मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
25 Oct 2017 - 4:34 pm

मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.
उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो. या लेखातील माहिती ही अधिकृत वैद्यकीय संस्थळावरून घेतलेली आहे, वृत्तपत्रातील बातम्यांवरून नाही.

या विषयावर १९९० पासून आजपर्यंत अनेक देशांत ३० मान्यताप्राप्त संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष अगदी टोकाचे उलट सुलट आहेत. त्यामुळे आपणच काय पण शास्त्रज्ञ सुद्धा अगदी गोंधळात पडले आहेत, हे नक्की. वाचकांचा कमीत कमी गोंधळ व्हावा असा प्रयत्न करत या विषयाचे थोडक्यात खालील मुद्दे मांडतो.

१) मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी या ‘ RF रेडिएशन’ प्रकारच्या असतात.
२) या लहरींमुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगाच्या संशोधनाचा मुख्य झोत आपला मेंदू व लाळग्रंथी यांवर आहे.
३) मोबाईल प्रचंड प्रमाणात वापरणाऱ्या लोकात मेंदूचा ‘ glioma’ हा रोग होण्याची शक्यता खूप आहे.
४) बरेचसे अभ्यास हे 2G फोन लहरींच्या संदर्भातले आहेत. काही अभ्यासामध्ये प्रयोगशाळेत ‘सेल कल्चर’ चा वापर झाला तर काहींमध्ये प्राण्यांवर प्रयोग झाले.

५) या फोनलहरी कर्करोगकारक (carcinogenic) आहेत की कर्करोगसहाय्यक (cocarcinogenic) या बाबतीत संशोधकांमध्ये खूप मतभेद आहेत. दोन्ही गट आपापल्या मतावर ठाम आहेत. अगदी आस्तिक व नास्तिक याप्रमाणे !

६) मोबाईलच्या शोधापूर्वी कर्करोग होण्याची जी कारणे प्रस्थापित झाली आहेत त्यामध्ये जनुकीय बदल (mutations) व अनेक प्रकारच्या रसायनांशी जवळचा व दीर्घकालीन संपर्क आणि विविध प्रकारची रेडीएशन ही महत्वाची आहेत. तंबाकूचे सेवन हे त्यापैकी एक उदाहरण.

७) त्यामुळे, शरीरात अयोग्य जनुकीय बदल झालेल्या एखादा माणूस जर दीर्घकाळ तंबाकूचे सेवन करीत असेल( किंवा अन्य रेडीएशन च्या संपर्कात असेल) आणि जोडीला त्याला मोबाईलचेही व्यसन जडले असेल तर त्याला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे यावर बऱ्याच संशोधकांचे एकमत दिसते.

८) ‘मोबाईल मुळे कर्करोग होतो’ या विधानापेक्षा ‘ शरीरात अगोदरच असलेली कर्करोगपूरक परिस्थिती मोबाईलमुळे अधिक रोगपूरक होते’ हे विधान अधिक मान्य होण्यासारखे आहे.
९) असे संशोधन प्राण्यांपेक्षा अधिकाधिक प्रमाणात थेट माणसांवर होणे आवश्यक आहे. परंतु, सध्या त्याला एका कारणाने मर्यादा येत आहेत.

संशोधन करताना माणसांचे २ गट करावे लागतात. एक गट अति मोबाइलचा वापर करणाऱ्यांचा तर दुसरा अजिबात मोबाईल न वापरणाऱ्यांचा. आता बघा, पहिला गट मिळणे अगदी सोपे आहे कारण सध्या ‘मोबाईल-अतिरेकी’ अगदी पोत्याने सापडतील. पण, अजिबात मोबाईल न वापरणारी माणसे खरेच दुर्मिळ आहेत ! प्रयोगापुरती तयार करायची म्हटली तरी त्याना दीर्घकाळ ( १०-२० वर्षे !) मोबाईलविना जगावे लागेल.
अहो, माणूस एकवेळ दारू-सिगरेट सोडेल हो, पण मोबाईल, छे काहीतरीच काय !
१०) तेव्हा सध्या एवढे करता येईल की ज्या व्यक्ती कर्करोगजन्य घटकांच्या संपर्कात आहेत (उदा. तंबाकू किंवा अन्य रेडीएशन) आणि मोबाईलचा अतिरेकी वापर करीत आहेत त्यांच्यावर दीर्घकाळ देखरेख व संशोधन करावे लागेल कारण गाठी तयार करणाऱ्या कर्करोगाची (solid tumors) वाढ ही संथ असते.
अलीकडे मोबाईल मुळे आपल्या आकलनशक्तीवर होणाऱ्या परिणामांवर बरेच संशोधन चालू आहे.

