शिवधनुष्य एका हाताने सहज उचलले
भात्यामध्ये शब्दच होते, नंतर कळले
कवितेच्या दरबारी नवशब्दांची मनसब
मिळता कोठे झुकायचे ते नाही कळले
शब्दप्रभूंना वाट विचारीत इथवर आलो
शब्द कधी रक्तातच भिनले, नाही कळले
पुन्हा पुहा मी अंधाराशी केली सलगी
उजाडताना उल्कांचे व्रण शब्दच झाले
प्रतिक्रिया
31 Oct 2017 - 8:34 am | मारवा
शेवटच्या दोन ओळीत अगोदरच्या कवितेशी घेतलेली अर्थ फारकत मला तरी उमगली नाही.
कि शेर जसा एकेकटा स्वतंत्र स्वयंपुर्ण ही असतो उर्दु शायरीत तसा काहीसा प्रकार आहे हा ?
31 Oct 2017 - 9:23 am | अनन्त्_यात्री
प्रतिसादाबद्दल आभार.
शेवटच्या दोन ओळीत अगोदरच्या कवितेशी अर्थ-फारकत आहे असं मला वाटत नाही.
कवितेचा अर्थ "फोडून"सांगणं अवघड वाटतं पण....आधीच्या ओळींमध्ये अनुकूल परिस्थितीत शब्दांचा जीवनव्यापीपणा सांगितलाय तसाच शेवटच्या दोन ओळीत प्रतिकूल परिस्थितीला भिडताना जी संकटं कोसळली त्यांच्या आठवणी शब्दरूपातच आता माझ्याकडे उरल्यायत असं अभिप्रेत आहे.