रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 Dec 2017 - 10:14 am

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)

त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५०
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.

एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.
तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:

१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
*************************************

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

16 Aug 2019 - 9:22 am | कुमार१

"सिगारेट ओढणाऱ्या सर्वांना कर्करोग का होत नाही ? " या नेहमीच्या प्रश्नाबाबतचे एक नवीन संशोधन:

सिगारेट मधील कर्करोगकारक घटकांचा नाश 'GST' या शरीरातील एन्झाईम द्वारा होतो. लोकसंख्येच्या सुमारे ५% लोकांत हे एन्झाइम नसते.

त्यामुळे हे एन्झाइम नसलेल्या आणि बऱ्याच सिगारेट ओढणाऱ्या लोकांत रोगाची शक्यता वाढते.

की आयुर्वेदिक वा जडीबुटी उपचार करून अतिशय स्वस्तात कर्करोग बरा होऊ शकतो पण अनेकांचे आर्थिक गणित धोक्यात येईल म्हणून मोठे खेळाडू मुद्दाम हे नाकारतात व महाग औषधांचा बागुलबुवा उभा केला जातो. कोणी याबाबत खातरजमा करेल काय ?

कुमार१'s picture

16 Aug 2019 - 9:16 pm | कुमार१

कायप्पा मजकूर कधीच गांभीर्याने घेता येत नाही.
संबंधित माहितीचा अधिकृत संदर्भ असल्यासच चर्चा होऊ शकते.

कुमार१'s picture

29 Aug 2019 - 11:03 am | कुमार१

विशिष्ट प्रतिजैविकांचा अतिवापर आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका याबाबत नवे संशोधन झाले आहे.
पेनिसिलीन गटातील काही ( उदा. Ampicillin), imipenem, chloramphenicol, clindamycin अशी काही औषधे जर रुग्णांना दीर्घकाळ दिली तर वयाच्या साठीनंतर मोठ्या आतड्याच्या सुरवातीच्या भागाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या औषधांच्या अनियंत्रित वापराने आतड्यातील नैसर्गिक जंतूंचा समतोल बिघडतो. त्यातून तिथे कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण होते.

म्हणून प्रतिजैविके वापरताना हे मुद्दे महत्वाचे आहेत :

१. ती कमीत कमी काळासाठी वापरावीत
२. अशा औषधाची निवड करताना ते शक्यतो अधिक ताकदवान ( broad spectrum) प्रकारचे नसावे.
३. विषाणूजन्य आजारांत उठसूठ प्रतिजैविके वापरू नयेत.

जॉनविक्क's picture

30 Aug 2019 - 11:57 pm | जॉनविक्क

त्यातून तिथे कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण होते.

याचे विस्तृत वर्णन कुठे वाचायला मिळेल ?

2017-2018 ही दोन वर्षे मी मनसोक्त विमल व माणिकचंद गुटखा खाण्यात घालवली, त्याचे विशेष असे व्यसन लागेना म्हणून रोज घरी आल्यावर चक्कमनसोक्त तंबाखू मळून खायला सुरुवात केली. गंम्मत अशी की मला चक्क तंबाखू खाण्याचे व्यसनच लागले.

ऑफिसमधे हे करणे शक्यच न्हवते कारण थुंकायची अडचण व interaction ही अवघड (म्हणून सिगारेट ओढायला सुरुवात केली) पण अख्खा दिवस अस्वस्थ जायचा व कधी ऑफिस सुटते व बार लावतो याचीच वाट बघत दिवस जात असे. खूप दिवसांनी एखादी गोष्ट ड्राईव्ह करत होती.

चुन्यामुळे चामडी सोलवटली गेली तिखट लागले तरी तंबाखू लागायचीच.

ज्याची आधी किळस वाटत होती ती सुरुवातीला आठवड्याला एक पुडी व नंतर अडीच दिवसात एक पुडी असे प्रमाण झाले.
या काळात पचनसंस्था अफलातून सुधारली. अगदी हवे तेंव्हा डुबुक एकदम व्यवस्थित त्यामुळे तब्येत फ्रेश. पण ऍसिडिटी विचारू नका आणि तिखट हा शब्द ऐकून तोंड जळत होते.

जरा ओव्हरच झाले आणि मला पहिल्यांदा व्यसनाधीन होणे म्हणजे काय हे समजले. तंबाखू सोडल्यावर अस्वस्थत्यामुळे फक्त चक्कर करणेच बाकी असावे :) मी कुठलही व्यसन पचवू शकेन, तंबाखू सोडून. आता तंबाखू मळून खाणे सोडले, पण कुठे ट्रिप व ट्रेक ठरला तर हमखास सिगारेट मारणे मात्र होतेच. व आठवड्यातुन एकदा तंबाखूयुक्त पानही खातोच.

