रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
3 Dec 2017 - 10:14 am

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत.

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

आपल्याला होणाऱ्या एकूण कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात. हादरलात ना हा आकडा ऐकून? पण ते वास्तव आहे. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! या रसायनांशी आपला अनेक प्रकारे संपर्क येतो. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि कर्करोग हा त्यापैकीच एक. रसायनांचे विविध स्त्रोत, त्यांच्यामुळे कर्करोग का होतो, कोणती रसायने जास्त घातक आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो यांचा आढावा या लेखात घेत आहे.

या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने पुढील मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतो:
१. रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
२. रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
३. कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे आणि
४. प्रतिबंधात्मक उपाय

रसायनांशी आपल्या संपर्काचे मार्ग
रसायने आपल्या शरीरात हवा, पाणी, अन्न अथवा त्वचेमार्फत शिरू शकतात. त्यांचे स्त्रोत हे खालीलप्रमाणे असू शकतात:
१. अन्नातील नैसर्गिक घटक : उदा. Aflatoxin हे दाणे, मका व सोयाबीन यांच्यात असते.
२. रासायनिक शेतीतील पिके : या विषयावर गेल्या दहा वर्षात अनेक माध्यमांतून भरपूर दळण दळले गेले आहे. अधिक लिहिणे नलगे.
३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.
४. व्यसने : उदा. तंबाकूतील अनेक रसायने आणि अल्कोहोल
५. हवा व पाण्याचे प्रदूषण : कारखान्यांतून सोडली जाणारी अनेक रसायने.
६. विशिष्ट उद्योगधंदे : उदा. Asbestos हे वाहन आणि बांधकाम उद्योगात वापरले जाते, तर aromatic amines ही रबर उद्योगात वापरतात.
७. रोगोपचारासाठी वापरलेली औषधे : उदा. cyclophosphamide हे काही कर्करोगांच्या उपचारासाठी वापरलेले औषध अन्य काही कर्करोग निर्माण करू शकते! आहे की नाही हा विरोधाभास?

रसायने आणि कर्करोगाची कारणमीमांसा
कर्करोगकारक रसायने ही आपल्या पेशींमध्ये शिरून थेट DNA वर हल्ला चढवतात. परिणामी काही जनुकीय बदल होतात. मग विशिष्ट प्रथिनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते. हाच तो कर्करोग. अर्थात अशा प्रकारे होऊ शकणारा कर्करोग खालील घटकांवर अवलंबून असतो:

१. रसायनाचे शरीरात जाणारे प्रमाण
२. रसायन-संपर्काचा दीर्घ कालावधी
३. कर्करोग होण्यासाठीची जनुकीय अनुकुलता आणि
४. शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती

ह्या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून कर्करोग होतो (multifactorial disease). काही वेळेस गप्पांच्या अड्ड्यात आपल्याला “अहो, आमचे ते काका रोज पन्नासेक तरी सिगारेटी फुंकायचे, तरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत कसे ठणठणीत होते” अशा छापाची विधाने कधीमधी ऐकायला मिळतात. याचे स्पष्टीकरण वरील चार कारणांमध्ये दडलेले असते. अर्थात अशी उदाहरणे ही अपवाद म्हणून सोडून द्यायची असतात. एखादे रसायन जर ९५% लोकांना घातक ठरले असेल तर त्याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.

कर्करोगकारक रसायनांची उदाहरणे
या संदर्भात अनेक रसायनांकडे ‘संशयित’ म्हणून बघितले गेले आहे. साधारणपणे त्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल:
१. कर्करोगकारक (carcinogenic)
२. कर्करोगपूरक (co-carcinogenic)

त्यापैकी सुमारे १०० रसायने ही आतापर्यंत माणसासाठी ‘कर्करोगकारक’ म्हणून सिद्ध झालेली आहेत. यातील एकेक रसायन हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय होऊ शकेल. काही रसायनांचा संपर्क हा विशिष्ट व्यावसायिकांपुरता मर्यादित असतो. याउलट धूम्रपान आणि मद्यपान हे समाजातील खूप मोठ्या समूहांशी संबंधित विषय आहेत. त्यामुळे या लेखाच्या मर्यादेत या दोनच स्त्रोतांमधील रसायनांचा विचार आपण करणार आहोत.

तंबाकूचे धूम्रपान
जागतिक स्तरावर फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे अर्थातच धूम्रपान. या रोगाने जे मृत्यू होतात त्यापैकी ८०% लोक हे दीर्घकाळ धूम्रपान करणारे असतात. धूर ओढणे हे स्वतःसाठी आणि धूर सोडणे हे आजूबाजूला असणाऱ्यांना घातक असते!
या धुरातील रसायनांचा तपशील असा आहे :
• एकूण रसायने ७०००
• त्यापैकी घातक २५०
• कर्करोगकारक ६९
• कर्करोगकारक रसायनांमध्ये Acetaldehyde, Aromatic amines, Benzo[α]pyrene ही काही उदाहरणे.

तंबाकूतील निकोटीन हे एक बहुचर्चित रसायन आहे. ते जबरदस्त व्यसनकारी आहे पण ते माणसात कर्करोगकारक असल्याचे अद्याप निर्विवाद सिद्ध झालेले नाही. तूर्तास त्याला कर्करोगपूरक म्हणता येईल.
तंबाकू खाणे हा प्रकार आपल्याकडे भरपूर आहे. त्यातील nitrosamines हे तोंडाच्या कर्करोगास कारण ठरतात. भारतात हा कर्करोग पुरुषांमधील कर्करोगांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.

अल्कोहोलचे सेवन अर्थात मद्यपान
हे शीर्षक वाचताक्षणीच अनेकांच्या भुवया उंचावतील कारण हा अतिशय संवेदनशील विषय आहे ! जगभरातील सुशिक्षित समाजावर नजर टाकता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेकांनी धूम्रपानाला आयुष्यातून हद्दपार केलेले आहे पण त्यांना मद्यपानाची संगत मात्र सोडवत नाही. संशोधकांचाही हा लाडका विषय! त्यामुळे बहुसंशोधित आणि बहुचर्चित. फक्त कर्करोगच नव्हे तर इतर अनेक आजारांशीही त्याचा कार्यकारणभाव जोडलेला आहे. त्यावरील भरपूर उलटसुलट माहिती माध्यमांतून उपलब्ध आहे.

एक दशकापूर्वी अल्कोहोलला ‘कर्करोगपूरक’ इतपत लेबल लावलेले होते. आता मात्र ते ‘कर्करोगकारक’ च्या यादीत जाऊन बसले आहे. काही संशोधक त्याला ‘risk factor’ असे सुरक्षित लेबल लावणे पसंत करतात.
तर आता जाणून घेऊयात याबाबतीतली ताजी घडामोड. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी American Society of Clinical Oncology (ASCO) ने अल्कोहोल आणि कर्करोग याबाबत नियतकालिकात जाहीर निवेदन दिलेले आहे. ‘First-time Statement’ अशा विशेषणासह त्याला ठळक प्रसिद्धी दिलेली आहे. त्यातील महत्वाचे मुद्दे असे आहेत:

१. अल्कोहोल हे पुढील सात अवयवांच्या कर्करोगास कारणीभूत ठरते (causal relationship) : तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि मोठे आतडे.
२. तर जठर आणि स्वादुपिंडाच्या बाबतीत मात्र ते ‘कर्करोगपूरक’ आहे.
३. दीर्घकाळ अतिरिक्त मद्यपानाने कर्करोगाचा खूप धोका संभवतो आणि प्रमाणात (moderate) पिणे सुद्धा सुरक्षित नाही.
४. वैधानिक इशारा : “ तुम्हाला जर कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल, तर खूप कमी ‘प्या’ आणि जर तुम्ही ‘पित’च नसाल तर अल्कोहोलच्या नादीच लागू नका !”

तर हे होते धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित रसायनांचे विवेचन. अन्य रसायनांचा विचार विस्तारभयास्तव करीत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
संशोधनातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवनव्या उपचारपद्धती विकसित होत आहेत. त्यामुळे जरी बऱ्याच कर्करोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असले तरीही रोगप्रतिबंध हा कधीही श्रेष्ठ उपाय ठरतो. याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या लेखाच्या विषयालाही ती लागू आहेत. त्यानुसार काही कर्करोग-प्रतिबंधक उपाय असे आहेत :
१. तंबाकूसेवन वर्ज्य
२. अल्कोहोलसेवन अत्यल्प
३. आहारात ‘अ’, ‘इ’ व ‘क’ जीवनसत्वांचा भरपूर वापर. तेव्हा गाजर, पालेभाज्या आणि लिंबू दणकून खात रहा.
४. शरीराच्या वजनावर नियंत्रण, कारण अतिरिक्त चरबी ही पेशींमध्ये कर्करोगपूरक परिस्थिती निर्माण करते. आणि,
५. विविध वैद्यकिय ‘चाळणी परीक्षा’ (screening tests) नियमित करून घेणे.

समारोप
एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे. आपण निर्माण केलेल्या रसायनांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्यांचा वापर आणि संपर्क शक्य तेवढा कमी केला पाहिजे. अन्नातून शरीरात जाणारी रसायने कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीचा प्रसार वेगाने झाला पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे हे तर सर्वस्वी आपल्याच हातात आहे. औद्योगिक-प्रदूषण नियंत्रण कठोरपणे झाले पाहिजे. रसायनांमुळे होणारा कर्करोग हा गंभीर सामाजिक आरोग्यविषय विषय आहे. तो रोखण्यासाठी विविध स्तरांवर युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा कर्करोगाचा भस्मासुर हळूहळू मानवजातीला गिळंकृत करण्यासाठी टपून बसलेला आहे.
*************************************

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

महत्त्वाच्या विषयाचा थोडक्यात परंतु सर्वस्पर्शी आढावा. यावर विस्तारभयाची चिंता न करता भरपूर लिहावे ही विनंती.

मराठी कथालेखक's picture

3 Dec 2017 - 12:00 pm | मराठी कथालेखक

चांगला लेख आणि लेखनशैली आवडली.
कर्करोगावरील उपचारांबाबतही सोपा, सामान्यांना कळेल असा लेख लिहावात ही विनंती.

कुमार१'s picture

3 Dec 2017 - 12:33 pm | कुमार१

एस आणि मक , मनापासून आभार!
तुमच्या सूचनांची नोंद घेत आहे.

सुबोध खरे's picture

3 Dec 2017 - 2:54 pm | सुबोध खरे

एक विनंती
सर्वात कॉमन अशी रसायने आणि त्यांच्या मुले होणारे कर्करोग यावर विस्तृत पणे लिहिले तर बरे होईल.--/\--

अमितदादा's picture

3 Dec 2017 - 2:55 pm | अमितदादा

उत्तम लेख आणि माहिती..सेंद्रिय शेती हे भविष्य आहे, परदेशात सेंद्रिय शेती उत्पादने eco tag ने ओळखली जातात, त्यांचा भाव हि जास्त असतो. ह्या उत्पादनांच प्रमाणीकरण होत, जेन्हे करून फसवाफसवी होऊ नये. भारतात सुधा सेंद्रिय शेतीच महत्व वाढू लागलं आहे हि उत्तम गोष्ट आहे. सिक्कीम हे भारतातील १००% सेंद्रिय करण झालेलं राज्य आहे, परंतु अपेक्षे प्रमाणे उत्त्पन मिळत नसल्याने ह्या राज्यातील शेतकरी परत एकदा रासायनिक शेतीकडे वळू शकतील अशी बातमी मध्यंतरी वाचली होती, असे होऊ नये हि इच्छा.

३. अन्न-प्रक्रिया : एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो.

हे माहित न्हवते, चांगली उपयुक्त माहिती मिळाली.

सुबोध खरे's picture

3 Dec 2017 - 2:55 pm | सुबोध खरे

एक विनंती
सर्वात कॉमन अशी रसायने आणि त्यांच्या मुले होणारे कर्करोग यावर विस्तृत पणे लिहिले तर बरे होईल.--/\--

सर्वात कॉमन अशी रसायने आणि त्यांच्या मुले होणारे कर्करोग यावर.......>>>>> तंबाकू व अल्कोहोल वर लिहिले आहेच.सर्वात कॉमन् तीच नाहीत का ?
अमित, आभार !

पद्मावति's picture

3 Dec 2017 - 3:25 pm | पद्मावति

तुमचे लेख नेहमीच उत्तम आणि माहितीपूर्ण असतात. हा लेखही अपवाद नाहीच.
महत्त्वाच्या विषयाचा थोडक्यात परंतु सर्वस्पर्शी आढावा. यावर विस्तारभयाची चिंता न करता भरपूर लिहावे ही विनंती. +१

कुमार१'s picture

3 Dec 2017 - 3:42 pm | कुमार१

पद्मावती, आभार.
तुमच्यासारख्या जाणकार वाचकांचे प्रतिसाद खूप मोलाचे आहेत

तेजस आठवले's picture

3 Dec 2017 - 3:58 pm | तेजस आठवले

चांगला विषय आणि चांगला लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन. विस्ताराने लिहावे ही विनंती, लेख मोठा झाला तरी हरकत नाही.
१.अल्युमिनियम हे कर्करोगकारक/ पूरक आहे का ? मला स्वतःला अल्युमिनियम च्या भांड्यात केलेला स्वयंपाक मनापासून आवडत नाही. त्यातून जे काही सूक्ष्म कण शरीरात जात असतील त्यामुळे कर्करोग होऊ शकतो का ?
२. सध्या टप्परवेअर सारख्या फूड ग्रेड प्लास्टिक डब्यात अन्न साठवले जाते. बरेच जण रोजचा डब्बा त्यात नेतात आणि ऑफिस मध्ये माइक्रोवेव्ह मध्ये गरम करून खातात. ह्याचा आणि कर्करोगाचा काही संबंध आहे का?,काही खात्रीलायक संशोधन झाले आहे का?
३. अपरिहार्य कारणांमुळे बाहेरचे खाणे, विशेषतः पॅकबंद खाणे सतत खाल्ले जाताना दिसते. पाकिटबंद चिप्स,कचोऱ्या, शेव, इतकेच काय सुपरमार्केट मधून गोठवलेले बर्गर, पॅटी, फ्रेंच फ्राईज च्या मोठाल्या पिशव्या नेताना मी बघतो. घरी मुलांना भूक लागल्यावर ह्या फ्राईज तळून दिल्या जातात. हे सगळे टिकवण्यासाठी त्यात काय काय रसायने घालतात हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. आपल्या घरच्या दह्यात फक्त दही असते, पण बाहेरच्या दह्यात त्याबरोबरीने अनेक रसायने आढळतात.त्यांचा काहीतरी प्रभाव शरीरावर नक्कीच पडत असणार. तसेच ती रसायने उत्सर्जन करण्यासाठी शरीराला कदाचित बरेच प्रयत्न करावे लागत असतील.. एकूणच पाकिटावर त्यात काय काय घातले आहे ते वाचून मगच निर्णय घ्यावा असे वाटू लागले आहे.प्रिझर्वेटिव्हस, रंग, सुवास, चव हे सर्व वाढवण्यासाठी वापरलेली रसायने, मीठ आणि साखरेचा अतिरिक्त वापर, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप ह्यातली शरीराला खरेच गरजेची किती आणि कारण नसताना पोटात ढकलावी लागणारी किती ?

अल्युमिनिअम व कर्करोग ' हा तसा घोळदार आणि वादग्रस्त विषय आहे.
कर्करोगकारक रसायनांच्या यादीत ''Aluminium" हा शब्द नाही पण "Aluminium production" असा उल्लेख आहे. थोडक्यात, घरगुती वापरातून (non- occupational exposure) जे अल्युमिनिअम पोटात जाईल ते कर्करोगकारक नसेल. पण, अल्युमिनिअम उत्पादन आणि वेल्डिंगमध्ये काम करणार्‍या (occupational exposure) व्यक्तींना कर्करोगाचा धोका संभवतो.
अर्थात १००% रोग होतो असे विधान करता येणार नाही.

