राम राम मंडळी,
ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की,
१) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय?
२) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात? आणि तो व्यक्त करण्याची माध्यमं जरी वेगवेगळी असली (भाषण/वक्तव्य आणि गाणं!) तरीही त्यात काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?
'वा! काय सुंदर विचार मांडले आहेत!' असं आपण एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण ऐकून अगदी सहजच म्हणतो, त्याचप्रमाणे अभिजात संगीताच्या क्षेत्रात देखील 'किशोरीताईंचा ख्याल ना?, वा! ताई काय सुंदर आणि वेगळेच विचार मांडतात!' असंही आपण म्हणतो.
लोकगीत, भावगीत, नाट्यगीत इत्यादी गायनप्रकार जेवढ्या प्रमाणात ऐकले जातात त्या तुलनेत ख्यालगायन ऐकलं जात नाही असं माझं निरिक्षण आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की हा लेख वाचणारा प्रत्येकच वाचक काही ख्यालगायन ऐकणारा असेल असे नाही. परंतु प्रत्यक्ष जरी कधी मैफलीत बसून ख्यालगायन ऐकले नसले आपल्यापैकी अनेकांच्या कानांवरून 'ख्यालगायन' हा शब्द निश्चितच गेला असावा!
तर मंडळी, 'वक्तृत्वातील ख्याल' आंणि गायनातील ख्याल' यात काय साम्य आहे (बरचंसं साम्यच आहे,) आणि काय फरक आहे हे या लेखातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे मी 'वक्ता' म्हणजे 'उत्तम वक्ता' (जो दहा हजारात एक असतो असं काहीसं संस्कृत मध्ये म्हणतात तसा!) आणि ख्यालगायक म्हणजे 'उत्तम ख्यालगायक' हे गृहीत धरूनच लिहिणार आहे एवढं आपण कृपया लक्षात घ्या. मला सर्वच नसली, तरी उत्तम वक्त्याची आणि उत्तम ख्यालगायकाची काही लक्षणे माहिती आहेत, त्याचाच आधार मी घेणार आहे.
एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा 'शब्द' हे त्याचं माध्यम असतं. मैफलीमध्ये एखादा वक्ता जेव्हा गात असतो तेव्हा अर्थातच 'सूर' किंवा 'स्वर' हे त्याचं माध्यम असतं. इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्या की शब्द हे सगुणरूप घेऊन श्रोत्यांपुढे येतात तर ख्यालगायनातल्या आलापीचे, लयकारीचे, तानेतले, मंद्र-मध्य-तार सप्तकातले स्वर हे निर्गुणरुपी असतात! ते श्रोत्याला समजून घ्यावे लागतात, जाणून घ्यावे लागतात आणि जरी समजले/जाणता आले नाहीत तरी ते त्याच्या काळजाला भिडावे लागतात! परंतु श्रोता जर जाणकार आणि बहुश्रुत असेल तर त्याला श्रवणाचा आनंद तर मिळेलच परंतु समोरचा गवई काय गातो आहे, कसं गातो आहे हेही तो डोळसपणे पाहू शकेल, गायकीवर काही भाष्यही करू शकेल. परंतु दोन्हीही क्षेत्रात शब्द आणि स्वर ह्यांनाच अनन्यसाधारण महत्व आहे हे निर्विवाद!
मग आता वक्त्याचा शब्द आणि गवयाचा स्वर (वर म्हटल्याप्रमाणे मला येथे अभिजात ख्यालगायन अपेक्षित आहे, ज्यात निर्गुणी स्वरांचं साम्राज्य अधिक असतं.भावगीत नव्हे, ज्यात स्वरांसोबतच शब्दांचंही प्राबल्य असतं आणि जे बरचसं सगुणरूप असतं!) यांनाच जर सर्वाधिक महत्व असेल तर मग उत्तम शब्द आणि उत्तम स्वर यांचे निकष काय? अहो एखाद्या उत्तम गवयाचं गाणं जसं काळजाला भिडतं तसंच एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण देखील अक्षरश: रोमांच उभे करणारं असतं, उघड्या मैदानावरील हजारोंचा श्रोतृवृंद स्तब्ध करून टाकणारं असतं!
अर्थातच माध्यमं असतात, शब्द आणि स्वर!
