात धसाले. येका बारावी पास अनपढ गवार पोट्टयाले मस्त शिकलेली गोरी गोमटी शयरातली वाटन अशी पोरगी भेटते. साल आमच्या कालेजात या अशा पोरी आमच्या सारख्या गाववाल्याकड ढुकुणही पाहत नव्हत्या. पुरणाच्या पोळीसंग कोणी मिरचीचा ठेचा देइन का? पिक्चरमंधी काहीबी दाखवते. इतकी शिकली सवरलेली पोरगी ते येवढबी पाहात नाही का आपल्या सासरी संडास हाय का नाही. बर तिन नाही तर तिच्या घरच्यायन तरी पाहाले पायजे का नाही? आता कोठबी पोरगी द्याची म्हटली का घरदार, शेतीवाडी पायतोच न जी आपण. तिचा काका सनी लियोनीची चवकसी करते पण ज्याची चवकसी कराची त्याची नाही करत. जाउ द्या आजकालच्या पिक्चरमंधी काय खर नाही. जे गडबड व्हाची ते होते आन त्या शिकल्या सवरल्या पोरीच लगन बिना संडासाच्या घरात होते. अशा बिना संडासाच्या घऱात शिकल्या सवरल्या पोरीच लगन झाल तर तिचे का हाल होते हे पाहाच असन तर हा पिक्चर पाहा. हे त्याचीच गोष्ट हाय.

आता घरात संडास नाही तर का कराच, सकाळ उठून कोठ जाच. साऱ्या पंचायती निस्तरता येते पण हे नाही. माणूस सारे सोंग आणू शकते पण हे कस आणता येइन? आता त्या हिरोइनच तरी का चुकल जी. कोणाले सवय नाही तर त्यान का कराच? त्या पोरीच येकदम बराबर होत, चुकल त्या हिरोचच. नाही आयकत बाप तर त्यान आपल्या बापाले ठासून सांगाले पायजे व्हत म्या घरात संडास बनवनार म्हणजी बनवनार, बस काम खल्लास, फालतू भानगडी पायजेनच कायले. गोष्टी अशा शिद्दया होइन तर तो पिक्चर रायते का? तो हिरो येवढा मोठा खिलाडी हाय पण बापाले पायल का त्याची टरारते. मंग का करन रोज नवीन नवीन जुगाड करत रायते. अशा कामात जुगाड जमते का जी? आता गावातल्या बाया, त्यायन दिली असती त्या पोरीले साथ तर का बिघडल असत. पण नाही ह्या आपलीच लावते. ते बिचारी पोरगी येकटी पडते जी. तिचा नवरा जुगाड करत रायते आन हे त्याच्या मांग मांग हिंडत रायते. आमचा विलन संडास लय भारी तो काही आयकत नाही. आन येक दिस असा हिसका देते का बस. हिरोले पक्क समजते बापू आता काही जुगाड करुन भागनार नाही. आता काहीतरी मोठ ठोस अस करा लागन. याले म्हणते विलन, येक शब्द बोलत नाही पण जे बोलाच ते बराबर बोलून जाते. अमदाचा तो विलेनचा अवार्ड संडासलेच द्याले पायजे. बर पहाड नाही हालवाचा तर आमच्या खिलाडीले घ्यायचच कायले कोणीबी ऐरागैरा नथ्थू खैरा चालला असता. आता खिलाडीनच मनावर घेतल्यावर मंग कोणच काम रायते जी. तो काहीबी करु शकते आपल्याले मालूमच हाय. बंदीकड बोबबोंब होते, शियेम पावतर गोष्ट जाते. आता इतकी बोबाबोंब झाल्यावर सरकारले संडासं बांधून द्याच लागते.

हागीणदारीची लय कटकट रायते जी गावात. असा हागीणदारी मुक्त गाव बोर्ड रायते आन त्याच्याच खाली पोट्टे बसले रायते. कणच्याबी गावात जाच म्हटल का पयले हागीणदारीच लागते. लइ बेक्कार दिसते जी ते. गावाले लागून वावर रायते ना त्या वावराले खारी म्हणते. असा खारीवाला कास्तकार तर लय म्हणजे लयच परेशान रायते. आता खारी म्हटली का ढोरगिर धसतेच, तो तरास तर रायतेच पण येकवेळ ढोर परवडल पण माणूस नको अशी हालत रायते. आमच्या लक्षुमनकडबी खारी होती. त्यान कुप घालून पायला पण गाववाले काही आयकत नव्हते. त्यान सोलर फेंसीग केल तर वावरात जान बंद झाल पण त्याच्या वावराच्या रस्त्यावरच बायान गोदरी केली. आता बोला. ग्रामपंचायतीन संडास बांधून देल्ले तरी दोनचार बाया होत्या ज्या सकायी उठून तिकडच जात होत्या. त्यान सरपंचाले सांगून पायल तर सरपंचान हात वर केले माय काम होत संडासं बांधाच म्या ते केल बाकी मले काही सांगू नको. त्यान धुऱ्यावर उभ राहून बायायले हटकल आन सांगतल तुम्ही जर का आता इकड दिसल्या तर कोर्टात केस करीन. सरड्याची धाव कुपापावतर तशी गाववाल्यायची धाव कोर्टापावतर. काही झाल का कोर्टात केस कराचीच हौस रायते. लक्षुमन हुशार गडी हाय त्याले मालूम होत बाया काही आयकाच्या नाही आन कोर्टा गिर्टात जाच्या नुसत्या बोलाच्या गोष्टी हायेत आपल्यालेच काहीतर करा लागन. मंग त्यान आपल्या पद्धतीनच सारा मामला निपटवला. त्यान गावात बोंब करुन देली का गावाकड बी चोऱ्या वाढल्या म्हणून आता शयरावाणी गावात बी जिकड तिकड छुपे कॅमेरे लागले.

लक्षुमनच काम तर झाल, बाया आयकल्या पण माणसायच काय त्यायले कोण समजावून सांगनार. म्हणूनच मले समजत नाही नुसते संडासं बांधून काम भागल असत तर कवाच झाल असत जी, पण लोकायले कोण समजावून सांगनार?

लिहनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

विनोदचित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

21 Dec 2017 - 2:00 pm | अनन्त अवधुत

झ्याक ज्यमल राजेहो!
ऐरागैरा नथ्थू खैरा / गोदरी / खारी लयं दिवसापास्न ऐकले नव्हते.

चिनार's picture

21 Dec 2017 - 4:47 pm | चिनार

मस्त !!

हाहाहाहाहा! जानराव इज बॅक.

तुषार काळभोर's picture

21 Dec 2017 - 8:01 pm | तुषार काळभोर

बम भारी लिहिलंय जी..

मित्रहो's picture

23 Dec 2017 - 8:44 am | मित्रहो

धन्यवाद अनंन्त अवधुत, चिनार, एस आणि पैलवान. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

पैसा's picture

23 Dec 2017 - 11:26 pm | पैसा

मस्त लिहिलंय! सिनेमा चांगला आहे पण तो!!

मित्रहो's picture

24 Dec 2017 - 3:35 pm | मित्रहो

जानरावची गोष्टच निराळी आहे.