विक्रीसाठी प्रोसेस केलेल्या, बाहेरून हवा बंद डब्यातून, पॅकिंग, पाऊच मधून विकत आणलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये कदाचित प्रिझर्वेटिव्ह्ज असतील, ती सगळी आपल्या पोटात जात असतात.
या संदर्भात पाश्चात्य देशातील स्मशानभूमी कंपन्या चालवणाऱ्यांना एक चिंता भेडसावते आहे. पूर्वी पेक्षा हल्ली पुरलेल्या शरीरांचे खूप कमी वेगाने विघटन होते अशी तक्रार आहे. हि प्रिझर्वेटिव्ह्ज ची करामत असू शकेल.
आपल्या भारतीयांची पद्धत छान. जन्म घेतेवेळी निसर्गाकडून जे काही एलेमेंट्स (पंचमहाभूते) घेतलेले असतात ते निसर्गाला तात्काळ परत केले जातात. अगदी आजकालच्या इन्स्टंट जमान्याला साजेसे. आणि हल्ली लोकं भरपूर चरबी (फॅट्स या अर्थाने) बाळगून असतात त्यामुळे एकदा पेटवले कि भरभर राख होते.

आता पाश्चात्य देशात देखील ग्रँड फिनाली बार्बेक्यू करतात असे ऐकिवात आहे. कमी खर्चिक आणि सुलभ.

बऱ्याच जणांनी प्लॅस्टिकच्या वेष्टनात ठेवलेले अन्न वा पाणी घातक आहे का असे विचारले आहे. तूर्त त्याबद्दल थोडे लिहितो
.
प्लॅस्टिकमधून Bisphenol A हा पदार्थ पोटात जातो. तसा तो फार काळ रक्तात टिकत नाही . पण जर प्रत्येक खाण्यापिण्याबरोबर तो पोटात गेला तर तो टिकू शकेल.

त्याच्या दुष्परिणामांवर बरेच संशोधन चालू आहे
कर्करोगापेक्षाही आपल्या हॉर्मोन यंत्रणा त्याने बिघडतात असा काहीसा निष्कर्ष आहे.
ठाम मत देणे अवघड आहे पण प्लस्टिक आणि अन्न संपर्क जेवढा कमी तेवढे चांगले.

आपल्या खाण्यापिण्याबरोबर अनेक गोष्टी पोटात जातात. पूर्वीच्या काळात रोमन लोक चिनी मातीच्या भान्ड्यामधून खात/पीत आणि त्यावर शिशाची झिलई असे. रोमन लोकामधल्या कमी होत जाणार्‍या जननप्रमाणाचे कारण त्यान्च्या पोटात अवाजवी प्रमाणात जाणारे शिसे असल्याची शन्का आहे. आपल्याकडे देखील ५० -६० वर्षापूर्वीपर्यन्त ताम्ब्यापितळेची भान्डी वेळोवेळी कल्हई करूनच वापरली जात - नाहीतर ताम्ब्यापितळेच्या भान्ड्यातील अन्न खात राहिल्यास अन्नातील आम्लान्चा (जसे ताक, लिम्बू, आम्बट भाज्या) ताम्ब्यापितळेवर परिणाम होऊन तयार झालेले क्षार पोटात जाण्याने उल्ट्या होऊन पोट्दुखीपासून मृत्युपर्यन्त परिणाम शक्य असे.

शक्य तेव्हढ्या कमी प्रक्रिया केलेले तसेच शक्य तेव्हढे ताजे अन्न खाणे हा खाण्यापिण्याबरोबर पोटात जाणार्‍या गोष्टी टाळण्याचा मार्ग आहे.

कुमार१'s picture

11 Dec 2017 - 8:55 am | कुमार१

शक्य तेव्हढ्या कमी प्रक्रिया केलेले तसेच शक्य तेव्हढे ताजे अन्न खाणे ">>≥> +100

कधी तंबाकु, खानावळीतले तळलेले पदार्थ यांच्या वाटेलाही न जाणाय्रा, केस काळे करणारे डाय न लावणाय्रा गृहिणींना कसलेकसले कर्करोग का होतात हे कोडेच आहे.

पगला गजोधर's picture

3 Dec 2017 - 4:50 pm | पगला गजोधर

कदाचित जनुकीय/आनुवंशिक घटक ????
कोणीही धूम्रपान/मद्यपान करत असेल, तर पुढच्या पिढीत ते आपली मॉडीफाईड जेनेटिकल स्ट्रेन पाठवतात असतात,

त्यामुळे अल्कोहोल तंबाखु सेवन ज्यात धुम्र/गुटखा बरोबर मिसरीं मशेरी सुद्धा आलं... कोणी वापरत असेल तर, अनाहूत पणे पुढच्या/येणाऱ्या पिढ्यावर ते परिणाम करत आहेत....

पगला गजोधर's picture

3 Dec 2017 - 5:00 pm | पगला गजोधर

किंवा आजकाल गाई म्हशींना दुधवाढीसाठी हार्मोन्सची इंजेक्शने देण्यात येते... त्या हार्मोन्स चे ट्रेसेस दुधातून मानवी शरीरात येतात, त्यामुळे असेल कदाचित ?? अर्थात कुमारजी डिटेलवार लिहितील, मी अंदाज सांगितला...(*मी वैद्यकीय पेशाशी संबंधित नाही, माझे शिक्षणही त्या संबंधात नाही...
)

लेखातील हा भाग बघा :

आपल्याला कर्करोग का होतो? ढोबळ मानाने त्याची तीन कारणे आहेत:
१. विविध किरणोत्सर्ग (रेडीएशन)
२. अनेक प्रकारची रसायने, आणि
३. काही विषाणूंचा संसर्ग

तिमा's picture

4 Dec 2017 - 4:32 am | तिमा

३. काही विषाणूंचा संसर्ग
हे समजले नाही. याबद्दल काही विदा आहे का ? कारण आत्तापर्यंत, कर्करोग फक्त रसायने व इतर कार्सिनोजेनिक पदार्थांमुळे होतो, असं ऐकलं होतं.

@ तिमा:
आता विषाणूंमुळे कर्करोग होतो याचा शोध प्रस्थापित होऊन पस्तीसेक वर्षे तरी लोटली बघा. सुमारे १५% कर्करोग हे यामुळे होतात. त्यापैकी महत्वाचे असे:
1. A type of Lymphoma
2. Liver Ca (due to Hep B & C viruses)
3. Cervical Ca (females)
4. Adult leukemia

हा कर्करोग कसा होतो ते थोडक्यात :
1. विषाणूकडे कर्करोगकारक जनुक असते.
2. ते तो आपल्या शरीरात आल्यावर आपल्या जनुकांमध्ये घुसडतो.
3. मग आपल्या पेशींत विशिष्ट प्रथिने खूप तयार होतात, आणि
4. त्यांच्या प्रभावाखाली पेशींची अनियंत्रित वाढ होते.

रंगीला रतन's picture

6 Dec 2017 - 10:02 pm | रंगीला रतन

सहमत... एवधेच नाहि तर ब्रेड किंवा पाव सुद्धा न खाणाऱ्या तसेच पालेभाज्या मुबलक प्रमाणात खाणाऱ्या माझ्या आईला सुद्द्धा हा रोग झाला होता. आणि तिच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये बघितलेल्या वर्ष दीड वर्षे वयाच्या बालकांना सुद्धा उपचार घेताना बघितल्यावर ह्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही.... ज्याला व्हायचंय त्याला होणार बाकीच्यांनी जास्ती काळजी करायची गरज नाही असे माझे तरी मत आहे.

रंगीला रतन's picture

6 Dec 2017 - 10:07 pm | रंगीला रतन

माफ करा हा प्रतिसाद कंजूस यांच्या प्रतिक्रियेला होता.

ज्याला व्हायचंय त्याला होणार बाकीच्यांनी जास्ती काळजी करायची गरज नाही असे माझे तरी मत आहे.>>>≥
यालाच शास्त्रीय भाषेत 'जनुकीय अनुकूलता' असे म्हणता येते.
पुन्हा एक मुद्दा अधोरेखित करतो : हा आजार multifactorial आहे.

मराठी_माणूस's picture

7 Dec 2017 - 3:36 pm | मराठी_माणूस

जनुकीय अनुकूलता व multifactorial : हे थोडे अजुन स्पष्ट कराल का ?