यामुळे मला कुतूहल आहे की मी अंदाजे कर्करोगाच्या किती जवळ-लांब असेन ?

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 8:14 am | कुमार१

यामुळे मला कुतूहल आहे की मी अंदाजे कर्करोगाच्या किती जवळ-लांब असेन ?

>>>>

सध्या आपली हवा, पाणी आणि अन्न याद्वारे असंख्य घटक रसायने आपल्या शरीरात जात आहेत. दुर्दैवाने यांवर तर आपल्याला काही नियंत्रण ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत आपण जर काही व्यसने लावून घेतली तर आपणच आपल्या आगीत तेल ओतणार आहोत. त्यामुळे तंबाकू इत्यादींपासून अलिप्तता ही महत्वाची आहेच.
आता तुम्ही जे व्यसन केले आहे त्यामुळे या रोगाचा धोका किती वाढला आहे? तर, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी गणिती असे सूत्र काही नाही (२+२= ४ वगैरे). याचे कारण असे की कर्करोग हा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून होतो. त्यामध्ये जनुकीय अनुकुलता महत्वाची असते. लेखातील हे मुद्दे पुन्हा अधोरेखित करतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

..... या रोगाची कारणमीमांसा विस्तृत देणारा संदर्भ सवडीने शोधून देतो.

जॉनविक्क's picture

31 Aug 2019 - 9:57 am | जॉनविक्क

सध्या आपली हवा, पाणी आणि अन्न याद्वारे असंख्य घटक रसायने आपल्या शरीरात जात आहेत. दुर्दैवाने यांवर तर आपल्याला काही नियंत्रण ठेवता येत नाही. अशा परिस्थितीत आपण जर काही व्यसने लावून घेतली तर आपणच आपल्या आगीत तेल ओतणार आहोत. त्यामुळे तंबाकू इत्यादींपासून अलिप्तता ही महत्वाची आहेच.

हाच तर मुद्दा आहे, परवा दिल्लीतील 28 वर्षीय सुसंस्कारित निर्व्यसनी तरूणीला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची बातमी वाचली असेलच.( नेटिझन्स नी दिल्लीतील प्रदूषणाला यासाठी जबाबदार धरले) त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी की आपण आगीपासून सुरक्षित अंतरावर आहोत हे समजेल व लांबूनच तेलही ओतता येईल ;)

.... या रोगाची कारणमीमांसा विस्तृत देणारा संदर्भ सवडीने शोधून देतो.

वाट पहात आहे. जनुकीय अनुकुलता आहे असे म्हणता येईल कारण आधीच्या पिढीत एका व्यक्तीला कर्करोग जडला होताच, त्यामुळे मला नेमके कोणते व्हेरिएबल किती इम्पॅक्ट करतात हे जाणून घ्यायचे कुतूहल आहे.

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 10:09 am | कुमार१

'घटक' नव्हे "घातक" असे वाचावे.

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 10:24 am | कुमार१

हे बघा एक बारा पानी पीडीएफ :

https://www.atsdr.cdc.gov/emes/public/docs/Chemicals,%20Cancer,%20and%20...
साध्या सोप्या भाषेत आहे.

तसेच,
माझा पूर्वीचा “कर्करोग आणि दुर्दैव” हा लेखही सवडीने बघता येईल:

https://misalpav.com/node/44259

यात प्रस्थापित थिअरीला आव्हान देणारी नवी वादग्रस्त थिअरी आहे.

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 10:24 am | कुमार१

हे बघा एक बारा पानी पीडीएफ :

https://www.atsdr.cdc.gov/emes/public/docs/Chemicals,%20Cancer,%20and%20...
साध्या सोप्या भाषेत आहे.

तसेच,
माझा पूर्वीचा “कर्करोग आणि दुर्दैव” हा लेखही सवडीने बघता येईल:

https://misalpav.com/node/44259

यात प्रस्थापित थिअरीला आव्हान देणारी नवी वादग्रस्त थिअरी आहे.

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 10:24 am | कुमार१

हे बघा एक बारा पानी पीडीएफ :

https://www.atsdr.cdc.gov/emes/public/docs/Chemicals,%20Cancer,%20and%20...
साध्या सोप्या भाषेत आहे.

तसेच,
माझा पूर्वीचा “कर्करोग आणि दुर्दैव” हा लेखही सवडीने बघता येईल:

https://misalpav.com/node/44259

यात प्रस्थापित थिअरीला आव्हान देणारी नवी वादग्रस्त थिअरी आहे.

जॉनविक्क's picture

31 Aug 2019 - 10:58 am | जॉनविक्क

पण एकूणच ट्रायल अन एरर प्रकरण आहे.

मी मध्यन्तरी HPV संशोधनासाठी स्वेच्छेने गिनीपिक बनलो होतो त्यामुळे या संदर्भातील चाचण्या झालेल्या आहेत (माझ्या तोंडातील पेशी तपासल्या होत्या) व त्याबाबतीत मला चिंता नाही. बाकी PDF मधील इतर मुद्देही रोचक. तसेच BAD LUCK THEORY ही रोचक आहे. थोडक्यात बरेच घटक आहेत. आपण शक्य ती काळजी घ्यायची (म्हणजे नेमकं काय हे जरा अवघडच आहे पण आवश्यक आहे हे नक्की)

धन्यवाद.

कुमार१'s picture

31 Aug 2019 - 11:09 am | कुमार१

मी मध्यन्तरी HPV संशोधनासाठी स्वेच्छेने गिनीपिक बनलो होतो

>>>
अरे वा , अभिनंदन !

आपण शक्य ती काळजी घ्यायची (म्हणजे नेमकं काय हे जरा अवघडच आहे पण आवश्यक आहे हे नक्की)

>> सही !

कुमार१'s picture

3 Nov 2019 - 4:32 pm | कुमार१

‘वर्षभरात कॅन्सरच्या रुग्णात ३०० टक्क्यांनी वाढ’

बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/cance...

यात भारतातील आकडेवारीही आहे.

कुमार१'s picture

12 Oct 2020 - 11:02 am | कुमार१

कर्करोगाचे त्याच्या पूर्व-अवस्थेतच निदान हा संशोधनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. किंबहुना, कर्करोगाचा धोका कोणत्या व्यक्तींना अधिक असतो, हे शोधणे हा या क्षेत्रातील पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे.
यासंदर्भात एक मौलिक संशोधन पुणे व नाशिकसह अन्यत्रही झाले आहे.

बातमी

जेव्हा शरीरात एखाद्या अवयवाच्या निरोगी पेशी कर्करोगपेशी होण्याच्या दिशेने सुरुवात होते, तेव्हा काही महत्त्वाचे बदल होतात. सुरुवातीस काही विशिष्ट पेशी रक्तप्रवाहात येऊ लागतात. या स्थितीत त्या व्यक्तीस कुठलाच त्रास किंवा लक्षण नसते. निरोगी व्यक्तीत अशा पेशी सापडणे खूप दुर्मिळ असते.
भविष्यात अशा पेशींची रक्तचाचणी ही कर्करोगाची एक महत्त्वाची चाळणी चाचणी ठरू शकेल. त्या दृष्टीने हे संशोधन पथदर्शक आहे.
अभिनंदन !

कुमार१'s picture

19 Jan 2021 - 7:51 pm | कुमार१

Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानित आणि पद्मविभूषण डॉ शांता ( नामवंत कर्करोग तज्ञ)
यांचे निधन

https://www-thehindu-com.cdn.ampproject.org/v/s/www.thehindu.com/news/ci...

आदरांजली !

कुमार१'s picture

10 May 2021 - 11:32 am | कुमार१

हेन्रिएटा लॅक्स (HeLa)

यांनी ७० वर्षांपूर्वी कर्करोग संशोधनासाठी स्वतःच्या पेशी दिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यातून अतिशय महत्वाचे संशोधन झाले.
सध्या करोना विषाणूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवून देण्याचे काम या पेशी करत आहेत.
त्यांच्यावर एक चांगला लेख इथे

वंदन !

गॉडजिला's picture

10 May 2021 - 12:41 pm | गॉडजिला

त्रिवार वंदन !

_/\__/\__/\_

कुमार१'s picture

20 Aug 2021 - 5:46 pm | कुमार१

शेतीतील कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो हे आपण जाणतो. यासंदर्भात पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वैज्ञानिक डॉ. राकेश जोशी यांनी मोलाचे संशोधन केले आहे .

फक्त कीटकांचाच नाश करतील आणि त्यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होणार नाही, अशी कीटकनाशके शोधण्यात त्यांनी संशोधन केलेले आहे.
याबद्दल डॉ. जोशी यांना यंदाचा युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे.
अभिनंदन !

https://www.ncl-india.org/files/DisplayResource.aspx?ResourceId=047a4612...