मग कसे असावेत बरं हे शब्द आणि स्वर?
(क्रमश:)
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
14 Dec 2007 - 1:50 am | सर्किट (not verified)
सुरुवात तर मस्त झाली आहे.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत !
- सर्किट
14 Dec 2007 - 4:26 am | बेसनलाडू
सहमत आहे.
(सहमत)बेसनलाडू
14 Dec 2007 - 1:53 am | मनोज
मन्या
14 Dec 2007 - 1:58 am | ऋषिकेश
>>..........मग कसे असावेत बरं हे शब्द आणि स्वर?.................
वा! छान सुरवात. पुढचा भाग लवकर टाका... प्रचंड उत्सुकता वाढली आहे
>>त्यामुळे मला कल्पना आहे की हा लेख वाचणारा प्रत्येकच वाचक काही ख्यालगायन ऐकणारा असेल असे नाही.
हे लक्षात घेऊन लेख येणार आहेत हे वाचून फार आनंद झाला. आमच्यासारख्या केवळ श्रवणभक्ती करणार्यांनाही संगीत-शास्त्रातील बारकावे, समजतील अश्या शब्दात कळले तर फार आनंद होईल. धन्यवाद!
-(पुढिल लेखाची वाट पाहणारा) ऋषिकेश
14 Dec 2007 - 7:48 am | सहज
+१
14 Dec 2007 - 2:14 am | धनंजय
मस्त विषयावर लेख.
पुढच्या भागांत एखादा एखादा यूट्यूब दुवा द्याल ("द्याल"=द्यावा, नागपुरी प्रयोग). म्हणजे आम्ही उदाहरणासह निर्गुण-सगुणांचे समांतर रसग्रहण करू.
14 Dec 2007 - 4:40 am | कोलबेर
वक्ता/ भाषण ह्या रुपकातुन ख्याला गायकी सारखा (आमच्या सारख्यांना समजण्यास अवघड) प्रकार समजवण्याची कल्पना खूप आवडली.
-कोलबेर
14 Dec 2007 - 4:49 am | नंदन
उत्तम सुरुवात झालीय, तात्या. किशोरी आमोणकर या स्वतंत्र विचाराच्या बुद्धिमान गायिका आहेत, असं वर्णन वेळोवेळी वाचलं आहे. त्याचा नक्की अर्थ काय हे या लेखमालेतून जाणून घ्यायला आवडेल.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
14 Dec 2007 - 9:25 am | आजानुकर्ण
पुढील भागाची प्रतीक्षा.
-०- आजानुकर्ण -०-
14 Dec 2007 - 10:54 am | आनंदयात्री
म्हणतो !
14 Dec 2007 - 9:54 am | राजीव अनंत भिडे
सुंदर लेख तात्या! पुढील भागांची वाट पाहात आहे.
तुझा,
(जिवाभावाच मित्र आणि पित्तु!)
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.
14 Dec 2007 - 11:04 am | विसोबा खेचर
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद.
शेवटी वक्तृत्व आणि गायन हे दोन्हीही अभिव्यक्तिचे विषय आहेत, दुसर्याशी संवाद साधण्याचे विषय आहेत, त्यामुळे या दोन माध्यमातील साम्यं पाहाणं किंवा त्यातील फरक शोधणं हा खरंच इंटरेस्टींग विषय आहे!
धन्याशेठ,
पुढच्या भागांत एखादा एखादा यूट्यूब दुवा द्याल ("द्याल"=द्यावा, नागपुरी प्रयोग). म्हणजे आम्ही उदाहरणासह निर्गुण-सगुणांचे समांतर रसग्रहण करू.
थोडं कठीणच वाटतंय, पण प्रयत्न जरूर करेन..
पुन्हा एकदा सर्व वाचकांचे मनापासून आभार!
बाकी मजेत! :))
तात्या.
14 Dec 2007 - 11:37 am | ध्रुव
पुढील भाग लवकर लिहा तात्या... :)
--
ध्रुव
14 Dec 2007 - 11:44 am | गारंबीचा बापू
तात्या,
मस्त लेखमाला. सुरूवात छान झालेय. पुढील लेखनही असेच होवो.