कुमार१'s picture

7 Dec 2017 - 8:05 pm | कुमार१

multifactorial : लेखात कारणमीमांसा मध्ये जे 4 घटक दिले आहेत, त्यांची एकमेकांशी interaction होऊन पेशींमध्ये घडामोडी होणे.

जनुकीय अनुकूलता >>>>>
रसायन DNA वर हल्ला करते. DNA कडे स्वतःच्या ढाली असतात. म्हणजे दुरुस्ती यंत्रणा. बरेचसे हल्ले तो परतवून लावेल. पण कधीकधी रसायन जबरदस्त असेल आणि ढाल कमकुवत असेल तर मात्र जनुकीय बिघाड होतो.
म्हणजेच बिघाडाला प्रतिकार करण्याची शक्ती पुरेशी किंवा नाही, याला प्रति/ अनुकूलता समजावे

पगला गजोधर's picture

3 Dec 2017 - 4:56 pm | पगला गजोधर

शिवाय ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा सारखे( देश पृथ्वीच्या ध्रुवाजवळचे), त्यांच्या भौगोलिक स्थानांमुळे (सूर्याच्या अतिनील किरनांमुळे) त्वचेच्या कर्करोग होण्याच्या प्रोबॅबिलीटिबाबतीत पुढे आहे....

चर्चेत सहभागी सर्वांचे आभार.
काही सूचनांची नोंद घेतली आहे. एकेक रसायन हे स्वतंत्र लेखाचा विषय होईल. सखोल विवेचन करण्यासाठी मला वैद्यकीय च्या मर्यादा ओलांडून रसायन शास्त्राचे वाचन करावे लागेल. त्यासाठी वेळ द्यावा ही विनंती.
दमादमाने एकेक मुद्दा घेईन

मस्त लिहत आहात. मराठीमध्ये हा विषय इतका छान कोणी हाताळला नव्हता.

कुमार१'s picture

3 Dec 2017 - 8:47 pm | कुमार१

आनंदा, आभार
तुमच्यासारख्या जाणकार वाचकांचे प्रतिसाद खूप मोलाचे आहेत

कुमार१..तुमचे लेख खूप माहितीपूर्ण असतात. इतकी महत्वाची माहिती सोप्या रितीने सांगता. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व प्रतिक्रियांना वेळेत आणि योग्य प्रतिसाद देता. तुमच्या लेखांवरून तुमचा अभ्यास दिसतोच पण तुम्ही तो अपडेटेड ठेवता ते ही कळते. धन्यवाद.

कुमार१'s picture

4 Dec 2017 - 4:05 pm | कुमार१

शलभ, धन्यवाद
तुमच्या सारख्या वाचकांचे प्रतिसाद हीच माझी लेखनाची ऊर्जा आहे !

महत्वपूर्ण उपयुक्त माहिती.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2017 - 4:37 pm | चौथा कोनाडा

सर्वांना उपयुक्त असणारा माहितीपुर्ण लेख !
धन्यवाद, कुमार१जी !

हादेखिल लेख माहितीपूर्ण.
पुलेशु.

सचिन काळे's picture

4 Dec 2017 - 6:00 pm | सचिन काळे

उत्तम लेख आणि माहिती दिलीत. कृपया एका शंकेचे निरसन करावे. घर्षणानेसुद्धा कर्करोग होतो असे ऐकिवात आहे. उदा. बरीच वर्षे टिकली, अंगठी, चेन, बांगडया ई. घातल्यावर घर्षणाने होणारा त्वचेचा कर्करोग, सतत तंबाकू तोंडात ठेवल्याने घर्षणाने होणारा तोंडाचा कर्करोग, युरिन ब्लाडरमध्ये बरीच वर्षे मुतखडा राहिल्याने घर्षणाने होणारा ब्लाडरचा कर्करोग. थोडक्यात शरीराच्या आत किंवा बाहेर कुठल्याही फॉरेन बॉडीमुळे सतत घर्षण झाले असता कर्करोग होण्याची शक्यता असते का?

कुमार१'s picture

4 Dec 2017 - 7:04 pm | कुमार१

सचिन, आभार व चांगली शंका
तुम्ही दिलेल्या उदा. मध्ये त्यात्या भागाचे chronic inflammation होते, जे कर्करोगासाठी पाया तयार करते.

तंबाकूच्या बाबतीत रसायनांचा वाटा मोठा आहे

मराठी_माणूस's picture

5 Dec 2017 - 11:02 am | मराठी_माणूस

एकाने सोप्या भाषेत कर्करोग समजावतांना असेच काहीसे सांगीतले होते. शरीरात कूठेही सतत irritation होत असेल तर तिथल्या पेशींची वाढ होते (त्या irritation चा सामना करण्यासाठी), आणि ती जेंव्हा अनियंत्रीत होउ लागते तेंव्हा कर्करोगाची शक्यता वाढते. हे अर्थातच ढोबळमानाने दिलेले स्पष्टीकरण आहे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

उपाशी बोका's picture

4 Dec 2017 - 8:18 pm | उपाशी बोका

हा लेख FUD (fear, uncertainty and doubt) प्रकारचा आहे. लेखाच्या आशयाशी सहमत आहे, पण "एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे." याबद्दल मला खरोखर शंका आहे. याबद्दल कुठे तसा अभ्यास झाला आहे का? याची लिंक लेखक देऊ शकेल का? नॉनस्टिक भांड्यात जेवण करू नका, ऑर्गॅनिक खा असे अनेक विचार पसरले आहेत, पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास झाला आहे का? हा संबंध १००% खात्रीलायक रित्या सिद्ध झाला आहे का? असे विचारले की उत्तर मिळत नाही.

https://www.cancer.org/cancer/cancer-causes/general-info/known-and-proba... यावरूनः

Cancer is caused by changes in a cell’s DNA – its genetic “blueprint.” Some of these changes may be inherited from our parents. Others may be caused by outside exposures, which are often referred to as environmental factors.
...
Carcinogens do not cause cancer in every case, all the time. Substances labeled as carcinogens may have different levels of cancer-causing potential. Some may cause cancer only after prolonged, high levels of exposure. And for any particular person, the risk of developing cancer depends on many factors, including how they are exposed to a carcinogen, the length and intensity of the exposure, and the person's genetic makeup.

धूम्रपान नक्कीच कर्करोग वाढण्यास कारणीभूत होतो, हे मान्य आहे. पण इतर केमिकल्सचे काय?

But for safety reasons, it is usually assumed that exposures that cause cancer at larger doses in animals may also cause cancer in people. It isn't always possible to know how the exposure dose might affect risk, but it is reasonable for public health purposes to assume that lowering human exposure will reduce risk.

"एकूण मानवी कर्करोगांपैकी सुमारे ८०% हे रसायनांमुळे होतात हे कटू सत्य आहे." हे सरसकट विधान अवैज्ञानिक आहे. अनेक केमिकल्समुळे मानवी जीवन सोईस्कर झाले आहे, हे पण तितकेच सत्य आहे.

कुमार१'s picture

4 Dec 2017 - 10:14 pm | कुमार१

80% हे विधान Harper's illus Biochemistry या पाठ्यपुस्तकातील आहे. याला आम्ही या विषयाची गीता म्हणतो
अमेरिकी पुस्तक, 90 वर्षाहोऊन अधिक काळ वापरात.
पान क्रमांक नंतर देतो, 30 th ed
80%मध्ये environmental pollutants included

शब्दबम्बाळ's picture

5 Dec 2017 - 8:39 am | शब्दबम्बाळ

नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण लेख!
रसायनांचे दुष्परिणाम आपल्या समोर आहेत पण कोणी लक्ष देत आहे का नाही असे वाटते! शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे पंजाबमध्ये काय परिस्थिती ओढवली आहे हे काही काळापूर्वी "कँसर ट्रेन" बद्दल वाचून कळाले होते!
पंजाब मध्ये हि "कँसर ट्रेन" आहे, एकूण प्रवाशांमधले जवळपास ६०% लोक कँसर पीडित असतात जे त्या ट्रेन मधून उपचारासाठी दवाखान्याकडे जातात.

The most remarkable feature of this train is that 60% of its population are cancer patients of all ages who come from all across Punjab. This 12-coach train has gained its name from a sudden increase in cancer cases in Punjab that many blame on pesticide use, growing pollution and hardly any response by authorities.

The shocking tale of India's 'Cancer Train'

आपण जे पौष्टिक भाज्या म्हणून खातो आहोत त्यातून किती रसायने पोटात जात असतील कोणास ठाऊक...

कुमार१'s picture

5 Dec 2017 - 9:21 am | कुमार१

शब्दबंबाळ, आभार
@ उपाशी बोका, हा संदर्भ:
Harper 30 ed, 2015, p 724 says.....
80% of human Ca are caused by environmental factors, principally CHEMICALS
या आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तक पुढे जालावरचे फुकटचे अनेक संदर्भ फिजुल आहेत
पुस्तक जरूर बघावे ही वि.

उपाशी बोका's picture

7 Dec 2017 - 10:08 am | उपाशी बोका

>>या आंतरराष्ट्रीय पाठ्यपुस्तक पुढे जालावरचे फुकटचे अनेक संदर्भ फिजुल आहेत.

धन्यवाद. केवळ वरील वाक्यामुळे उत्सुकता वाढली. माझ्याकडे ते पाठ्यपुस्तक नाही आणि मिळायची शक्यता नाही.
80% of human Ca are caused by environmental factors, principally CHEMICALS हे वाक्य नक्कीच पुस्तकात असेल, याबद्दल दुमत नाही. पण ते कुठल्या आधाराने लिहिले आहे, याचा कृपया संदर्भ द्यावा. (म्हणजे तळटीप, मूळ वैज्ञानिक पेपर वगैरे). ते केवळ पुस्तकात आहे म्हणून खरे/खोटे मानत नाही पण या वाक्याचा बेसिस काय ते जाणून घ्यायला आवडेल.

प्रश्न उरला जालावरचे संदर्भ फिजुल आहेत याबद्दल. सर्व संदर्भ खरे नसले तरी तो संदर्भ कुणी दिला आहे, हेदेखील महत्वाचे वाटते.

The Report on Carcinogens (RoC) is a scientific and public health document that identifies and discusses agents, substances, mixtures, or exposure circumstances (referred to in the report as “substances”) that may pose a cancer hazard to humans

https://ntp.niehs.nih.gov/pubhealth/roc/index-1.html नुसारः

The 14th Report on Carcinogens contains information on 248 substances — 62 known to be a human carcinogen and 186 reasonably anticipated to be a human carcinogen — including some classes of related chemicals or substances.

Of all cancer deaths worldwide, 70% occur in low- and middle-income countries.

कॅन्सर टाळण्यासाठी तंबाखू टाळा ( Single most preventable cause of cancer; causes 80% of lung cancer cases in men and 40% in women worldwide), Hepatitis B virus Exposure टाळा ( Causes 54% of liver cancer worldwide) आणि Occupational Exposure टाळा ही माहिती मिळाली. The good news is that over 35% of cancers are due to modifiable risk factors and can be prevented (Beaglehole et al. 2006, Reuben 2010, Stewart et al. 2016).

Given that about 12 percent of cancers worldwide are linked to viruses, and there are no vaccines available for any of these five viruses, prevention is critical for reducing potential cancer risks.

पण ८०% कॅन्सर मुख्यतः केमिकल्समुळे होतात असा निष्कर्ष कुठेही सापडला नाही. एखाद्या सायन्टिफिक पेपरचा संदर्भ दिलात (पुस्तकाचा नाही) तर मदत होईल.

कुमार१'s picture

7 Dec 2017 - 10:24 am | कुमार१

उबो, सवडीने प्रयत्न करतो
जाता जाता,
Harper हे पुस्तक M RC Path, US board certification आणि आपल्या एम बी बी एस व एम डी या सर्व अभ्यासक्रमांना पाठय पुस्तक म्हणून आहे.

तुमच्या मताबद्दल आदर आहे. तूर्त इथे थांबूयात

उपाशी बोका's picture

7 Dec 2017 - 10:40 am | उपाशी बोका

Federal Government Agencies That Regulate Exposures to Carcinogens

There are several Federal agencies that are charged with establishing permissible levels of exposure to chemical substances in the general environment, home, and workplace, and in food, water, and pharmaceuticals. These include the Consumer Product Safety Commission (CPSC), Environmental Protection Agency (EPA), the Food and Drug Administration (FDA), the Occupational Safety and Health Administration (OSHA), and the U.S. Department of Agriculture (USDA). In addition, the Agency for Toxic Substances and Disease Registry (ATSDR) has broad jurisdiction over hazardous waste
issues.

Consumer Product Safety Commission (CPSC)
: http://www.cpsc.gov
CPSC is an independent Federal regulatory agency responsible for reducing the risk of injuries and deaths associated with consumer products.
The consumer hotline is 1-800-638-2772 or the toll-free TTY number is 1-800-638-8270.

Environmental Protection Agency (EPA): http://www.epa.gov
EPA is a government regulatory agency charged with protecting human health and safeguarding the natural environment.
—One-stop source for environmental information where you live:
http://ww.epa.gov/enviro
—Learn about the environmental resources available in your community:
http://www.epa.gov/epahome/comm.htm
—EPA National Pesticide Information Center:
http://npic.orst.edu
.
1-800-858-7378
—EPA
Superfund Hotline for hazardous waste: 1-800-775-5037 or
703-413-0223. The toll-free TTY number is 1-800-553-7672.
—General information about identifying and cleaning up hazardous waste
sites: http://www.epa.gov/superfund/about.htm
—A list of hazardous waste sites:
http://www.epa.gov/superfund/sites/index/htm
—A list of common contaminants in hazardous waste sites and their
health effects:
http://www.epa.gov/superfund/programs/er/hazsubs/sources/htm

—For more information about radon in your home, visit the EPA radon Web
site: http://www.epa.gov/iaq/radon
or the National Radon Information
line:
1-800-SOS-RADON (1-800-767-7236)

Food and Drug Administration (FDA)
: http://www.fda.gov
FDA helps safe and effective products reach the market in a timely way and monitors the products for safety after they are in use.
—The National Center for Toxicological Research:
http://www.fda.gov/nctr
—FDA Information:
www.cfsan.fda.gov
or 1-888-463-6332

Occupational Safety and Health Administration (OSHA)
: http://www.osha.gov
OSHA is a Federal regulatory agency under the U.S. Department of Labor whose mission is to prevent work-r
elated injuries, illnesses, and deaths. To report accidents, unsafe working conditions, or safety and health violations: 1-800-321-6742. OSHA also has a toll-free TTY number: 1-877-889-5627. Office of Communications: 202-693-1999.
Individuals can also contact their local area offices.

United States Department of Agriculture (USDA)
: http://www.usda.gov/services.html
The USDA has several agencies and programs related to agricultural products including food safety inspection,
animal and plant inspection service, nutrition programs, and agricultural research programs.

Agency for Toxic Substances and Disease Registry (ATSDR)
: http://www.atsdr.cdc.gov
ATSDR is an agency of the U.S. Department of Health and Human Services (DHHS) and is the principal Federal agency
involved with hazardous waste issues and has fact sheets on various chemicals/agents. ATSDR Information Center: 1-888-422-8737
In many cases, more than one agency has the regulatory authority for a specific chemical, depending on its use and potential for human exposure. For example, pesticides are regulated by the EPA, FDA, USDA, and OSHA.
Other Federal Agencies
Other Federal agencies such as the NIEHS, NCI, and Centers for Disease Control (which includes the National Institute for Occupational Safety and Health and the National Center for Environmental Health) are charged with generating scientific information that helps regulatory agencies make sound regulatory decisions.

National Institute of Environmental Health Sciences (NIEHS)
: www.niehs.nih.gov
NIEHS was established to reduce human illness caused by unhealthy substances in the environment. Today, NIEHS supports extensive biomedical research, prevention, and intervention programs, as well as training, education, and community outreach efforts.