कुमार१'s picture

7 Sep 2021 - 9:43 am | कुमार१

मानवी पेशींचा मूलभूत अभ्यास आणि कर्करोगावरील उपचार यात मोलाचे संशोधन करणारे नोबेल-विजेते एडमंड एच. फिशर यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले

आदरांजली

कुमार१'s picture

10 Nov 2021 - 8:27 am | कुमार१

कर्करोग उपचारांसाठी किरणोत्सर्गाचा वापर ही एक प्रस्थापित पद्धत आहे. त्यामध्ये सतत संशोधन होत आहे.

आता त्यासंदर्भात linear accelerator हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातून निघालेल्या किरणांमुळे फक्त कर्करोग पेशींचा नाश होतो आणि शरीरातील आजूबाजूच्या नॉर्मल पेशींना धक्का लावला जात नाही.

कुमार१'s picture

4 Feb 2022 - 9:19 am | कुमार१

आज जागतिक कर्करोग दिन. त्यानिमित्ताने भारतातील काही आकडेवारी :

• दरवर्षी आठ लाख नवीन कर्करुग्णांचे निदान
• दरवर्षी चार लाख मृत्यू.
• मृत्यू होणाऱ्यांचा सर्वाधिक (७०%) वयोगट ३०-६९
• पुरुषांपेक्षा महिलांच्या कर्करोगाची टक्केवारी अधिक

एकूण कर्करोगामध्ये प्रमाणाची क्रमवारी अशी :
1. स्तन
2. फुफ्फुस
3. तोंड
4. गर्भाशय मुख आणि
5. गर्भाशय
…..
जे लोक कर्करोगाने बाधित आहेत त्यांचा आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा.

वयाच्या पन्नाशीनंतर कर्करोगासाठीच्या विविध चाळणी चाचण्या सर्वांनी करून घेणे हितावह.
यासंबंधी विवेचन इथे झालेले आहे

कुमार१'s picture

30 Oct 2022 - 5:41 pm | कुमार१

पुण्याच्या वारजे परिसरात 1997 मध्ये स्थापन झालेल्या Cipla palliative care या कर्करुग्ण सेवा संस्थेला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत

अभिनंदन आणि शुभेच्छा !

कुमार१'s picture

26 Nov 2022 - 9:03 am | कुमार१

कर्करोगी व्यक्तीच्या रक्तातून फिरणाऱ्या कर्करोगपेशी अचूक ओळखणारी oncodiscover ही रक्तचाचणी डॉ. जयंत खंदारे यांच्या चमूने विकसित केली आहे. या चाचणीचे यशस्वी रुग्णप्रयोग मुंबईतील टाटा रुग्णालयात झाले.

या चाचणीचे संशोधन पुण्यामध्ये सुमारे 15 वर्षांपासून चालू होते. या चाचणीचा परदेशातील खर्च सुमारे दीड लाख रुपये असून भारतात ही चाचणी अवघ्या पंधरा हजार रुपयांमध्ये करणे शक्य झालेले आहे.

या संशोधनाचा उचित गौरव केंद्र सरकारतर्फे झालेला आहे.

कुमार१'s picture

14 Dec 2022 - 8:24 am | कुमार१

न्युझीलँड मध्ये सिगारेट विक्रीवर निर्बंध घालणारा कायदा मंजूर झाला आहे. त्यानुसार 1जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कोणालाही सिगारेट खरेदी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सिगारेट विक्री टप्प्याटप्प्याने हद्दपार करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

कुमार१'s picture

4 Feb 2023 - 6:05 am | कुमार१

आज (४ फेब्रु) जागतिक कर्करोग दिन.

जे लोक कर्करोगाने बाधित आहेत त्यांचा आजार नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा.
वयाच्या पन्नाशीनंतर कर्करोगासाठीच्या विविध चाळणी चाचण्या सर्वांनी करून घेणे हितावह.

यंदाचे जागतिक ब्रीदवाक्य कर्करोगाच्या उपचारांसंबंधी असून ते असे आहे:
“close the care gap”

कुमार१'s picture

4 Feb 2024 - 6:27 pm | कुमार१

जागतिक कर्करोग दिनानिमित्त ( ४ फेब्रुवारी) सर्व संबंधित रुग्ण आणि त्यांची सेवा करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेल्या अहवालातील दोन महत्त्वाच्या गोष्टी :
१. जगभरातील कर्करोगापैकी निम्मे कर्करोग हे खालील ५ अवयवांचे मिळून आहेत : फुफ्फुसे, स्तन, मोठे आतडे, यकृत आणि जठर.

२. त्यांची जागतिक क्रमवारी लावायची झाल्यास फुफ्फुसांचा पहिल्या क्रमांकावर तर स्तनांचा दुसऱ्या क्रमांकावर आहे.