बापू
14 Dec 2007 - 12:13 pm | पुष्कर
वक्तृत्व आणि संगीत यांची आपण घातलेली सांगड खूपच आवडली. फक्त एकच पिंक टाकतो. शब्द हे सगुण आणि स्वर मात्र निर्गुण हे काही केल्या पटत नाही. स्वर हे देखील सगुणच आहेत. शब्दांची भाषा ही सर्वांनाच माहीत असल्यामुळे शब्दातून भावना लगेच डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण स्वर ही सुद्धा संगीताची भाषाच नव्हे काय? ती जाणणार्यांच्या डोळ्यासमोरही स्वर एखादे चित्र उभे करत नाहीत काय? दोन्ही विचार व्यक्त करण्याची वेगवेगळी माध्यमे आहेत असे वाटते. आता अण्णांची 'तीरथ को सब करे' ही चीज ऐकताना एखाद्याला तिलक-कामोद माहीत नसला तरी डोळ्यासमोर काहीतरी पवित्र, सुंदर, भक्तिपूर्ण चित्र उभे करण्याची ताकद त्यात आहे, हे आपल्यासारख्या जाणकाराला मी काय सांगावे?
पुढच्या भागांची आतुरतेने वाट बघतो आहे. (लहान तोंडी मोठा घास वाटत असल्यास)आगाऊपणाबद्दल क्षमस्व.
-पुष्कर
14 Dec 2007 - 12:34 pm | विसोबा खेचर
पुष्करसाहेब,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शब्द हे सगुण आणि स्वर मात्र निर्गुण हे काही केल्या पटत नाही. स्वर हे देखील सगुणच आहेत.
नक्कीच आहेत परंतु प्रथमदर्शनी ते निर्गुणच असतात/वाटतात. प्रत्येकजण त्यात आपापला अर्थ शोधतो. त्यानंतरच निर्गुण स्वरातली सगुणता ही त्या त्या श्रोत्याला दिसायला लागते! शब्दांचं तसं नाही. ते डायरेक्ट सगुणस्वरुपातच आपल्यासमोर येतात. अर्थात, हे माझं मत.
पण स्वर ही सुद्धा संगीताची भाषाच नव्हे काय?
नक्कीच आहे!
ती जाणणार्यांच्या डोळ्यासमोरही स्वर एखादे चित्र उभे करत नाहीत काय? दोन्ही विचार व्यक्त करण्याची वेगवेगळी माध्यमे आहेत असे वाटते.
मला वाटतं की सदर लेखात 'माध्यमे वेगळी आहेत' असंच मी म्हटलेलं आहे. किंबहुना स्वर डोळ्यासमोर एखादे चित्रं उभे करतात याच तत्वावर माझी बसंतचं लग्न ही लेखमालिका उभी आहे असं मला वाटतं!
आता अण्णांची 'तीरथ को सब करे' ही चीज ऐकताना एखाद्याला तिलक-कामोद माहीत नसला तरी डोळ्यासमोर काहीतरी पवित्र, सुंदर, भक्तिपूर्ण चित्र उभे करण्याची ताकद त्यात आहे, हे आपल्यासारख्या जाणकाराला मी काय सांगावे?
खरं आहे, आपण म्हणताय त्याच्याशी मीही सहमत आहे!
असो, पुनश्च एकदा धन्यवाद. लवकरच दुसरा भाग लिहितो..
अवांतर - अण्णांची 'तीरथ को सब करे' ही तिलककामोदातली झपतालातली बंदिश फारच सुरेख आहे. मूळची आग्रावाल्यांची आहे. पं उल्हास कशाळकरदेखील ही बंदिश फार सुरेख गातात. याच रागातली, 'मन मे मोहन बिराजे' ही एकतालातली द्रूत बंदिश मात्र सवाईगंधर्व गायचे तीच अण्णांकडूनही ऐकलेली आहे..
तात्या.
14 Dec 2007 - 6:11 pm | शलाका पेंडसे
छान विचार. पुढचा भाग केव्हा टाकणार?
18 Dec 2007 - 9:02 pm | वाटाड्या...
हे वाचुन, गायक ख्याल गात आहे हे कसे कळावे? ह्यावर काहि प्रकाश टाकु शकाल काय?