—NIEHS Office of Communications for public inquiries: 1-919-541-3345.
National Toxicology Program (NTP):
http://ntp-server.niehs.nih.gov
The NTP is an interagency program that coordinates toxicology research and testing activities within the U.S. Department of Health and Human Services. The NTP evaluates agents of public health concern by developing and applying tools of modern toxicology and molecular biology and publishes the biennial Report on Carcinogens
. To contact the NTP Office of Liaison and Scientific Review: 919-541-0530 (phone); 919-541-0295 (fax);
liaison@starbase.niehs.nih.gov
(e-mail).

National Cancer Institute (NCI)
: http://www.cancer.gov
NCI coordinates the National Cancer Program, which conducts and supports cancer research, training, and health information dissemination throughout the country.
—Fact Sheets available on:
http://cis.nci.nih.gov/fact
—NCI Publications. NCI’s on-line ordering service:
https://cissecure.nci.nih.gov/ncipubs
—Press Releases are available on NCI’s main Web site at
http://newscenter.cancer.gov
Press Office: 1-301-496-6641.
—NCI’s SEER Program is the most authoritative source of information on cancer incidence and survival in the United States.
http://seer.cancer.gov
—For geographic patterns of rates of cancer death from 1950–1994 for over
40 cancers:
http://www3.cancer.gov/atlasplus
—NCI’s toll-free Cancer Information Service for information about cancer and
to request publications: 1-800-4-CANCER (1-800-422-6237). The toll-free
TTY number is 1-800-332-8615.

Centers for Disease Control and Prevention (CDC)
: http://www.cdc.gov
CDC is an agency of DHHS that promotes health and quality of life by preventing and controlling disease, injury, and disability. Components of the CDC include:
—National Institute for Occupational Safety and Health (NIOSH):
http://www.cdc.gov/niosh
A Federal agency responsible for conducting research and making recommendations for the prevention of work-related
disease and injury. 1-800-356-4674
—National Center for Environmental Health (NCEH) Health Line:
http://www.cdc.gov/nceh
1-888-232-6789
—National Report on Human Exposure to Environmental Chemicals:
www.cdc.gov/nceh/dls/report
1-866-670-6052
—GIS (geographic information systems) and public health Web site:
http://www.cdc.gov/nchs/gis.htm

—National Center for Health Statistics (NCHS):
http://www.cdc.gov/nchs
NCHS collects data to monitor the nation’s health.
—CDC public inquiries: 1-800-311-3435
—National Program of Cancer Registries:
www.cdc.gov/cancer/npcr
Funds
statewide cancer registries in 45 states, the District of Columbia, and several territories, and serves as a valuable resource for citizens concerned about a possible increased occurrence of cancer in their communities.
—The National Breast and Cervical Cancer Early Detection Program:
www.cdc.gov/cancer/nbccedp/index.htm
Provides free screening exams to poor, uninsured women in all 50 states.
—Office of Smoking and Health:
www.cdc.gov/tobacco/mission.htm
—Division of Cancer Prevention and Control:
www.cdc.gov/cancer

इतक्या एजन्सी कार्यरत असताना ८०% कॅन्सर मुख्यतः केमिकल्समुळे होतात असा निष्कर्ष केवळ एका पुस्तकावर आधरून काढले, हे बघून आश्चर्य वाटले, इतकेच म्हणणे आहे.

प्राची अश्विनी's picture

7 Dec 2017 - 6:27 pm | प्राची अश्विनी

उपाशी बोका, तुमची शंका पटली.‌ इतक्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्द्ल कौतुक.

'भस्मासुर' शब्द अतिशयोक्ती वाटू शकेल. पण तो का वापरला ते सांगतो.

या रोगाच्या जागतिक मृत्युंची आकडेवारी मी एका आंतरराष्ट्रीय पाठय पुस्तकातून घेतली आहे. याची दर अडीच वर्षांनी आवृत्ती निघते. गेल्या दोनमधील फरक बघा:
2013 : ६५ लाख मृ.
2015 : ८० लाख
आता 2018 मध्ये..............?

उपाशी बोका's picture

7 Dec 2017 - 9:20 am | उपाशी बोका

मान्य आहे की कर्करोग वाईट रोग आहे, पण जगातील सर्वात वाईट १० प्रकारच्या रोगांमध्ये त्याचा नंबर ५ वा आहे.
कमी उत्पन्न असलेल्या देशात तर कर्करोग पहिल्या १० त पण नाही. अधिक उत्पन्न असलेल्या देशात त्याचा नंबर ४ आहे.
हृदयाच्या विकाराने मरण्याची शक्यता कर्करोगाने मरण येण्यापेक्षा बरीच जास्त आहे. खरा धोका कुठून आहे?

जागतिक मृत्युंची आकडेवारी अशी आहे:
1. Ischemic heart disease, or coronary artery disease - ८८ लाख
2. Stroke - ६२ लाख
3. Lower respiratory infections - ३२ लाख
4. Chronic obstructive pulmonary disease - ३१ लाख
5. Trachea, bronchus, and lung cancers - १७ लाख
6. Diabetes mellitus - १६ लाख
7. Alzheimer’s disease and other dementias - १५ लाख
8. Dehydration due to diarrheal diseases - १४ लाख
9. Tuberculosis - १३.७ लाख
रस्त्यावरील अपघाती मृत्यू - १३.४ लाख
10. Cirrhosis - १२ लाख

संदर्भः https://www.healthline.com/health/top-10-deadliest-diseases
मूळ स्रोतः World Health Organization - http://www.who.int/mediacentre/factsheets/fs310/en/

कुमार१'s picture

7 Dec 2017 - 9:50 am | कुमार१

उबो, माझी आकडेवारी Harper या पाठयपुस्तकातील आहे.त्यात कर्करोगाला क्र. 2 चे स्थान दिलेले आहे.
तो संदर्भ मी सर्वोत्तम मानतो.
त्यामुळे तुमच्या 4 या क्र. शी पूर्ण असहमत.
आपण पुस्तक बघाच ही पुन्हा वि.

उपाशी बोका's picture

7 Dec 2017 - 10:14 am | उपाशी बोका

अहो, पण तो माझ्या मनाचा रिपोर्ट नाहीये, World Health Organization चा रिपोर्ट बरोबर नाही, तुमचे पुस्तकच बरोबर आहे असे म्हणणे असेल तर प्रश्नच मिटला.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jan 2018 - 12:04 pm | प्रकाश घाटपांडे

थोडक्यात म्हणजे जर तज्ञांचेच क्रमवारी विषयी मतभेद आहेत. तर सामान्यांचा अजूनच गोंधळ वाढतो.

ss_sameer's picture

6 Dec 2017 - 8:32 pm | ss_sameer

अतिशय सुंदर लेख,
मलाही असेच वाटते आहे, जागेची तमा बाळगू नका, माहिती आवश्यक वाटली की लोक वाचतील नक्की...!

कुमार१'s picture

6 Dec 2017 - 8:45 pm | कुमार१

समीर, उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार !

ss_sameer's picture

6 Dec 2017 - 8:51 pm | ss_sameer

फारच सुंदर आणि उपयुक्त लेख.

माझंही हेच मत आहे, स्थान आणि वेळ भयास्तव हात आखडता न घेता लिखाण करत राहा,
माहिती कामाची वाटली की लोक वाचतातच वाचतात, शिवाय तुमची शैली देखील छान आहे,
लगे रहो...!

नाखु's picture

7 Dec 2017 - 8:45 am | नाखु

वेगळ्या विषयावरील लिखाण आवडले.इतक सोपं करून आणि तपशीलवार सांगितले त्याबद्दल अभिनंदन

आणखी लेखन करावे हीच विनंती

नाखु

कुमार१'s picture

7 Dec 2017 - 10:56 am | कुमार१

यापूर्वी मिपावरच इन्सुलिन, कोलेस्टेरॉल व हिमोग्लोबिन वर मी लेख लिहिले आहेत

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Dec 2017 - 9:47 am | अनिरुद्ध.वैद्य

अशाच एका चाय पे चर्चामध्ये मला मिळालेलं बोधामृतः हे सगळं करुन काय होणार? तर तुमचं आयुष्य वाढणार! पण कुठल? तर म्हातारपणातलं !!
I rested my case there.