तर वाचकहो, अशी आहे ‘मोबाईल व कर्करोग’ या वादग्रस्त गृहीतकाबाबतची आजची परिस्थिती. समाजात यावर मतांतरे असणारच. शास्त्रीय वादविवादही झडत राहणार. कुठलाही ठोस निष्कर्ष काढणे सोपे नसणार. पण, मोबाईलचे व्यसन लागू न देता त्याचा मर्यादित वापर करणे आपल्या सगळ्यांच्याच हिताचे आहे यात शंका नाही.
****************************************

जीवनमानअभिनंदनलेख

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

25 Oct 2017 - 4:53 pm | मराठी_माणूस

मोबाइल टॉवरचा त्रास होतो हे ह्या बातमीवरुन दिसते

https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/man-wins-fight-against-...

बातमीशी सहमत आहे . अजून काही असे दावे वाचले आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2017 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच पेप्रात की कुठे तरी वाचलं की मोबाइल वापरामुळे कर्करोग होतो एक सेकंदभर गपगार आणि दुस-या क्षणी असल्या संशोधनाच्या बातम्या थोतांड असतात म्हणून सोडूनही दिलं.

दर दोन दिवसाला कोणत्या तरी परदेशी यूनवर्सिटीत असे संशोधन झाले अन तसे संशोधन झाले, परदेशी डॉक्टर तज्ञाची टीम ने असे केले आणि तसे केले आणि अमुक अमुक निष्कर्ष काढले. अरे शांततेने जगु द्या ना भो...!

सुरुवातीला टीव्ही आला तेव्हाही अशा बातम्या यायच्या, मधे ते पेजर होते तेव्हाही अशा बातम्या, कंप्यूटरच्या अतिवापरामुळे यो होतं आणि त्यों होतं, आता मोबाइलच्या अतिवापरामुळे असं होतं आणि तसं होतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम होतात एवढं मात्र कळतं.

अवांतर : मोबाइलच्या अति वापरामुळे कर्करोग होतो की नाही ते सांगता येणार नाही, पण दृष्टी मात्र कमी होत असावी असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(मोबाइलचं व्यसन असलेला)

कुमार१'s picture

26 Oct 2017 - 2:23 pm | कुमार१

धन्यवाद, दिलीप बिरुटे !

गामा पैलवान's picture

26 Oct 2017 - 7:50 pm | गामा पैलवान

कुमार१,

माझ्या माहितीप्रमाणे फिरस्त्या (=मोबाईल) मधले जे रेडियो असतात त्यातनं बाहेर पडणाऱ्या लहरींची शक्ती अत्यल्प असते. त्यातून कर्करोग होत नाही. मात्र तरंगस्तंभ ( = मोबाईल टॉवर्स) असतात त्यांतून बाहेर पडणारं प्रारण (=रेडियेशन) बरंच जास्त असतं. हे खरं घातक व कर्करोगजन्य असतं. कारण की स्तंभास असंख्य फिरस्ते जोडले गेलेले असतात. म्हणून एकेक फिरस्त्याचं प्रारण कमी शक्तीचं असलं तरी सगळ्यांची बेरीज बरीच होते.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

26 Oct 2017 - 8:14 pm | कुमार१

गा पै, सहमत आहे.

Nitin Palkar's picture

26 Oct 2017 - 8:31 pm | Nitin Palkar

बर्यापैकी सम्यक लिहिले आहे.

nanaba's picture

30 Oct 2017 - 11:08 pm | nanaba

आअपण मोबाईल वा परला नाही तरीही आपण आजूबाजूचे फोन , टौवर टा ळू शकत नाही. ऑफि स मधे एका फ्लोअर वर २५० फोन्स असतात.

जागु's picture

3 Nov 2017 - 12:22 pm | जागु

अगदी बरोबर.

कुमार१'s picture

31 Oct 2017 - 11:26 am | कुमार१

सहमत आहे

गेल्या २० वर्षात आपला टीव्ही, संगणक आणि मोबाइल यांचा वापर खूप वाढला. त्यातून जे 'प्रदूषण' होते त्याला आता वैज्ञानिकानी "electropollution" असे नाव दिले आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम हे संवेदनशील व्यक्तींमध्ये होउ शकतात. त्यामध्ये २ प्रमुख आजारांचा समावेश आहे:

१. आपली आकलनशक्ती (cognition) कमी होणे आणि
२. अल्झायमर आजार
भविष्यात या संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेल.