साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली. कुठे इंटरव्यु असेल तर तिथे आपले काय होइल ,नोकरी मिळाली तर आपल्याला झेपेल की नाही याचं प्रचंड मानसिक दडपण येऊ लागले.
अशातच मला एके ठीकाणी नोकरी मिळाली ,पहील्या आठवड्यतच माझ्यावर बरीच जबाबदारी सोपवण्यात आली ,ती पुर्ण करताना प्रचंड घाबरलो होतो.आपल्याला नक्की काय होतेय हे कळत नव्हते.कसाबसा दोन महीने टिकुन राहीलो पण मनावर सतत दडपण असायचे,श्वास लागायचा पॅनिक ॲटेक वगैरे यायला लागले म्हणून नोकरी सोडून सातार्यात परत आलो.स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे अशी घरी थाप मारु घरीच बसून राहीलो.मधे अधे आमच्या शेतावर जायचो.या प्रकारात तीन चार वर्ष घालवली.या काळात प्रचंड निराश असायचो,पण मित्र असायचे त्यामुळे वेळ जायचा.यथावकाश मित्र त्यांच्या नोकरीधंद्यात स्थिर स्थावर झाले, मी मात्र जागेवरच बसून राहीलो ,थिजल्यासारखा,पण विचारचक्र चालू असायचे ,mind clarity चांगली होती.घरचे शेत असल्याने लक्ष घालत होतो.
मित्रांची लग्न कार्ये ,चुलत मावस भावडांची आर्थिक झेप याच्याशी तुलना करत आपल्या आयुष्यात काहीच हॅपनींग नाही,आपण काहीच कामाचे नाही आहोत हा विचार बळावत गेला.something is terribly wrong with me ह्या निर्णयाप्रत आलो(ही चूक होती)
आता काय करायचे?
मग एक दिवस तुळईला गळफास घेण्याचा बालिश प्रयत्न केला.धाडकन खाली कोसळलो ,काही कळतच नव्हते काय होतेय ते!
घरचे धावत आले,बापाने दोन ठेऊन दिल्या ,आईने समजूत काढली की तुला मानसोपचाराची गरज आहे आपण तिकडे जाऊ,घरच्यांनी मग मला सायकीॲट्रीस्टकडे नेले .त्यांनी मला सांगितले की मेंदूमध्ये रासायनिक बदल घडल्याने असे होते.आपण औषधे चालू करुयात मग तू एकदम ठणठणीत बरा होशील,हे साल होते २०१२.ट्रीटमेंट सुरु झाली.तीन प्रकारची औषधे सुरु झाली antidepressants, antipsychotics,benzodiazepines,.पहील्या सहा आठ महीन्यांमध्ये प्रचंड झोप लागण्याशिवाय काही बदल दिसला नाही.मध्यंतरीच्या काळात दोन तीन वर्ष ट्रीटमेंट चालू ठेवली.दिवसभर गुंगीशिवाय काही फरक पडत् नव्हता.वजन ६० किलोवरुन ७५ किलो झाले ,नुसती खाखा सुटलेली असायची.डॉक्टरांना सांगितले तर फरक पडेल, ही औषधे लाँग टर्म घ्यावी लागतात असे उत्तर मिळाले.लाँग टर्म म्हणजे कीती काळ याचं उत्तर मिळत नव्हते.डॉक्टरची फी,अत्यंत महगडी औषधे घरच्यांखातर घेत राहून zombie अवस्थेला पोचलो.सगळ्या इमोशंस ब्लंट झाल्या होत्या,अगदी पोटंट असलेला सेक्श्युल इंटरेस्टही .ट्रीटमेंट आधी ज्या गोष्टीत रस वाटायचा तोही बंद झाला.मग ठरवले इंटरनेटच्या आधारे नक्की आपल्या मेंदूशी काय खेळ चालू आहे ते शोधुन काढुयात.
गुगलला जाऊन psychiatry असा सर्च देऊन पुर्ण व्हायच्या आतच गुगलने psychiatry is a hoax असे सजेशन दिले.त्यावर क्लीक केल्यावर ढीगभर वेबसाईटी ओपन झाल्या .त्यातल्या रिलायबल वाटणार्या बुकमार्क केल्या व अभ्यास सुरु केला.Joanna moncrieff ह्या ब्रिटीश सायकीट्रीस्टचे लेख इंटरेस्टींग वाटले.ते वाचायला घेतले.यावरुन मनोविकारशास्त्र हे drug centred असुन ते disease centred असल्याचे खोटे सांगत कसे रेटून नेले आहे ते समजले.इतर आधुनिक वैद्यकशाखा या disease centred ॲप्रोच वापरतात,म्हणून यशस्वी आहेत. ,सायकीॲटीस्ट्र आणि फार्मासिट्युकल जायंट्सने drug centred असलेल्या या मनोविकारशास्त्राला disease centred असल्याचे भासवून प्रचंड नफा कमावून कीती आयुष्य उध्वस्त केली असतील याची कल्पना न केलेली बरी
https://joannamoncrieff.com/2013/11/21/models-of-drug-action/
.मनोविकारशास्त्राला disease centred असल्याचे सिद्ध करण्यासाठी अगदी पेड रिसर्चही प्रसिद्ध केले जातात.
सायकीॲट्रीचे काही शेंडा बुडखा नसलेले ग्रह आहेत .त्यातला एक आहे नैराश्याच्या बाबतीत .
Serotonin hypothesis of depression -- सायकीॲट्रीनुसार नैराश्य वा डिप्रेशन हे मेंदूमधील सेरोटोनीन नावाच्या neurotransmitter वा संदेशवहनाचे काम करणार्या रसायनाच्या कमतरतेने येते.याला कोणताही आधार नाही .ही चक्क ढगात मारलेली गोळी आहे.मेंदूत कीती सेरोटोनिन आहे हे मुळात मोजताच येत नाही.अशी कोणतीही आधुनिक पद्धत नाही कि ज्याने मेंदूतील सेरोटोनिनची पातळी मोजता येईल.रक्तात कीती सेरोटोनीन आहे हे मोजता येते पण मेंदूत कीती आहे हे मोजता येत नाही.त्यामुळे सेरोटोनीन हाय्पोथिसिस हे एक मिथक आहे.
सेरिटोनिनची मेंदूतील पातळी वाढवण्यासाठी selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI नावाची औषधं दिली जातात.यानुसार मेंदूत पुन्हा शोषले जाणारे सेरोटोनीन थांबवता येते व मेंदूतील सेरोटोनीन ची पातळी वाढते व नैराश्य कमी होते.याला कुठलाही ठोस आधार मिळालेला नाही.सेरोटोनीन ची पातळी वाढत असेलही पण त्याने नैराश्य कमी होते हे सिद्ध झालेले नाही.काही double blind clinical trials मध्ये SSRI व placebo यांचा परिणाम जवळपास सारखाच होता.
Peroxetine नावाचे एक अत्यंत सिडेटिव्ह औषध मला चालू होते ते याच antidepressants प्रकारात येते.माझे वजन वाढायला हे औषध कारणीभूत आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4471964/
Antipsychotics-- मनोभ्रम(Psychosis) ,bipolar disorderआणि छिन्नमनोवस्था(schizophrenia) या रोगांवर antipsychotics दिले जातात.सेरोटोनीन व डोपामाईन या मेंदूतील रसायनांचा ताळमेळ सुधारणे हे या औषधाचे काम मानले जाते.पण याच्या उपयुक्ततेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.रुग्णाला मदत होण्याऐवजी यातून नुकसानच अधिक होते हे लक्षात आले आहे.हे औषध घेतल्याने मेंदूतील उती(tissues)नष्ट होतात व मेंदूचे आकारमान लहान होते.खास करुन विचार करणारा मेंदूचा भाग (prefrontal cortex)ह्रास पावत जातो ,याला brain atrophy म्हणतात.खास करुन मेंदूतील ग्रे मॅटर वॉल्युम कमी होत असल्याचे आढळुण आले आहे.स्कीझोफ्रेनिक जे antipsychotics घेतात त्यांची तुलना औषध न घेणार्या स्कीझोफ्रेनिक पेशंटशी केली असता ,औषध न घेणारा वर्गाचा आजार आटोक्यात असल्याचे दिसून आलेले आहे.त्यामुळे antipsychotics घेणे खुपच धोक्याचे आहे.या औषधामुळे टाईप टू प्रकारचा डायबेटीस होण्याचा धोका अधिक वाढतो.
https://www.theguardian.com/commentisfree/2008/mar/02/mythoftheantipsych...
Benzodiazepines--- ही मायनर ट्रॅंक्युलायझर्स म्हणजे गुंगी आणणारी औषधे आहेत .दोन आठवड्यांनंतर प्रचंड डिपेंडंस येतो.रुग्णाला सतत गुंगीत ठेवणारी औषधे आहेत.यापैकी मला clonazepam नावाचे औषध चालू होते .ज्याची खरे तर काहीच गरज नव्हती.पण gross scientific misconduct चे जे लाखो बळी आहेत त्यापैकी मी एक आहे.
माझ्या अल्पमतीनुसार मी psychiatry नावाच्या आधुनिक वैद्यकशास्त्रातील मिथकाचा बळी ठरलो होतो.एप्रिल २०१७ नंतर मी ट्रीटमेंट थांबवली.पण जो डॅमेज झाला आहे तो न भरुन येणारा आहे.जवळपास लाख दिडलाखाची औषधे खाउन हाती काहीच लागले नाही ,फसवले गेल्याची भावना मनात आहे.जे लोक मनोविकारत्ज्ञाकडे जाण्याचा विचार करत आहेत त्यांना माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा ही भावना ठेऊन हे लिहले आहे.
जो पर्यंत मनोविकारासाठी disease centred ट्रीटमेंट विकसीत होत नाहीत तो पर्यंत मनोरुग्णांची परवड होत राहील.इतर आधुनिक वैद्यकीय शाखांची भ्रष्ट नक्कल करण्याच्या नादात psychiatry ही शाखा बदनाम होत चालली आहे.सध्या पुन्हा ट्रीटमेंट आधीचं व्यक्तीमत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ,जे फार चांगलं होतं असं नाहि पण आजच्या इतकं वाईट नक्कीच नव्हते. या दोन शब्दांचा कुणाला फायदा झाल्यास आनंदी वाटेल.
योग्य ठीकाणी लिंक्स दिल्या आहेत,त्या जरुर वाचाव्यात.विशेषतः Joanna moncrieff यांचे लेखन जरुर वाचावे.
प्रतिक्रिया
29 Nov 2017 - 7:10 pm | गोंधळी
जो पर्यंत मनोविकारासाठी disease centered ट्रीटमेंट विकसीत होत नाहीत तो पर्यंत मनोरुग्णांची परवड होत राहील
ह्या अनुभवातुन मिही गेलो आहे. बहीनीने मला ही मुंबईतील एका नवाजलेल्या सायकीॲट्रीस्टकडे नेले होते.त्या गोळ्यांनी दिवसभर मि गुंगीतच असायचो.चालताना कधी कधी तोलही जायचा.पण काही उपयोग झाला नाही.
नक्की काय समस्या आहे हे कोणालाच सांगता येत नाही. भावनांच्या भुलभुलै मध्ये फसल्यासारखी अवस्था असते.
29 Nov 2017 - 7:13 pm | मराठी कथालेखक
तुमचा हा धागा नक्कीच दखलपात्र आणि चर्चा घडून यावी असा आहे.
मला वैद्यकशास्त्रातले ज्ञान नाही. पण काही गोष्टींशी मी सहमत आहे
१) नैराश्य घालविणार्या औषधांनी गुगी / झोप येत रहाते.
२) वजन वाढते
३) भावनांची तीव्रता कमी होते, भावना बोथट होतात
४) लैंगिक इच्छा / आकर्षण कमी होते.
५) बहूधा हे दुष्परीपरिणाम / नुकसान औषध बंद केल्यावर अगदी १२-१५ वर्षांतही भरुन न येणारे /irreversible आहे असेच मलाही वाटते , किंवा भरुन येण्यासारखे असल्यास ते कसे याबद्दल कल्पना नाही..याबद्दल कुणी मार्गदर्शन केल्यास चांगले होईल.
29 Nov 2017 - 7:32 pm | Ranapratap
मी. पा वरील डॉक्टरांनी या बाबत मार्गदर्शन करावे, खरे साहेब तुमच्या विस्तृत प्रतिसादाची वाट पाहतोय.
29 Nov 2017 - 8:28 pm | SHASHANKPARAB
ही औषधे तुम्ही एप्रिल 17 मध्ये थांबवली, परंतु विचारांत किंवा आत्मविश्वासात काही फरक पडला का?
जास्त खोलात जात नाही, पण तुमची ही अवस्था नकारात्मक स्वसंमोहनामुळे झालेली आहे.. मी हे स्वानुभवाने सांगतो की यावर अगदी साधा असा एक उपाय आहे जो केवळ 7 ते 15 दिवसांत फरक दाखवेल. तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार एका कागदावर उतरवा. मग त्या वाक्यांना अगदी समर्पक अशी सकारात्मक वाक्ये शोधा. त्या सकारात्मक वाक्यांना पाठ करा आणि दिवसभर तोच परिच्छेद मनातल्या मनात बोलत रहा. ही सकारात्मक स्वसंमोहनाची एक खूप सोपी पद्धत आहे. ज्या अदृश्य मनाने तुमच्यातल्या न्यूनगंडाला मोठे केले तेच मन आत्मविश्वासही वाढवू शकते यात शंका नाही..
30 Nov 2017 - 4:25 pm | Nitin Palkar
सकारात्मक स्वसंमोहनाची एक खूप सोपी पद्धत आहे द. पां. खांबेटे यांचे 'स्वयं सूचना' पुस्तकात या विषयी खूप छान माहिती दिली आहे.
30 Nov 2017 - 1:10 am | रुस्तम
माबो वर अक्कलशून्य आणि इथे सिंथेटिक जिनिअस
एवढे सगळे त्रास तुम्हालाच कसे काय होतात?
21 Dec 2017 - 4:25 pm | arunjoshi123
प्रिय रुस्तमजी,
आपण हा प्रतिसाद मागे घ्यावात अशी विनंती.
22 Dec 2017 - 2:10 am | रुस्तम
http://www.drsachinpatkar.com
ह्यांच्या उपचाराने आमचा एक जवळचा नातेवाईक पूर्ण पणे बरा झाला. ह्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत.
30 Nov 2017 - 8:37 am | सुचिता१
गंभीर विशय आहे, जाणकारांनी अधीक माहीती द्यावी .