18 Dec 2007 - 9:44 pm | प्राजु
माझ्या आवडत्या विषयावर लेख आहे... सुरूवात छान झाली आहे, आणखी पुढेही लवकरच येऊदे.
- प्राजु.
19 Dec 2007 - 12:10 pm | धोंडोपंत
वा वा तात्या,
झकास आणि सुंदर लेख. क्या बात है !! आवडला
आपला,
(संगीतप्रेमी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
19 Dec 2007 - 11:57 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्या, लेख आवडला आणि उत्सुकता वाढली आहे.... एक विनंति, 'रेकमंडेड रिडींग' असते तसे 'रेकमंडेड लिसनिंग' सूचवा. युट्यूब मधे नाहि तर काही अन्य मार्ग....
आपला बिपिन.
20 Dec 2007 - 1:09 pm | विसुनाना
हात वाळतोय. पंगत खोळांबलीय. जरा लवकर वाढा..
आपल्या चौपाळातले चमचमीत पदार्थ -
रौशनी - ५
वसंताचं लग्न -१२
शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! -२
हस्ताक्षरावरून स्वभाव -??
20 Dec 2007 - 1:14 pm | स्वाती दिनेश
हात वाळतोय. पंगत खोळांबलीय. जरा लवकर वाढा..
आपल्या चौपाळातले चमचमीत पदार्थ -
असेच,विसुनानांसारखेच..:)
स्वाती
20 Dec 2007 - 4:17 pm | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार...
नानासाहेब,
हात वाळतोय. पंगत खोळांबलीय. जरा लवकर वाढा..
आपल्या चौपाळातले चमचमीत पदार्थ -
रौशनी - ५
वसंताचं लग्न -१२
शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! -२
हस्ताक्षरावरून स्वभाव -??
लवकरच सर्व लेखन पुरं करतो. सध्या जरा कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे जरा निवांत व स्वच्छंदपणे लेखन करावयास फारसा वेळ मिळत नाही. तरीही होणार्या विलंबाबद्दल क्षमस्व..
तात्या.
9 Nov 2012 - 2:11 pm | प्रास
हे असं आम्हा सामान्यांच्या भाषेत समजून सांगण्यासारखं संगीत विषयअला वाहिलेलं लिखाण सहसा का बरं वाचायला मिळत नाही?
आणि असं मिळूनही आम्ही आपले कोरडे ते कोरडेच राहणार कारण तात्याने ते पूर्ण तर केलं पाहिजे ना....
कुणीतरी सांगा रे तात्याला, वर विसुनाना म्हणत आहेत ते....
हात वाळतोय. पंगत खोळांबलीय. जरा लवकर वाढा..
आपल्या चौपाळातले चमचमीत पदार्थ -
रौशनी - ५
वसंताचं लग्न -१२
शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! -२
तेव्हा डिसेंबर २००७ आणि आता नोव्हेंबर २०१२
किती दिवस वाट बघायची ब्वॉ?
10 Nov 2012 - 9:24 am | चौकटराजा
प्रास राव संगीत या विषयाला वाहिलेलं लिखाण मराठीतही भरपूर आहे. वानगी दाखल - पुण्याच्या गानवधेन संस्थेने प्रकाशित केलेले व श्रीरंग संगोराम यानी संपादित केलेले " संगीत सुख संवाद " हे ५२ लेख असलेले पुस्तक आपण जरूर वाचावे. त्यात जाणकार कलावंत, समीक्षक यांचे उत्तमोत्तम लेख आहेत.ख्याल म्हणजे दीर्घावलेले गीत् अशीही ओ़ळख ख्यालाची होते, दमसास, स्वराचा लगाव, ताना पलटे पाठ करण्याचे महत्व, रागांग पद्धेतीने रागांची ओळख ( प्रचतित पद्धत -थाट पद्धत ) रियाझ ई. अनेक अंगावर त्यात प्रकाश टाकण्यात आला आहे.
माझा अनुभव असा की जसा गायनाचा रियाझ व तपश्च्यर्या असते तशी श्रवणाची ही असते. रागांची मांडणी, निरनिराळ्या
घराण्यांची ओळख ही आस्ते आस्ते होत जातेच. प्रत्येक घराण्यात कशाला महत्व द्यायचे हे ठरवूनच गायले जाते.