सुबोध खरे's picture

7 Dec 2017 - 10:22 am | सुबोध खरे

वैद्य साहेब
व्हॉट्स अँप विद्यापीठात किंवा चाय पे चर्चा मध्ये मिळणारी माहिती विशिष्ट मनोवृत्तीने पसरवलेली असते आणि बहुसंख्य वेळेस ती भंपक असते.
दारू पिऊन आणि सिगरेट पिऊन आपले आयुष्य कमी होते ते म्हातारपणात नव्हे तर आपले येते म्हणजेच आपला "तरुणपणाचा" काळ कमी होतो.
मुद्दाम "अल्कोहोल आणि सेक्स" किंवा "सिगारेट आणि सेक्स" असे जालावर खोदून पहा. लैंगिक शैथिल्य(erectile dysfunction) पासून अवेळी वीर्योत्सर्जन(premature ejaculation) पर्यंत सर्वच्या सर्व दुष्परिणाम या दोन्ही पदार्थामुळे होतात.दारू मुळे माणसाच्या कल्पनाशक्तीला पंख फुटतात आणि आपण सर्वात शूर, वीर आणि देखणे आहोत असा आभास मात्र होतो.
बाकी आपली शक्ती( लैंगिक सोडून इतर) सिगारेटचे किंवा दारूने वाढण्याची शक्यता नाहीच म्हणजे मग अशक्त आणि नपुंसक माणूस हा वृद्ध का तरुण हे सांगण्याची गरज नाहीच.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Dec 2017 - 4:45 pm | अनिरुद्ध.वैद्य

ते मला मिळालेलं बोधामृत होतं, मी त्याच्याशी सहमत नाहीच!

उपाशी बोका's picture

7 Dec 2017 - 10:44 am | उपाशी बोका

दारू पिऊन आणि सिगरेट पिऊन म्हातारपण येत नाही कारण तुम्ही तरुणपणातच गचकता.

सुबोध खरे's picture

7 Dec 2017 - 10:50 am | सुबोध खरे

https://www.indiatimes.com/health/healthyliving/effects-of-alcohol-probl...
Alcohol ages you
Alcohol accelerates the ageing process by dehydrating our bodies. That’s why, after a night of heavy drinking, you are likely to wake up thirsty. Besides, it also forces our kidneys to work overtime to flush out all the toxins from the body. Excessive consumption of alcohol also leads to depletion of vitamin A within our bodies, which is needed by the skin for cell renewal. The result? Dry, greyish skin that’s prone to wrinkling.
"The dehydrating effect of alcohol and depletion of anti-oxidants makes the skin susceptible to free radical-induced damage resulting in dull skin, darkening (hyperpigmentation), dark circles, coarse texture, and development of wrinkles. So drinking too much alcohol can make you age at a faster pace,

सुबोध खरे's picture

7 Dec 2017 - 9:53 am | सुबोध खरे

कर्करोगाबद्दल समग्र आणि व्यापक असा दृष्टिकोन असलेला लेख आहे.
Cancer is a Preventable Disease that Requires Major Lifestyle Changes
Abstract
This year, more than 1 million Americans and more than 10 million people worldwide are expected to be diagnosed with cancer, a disease commonly believed to be preventable. Only 5–10% of all cancer cases can be attributed to genetic defects, whereas the remaining 90–95% have their roots in the environment and lifestyle. The lifestyle factors include cigarette smoking, diet (fried foods, red meat), alcohol, sun exposure, environmental pollutants, infections, stress, obesity, and physical inactivity. The evidence indicates that of all cancer-related deaths, almost 25–30% are due to tobacco, as many as 30–35% are linked to diet, about 15–20% are due to infections, and the remaining percentage are due to other factors like radiation, stress, physical activity, environmental pollutants etc. Therefore, cancer prevention requires smoking cessation, increased ingestion of fruits and vegetables, moderate use of alcohol, caloric restriction, exercise, avoidance of direct exposure to sunlight, minimal meat consumption, use of whole grains, use of vaccinations, and regular check-ups. In this review, we present evidence that inflammation is the link between the agents/factors that cause cancer and the agents that prevent it. In addition, we provide evidence that cancer is a preventable disease that requires major lifestyle changes.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2515569/

सुबोध खरे's picture

7 Dec 2017 - 9:59 am | सुबोध खरे

अजून काही दुवे
http://www.cancerresearchuk.org/health-professional/cancer-statistics/ri...
http://www.telegraph.co.uk/news/health/news/12055206/Nine-in-10-cancers-...
अजून वेळ गेलेली नाही
आजच आपली जीवनपद्धती सुधारा आणि कर्करोगापासून स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करा.

कुमार१'s picture

7 Dec 2017 - 10:50 am | कुमार१

सुबोध, चांगली माहिती
आभार

उत्तम आणि माहितीपुर्ण लेख.
अवांतर : मला पडलेला एक प्रश्न, वैद्यकिय शिक्षण हे इंग्रजीमध्ये असूनही जवळपास सगळेच डॉक्टर वैद्यकिय टर्म्स उत्तम मराठीत कसे समजाऊन सांगतात त्यांच्या पेशंटना? म्हणजे तसा काही स्वतंत्र अभ्यासक्रम असतो का?

कुमार१'s picture

8 Dec 2017 - 9:02 pm | कुमार१

सालदा र, आभार !
तसा काही स्वतंत्र अभ्यासक्रम नसतो. मराठीप्रेमी डॉ ते आत्मसात करतात. ☺
तर तसे नसणारे मुद्दामहून इंग्रजीत बोलतात !

कुमार१'s picture

10 Dec 2017 - 5:42 am | कुमार१

आपणा सर्वांना लेख महत्त्वाचा वाटला याचे समाधान आहे.

सर्वांच्या सहभागामुळे चर्चा उपयुक्त झाली याचा आनंद वाटतो.

मनापासून आभार !

एकविरा's picture

15 Dec 2017 - 11:56 am | एकविरा

मी वाचलय की खडे मीठ आणि हळदीच्या पाण्यात फळे ,भाज्या धुतल्या की रसायने निघतात . खरे आहे का?

कुमार१'s picture

15 Dec 2017 - 5:39 pm | कुमार१

वरवरची निघत असावीत
गाभ्यात पोचलेली ? माहीत नाही

अनिंद्य's picture

15 Jan 2018 - 3:37 pm | अनिंद्य

कुमार१,

उत्तम लिहिता आहात.

मला एक शंका आहे - कर्करोग झालेल्या पालकांच्या अपत्यांना कर्करोग होण्याची शक्यता अन्य लोकांपेक्षा जास्त असते का ?

अनिंद्य

कुमार१'s picture

15 Jan 2018 - 5:46 pm | कुमार१

अनिंद्य, आभार.
कर्करोग झालेल्या पालकांच्या अपत्यांना कर्करोग होण्याची शक्यता अन्य लोकांपेक्षा जास्त असते का ? >> चांगला प्रश्न.

ठराविक कर्करोग अनुवंशिक असतात. स्तन आणि दृष्टीपटलाचा कर्करोग ही त्याची महत्वाची उदाहरणे.
( आठवतंय का,अँजेलिना जोलीने तशी अनुवंशिकता असल्याने स्वताचे दोन्ही स्तन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काढून टाकले होते. अर्थात हा उपचार वादग्रस्त आहे.)

कलंत्री's picture

21 Jan 2018 - 10:43 pm | कलंत्री

गुटख्यामूळे कर्करोग होतो असा समज आहे याचा मलातरी लेख अथवा शंकासमाधानामध्ये उल्लेख आढळळा नाही. कृ. खुलासा व्हावा.

माझ्या एका मित्राला तोंडाचा कर्करोगाचे निदान झाले असतांना त्याने मनापासून प्रार्थना केली आणि नंतरच्या निदानात तो कर्करोगमूक्त झाला असे मला त्याने सांगितले. याविषयावर ही लिहायला हवे. ( श्रध्दा अथवा अंधश्रद्धा अश्या दोन्ही बाजूने).

बाकी लेख छानच होता हे नमूद करावेसे वाटते.

सुबोध खरे's picture

22 Jan 2018 - 12:01 am | सुबोध खरे

India
According to the National Report of Global Adult Tobacco Survey conducted in India and Bangladesh, the current prevalence of smokeless tobacco use is 25.9 and 27.2%, respectively. There are 30 different types of smokeless products available in these countries, including zarda, which contains dried and boiled tobacco leaves, limes, areca nut, additives, spices, and tannins [14]. Oral cancer accounts for 30 to 40% of cancer cases reported in India, and the most obvious cause is the extensive use of tobacco products, consumed via smoking and/or smokeless chewing products [15]. In addition, oral cancer occurrence is especially high in Uttar Pradesh in north India due to the extraordinary rate of consumption of smokeless tobacco products, such as paan and gutkha [16].

In India, the prevalence of oral cancer is high. It has been previously documented that besides other factors, the extensive use of paan, gutkha, and zarda could also contribute to the development of oral cancer [2]. In India, mostly children and teenagers chew gutkha occasionally or regularly. In Mumbai, 40% of school students and 70% of college students have been reported to regularly consume gutkha. Although some states of India have banned gutkha consumption due to its carcinogenic properties and other hazardous effects, it is still actively sold on the black market [2]. In addition, the widespread habit of paan and gutkha use is not limited to the Indian subcontinent, but extends to immigrants living in US and Europe [17-20]. In the Indian city of Wardha, gutkha was found to be used by approximately 46.4% of men and 20% of women [18].
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5543298/

सुबोध खरे's picture

22 Jan 2018 - 12:02 am | सुबोध खरे

India
According to the National Report of Global Adult Tobacco Survey conducted in India and Bangladesh, the current prevalence of smokeless tobacco use is 25.9 and 27.2%, respectively. There are 30 different types of smokeless products available in these countries, including zarda, which contains dried and boiled tobacco leaves, limes, areca nut, additives, spices, and tannins [14]. Oral cancer accounts for 30 to 40% of cancer cases reported in India, and the most obvious cause is the extensive use of tobacco products, consumed via smoking and/or smokeless chewing products [15]. In addition, oral cancer occurrence is especially high in Uttar Pradesh in north India due to the extraordinary rate of consumption of smokeless tobacco products, such as paan and gutkha [16].

In India, the prevalence of oral cancer is high. It has been previously documented that besides other factors, the extensive use of paan, gutkha, and zarda could also contribute to the development of oral cancer [2]. In India, mostly children and teenagers chew gutkha occasionally or regularly. In Mumbai, 40% of school students and 70% of college students have been reported to regularly consume gutkha. Although some states of India have banned gutkha consumption due to its carcinogenic properties and other hazardous effects, it is still actively sold on the black market [2]. In addition, the widespread habit of paan and gutkha use is not limited to the Indian subcontinent, but extends to immigrants living in US and Europe [17-20]. In the Indian city of Wardha, gutkha was found to be used by approximately 46.4% of men and 20% of women [18].
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5543298/

कुमार्१जीनी लिहिलेल्या उत्तम लेखाला ही थोडी पुस्ती

https://www.businessinsider.in/The-shocking-tale-of-Indias-Cancer-Train/...

कुमार१'s picture

22 Jan 2018 - 10:00 am | कुमार१

कलंत्री, सुबोध आणि शेखर , आभारी आहे.
वाचकांच्या प्रतिसादातून विषयाचे गांभीर्य लक्षात येते.

नुकत्याच भारत, चीन व अमेरिका येथील बाटलीबंद पाण्याच्या नमुना चाचणीचे निष्कर्ष हाती आले आहेत. त्यांत बिसलेरी सारख्या उत्पादनांचाही समावेश आहे :
https://www.google.com/amp/www.livemint.

सध्या महाराष्ट्रातही याची जोरदार चर्चा आहे.
बघूया याला काही पर्याय सापडतोय का.

कुमार१'s picture

22 May 2018 - 11:10 am | कुमार१

.

कुमार१'s picture

1 Jun 2018 - 3:44 pm | कुमार१

रसायनांचा हॉर्मोन्सवर होणारा दुष्परिणाम माझ्या अन्य लेखात इथे वाचता येईल :
https://www.misalpav.com/node/42676

गेल्या काही वर्षांत तरुण वयातील कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यातील बरेच रुग्ण योग्य उपचारांनी बरे होतात. पण, त्यांना पुढील आयुष्यात इतर काही दीर्घकालीन आजारांना सामोरे जावे लागते. त्या आजारांत प्रामुख्याने थायरॉईड-कमतरतेचा समावेश असतो.

या मुद्दयावर अधिक संशोधन चालू आहे.

“ प्राणी अभ्यासातून कर्करोग नियंत्रणाकडे”
हा आजच्या ‘सकाळ’ मधील लेख वाचनीय आहे.

काही देवमासे कर्करोगमुक्त असतात तर हत्तीतील कर्करोगाचे प्रमाण खूप कमी आहे. याचे कारण त्यांच्यात असलेली विशिष्ट प्रथिने.
त्या प्रथिनांशी संबंधित जनुके जर माणसात समाविष्ट करता आली तर रोग नियंत्रण शक्य होईल, असा लेखाचा सारांश आहे.

पाश्चिमात्य देशांत बरेच लोक आपल्या शेतात वा बागेतील वनस्पतींवर ‘Roundup’ हे तणनाशक फवारतात. Glyphosate या रसायनाने कर्करोग होऊ शकतो. काहीसे वादग्रस्त असे ते रसायन आहे.
हा फवारा दीर्घकाळ वापरलेल्या दोघांना कर्करोग झाला. गेल्या वर्षभरात या दोघांनी तो फवारा बनवणाऱ्या कंपनी विरुद्ध दावे लावले होते. त्यांत न्यायालयाने फिर्यादीची बाजू मान्य केली असून कंपनीला जबरी दंड ठोठावला आहे.

आता कंपनीने Glyphosateविरहित फवारा निर्मिला आहे.

कुमार१'s picture

30 Mar 2019 - 9:44 am | कुमार१

‘मोन्सॅन्टो’ला झटका (अग्रलेख) हे आजच्या 'सकाळ' मध्ये इथे वाचता येईलः

https://www.esakal.com/sampadakiya/loksabha-election-2019-and-usa-court-...

कुमार१'s picture

21 Jul 2019 - 11:28 am | कुमार१

आजच्या लोकसत्तामध्ये सुभाष पाळेकरांचा नैसर्गिक शेतीवर छान लेख आहे:

https://www.loksatta.com/vishesh-news/major-agricultural-problems-in-mah...

…. कुठलेच 'खत' न वापरता ही शेती करतात.

age factor, anti metabolite medicines, papiloma virus ह्या contributing factors बद्दलपण माहिती पुरवा म्हणजे वाचकांमधे अकारण भिती निर्माण होणार नाही.

कुमार१'s picture

21 Jul 2019 - 4:06 pm | कुमार१

जा लो,
सूचना चांगली आहे. सवडीने विचार करतो.
धन्यवाद

कुमार१'s picture

16 Aug 2019 - 9:22 am | कुमार१

"सिगारेट ओढणाऱ्या सर्वांना कर्करोग का होत नाही ? " या नेहमीच्या प्रश्नाबाबतचे एक नवीन संशोधन:

सिगारेट मधील कर्करोगकारक घटकांचा नाश 'GST' या शरीरातील एन्झाईम द्वारा होतो. लोकसंख्येच्या सुमारे ५% लोकांत हे एन्झाइम नसते.

त्यामुळे हे एन्झाइम नसलेल्या आणि बऱ्याच सिगारेट ओढणाऱ्या लोकांत रोगाची शक्यता वाढते.

की आयुर्वेदिक वा जडीबुटी उपचार करून अतिशय स्वस्तात कर्करोग बरा होऊ शकतो पण अनेकांचे आर्थिक गणित धोक्यात येईल म्हणून मोठे खेळाडू मुद्दाम हे नाकारतात व महाग औषधांचा बागुलबुवा उभा केला जातो. कोणी याबाबत खातरजमा करेल काय ?

कुमार१'s picture

16 Aug 2019 - 9:16 pm | कुमार१

कायप्पा मजकूर कधीच गांभीर्याने घेता येत नाही.
संबंधित माहितीचा अधिकृत संदर्भ असल्यासच चर्चा होऊ शकते.