30 Nov 2017 - 10:05 am | मराठी_माणूस
औषध न घेता समुपदेशन घेतले तर फायदा होतो का ?
30 Nov 2017 - 10:35 am | विनिता००२
मला वाटते, औषधे शारीरीक तंत्र रुळावर आणण्यासाठी दिली जातात. तुम्ही नेमके कोणाकडे गेले माहीत नाही, पण मानसशास्त्राची विद्यार्थीनी म्हणून हे लिहीत आहे.
१९९७ -९८ साली माझ्या वडीलांचे कशाचे तरी दडपण आलेले. त्या काळात मी प्रेंग्नंट होते. माहेरी काय चाललेय, मला काहीच माहीत नव्हते. पहिले बाळंतपण म्हणून माहेरी आले, तर सगळे गाडे घसरलेले! वडील रात्र रात्र झोपायचे नाहीत, सिगरेट ओढत बसायचे. एका ठिकाणी ठेवलेले पैसे काढून दुसरीकडे लपवायचे, कोणाशी बोलायचे नाहीत, एकटेच बडबडायचे. जेवायचे नाहीत. तशात ९ महिने भरलेली मी अशा अवस्थेत वडीलांची ती अवस्था पाहून हादरुनच गेले.
खरे तर आधी मला त्यांना काय होतय ते कळलेच नाही. २ रात्र झोपमोड झाल्याने मी चिडले. मग मला घरातल्यांनी सांगितले, गेले कित्येक दिवस ते असेच वागत आहेत. मी विचारात पडले. कुटुंबाची जबाबदारी वडीलावरच होती, ती त्यांनी खूप व्यवस्थित निभावली होती. त्यांना असे का व्हावे? तशातच एक दिवस त्यांनी खोट्या नोटा आहेत म्हणून खर्या नोटा बंबात जाळल्या. ते कळल्यावर मला लक्षात आले की परिस्थिती हाताबाहेर जाते आहे.
मानसशास्त्र शिकले असल्याने त्यांना त्रास होतोय हे कळले. टेलीफोन डिरेक्टरीतून एका चांगल्या मानसशास्त्रज्ञाचा नंबर शोधून वेळ घेतली. आमचे एक स्नेही गाडी घेवून आले. तेव्हा अक्षरशः वडीलांना धरुन जबरदस्ती गाडीत बसवले.
तिथे सेशन सुरु झाल्यावर वडीलांना झोप लागू लागली आणि ते नॉर्मल झाले.
त्या काळात घरातल्यांनी त्यांना वेडा ठरवण्यात काही कसर ठेवली नव्हती, मी तिथे नसते तर त्यांची अवस्था अजून किती बिकट झाली असती कोण जाणे!
त्यानंतर मात्र परत कधी त्यांना त्रास झाला नाही हे खरे!
1 Dec 2017 - 1:34 pm | चौथा कोनाडा
दुर्दैवी !
अपण आणि आपले कुटुंबिय कोणत्या परिस्थितून गेला आहात, हे लक्षात येते.
वेळीच योग्य उपचार घेवुन संकटातुन बाहेर आलात हे सुदैवच म्हणावे लागेल !
तुम्ही स्वतः मानसशास्त्राशी संबंधीत असल्यामुळे आपले आणखी अनुभव वाचण्यास आवडतील.
1 Dec 2017 - 3:17 pm | विनिता००२
नक्कीच! वेळ मिळेल तसे लिहीन
30 Nov 2017 - 11:06 am | राजाभाउ
विषय आणि केलेला दावा मोठा व गंभीर आहे, जाणाकाराच्या प्रतीक्रियांच्या प्रतिक्षेत.
30 Nov 2017 - 1:26 pm | सुबोध खरे
सिंथेटिक जिनियस
मनोविकार शास्त्र हे मिथक म्हणावे इतकी वाईट परिस्थिती नक्कीच नाही. हे आपले मत किंवा ग्रह आहे. त्याचा आदर आहे.
selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI बद्दल काही लिहण्या अगोदर काही मूलभूत गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
वैद्यकशास्त्रातील बहुसंख्य औषधांची चाचणी हि सुरुवातीला लहान प्राण्यांवर (म्हणजे उंदीर गिनिपिग सारखे) केली जाते. त्यानंतर त्या चाचण्या गुणसूत्रे आणि उत्क्रांती मध्ये माणसाच्या सर्वात जवळ असलेल्या प्राण्यांवर म्हणजे माकडांवर केल्या जातात. या औषधांचा परिणाम आणि दुष्परिणाम काय होतो याची विस्तृत माहिती उपलब्ध झाली कि मग हीच औषधे मानवी स्वयं सेवकांवर वापरली जातात.
मानसिक रोगांच्या आजारावरील औषधांच्या संशोधनातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे मानवी मेंदूचा विकास आणि प्राण्यांच्या मेंदूचा विकासात जमीन अस्मानाचे अंतर आहे. ०-१०० या श्रेणीत माकडाचा मेंदू ५० धरला तर उंदीर गिनिपिग हे तर १०-२० पातळीपर्यंतच येतील. म्हणजेच काय?
जर नैराश्य या आजारासाठी असलेल्या औषधाच्या चाचण्या घ्यायच्या तर पहिल्यांदा उंदीर किंवा गिनीपिग मध्ये तो आजार निर्माण करायला लागेल किंवा नैराश्याने ग्रासलेले उंदीर शोधायला लागतील. मगच त्यांना औषध देऊन त्या औषधाचा आजारावर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. हे काम किती कर्म कठीण आहे ते आपण लक्षात घ्या.
इतर शारीरिक आजारावर असलेली औषधे आणि मानसिक आजारावर असलेली औषधे यात हा एक फार मोठा आणि मूलभूत फरक आहे.
NO ANIMAL MODEL IS AVAILABLE FOR PSYCHO ACTIVE DRUGS
आता दुसरा मुद्दा -- आपण नैराश्याच्या भरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याचा अर्थ आपल्याला झालेला आजार हा खरा होता नुसताच देखावा नव्हता. selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI औषधे घेतल्यामुळे "बहुधा" आपलयाला परत आत्महत्या करावीशी वाटली नाही. लक्षात घ्या कि selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI ने आपले निराशावादी विचार लगेचच्या लगेच नाहीसे होत नाहीत. त्याला एक ते तीन आठवडे वेळ लागतो या काळात आपली आत्महत्येची प्रेरणा/ प्रेरक हेतू (motivation) कमी करणे आवश्यक असते.
तातडीचा उपाय म्हणून खरं तर ECT (electro convulsive therapy) म्हणजे सामान्य माणसांच्या आकलनात शॉक थेरपी वापरली जाते परंतु या सध्या आणि कोणतेही दूरगामी दुष्परिणाम नसणाऱ्या उपायाला सिनेमाने इतके बदनाम आणि भीतीदायक करून ठेवलेले आहे कि सामान्य माणूस शॉक म्हटले कि ताबडतोब त्याला नकारच देतो. तो काही वेडा नाही पासून असले भयंकर उपाय आम्हाला करायचेच नाहीतअशा तर्हेचे नकार सर्रासपणे येतात. यासाठी मग सुरुवातीला सर्व संवेदना बधिर करणे हा एक तातडीचा उपाय म्हणून वापरला जातो. ( हाच उपाय एखाद्या हिंसक झालेल्या उन्मादाच्या(schizophrenia) मनोरुग्णावर वापरला जातो)
selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI हि औषधे १०० % रुग्णांवर गुणकारी ठरतात असा कुणाचाच दावा नाही आणि ज्यांना लागू पडतात त्यांनाही १००% लागू पडतात असेही नाही. पण म्हणून ती औषधे अगदीच निरुपयोगी आहेत असेहि नाही. तसा दावा करणारे अनेक शास्त्रज्ञ आणि मनोविकार तज्ञहि आहेत. साधारण ३० % रुग्णांना हि औषधे उत्तम लागू पडतात. ४० % रुग्णांना मध्यम लागू पडतात आणि उरलेल्या ३० % रुग्णांना ती कमी लागू पडतात किंवा अजिबात लागू पडत नाहीत.
(पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारेही अनेक दिग्गज लोक आणि शास्त्रज्ञ आहेत)https://wiki.tfes.org/Frequently_Asked_Questions
आजही मनोविकारावरील संशोधन हे अतिशय तुटपुंजे आणि बाल्यावस्थेतच आहे( एक कारण वर दिलेले आहेच). त्यातून मानवी मेंदू अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि मानवी मन ( भावना) हा तर अगदीच न समजलेला विषय आहे. एकाच गोष्टीवर मेंदू किंवा मन अनेक विविध तर्हेने विचार करत असतो त्यामुळे एकाच तर्हेच्या विचाराला( उदा. नैराश्यवादी) केवळ बंदी करणे हे आपल्याला वाटते तितके सोपे नाही.
सध्या सरकारी खात्यात आय ए एस चा एक सचिव दारूबंदी यशस्वी कशी होईल यासाठी काम करत असतो आणि त्याच वेळेस अबकारी खात्याचा सचिव शासनाचे "दारूमुळे" उत्पन्न कसे वाढेल यासाठी झटत असतो. तसाच हा प्रकार आहे.
आपल्याला SSRI लागू पडले नाही म्हणून आपण त्याची वाईट बाजू पुढे आणली आहे.
हे म्हणजे अणुबॉम्ब हा युद्ध टाळण्याचा उपाय( किमान खात्रीचा प्रतिबंधक -- minimum credible deterrent) म्हणून वापरात असलेल्या देशात अणुबॉम्बचा कसून विरोध करणारे लोकही आहेतच. कोण १०० % बरोबर आणि कोण चूक हे सांगणे कठीण आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या पुराव्यानुसार SSRI हि औषधे उपयुक्त श्रेणीत मोडली जातील.
https://www.medscape.com/viewarticle/88492
जसे जसे संशोधन पुढे जाईल तशी अधिक गुणकारी आणि दुष्परिणाम नसणारी औषधे शोधली जातील आणि मनोरुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल.
क्रमशः
30 Nov 2017 - 3:24 pm | श्रीगुरुजी
लेख बराच माहितीपूर्ण आहे आणि हा प्रतिसादही उत्तम आहे.
1 Dec 2017 - 11:43 am | पुंबा
+१११
30 Nov 2017 - 9:45 pm | Ranapratap
डॉक्टर आपण माझ्या विनंतीला मान देऊन जो विस्तृत प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले आभार, बरेच गैरसमज दूर झाले.
1 Dec 2017 - 12:15 pm | sagarpdy
https://youtu.be/esPRsT-lmw8
हा डॅनियल अमेन चा टेड टॉक पहिला. तो बराच सेन्स करतो. मानसोपचारतज्ञ अन्य मेडिकल फिल्ड प्रमाणे फार टेस्ट वर अवलंबून नसतात, परिणामी अचूक निदान व उपचार कठीण होत असावा. व्हिडीओ प्रमाणे ब्रेन स्कॅन ही एक उपयुक्त चाचणी ठरू शकते असे वाटते आणि पटते.
1 Dec 2017 - 1:07 pm | सिंथेटिक जिनियस
NO ANIMAL MODEL IS AVAILABLE FOR PSYCHO ACTIVE DRUGS
>>>>
मग ही जी सायकीॲट्रीक ड्र्ग्ज आहेत त्यांच्या क्लीनीकल ट्रायल कशा घेतल्या गेल्या?
माझ्या वाचनानुसार आधी ॲनिमल ट्रायल्स होऊन ती फेज पुर्ण यशस्वी झाल्यावर ह्युमन ट्रायल होतात.लेखात Joanna moncrieff यांचा संदर्भ दिला आहे,त्यांचे psychiatry ही drug centred आहे हे अनुमान आपल्याला मान्य आहे का?
1 Dec 2017 - 6:05 pm | सुबोध खरे
सायकीॲट्रीक ड्र्ग्ज आहेत त्यांच्या क्लीनीकल ट्रायल
बऱ्याच औषधांच्या वैद्यकीय चाचण्या या युद्ध कैद्यांवर (संपूर्णपणे बेकायदेशीरपणे आणि मानवते विरुद्ध) घेतल्या गेल्या होत्या. बाकी अनेक ऑषधांच्या चांगल्या आणि वाईट परिणामानंतर लक्षात आलेल्या गोष्टींवरून तशी लक्षणे असणाऱ्या रोग्यांवर हि औषधे वापरून पहिली गेली आणि अशा तुकड्यातुकड्यातूनच मनोविकार शास्त्र पुढे गेले.
अर्थात आता फंक्शनल एम आर आय (f-MRI) आणि पेट सिटी(PET- CT) या अतिशय उपयुक्त अशा चाचणी पद्धती उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे जिवंत रुग्णाच्या मेंदूतील प्रत्यक्ष होत असलेल्या बऱ्यचशा घडामोडींबद्दल थोडीफार का होईना माहिती उपलब्ध होत आहे. मानवी मन आणि भावना या गोष्टींचा मेंदूतील कोणत्या केंद्रांशी आणि कसा संबंध आहे याचे गूढ आता हळू हळू उकलू लागले आहे
या चाचण्या जशा जशा पुढे जातील आणि अधिक अधिक माहिती उपलब्ध होईल तसे तसे मनोविकारशास्त्र अधिक प्रगत होत जाईल.
उदाहरणादाखल नैराश्य या रोगाबद्दलचा एक अभ्यास याबद्दल चा दुवा देत आहे. क्लिष्ट आहे पण वाचून पहा. https://www.ucl.ac.uk/pals/research/experimental-psychology/blog/fmri-vi...
1 Dec 2017 - 6:10 pm | सुबोध खरे
https://www.scientificamerican.com/article/brain-imaging-identifies-diff...
हा दुवा वाचून पहा जास्त सोप्या शब्दात आहे.
1 Dec 2017 - 7:31 pm | चौथा कोनाडा
डॉ खरे साहेब, आपल्या सविस्तर माहिती व धाग्याबद्दल मनापासून धन्यवाद !
आपल्या मुळे बऱ्याच शंकाचे निरसन होत आहे.
आपण वेळोवेळी मार्गदर्शन व चर्चा करता त्याचा आम्हा मिपाकरांना फायदा होतो.
2 Dec 2017 - 12:16 pm | मराठी_माणूस
म्हणजे आता कदाचीत घेतल्या जात नसतील असे वाटते आणि ती चांगलीच गोष्ट आहे.
मग सध्या जी औषधे अशा विकारावर दीली जातात त्यांच्या चाचण्या होतात का नाही ?
2 Dec 2017 - 12:22 pm | सुबोध खरे
सध्या अशा चाचण्यांसाठी मानवी स्वयंसेवकांचा उपयोग केला जातो. ज्याबद्दल त्यांना योग्य असा मोबदला पण मिळतो.
https://www.centerwatch.com/clinical-trials/volunteering.aspx
17 Dec 2017 - 2:15 pm | मारवा
selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI हि औषधे १०० % रुग्णांवर गुणकारी ठरतात असा कुणाचाच दावा नाही आणि ज्यांना लागू पडतात त्यांनाही १००% लागू पडतात असेही नाही. पण म्हणून ती औषधे अगदीच निरुपयोगी आहेत असेहि नाही. तसा दावा करणारे अनेक शास्त्रज्ञ आणि मनोविकार तज्ञहि आहेत. साधारण ३० % रुग्णांना हि औषधे उत्तम लागू पडतात. ४० % रुग्णांना मध्यम लागू पडतात आणि उरलेल्या ३० % रुग्णांना ती कमी लागू पडतात किंवा अजिबात लागू पडत नाहीत.
याचा संदर्भ नेटवर वाचायल मिळेल का ?
दुसरं ज्यांना लागु पडतात त्यांनी ही SSRI औषधे जरी चांगली असली लागु पडली तरी जर सलग ३-४ वर्षे नियमीत घेतल्यास त्याचा काय परीणाम होतो ?
हे म्हणजे या औषधांच्या दिर्घकाळ सेवणाचा काय साइड इफेक्ट होतो ? डिपेन्डन्स होतो का कायम स्वरुपी ? सोडता येणे शक्य होते का ?
या विषयी अधिक माहीती दिल्यास आनंद होइल. वा संदर्भ नेट वर असल्यास कृपया दयावा
30 Nov 2017 - 9:49 pm | शाम भागवत
सत्गुरू वामनराव पैंची विश्वप्रार्थना खूप उपयोगी पडते. मनातले विचार सकारात्मक करण्याची शक्यता खूपच वाढते. मी आजही एखाद्या त्रासदायक गोष्टींच्या आठवणींमुळे नकारात्मक विचार येऊ लागले तर शांतपणे बसून विश्वप्रार्थना म्हणतो. मन खूप शांत होते. माझ्या प्रगतीत नामस्मरणाबरोबरच या विश्वप्रार्थनेचा खूप मोठा वाटा आहे.
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे माझा त्यावर विश्वास आहे. पण यावर विश्वास न ठेवण्याचा अधिकार इतरांनाही आहे याची मला जाणिव आहे. मी फक्त पूज्य पै यांची २७-२८ पुस्तके व २६ सिडीचा अभ्यास २००७-२००८ मधे करत होतो. त्या आधारावर हे लिहिलेले आहे. बाकी माझा जिवनविद्या मिशनशी कोणताही संबंध नाही.
1 Dec 2017 - 11:42 am | पुंबा
विश्वप्रार्थना खरोखर फार सुंदर आहे.
वामनराव पैंची पुस्तके, भाषणे देखिल फार छान आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन लिहिलेली, अगदी घरगुती, प्रापंचिक समस्या डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेली आणि कुठल्याही अंधश्रद्धा, कर्मकांडाला बळ न देणारी.
2 Dec 2017 - 2:17 pm | सस्नेह
सिंजि यांच्याशी बऱ्याच अंशी सहमत. यासारखाच अनुभव एका जवळच्या नातेवाईकास आलेला पाहिला आहे.
उन्मादाचा झटका आल्यास गुंगीचे बधिरतेचे औषध देणे योग्य असेल, पण नैराश्य, उदासीनता, जडपणा यावर हीच औषधे देणे खरोखर योग्य आहे काय ? यावर नक्कीच इतर काही उपचार असायला हवेत.
तसेच तीच तीच औषधे अनेक वर्षे घेणे आवश्यक आणि योग्य आहे काय ? मानसोपचार तज्ञ सुरुवातीस दोन ते तीन वर्षे सांगतात, परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे मनोरुग्णास तीच गुंगीची आणि बधिरतेची औषधे दिली जातात, ज्यांचा परिणाम म्हणून रुग्ण कदाचित बरे होत असतील, पण त्यांच्या आयुष्यात भाव-भावना, विचारशक्ती उस्फूर्तता याचा लवलेश शिल्लक राहत नाही आणि ते मानसिकरित्या मृतप्राय होतात, असे निरीक्षण आहे.
12 Dec 2017 - 9:39 pm | पैसा
मुख्य कारण म्हणजे नेमका काय आजार आहे हे डॉक्टरही खात्रीने सांगू शकत नाहीत. सगळ्या आजारांवर एकसारखी औषधे देत रहात
जवळच्या माणसात 2 डिप्रेशन, anxiety यांचे आजार आणि उपचार जवळून पाहिले आहेत. हे उपचार चक्रव्यूहासारखे वाटतात. कधी आणि कसे बाहेर पडता येईल याचा पत्ता लागत नाही.
मनोरोग तज्ञ अतिशय कमी असल्याने असेल त्याला धरून राहण्याशिवाय पर्याय नसतो. एक डॉक्टर पाहिले ते दर आठवडयाला २/३ दिवस कुठे ना कुठे काँफेरेन्सला गेलेले असतात. उरलेल्या दिवसात दिवसाला २०० २५० रुग्णांना consulting करतात. सरासरी २ ३ मिनिटात patient ला कसे judge करतात देव जाणे. रुग्ण फार अस्वस्थ झाला तर त्यांची समुपदेशक फोनवरून "अमकी गोळी जास्त द्या" म्हणून सांगतात. मुळात समुपदेशकाने गोळ्या सांगणे गैर आहे. त्यात जर "ती गोळी पार्किन्सन सिन्ड्रोमसाठी माझी आई घेते, त्या गोळीने anxiety कशी कमी होईल"असे विचारले तर "आम्ही सांगतो म्हणून घ्या, शांत करणारी आहे. आम्ही हजारो रुग्ण बरे केलेत, तुम्ही एकच रुग्ण बघताय. इंटरनेट वर जास्त वाचू नका" असले काहीतरी ऐकावे लागते.
गोळ्यांचे side इफेक्ट आजारासारखेच असतील तर ती औषधे नेमका काय परिणाम करतात देवजाणे!
एका patientला severe डिप्रेशनसाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केल्याच्या दुसऱ्या दिवशी तो आवाज ऐकू येतात म्हणत चित्रविचित्र ट्विट्स करू लागला. डोक्यात काय तरी विचित्र व्हायला लागल्याने खूप अस्वस्थ वाटल्यावर जीव द्यावासा वाटतो म्हणू लागला. हे सगळे गोळ्या सुरू केल्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू झाले. मग असाच महिनाभर गेल्यावर यांच्यात स्किझोफ्रेनिया ची लक्षणे दिसत आहेत म्हणून अजून गोळ्या सुरू करायला डॉक्टर मोकळे. पण मग ट्रीटमेंट अचानक थांबवताही येत नाही असा पेच.
बरं सगळी लक्षणं वगैरे इतके व्हेग असते की तिसरा माणूस काही बोलूच शकत नाही. स्वतः डॉक्टर ठाम नसतात तर सामान्य नातेवाईकांची काय कथा!
13 Dec 2017 - 9:52 am | नमकिन
चित्रपट हा छान होता.
मनोविकार निर्माण झाला असून तो लवकरच ओळखला जातो असे नाही.
मनोविकास करण्यास औषधे नसावी तर परिस्थिती पहाण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल व तसे संस्कार/प्रयत्न केले तर सुधारणा होईल, असं वाटतं.
14 Dec 2017 - 6:59 pm | चित्रगुप्त
कसलं डोंबलाचं disease centered घेऊन बसलायस सिन्थेटिका, पाश्चात्त्य वैद्यकाचं नावच मुळात 'मेडिसिन' असं आहे, यातच सगळं आलं. मोठमोठ्या औषध कंपन्यांच्या हातात आहेत सगळ्या किल्ल्या.
बाकी लेख बरीक प्रांजळ लिहिलास रे जिनियसा. 'तारे जमीं पर' सारखी जी मुलं असतात, त्यांच्यासाठी खरंतर अगदी वेगळ्या शाळा-कॉलेजं असायला हवीत.
--बाईसाहेब फुरसुंगीकर.
20 Dec 2017 - 12:10 pm | रंगीला रतन
लेखाशी बर्यापैकी सहमत. मी पण ३ जणांना मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेताना बघितले आहे. त्या पैकि दोन ड्र्ग अॅडीक्ट होते, तर एक दहावितला विद्यार्थि होता. पहिला रुग्ण अंमली पदार्थांचे अतिरेकी सेवन करायचा, दिवस भर चरस किंवा गांजा तर कधी दोन्ही पदार्थ एकत्र करुन (त्याला चरसी लोकं गंगा जमुना कि असच कहितरि म्हणतात.) भरलेल्या चिलमी ओढायचा, त्यात मधे मधे दारु, ती सुद्धा भरलेल्या ग्लास मध्ये कुठल्या तरी गोळ्या टाकुन प्यायचा, जोडीला सिगरेट, बीडी ओढणे चालु असायचे, भांगेच्या गोळ्या खायचा. ह्या सर्व अतिरेकाचा व्हायचा तो परिणाम झालाच, त्याचे मानसीक संतुलन खुपच बिघडले. दिवसातुन १५ ते २० वेळा अंघोळच काय करायचा, नग्न अवस्थेत घराबाहेर पडायचा. एकदा त्याने पहाटे दुधवाल्याचा गळा दाबुन धरला होता, त्या दुधवाल्याचे दैव बलवत्तर म्हणुन वरच्या मजल्यावर रहाणारा एक मनुष्य कामावर जाण्यासाठि खाली उतरत होता, त्याने हस्तक्षेप करुन त्याला सोडवले, नाहीतर अनर्थ घडला असता. वास्तविक हि व्यक्ति शिक्षणाने सिव्हिल इंजीनिअर (काँक्रीट एक्सपर्ट), उत्तम सांपत्तीकस्थिती असलेल्या कुटुंबातलि होति. परन्तु दुधवाल्याच्या प्रकरणानंतर त्याला मानसोपचार तज्ञाक्डे नेण्यात आले.(त्या आधी ३ वेळा व्यसनमुक्ति केंन्द्राच्या वार्या झालेल्या होत्या.) पहिले आठ दिवस त्याला कुठलीतरी इंजेक्शनस देउन फक्त झोपवुन ठेवण्यात आले होते. नंतर अनेक प्रकारच्या गोळ्या सुमारे २ वर्षे सुरु होत्या. आता तो कधितरी एखादी बिअर वगैरे पितो पण बाकी व्यसनांपासुन लांब आहे. परंतु आजही म्हणजे उपचार सुरु करुन ५ वर्षानंतरही त्या महागड्या गोळ्या मात्र सुरुच आहेत, आणि त्या बंद करण्याचि त्याचि बिल्कुल तयारी नाहिये. कारण त्याचा असा पक्का समज झाला आहे कि जर मी ह्या गोळ्या घेणे थांबवले तर पुन्हा मी अंमली पदर्थांच्या आहारी जाईन. ह्यावरुन मला तरि असे वाटते कि त्याला हि एक प्रकारचि डीपेंडन्सी आलेलि आहे.
दुसरी व्यक्ति हि उच्चमध्यमवर्गातला एक फर्स्ट ईयर बी.एस.सी चा विद्यार्थि होता. आई वडीलांच्या जागरुकते मुळे अगदी सुरुवातिलाच त्याचे अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रकार लक्षात आले. मग पुण्याला सातारा रोड वर त्यांच्या घराजवळच असलेल्या एका (तथाकथीत) नामांकीत फॉरीन रीटर्न मानसोपचार तज्ञाकडे उपचार सुरु केले. ४० ते ५० हजार रुपये खर्चुन मेंदुच्या कुठ्ल्या कुठ्ल्या टेस्ट्स करण्यात आल्या, मग महीन्याला ३० हजार रुपयांची औषधे सुरु झाली. त्यात काही गोळ्या व शुगर क्युब्स वर २ थेंब टाकुन सेवन करण्याचे ड्रॉप्स यांचा समावेश होता. सुमारे ८ ते १० महीने हि ट्रीट्मेंट चालु होति. कॉलेज, प्रॅक्टीकल्स आणि क्लास च्या वेळा सांभाळताना ड्रॉप्स घ्यायच्या वेळा चुकल्या तर त्याला खुप बेचैनी यायचि, चीडचीड व्हायचि. त्यात एकेदिवशि त्याने दुपारचे ड्रॉप्स घेणे चुकले म्हणुन रात्री डबल डोस घेतला तर थोड्यावेळाने त्याला फीट आल्यासारखे झाले म्हणुन हॉस्पिटल मध्ये दाखल केले. संपुर्ण पार्श्वभुमी समजुन घेतल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी दुसर्या दिवशी सकाळी न्युरोलॉजिस्टना बोलावले. त्यांनी त्याची डी-अॅडीक्शन साठि सुरु असलेली सर्व औषधे मागवुन तपासली व एका अॅडीक्शन पासुन मुक्ति मिळवण्यासाठि दुसर्या ड्र्ग्स ची डीपेंडन्सी वाढवणारी ती औषधे घेणे ताबडतोब थांबवण्यास सांगीतले.
तिसरी व्यक्ति ही मध्यमवर्गिय परिवारातला दहावितला विद्यार्थि होता. त्याला मानसोपचार तज्ञाकडे नेण्याचे कारण थोडे वेगळे होते. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्ह्ते आणि तो १५ वर्षांचा झाला तरी रात्री झोपेत अंथरुणात लघवी करत होता. त्याच्याहि मेंदुच्या काही टेस्ट्स केल्या व ६ महिन्यांचा औषधांचा कोर्स करायला सांगितला.जवळपास लाख सव्वा लाख रुपये खर्च करुन सुद्धा आज २ वर्षांनंतरही त्याच्यात किंचीतही सुधारणा झालेली नाहिये.
21 Dec 2017 - 6:37 pm | सुबोध खरे
रंगीला रतन
एका अॅडीक्शन पासुन मुक्ति मिळवण्यासाठि दुसर्या ड्र्ग्स ची डीपेंडन्सी वाढवणारी ती औषधे घेणे ताबडतोब थांबवण्यास सांगीतले.
हा रुग्ण पूर्णपणे औषधापासून मुक्त झाला कि त्याला औषधे बदलून दिली गेली.
बहुतांश वेळेस बाहेर फक्त अर्धसत्य येते आणि त्यामुळे गैरसमज वाढीस लागतात.
हे आपल्याला वैयक्तिक स्वरूपात लिहिलेले नाही कृपया गैरसमज नसावा.
4 Jan 2018 - 11:01 am | रंगीला रतन
हा रुग्ण पूर्णपणे औषधापासून मुक्त झाला कि त्याला औषधे बदलून दिली गेली.
न्युरोलॉजिस्ट नी त्याला एक वर्षासाठि औषधे बदलुन दिली. पण हि नविन औषधे कुठ्ल्याहि मेडिकल स्टोर मध्ये मिळ्तात, पुर्वीच्या औषधांप्रमाणे फक्त त्याच संस्थेतुन घ्यावी लागत नाहियेत.
20 Dec 2017 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे
सायकियाट्रिस्ट मधे दोन पंथ आहे एकाचा भर औषधांवर असतो. दुसरा सायकोथेरपी वर अधिक भर देतो. पण ते एकमेकांवर टीका करत नाहीत. सायकियाट्रिस्ट ही माणसेच आहेत त्यामुळे गुणदोष त्यांच्यात ही आहेत. तितकीशी गरज नसताना औषधे देउन रुग्णाला आपल्या कह्यात ठेवणारी धंदेवाईक मानसिकता ही त्यांच्यातही आढळू शकते. पण रुग्ण हे कसे ठरवणार?
20 Dec 2017 - 1:42 pm | पैसा
पण निव्वळ सायकोथेरपीनेही बरे वाटत असेल तर दुष्परिणाम करणारी औषधे हट्टाने का देतात? एका लिंकवर वाचले की भारतात स्किझोफ्रेनियाचा एक एपिसोड होउन गेल्यावर पेशंट रिलॅप्स होण्याचे प्रमाण कमी आहे, लोक इतर समांतर औषध पद्धती योग, आयुर्वेद इत्यादिवर भर देतात. तर अमेरिकेत पेशंट रिलॅप्स होण्याचे प्रमाण जास्त आहे. तिकडे निव्वळ अॅलोपथिक औषधे सतत घेत रहातात. काय खरे न काय खोटे. पुरावे तर दोन्ही प्रकारचे म्हणणे असणार्याना मिळतातच.
21 Dec 2017 - 10:38 am | प्रकाश घाटपांडे
तज्ञांमधेच मतभेद आहेत त्यामुळे रुग्णाला काय कळणार? उगाच 'रिस्क' नको म्हणून औषधे घेत रहा. जशी बीपी डायबेटीस ची असतात तशी
21 Dec 2017 - 4:38 pm | arunjoshi123
डियर सिंथेटिक जिनिअस,
आपण पुनश्च लाईफ मधे सेटल झालेले आहात त्याबद्दल अभिनंदन. झाल्या गोष्टी विसरून जा. आणि शक्यतो पब्लिक फोरममधे सांगू नकात कारण संवेदनशील विषय आहे.
================
बाकी मानसिक आजारांत उपचार आवश्यक असतात. तेव्हा या शाखेला खारिज करण्यापूर्वी रुग्ण कसा ओळखावा, रोग कसा ओळखावा, कसा दुरुस्त करावा, रुग्णाशी कसे वागावे, इ इ सांगणे आवश्यक आहे.
===================
सुबोधजींचे प्रतिसाद अतिशय उत्तम. काही टक्के लोकांना उपचार लागू होत नाहीत ही उणिव आहे खरी, पण जी उपयुक्तता आहे ती कमी नाही.
21 Dec 2017 - 6:33 pm | सुबोध खरे
येथे आलेले बरेच प्रतिसाद हे गैरसमजातून आलेले किंवा पूर्वग्रहदूषित आहेत.
१) सायकियाट्रिस्ट मधे दोन पंथ आहे एकाचा भर औषधांवर असतो. दुसरा सायकोथेरपी वर अधिक भर देतो.
मनोविकारात जेंव्हा रुग्णाला आपल्या आजाराची कल्पना आहे (INSIGHT) उदा. नैराश्य (DEPRESSION) ,मंत्रचळेपणा( OCD ) किंवा मादक द्रव्यांचे व्यसन. अशा रुग्णांना सायकोथेरपी देऊन फायदा होऊ शकतो. पण ज्या रुग्णाला अशी कल्पनाच नाही. उदा. उन्माद(SCHIZOPHRENIA) येथे जर रुग्णाला आपण बादशहा आहोत असे वाटत असेल कारण भ्रम (DELUSION - false but unshakable belief) किंवा आभास (halucination) होत असेल तर त्याच्या दृष्टीने ते सत्यच असते तेंव्हा त्याला समजावून सायकोथेरपी देऊन काहीच उपयोग होत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Raman_Raghav
ज्यांना रस असेल त्यानि वरील सिंधी दलवाई उर्फ रामन राघव ची केस वाचून पहा
२) बहुतांश मनोविकाराबाबत गैरसमज जास्त आहेत.त्यामुळे एखादा माणूस विक्षिप्त आहे किंवा तर्हेवाईक आहे म्हणून दुर्लक्ष केले जाते. यामुळे आपल्याकडे मनोविकार तज्ज्ञांची मदत घेईपर्यन्त रोग बराच पुढे गेलेला असतो. शिवाय त्याबद्दल असलेला एक कलंक म्हणून सहजासहजी लोक मनोविकार तज्ज्ञाकडे जाण्याचे टाळतात. कारण उदा. लग्नाच्या बाजारात रुग्ण मनोविकार तज्ज्ञाकडे जात आहे हे उघड करणे कठीण जाते. (बहुसंख्य मनोविकार हे तरुण वयातच होतात.) त्यातून अशिक्षित लोकांत हे "बाहेरचं" आहे म्हणून झाडफूक वाल्यांची मदत घेतली जाते. असे सगळे रुग्ण प्रत्यक्ष इलाजासाठी मनोविकार तज्ज्ञांकडे येतात तोवर बराच उशीर झालेला असतो.
३) सगळेच मनोविकार हे पूर्णपणे बरे होतातच असे नाही पण बहुसंख्य रुग्णांची लांब कालपर्यंत औषध घेण्याची तयारी किंवा वृत्ती नसते. जसे शारीरिक आजारात उदा. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे आजार बरे होत नाहीत तर त्यावरील औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. परंतु आपण मनोविकार तज्ज्ञांकडे जातो हे लोकांना सांगण्याची लाज वाटते, संकोच वाटत,, समाजातून अलग पडू याची भीती असते. यामुळे रोग जरा आटोक्यात आला कि उपचार सोडून देण्याची वृत्ती ९० % रुग्णात आढळते. यामुळे रोग जुनाट स्थितीत जातो. मनोविकारात सुद्धा रुग्णाला तज्ज्ञाकडे बराच काळ जाणे आवश्यक असते त्याप्रमाणे त्याची औषधे कमी जास्त करत करत हि कमीत कमी पण परिणामकारक (minimum effective dose) मात्रेत आणणे शक्य असते. असे न केल्याने जेवढा पाहिजे तेवढा सुपरिणाम मिळत नाही हि वस्तुस्थिती.
४) अमली पदार्थाचे व्यसन असलेली व्यक्ती जेंव्हा व्यसनमुक्तीसाठी मनोविकार तज्ज्ञाकडे भरती होतो तेंव्हा त्याचे व्यसन असलेला पदार्थ थांबवला जातो या पदार्थावर हा माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अवलंबित(डिपेन्डेन्स) झालेला असतो. हा पदार्थ एकदम काढून घेतला कि रुग्णाला भयंकर शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसू लागतात. उदा गर्द / हेरॉईनचे व्यसन असलेल्या माणसाला ओकाऱ्या आणि जुलाब सुरु होतात डोळ्यातून, नाकातून पाणी वाहू लागते. पोटात प्रचंड मुरडा होतो.(याला टर्की म्हणतात. गर्दुल्ल्याना पोलीस सुद्धा अटक करत नाहीत कारण कितीही मारहाण केली तरी हा रुग्ण हतबल असतो आणि कोठडीतील घाण पोलिसांनाच साफ करावी लागते). टर्कीतून सुटका मिळवण्यासाठी रुग्ण काहीही करू शकतो. ज्यात एखाद्याला गुन्हा करण्यास भाग पाड्ता येते किंवा याच्या आहारी गेलेल्या उच्चभरू स्त्रिया केवळ पुढचा "डोस" मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यास तयार झाल्याची उदाहरणे आहेत.
हे रुग्ण नैराश्य(depression) वैफल्य (frustration) यामुळे हिंसक सुद्धा होऊ शकतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्यामुळे या अमली पदार्थाचा परिणाम कमी होईस्तोवर रुग्णाला शांत ठेवावे लागते. एकदा रुग्णाला तुम्ही शांत होणारी औषधे दिली ( tranquilizers ) कि तो प्रचंड झोपतो कारण त्याच्या शरीराची झालेली हानी भरून काढण्याचा शरीर प्रयत्न करीत असते. ( झोपवायचेच होते तर घरी झोपवले असते अशी दूषणे १०० टक्के मनोविकार तज्ज्ञांनी ऐकलेली असतात). त्यातून व्यसनातून संपूर्ण मुक्ती मिळण्याचे प्रमाण खूप जास्त नाही आणि बरेच रुग्ण परत व्यसनाधीन होतात.
एक अमेरिकेतील स्थिती दाखवणारा दुवा
https://www.therecoveryvillage.com/recovery-blog/drug-rehab-success-rates/
Inpatient treatment costs $3,200 on average. 73% of addicts complete treatment and 21% remain sober after five years.
Residential treatment costs $3,100 on average. 51% of addicts complete treatment and 21% remain sober after five years.
Detox costs $2,200 on average. 33% of addicts complete treatment and 17% remain sober after five years.
Outpatient drug-free treatments cost $1,200 on average. 43% of addicts complete treatment and 18% remain sober after five years.
मनोविकाराबाबत आणि मनोविकार तज्ञांबाबत आपल्या समाजात भरपूर पूर्वग्रह आहेत. हे आजार म्हणजे एक कलंक समजला जातो . त्यामुळे बरेचसे रुग्ण परत परत मनोविकार तज्ज्ञांकडे जाणे टाळतात. ज्यायोगे आजाराचा नुकताच पुनरुद्भव सुरु झाला असेल तेंव्हाच त्यारुग्णाच्या मानसिक स्थितीतील बदल इतरांना लक्षात यायच्या अगोदर तो नियंत्रणात आणला जात नाही आणि हे दुष्टचक्र चालूच राहते.
21 Dec 2017 - 6:59 pm | सुबोध खरे
मनोविकाराबाबत असणारे पूर्वग्रह आणि सामाजिक कलंक किंवा लांच्छन असल्यामुळे पूर्ण पणे बरे झालेले मनोरुग्ण समाजात आपल्याला मनोविकार होता हे उजळ माथ्याने सांगत नाहीत.
हृदयाची बायपास झालेला माणूस जसा न विचारता सुद्धा तुम्हाला आपली कहाणी सांगतो आणि छातीवरील व्रण योध्दयाच्या आवेशकत दाखवतो तसे मनोरुग्णांच्या बाबतीत कधीच होत नाही. यामुळे बरे झालेले रुग्ण गुलदस्त्यात राहतात आणि बरे न झालेल्या ( कोणत्याही कारणामुळे) रुग्णांच्या "सुरस आणि चमत्कारिक" गाथा ऐकायला मिळतात.
मनोविकार विभागात काम करून झाल्यावर एक वर्षांनी मी एका पार्टीस गेलो असताना एक मनोरुग्ण भेटला माझ्याशी त्याने छान हसून भरपूर गप्पा मारल्या. एवढ्यात आमचे मनोविकार तज्ञ कर्नल पेठे तेथे आले तर याने त्यांना नुसता सलाम केला आणि पुढे गेला. याच्या अशा वागणुकीमुळे मला आतमध्ये कुठेतरी दुखावल्यासारखे वाटले कारण या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्याचा सरानी दोन वर्षे इलाज केला होता. मी पेठे सरांशी बोललो तर ते म्हणाले अरे तू उगाच मनाला लावून घेऊ नको. हे लोक मला सार्वजनिक जीवनात ओळख देणारच नाहीत पण मी जर काही कामासाठी त्याच्या कडे गेलो तर माझे काम मात्र प्राधान्याने करतील. मी जेंव्हा मनोविकार शास्त्रात एम डी करण्याचे ठरवले तेंव्हा हि गोष्ट गृहीत धरली होती. आपण मनोविकार तज्ज्ञाकडे इलाज घेत होतो हे त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेस बाधा आणणारे ठरेल. हा अधिकारी नौदलाचा जनसंपर्क अधिकारी होता आणि त्याचा आजार जवळ जवळ आत्महत्ये पर्यंत गेला होता. अशा स्थितीतून बाहेर आलेला रुग्ण किती व्यवस्थित काम करू शकतो याचे हे एक उदाहरण आहे .
याचा अर्थ एवढाच आहे बहुसंख्य मनोरुग्ण जे बरे होतात ते आपल्याला दिसत नाहीत आणि जे बरे होत नाहीत त्यांच्या कहाण्या ऐकायला मिळतात.
यात वैयक्तिक आलेल्या वाईट अनुभवाबद्दल कोणतेही समर्थन मी देत नाही. मनोविकार शास्त्र हे परिपूर्ण आहे असे कोणीच म्हणत नाही
किंबहुना आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हे शास्त्र सर्वात कमी विकसित आहे असेच म्हणावे लागेल.
सर्व मनोविकार तज्ञ चांगलेच असतात असाही माझा दावा नाही.
पण वस्तुस्थितीचा दुसरा पैलू सुद्धा पुढे यावा आणि काही अंशी तरी गैरसमज दूर व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
22 Dec 2017 - 12:00 pm | arunjoshi123
माहीतीपूर्ण प्रतिसाद.
22 Dec 2017 - 12:59 pm | मराठी_माणूस
औषधे न घेता समुपदेशन च्या साह्याने विकार बरे केले जाउ शकतात का ? कींवा कोणते विकार समुपदेशांनी आटोक्यात आणता येतात आणि कोणत्या विकारांना औषधे अत्यावश्यक आहेत ?
4 Jan 2018 - 11:31 am | प्राची अश्विनी
पटले.
27 Dec 2017 - 4:47 pm | तुडतुडी
अगदी बरोबर आहे . आमच्या घरात सुद्धा हा प्रकार घडलेला आहे . Psychatrist एक गोळी झोप येण्यासाठी देतात . १ गोळी झोप उतरण्यासाठी .मेंदूला झोपवूनच ठेवले जाते . निव्वळ फसवाफसवी
1 Jan 2018 - 5:30 pm | अँड. हरिदास उंबरकर
लेख आणि प्रतिसाद वाचून ज्ञानात मोठी भर पडली.. या विषयावरील अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.